जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2008/164 प्रकरण दाखल तारीख - 28/04/2008 प्रकरण निकाल तारीख – 28/04/2009 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्री.सतीश सामते - सदस्य श्यामसिंह पि.गुरुसिंह बिसेन, अर्जदार. वय वर्षे 40, व्यवसाय श्याम टॉकीज, रा.नांदेड. विरुध्द. 1. किरण बॅटरीज, गैरअर्जदार. तर्फे प्रोप्रायटर, बाफना मोटर्स जवळ, खालसा विद्यालय, हैद्राबाद रोड, नांदेड. 2. उत्पादक,एक्साईड बॅटरी, तर्फे कार्यकारी संचालक/पुरवठा अधिकारी, रजि,ऑफीस, एक्साईड हाऊस, 59 ई, चौरंगी रोड, कलकत्ता 700020. मार्फत त्यांचे अधिकृत विक्रेते गैरअर्जदार क्र. 1 नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड. यु.पी.ठाकुर. गैरअर्जदार क्र.1 - नो से गैरअर्जदार क्र. 2 - एकतर्फा. निकालपञ (द्वारा-मा.श्री.सतीश सामते,सदस्य) गैरअर्जदार यांच्या सेवेच्या त्रुटीबद्यल अर्जदार आपल्या तक्रारीत म्हणतात ते श्याम टॉकीजचे मालक असुन गैरअर्जदार क्र. 2 या कंपनीचे डिलर गैरअर्जदार क्र. 1 यांच्याकडुन एक्साईडची बॅटरी दि.08/08/2006 रोजी रु.7,100/- नगदी देऊन विकत घेतले. बिल क्र.251 द्वारे बॅटरीची 24 महिन्याची वॉरंटी गैरअर्जदार क्र. 1 ने दिली होती. बॅटरी एक वर्ष कसेबसे चालली त्यानंतर डिस्चार्ज होणे, बंद पडणे असे होवू लागले म्हणुन गैरअर्जदार क्र. 1 यास दाखविले असता, त्यांनी ती बॅटरी गैरअर्जदार क्र.2 कडे पाठवुन नविन बॅटरी मागवुन देतो, असे सांगीतले परंतु आजपर्यंत बॅटरी दिली नाही, नंतर बॅटरी देण्यास नकार दिला, म्हणुन अर्जदाराने वकीला मार्फत दि.14/02/2008 कायदेशिर नोटीस पाठविली, त्याचे गैरअर्जदाराने आजपर्यंत कोणतेही उत्तर दिले नाही म्हणुन अर्जदाराची मागणी आहे की, अर्जदारास नुकसान भरपाईसह नविन बॅटरी देण्याचे आदेश करावेत किंवा खरेदी किंमत रु.7,100/- हे व्याजासह द्यावेत तसेच मानसिक त्रासाबद्यल रु.10,000/- मिळावेत म्हणुन हा तक्रारअर्ज अर्जदार दाखल केलेला आहे. गैरअर्जदार क्र. 1 हे वकीला मार्फत हजर झाले परंतु त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल न केल्यामुळे नो से आदेश करुन प्रकरण पुढे चालविण्यात आले. यानंतर गैरअर्जदार क्र. 2 यांना आर.पी.ए.डी.द्वारे नोटीस पाठविण्यात आली, ज्याची पोष्टाने पोहच पावती क्र.4750 दि.18/12/2008 ची आर.पी.ए.डी. दि.26/12/2008 रोजी गैरअर्जदारांना मिळाल्याचा रिपोर्ट पोष्टाने दिला आहे. या आधारे गैरअर्जदार क्र. 2 यांना नोटीस मिळुनही ते या प्रकरणांत हजर झाले नाही. म्हणुन त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश करुन प्रकरण पुढे चालविण्यात आले. अर्जदाराने पुरावा म्हणुन आपले शपथपत्र दाखल केलेले आहे. त्यांनी दाखल केलेले कागदपत्र बारकाईने पाहुन व वकिला मार्फत केलेला युक्तीवाद ऐकुन खालील मुद्ये उपस्थीत होतात. मुद्ये. उत्तर. 1. गैरअर्जदारांच्या सेवेतील त्रुटी सिध्द होते काय? होय. 2. काय आदेश? अंतीम आदेशा प्रमाणे. कारणे मुद्या क्र. 1 अर्जदारांनी गैरअर्जदार क्र.1 किरण बॅटरीजचे बिल क्र.251 दि.08/08/2006 चे दाखल केले आहे, त्यावर एक्साईड बॅटरी किंमत रु.7,100/- ला विकत घेतल्याची नोंद आहे. एक्साईड बॅटरीची वॉरंटी कार्ड दाखल केले असून कोड क्र. 3 पी 6 बॅच नंबर 13476 यावर 24 महिन्याची वॉरंटी एक्साईड कंपनीने दिली आहे, गैरअर्जदार क्र. 1 हे वितरक आहेत, निर्माते कंपनीची वॉरंटीबद्यल पुर्णतः जबाबदारी येते व बॅटरी वॉरंटी कालावधीत जर खराब झाले असेल तर कंपनीने ते बदलुन देणे आवश्यक आहे, असे असतांना नांदेड येथील एक्साईड बॅटरीचे वितरक गैरअर्जदार क्र. 1 हे समोर येत नाही व म्हणणेही देत नाही. कंपनी व अर्जदार यातील वितरक हे दुवा आहेत. म्हणुन त्यांच्यावर नैतीक जबाबदारी येते की, त्यांनी ग्राहकास चांगली सेवा पुरवावी व कंपनीकडुन ते बॅटरी बदलुन अर्जदारास द्यावी. बॅटरी 12 महीनेच चालली असे अर्जदाराचे म्हणणे आहे, मग ही बॅटरी 12 महीनेच चालली असतांना ते गैरअर्जदार क्र. 1 यांचेकडे कधी वापस दिली याबद्यलचा पुरावा किंवा तारीख अर्जदाराने दिले नाही, या विषयी गैरअर्जदार क्र.1 यांना आपले म्हणणे मांडता आले असते परंतु संधी मिळुनही त्यांनी आपले म्हणणे मांडले नाही, याचा अर्थ अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 1 यांचेकडे 12 महिन्यानंतर बॅटरी दिली असा घ्यावयास हरकत नाही. वॉरंटी कालावधीमध्ये बॅटरी असेल तर ती कंपनीकडुन बदलुन देण्याची नैतीक जबाबदारी गैरअर्जदार क्र. 1 वर येते, असे गैरअर्जदार क्र.1 ने न केल्यामुळे सेवेत त्रुटी झाली आहे. वरील सर्व बाबींचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश. अर्जदाराचा तक्रारअर्ज मंजुर करण्यात येतो. 1. गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी एकत्रितरित्या व संयुक्तीकरित्या अर्जदारास एक्साईड कंपनीची बॅटरी कोड नंबर 3 पी 6 बॅच नंबर 13476 याच सारखी नविन बॅटरी बदलुन द्यावी किंवा असे न केल्यास बॅटरीची किंमत रु.7,100/- व त्यावर प्रकरण दाखल केलेली तारीख दि.02/05/2008 पासुन 9 टक्के व्याजाने पुर्ण रक्कम मिळेपर्यंत व्याजासह द्यावे. 2. पहील्या ऑपशनवर बॅटरी बदलुन दिल्यास, पुढील व्याज फक्त द्यावे. 3. अर्जदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी रु.3,000/- व दावा खर्चापोटी रु.1,000/- देण्यात यावे. 4. संबंधीत पक्षकार यांना निकाल कळविण्यात यावे. (श्री.बी.टी.नरवाडे पाटील) (श्री.सतीश सामते) अध्यक्ष सदस्य गो.प.निलमवार.लघूलेखक. |