द्वारा- मा. अध्यक्ष, श्रीमती अंजली देशमुख
:- निकालपत्र :-
[मा. मंचाच्या दिनांक 31/03/2012 च्या आदेशानुसार सुधारित निकालपत्र]
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे-
1. तक्रारदार हे त्यांच्या पत्नी श्रीमती माला बी. फर्नांडीस यांचे कुलमुखत्यारधारक [पॉवर ऑफ अॅटर्नी होल्डर] आहेत. जाबदेणार यांनी तक्रारदारांना जी सदनिका ताब्यात दिली तीचे स्ट्रक्चर बेकायदेशिर आहे. FSI बेकायदेशिर आहे. जाबदेणार यांनी अद्यापपर्यन्त कंडोमिनीअम ऑफ अपार्टमेंट करुन दिलेले नाही. जाबदेणार यांनी मेंन्टेनन्सचा हिशेब दिलेला नाही. जिन्यात व पार्कींगमध्ये लाईट नाही. तक्रारदारांनी सर्व रक्कम किरण कन्स्ट्रक्शनला दिलेली आहे परंतू जाबदेणार आंबेकर होळकर कन्स्ट्रक्शन या नावाचा उल्लेख करतात. तक्रारदार, जाबदेणार यांनी जे बेकायदेशिर बांधकाम केलेले आहे ते पाडून मागतात, पुणे महानगरपालिकेच्या मंजूर नकाशाप्रमाणे बांधकाम मागतात. ओंकार अपार्टमेंट चे अपार्टमेंट कन्डोमिनीअम करुन मागतात. जाबदेणारांकडून खर्चाचा ताळमेळ [statement of account] मागतात. जाबदेणार यांनी किरण कन्स्ट्रक्शन चे नाव लावावे अशी मागणी करतात. तक्रारदारांनी प्रतिज्ञापत्र व कागदपत्रे दाखल केली.
2. जाबदेणार यांनी लेखी जबाब दाखल करुन तक्रारदारांच्या मागणीस विरोध दर्शविला. जाबदेणार यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदार हे त्यांचे ग्राहक नसून त्यांच्या पत्नी श्रीमती माला बी. फर्नांडिस या त्यांच्या ग्राहक आहेत. सदरील तक्रार अर्जात त्यांचा कुठेही उल्लेख नाही. तक्रारदार जाबदेणार यांचे ग्राहक नसल्यामुळे तक्रार नामंजुर करावी अशी मागणी जाबदेणार करतात. तक्रारदारांनी याच मंचामध्ये तक्रार क्र.पीडीएफ/374/2008
कन्डोमिनीअम ऑफ अपार्टमेंट करुन मिळण्यासाठी दाखल केली होती. या तक्रारीचा निकाल दिनांक 22/6/2009 रोजी मंचाने दिलेला आहे. त्यामुळे रेस ज्युडिकाटा या तत्वाची बाधा येत असल्यामुळे प्रस्तूत तक्रार खर्चासह नामंजुर करावी अशी मागणी जाबदेणार करतात. तक्रारदारांनी अनेक माहिती मा. मंचापासून लपवून ठेवली आहे. जाबदेणार यांनी मुळातच कुठलेही बेकायदेशिर बांधकाम केलेले नाही. पुणे महानगर पालिकेने मंजूर केलेल्या FSI पेक्षा अधिक क्षेत्राचे बांधकाम नाही. पुणे महानगर पालिकेने दिनांक 26/6/2008 रोजी भोगवटा पत्र [completion certificate] जाबदेणार यांना दिलेले आहे. जाबदेणार यांनी श्रीमती माला बी. फर्नांडिस यांना दिनांक 9/11/2009 रोजी अपार्टमेंट डीड करुन दिलेले आहे. दिनांक 23/8/2009 रोजी सर्व सदनिकाधारकांची संस्था स्थापन करुन दिनांक 29/8/2009 रोजी संस्थेच्या ताब्यात पुर्वीचे संपुर्ण हिशेब दिलेले आहेत. करारानुसार सर्व पुर्तता केलेली आहे. म्हणून सदरील तक्रार रुपये 5000/- कॉम्पेनसेटरी कॉस्ट सह नामंजुर करावी अशी मागणी जाबदेणार करतात. जाबदेणार यांनी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
3. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदारांनी याच मा. मंचासमोर तक्रार क्र.पीडीएफ/374/2008 कन्डोमिनीअम ऑफ अपार्टमेंट करुन मिळण्यासाठी दाखल केली होती. या तक्रारीचा निकाल दिनांक 22/6/2009 रोजी मंचाने दिलेला आहे, त्यात जाबदेणार यांनी तक्रारदारांच्या नावे डीड ऑफ अपार्टमेंट तीन महिन्यांच्या आत करुन दयावे असे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार जाबदेणार यांनी श्रीमती माला बी. फर्नांडिस यांना दिनांक 9/11/2009 रोजी अपार्टमेंट डीड करुन दिलेले आहे. जाबदेणार यांनी मंचापुढे दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता दिनांक 14/8/2008 रोजीच्या पत्राद्वारे श्रीमती माला बी. फर्नांडिस यांना डीड ऑफ अपार्टमेंट नोंदवून घेण्याबाबत कळविल्याचे दिसून येते. पुन्हा एकदा दिनांक 9/9/2009 रोजी श्रीमती माला बी. फर्नांडिस यांना पत्र पाठवून डीड ऑफ अपार्टमेंट करुन देण्याबाबत जाबदेणार इच्छूक आहेत असे त्यात नमूद केलेले आहे, परंतू तक्रारदारांचीच तशी इच्छा नसल्यास मा. मंचास तसे कळविण्यात येईल, असाही उल्लेख सदर पत्रात असल्याचे दिसून येते. दिनांक 23/8/2009 च्या किरण कन्स्ट्रक्शन्स च्या लेटर हेड वर सेक्रेटरी व अध्यक्ष यांची निवड केलेली असल्याचे दिसून येते. अध्यक्ष म्हणून श्री विनायक घुले तर सेक्रेटरी म्हणून श्री. विनोद आंबेकर यांची निवड झाल्याचे दिसून येते. दिनांक 29/8/2009 च्या पत्रावरुन किरण कन्स्ट्रक्शन्स ने नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. घुले व सेक्रेटरी श्री. आंबेकर यांना ओंकार अपार्टमेंटच्या मेन्टेनन्सचा व एम.एस.ई.बी लाईट बिल व वॉचमन पगारासाठी सभासदांकडून रोख स्वरुपात व चेक मध्ये घेतलेल्या रकामंचा हिशेब दिल्याचे दिसून येते. तसेच जमा खर्चाचा हिशेब दिलेला असल्याचे दिसून येते. किरण कन्स्ट्रक्शन्स यांच्या दिनांक 2/10/2009 च्या ओंकार अपार्टमेंट संबंधी खालील कागदपत्रे अध्यक्ष श्री. घुले व सेक्रेटरी श्री. आंबेकर यांच्याकडे सुपूर्द केल्याचे दिसून येते. -
1. विकसन करारनामा
2. कुलमुखत्यारपत्र
3. सर्टिफाइड प्लान
4. 7/12
5. बिल्डींगचे भोगवटा पत्र
6. मिटर विभागाची NOC
7. अतिक्रमण NOC
8. पथ विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र
9. गार्डन NOC
10. ड्रेनेज NOC
11. नळ कनेक्शन पावती
12. वॉटर लाईन डेव्हलपमेंट NOC
13. कमेन्समेंट
14. एन ए ऑर्डर
15. यु.एल.सी
16. डिक्लरेशन [DECLARATION]
ओंकार अपार्टमेंट संदर्भातील सर्व कागदपत्रे जाबदेणार यांनी सुपूर्द केल्याचे दिसून येते. यावरुन जाबदेणार यांनी करारानुसार सर्व बाबींची पुर्तता केल्याचे दिसून येते. तसचे जाबदेणार यांनी याच मा. मंचाने तक्रार क्र.पीडीएफ/374/2008 मध्ये दिनांक 22/6/2009 रोजी दिलेल्या आदेशाची पुर्तता केल्याचे दिसून येते. तरीसुध्दा तक्रादारांनी दिनांक 9/10/2009 रोजी प्रस्तूत तक्रार त्याच कारणांवरुन दाखल केलेली आहे. सी.पी.सी नुसार या तक्रारीस रेस ज्युडिकाटा या तत्वाची बाधा येते असे मंचाचे मत आहे. तक्रारदार श्रीमती माला बी. फर्नाडिस यांचे कुलमुखत्यार धारक आहेत. प्रस्तूतच्या तक्रारीत तक्रारदारांनी बेकायदेशिर बांधकाम पाडून टाकावे अशी मागणी केलेली आहे, परंतू बेकायदेशिर बांधकामासंदर्भातील पुरावा मात्र त्यांनी दाखल केलेला नाही. जाबदेणार यांनी कराराप्रमाणे पुर्तता केलेली असल्याचे दिसून येते. तक्रारदारांनी प्रस्तूतची तक्रार खोटी, जाबदेणार यांना त्रास देण्याच्या हेतुनेच दाखल केलेली असल्याचे निदर्शनास येते. म्हणून मंच सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 26 अंर्तगत रुपये 1000/- दंडासहित नामंजुर करते. तक्रारदारांनी रुपये 1000/- दंडापोटी जाबदेणार यांना दयावेत असा आदेश मंच देतो.
वरील विवेचनावरुन व कागदपत्रांवरुन खालीलप्रमाणे आदेश देण्यात येत आहे-
:- आदेश :-
[1] तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 26 अंर्तगत नामंजुर करण्यात येते.
[2] तक्रारदारांनी दंडापोटी रुपये 1000/- जाबदेणार यांना या आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून चार आठवडयांच्या आत अदा करावेत.
[3] आदेशाची प्रत दोन्ही पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.