अर्जदारासाठी प्रतिनिधी श्री.हितेश पटेल. गैर अर्जदारासाठी वकील श्री.शिवाजी मासाळ व श्री.पाटोळे. मा.अध्यक्षानुसार दिलेले निकालपत्र. तक्रारदाराची थोडक्यात तक्रार खालील प्रमाणे. 1. तक्रारदार हे मे.टेक्नोक्राप्ट इंडस्ट्रीज लि.कंपनीचे अध्यक्ष आहेत. सदरहू कंपनी माल तंयार करणे व त्याची निर्यात करणे हा व्यवसाय करते. तक्रारदार हे कलकत्ता येथे गेले होते. कलकत्याहून मुंबईला येण्यासाठी त्यांनी एअर डेक्कन फ्लाईट डी.एन. 642 या विमानाचे दिनांक 02/05/2006 चे तिकिट घेतलेले होते. त्याचा पी.एन.आर. क्र.डी.ए.03427458 असा होता. विमानाची कलकत्ता विमानतळावरुन निघण्याची वेळ सकाळी 8.50 अशी होती. विमान निघण्यापूर्वी सामनेवाले यांनी एस.एम.एस. ने कळविले की, विमानाची सुटण्याची वेळ 8.50 ऐवजी दुपारी 12.25 ची झालली आहे. विमान सुटण्यास अजून 4 तासाचा अवधी होता. म्हणून तक्रारदार पुन्हा परत गावात हॉटेलमध्ये गेला. त्यानंतर पुन्हा एस.एम.एस. आला की, विमानाची सुटण्याची वेळ दुपारी 12.30 ची आहे. तक्रारदार 11.00 वाजता चेकींगसाठी विमानतळावर गेला. त्यावेळी सामनेवाले यांनी सांगीतले की, ते विमान रद्द करण्यात आले. 2. तक्रारदाराचे म्हणणे की, त्याला दिनांक 02/05/2006 रोजी दुपारी 1.00 वाजता मुंबई येथे महत्वाची मिटींग होती. म्हणून त्यांनी ग्राहकांना कळविले व मिटींगची वेळ बदलून 4.00 वाजता ठेवली. त्यांनी सामनेवाले यांना जेट ऐअरवेजच्या विमानाने जाण्याची व्यवस्था करावी अशी विनंती केली. जेट ऐअरवेजचे ते विमान दुपारी 1.30 वाजता सुटणार होते. त्यांनी असे सांगीतले की, त्या विमानाने जाण्याची व्यवस्था केली तर ते मिटींगला हजर राहू शकतील. जेट ऐअरवेजच्या विमानाची सीट उपलब्ध होती. तरी ऐअर डेक्कन ऐअरवेजने तक्रारदारांची विनंती मान्य केली नाही, व त्याला त्या दिवशी दुपारी 5.25 वाजता सुटणा-या फ्लाईट क्र.डी.एन.681 चे तिकेट घ्यायला लावले. त्यामुळे त्यांचे ग्राहकांनी मिटींग रद्द केली व त्याला आर्थिक नुकसान झाले. 3. तक्रारदाराचे म्हणणे की, या घटनेमुळे त्यांना खुप मानसिक त्रास झाला. त्यांचे ग्राहक परदेशातून मिटींगसाठी येणार होते व मिटींग होताच ते निघून जाणार होते. त्यांनी सामनेवाले यांना त्याच दिवशी कलकत्ता विमानतळावर पत्र देऊन 5 लाख रुपयाच्या नुकसान भरपाईची मागणी केली. त्यानंतरही पत्र व्यवहार केला. सामनेवाले यांनी त्यांना विमानाचे एक खास तिकेट देऊ केले. तक्रारदाराने त्यांचा तो प्रस्ताव नाकारला. सामनेवाले यांनी मागीतलेली नुकसान भरपाई न दिल्यामुळे सदरहू तक्रार दाखल करुन खालील प्रमाणे मागण्या केल्या आहेत. ए) कलकत्ता शहरात जाण्या येण्याचा, राहण्याचा खर्च रु. 3500/- बी) खाण्या पिण्याचा खर्च रु. 1300/- सी) त्याला जे फोन वगैरे करावे लागले त्याचा खर्च रु.1800/- डी) व्यापाराचे नुकसान झाले त्याचा खर्च रु.3,80,000/- इ) मानसिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई 1,13,000/- फ) किरकोळ खर्च रु. 400/- असे एकूण रुपये 5,00,000/- येवढया रकमेची मागणी केली आहे. 4. एअर डेक्कन यांनी त्यांची कैफीयत देऊन तक्रारदाराचे आरोप नाकारले. त्यांचे म्हणणे की, तांत्रिक कारणामुळे जे त्यांच्या नियंत्रणाबाहेर होती त्यासाठी विमान रद्द करावे लागले. तक्रारदाराने पसंती दिल्यावरुन त्यांचे तिकिट त्याच दिवशी निघणा-या फ्लाईट डी.एन.681 साठी नक्की केले. व त्यासाठी जास्तीचे पैसे घेतले नाही. ते फ्लाईट त्या दिवशी 5.25 वाजता निघणार होते. तक्रारदाराने त्या विमानाने प्रवास केला. त्यामुळे सदरहू तक्रार दाखल करण्यासाठी काही कारण घटले नाही. 5. सामनेवाले यांचे म्हणणे की, तक्रारदार हे मे.टेक्नोक्राप्ट इंडस्ट्रीज लि.कंपनीचे अध्यक्ष आहेत. ते व्यवसायाचे निमित्ताने कलकत्यास आले होते. त्यांनी तिकिट व्यवसायाचे उद्देशाने घेतले होते. त्यामुळे ते ग्राहक संरक्षण कायद्याखाली ग्राहक होत नाही. सा.वाले सेवेत काही न्यूनता नाही. म्हणून सदरहू तक्रार रद्द करण्यात यावी. 6. तक्रारदाराला आर्थिक नुकसान झाले, त्याची गैरसोय झाली, हे सामनेवाले अमान्य करतात. त्यांचे म्हणणे की, अगदी सुरवातीला त्यांनी तक्रारदाराला सांगीतले की, डी.एन.642 या विमानात तांत्रिक दोष आहे. दुसरे विमान त्याच दिवशी 5.25 वाजता कलकत्याहून निघेल. त्यांना असेही सांगीतले होते की, त्या विमानाने जाण्यास त्यांना जादा रक्कम भरावी लागणार नाही. म्हणून तक्रारदाराने त्या विमानाने जाण्याची पसंती दर्शविली. तक्रारदाराला माहित होते की, सामनेवाले यांच्या विमानाचे भाडे इतर विमान कंपनीच्या दरापेक्षा बरेच कमी आहे. तिकीटाच्या शर्ती व अटी मध्ये विमान रद्द झाले तर त्या विमानाऐवजी कंपनी दुस-या विमानाची व्यवस्था करुन देईल असे म्हटलेले नव्हते. प्रवाशांची लगेचच त्यानंतर निघणा-या विमानामध्ये व्यवस्था करण्यात येईल असे सांगीतले होते. त्यांचे म्हणणे की, जेट एअरवेजचे भाडे रु.7000/- होते. ते त्यांच्या विमानाच्या भाडयापेक्षा म्हणजे रु.2928.95 पेक्षा बरेच जास्त होते. त्यांनी तक्रारदाराला मुंबई ते कलकत्ता याचे एक तिकिट पैसे न घेता देऊ केले होते. परंतु तक्रारदार त्याचेसाठी व त्यांच्या संपूर्ण फॅमिलीसाठी तिकिटाची मागणी करीत होते. त्यांची ती मागणी गैरवाजवी असल्यामुळे, त्यांनी ती स्विकारली नाही. सामनेवाले यांचे म्हणणे की, हवामन खराब असल्यामुळे विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाला, तसेच अति महत्वाचे लोकांनी चळवळ व त्यासाठी विमानतळ बंद राहणे इ. वस्तुस्थिती असेल तर सामनेवाले यांना तिकिट रद्द करणे किंवा उशिर करणे हाच पर्याय उपलब्ध असतो. तसेच सामनेवाले यांच्या झालेल्या करारानुसार एअर डेक्कनला प्रवाशांना नोटीस न देता विमानाचे उड्डाणात बदल करण्याचा हक्क आहे. सामनेवाले यांनी कराराच्या संबंधीत शर्ती व अटी कैफीयतीत नमुद केल्या आहेत. सामनेवाले यांचे म्हणणे की, प्रवाशांच्या बँगेजेस दुस-या एअर लाईन्सच्या विमानात ट्रान्स्फर करण्याची त्यांची जबाबदारी नाही. जर वातावरणाचे कारणावरुन किंवा तांत्रिक कारणावरुन विमान रद्द करावे लागले किंवा विमानाच्या वेळेत बदल झाला व विमान सुटण्यास उशिर झाला, तर त्यांचे सेवेत न्यूनता म्हणता येत नाही किंवा त्यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला असे म्हणता येत नाही. तक्रारदारास कलकत्याहून निघण्यास जो उशीर झाला तो विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे झाला. त्यात त्यांच्या सेवेत न्यूनता नाही. म्हणून तक्रार रद्द करण्यात यावी. 7. तक्रार प्रलंबीत असताना एअर डेक्कन किंग फीशर एअर लाइन्समध्ये विलीन झाली. तक्रारदाराने तक्रारीत दुरुस्ती करुन एअर डेक्कनला वगळले व त्याऐवजी किंग फीशर एअर लाइन्स यांना पक्षकार केले. त्यांनी पुरसीस देऊन डेक्कन एअरवेजने दिलेली कैफीयत अंगीकृत केली. 8. आम्ही तक्रारदारांतर्फे प्रतिनिधी श्री.हितेश पटेल यांचा तोंडी युक्तीवाद ऐकला. आज तोडी युक्तीवादाचे वेळी सामनेवाले यांचेतर्फे कुणीही हजर नव्हते. आम्ही कागदपत्रं वाचली. सामनेवाले यांनी दिलेला लेखी युक्तीवादही वाचला. सदरहू तक्रारीत निकालासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. अ.क्र. | मुद्दे | उत्तर | 1. | कलकत्याहून निघण्यास तक्रारदाराला उशिर झाला यात सामनेवाले यांचे सेवेत न्यूनता आहे असे तक्रारदार सिध्द करतात काय ? | होय | 3. | सामनेवाले यांचे सेवेत न्यूनता असल्यास तक्रारदाराला किती नुकसान भरपाई मिळण्याचा अधिकार आहे. | अंतीम आदेशाप्रमाणे. |
9. दिनांक 02/05/2006 रोजी तक्रारदाराने सामनेवाले यांच्या डी.एन.642 चे विमानाचे तिकिट घेतले होते, ते कलकत्याहून सकाळी 8.50 वाजता निघणार होते, ते विमान सामनेवाले यांनी रद्द केले, म्हणून तक्रारदाराला सामनेवाले यांच्या विमान डी.एन.681 ने मुंबईला यावे लागले, ते कलकत्याहून 5.25 वाजता निघाले याबद्दल उभय पक्षकारात दुमत नाही. 10. सामनेवाले यांचे म्हणणे की, तक्रारदाराची ही बिझनेस टूर होती. व त्यांनी सदरहू टूरसाठी तिकिट घेतले असल्यामुळे ते ग्राहक होत नाहीत. मंच सामनेवाले यांच्या या म्हणण्याला सहमत नाही. तक्रारदाराने त्यांच्या प्रतिउत्तरामध्ये म्हटले आहे की, ते त्यांच्या शालकाचे हग्नाला हजर राहण्यासाठी कलकत्यास गेले होते. तक्रारदार हे बिझनेस टूरवर गेलेले होते असे त्यांनी म्हटलेले नाही, व सामनेवाले यांनी सिध्द केलेले नाही. त्यामुळे तक्रारदार ग्राहक नाहीत आहे म्हणता येत नाही. सामनेवाले यांचा हा मुद्दा नाकारण्यात येतो. 11. सामनेवाले यांचे म्हणणे की, डी.एन.642 हे विमान टेक्नीकल कारणामुळे रद्द करंण्यात आले. मात्र त्या बद्दलचा काही लेखी पूरावा सामनेवाले यांनी दाखल केलेला नाही. त्यामुळे सामनेवाले यांचे हे म्हणणे मान्य करता येत नाही. 12. सकाळी 8.50 वाजता निघणारे विमान रद्द झाल्यामुळे तक्रारदाराला मुंबईस पोहचण्यास उशिर झाला. कारण सामनेवाले यांच्या ज्या विमानाने त्यांनी प्रवास केला ते कलकत्याहून त्याच दिवशी 5.25 वाजता निघाले. म्हणजे विमान निघण्यास जवळ जवळ 9 तास उशिर झाला. सहाजिकच मुंबईला पोहचण्यासाठी त्याला उशिर झाला असणार. सामनेवाले यांनी तांत्रिक कारणामुळे विमान रद्द केले हे सिध्द केलेले नसल्यामुळे तक्रारदाराला जो उशिर झाला ही सामनेवाले यांच्या सेवेतील न्यूनतेमुळे झाला हे स्पष्ट आहे. मात्र तक्रारदाराला जेट एअरवेज विमानाने पाठविण्याची सामनेवाले यांनी व्यवस्था केली नाही ही सामनेवाले यांच्या सेवेत न्यूनता होत नाही. कारण तक्रारदाराने दिनांक 02/05/2006 च्या सामनेवाले यांना दिलेल्या पत्रावरुन हे दिसून येते की, जेट एअरवेजच्या विमानाचे भाडे हे डेक्कन एअरवेजच्या विमानापेक्षा जास्त होते, व या पत्रात तक्रारदाराने यांनी म्हटले आहे की, जेट एअरवेजचे तिकिट खरेदी करण्यासाठी त्यांचे जवळ पैसे नाहीत. 13. सामनेवाले व तक्रारदार यांचेमध्ये झालेल्या पत्र व्यवहारावरुन असे दिसते की, सामनेवाले यांनी तक्रारदाराला कलकत्ता ते मुंबई किंवा मुंबई ते कलकत्ता या प्रवासाचे एक खास तिकिट फ्री देऊ केले होते. त्या तिकिटाचा उपयोग तक्रारदाराला दिनांक 31 मार्च,2007 पर्यत करावयाचा होता. तक्रारदाराने सामनेवाले यांचा हा प्रस्ताव नाकारला. कारण 31/03/2007 पर्यत त्यांना अमेरीका व इतर देशात जावयाचे असल्याने त्यांना कलकत्यास जाणे शक्य नव्हते. त्यांनी सामनेवाले यांना असेही कळविले होते की, त्याला झालेल्या खर्चाबद्दल त्याचा हक्क अबाधीत ठेऊन सामनेवाले त्यांना जर त्याच्यासाठी व त्यांच्या पत्नीसाठी भारतातील प्रवासासाठी तिकिट दिले तर ते आपसात समझोता करु शकतील. सदरहू विनंती सामनेवाले यांनी मान्य केलेली दिसत नाही. 14. तक्रारदाराला निघण्यास 9 तास उशिर झाल्यामुळे तेथे हॉटेलमध्ये राहण्याचा, जेवण्याचा, तसेच घरी , ऑफीसमध्ये फोन वगैरे करण्याचा खर्च तक्रारदाराला करावा लागला असेल हे मान्य करण्यासारखे आहे. तक्रारदार यांनी या बाबतचा जरी कागदोपत्री पुरावा दिलेला नाही तरी त्याला वाजवी नुकसान भरपाई देणे योग्य आहे. 15. तक्रारदाराने त्याला व्यवसायीक नुकसान झाले या बद्दल नुकसान भरपाई रुपये 3,80,000/- मागीतली आहे. मंचाचे मते ही नुकसान भरंपाई तक्रारदाराला देणे योग्य नाही. कारण तक्रारदाराची परदेशीयासोबत त्या दिवशी मिटींग होती, याबद्दल त्यांनी काहीही लेखी पूरावा दाखल केलेला नाही. मिटींग रद्द झाल्यामुळे प्रत्यक्षात त्यांचे कसे व कोणते नुकसान झाले या बद्दलचा तक्रारदाराने लेखी काही पुरावा दाखल केलेला नाही किंवा त्याबाबत सविस्तर माहिती दिलेली नाही. म्हणून तक्रारदाराची ही नुकसान भरपाईची ही मागणी नाकारण्यात येते. तक्रारदाराने किरकोळ खर्चासाठी रु.400/- ची मागणी केलेली आहे, ती तक्रारदारास मंजूर करणे योग्य आहे. 16. कलकत्याहून विमान निघण्यास 9 तासाचा उशिर झाल्यामुळे तक्रारदाराला मानसिक त्रास होणे व त्याची गैरसोय होणे हे साहजिकच आहे. त्यासाठी त्याला वाजवी नुकसान भरपाई देणे योग्य वाटते. 17. वरील परिस्थितीचा सारासार विचार करुन मंचाचे मते खालील आदेश न्यायाच्या हिताच्या दृष्टीने योग्य आहे. आदेश 1. तक्रार क्र. 382/2006 अंशतः मंजूर करण्यात येते. 2. सामनेवाले यांनी तक्रारदाराला नुकसान भरपाईपोटी खालील प्रमाणे रक्कमा अदा कराव्यात. 1) विमानाचे उड्डाणाला उशिर झाल्यामुळे विमान तळावरुन कलकत्ता शहरात येण्या-जाण्याचा खर्च रु.3000/- 2) खाण्या- पिण्याचा खर्च रु.1000/- 3) फोन वगैरे करण्यासाठी झालेला खर्च रु.1000/- 4) मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई रु.10,000/- 5) तक्रारीचा खर्च रु. 400/- असे एकूण रु.15,400/- ------------ सदरहू रक्कम सामनेवाले यांनी तक्रारदाराला सदर आदेशाची प्रमाणित प्रत मिळाल्यानंतर एक महिन्याचे आत द्यावी अन्यथा विलंबापोटी सदरहू रक्कमेवर द.सा.द.शे. 9 दराने व्याज देण्यास सामनेवाले जबाबदार राहातील. 3. आदेशाच्या प्रमाणित प्रती दोन्ही पक्षकारांना विनामूल्य पाठविण्यात याव्या.
| [HONORABLE G L Chavan] Member[HONABLE MRS. JUSTICE S P Mahajan] PRESIDENT | |