निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा *-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-* आदेश 1. सा.वाले क्र.1 हे विमान प्रवास सेवा पुरविणारी कंपनी आहे. तर क्र.2 ही सा.वाले क्र.2 यांची एजंट आहे. तक्रारदाराने स्वतः व त्यांचे कुटुंबिय मुंबई ते गोहाट्टी येथे दिनांक 6.11.2007 रोजी प्रवास करणार असल्याने त्यानी तिकिट दिनांक 19.9.2007 रोजी सा.वाले क्र.2 यांचेमार्फत काढले होते. विमान सुटण्याची वेळ तिकिटावर 6 नोव्हेबर सकाळी 11.00 वाजता अशी लिहिली होती. तक्रारदाराच्या तक्रारीतील कथनाप्रमाणे दि.6.11.07 रोजी तक्रारदार व त्यांचे कुटुंबीय सकाळी 10.10 मिनिटांनी पोहोचले. त्यांचे सामानसुमानाची तपासणी करण्यात आली व त्यानंतर 10.30 वाजता तक्रारदारांना सांगण्यात आले की, विमान पुर्विच रवाना झालेले आहे. त्यानंतर तक्रारदाराने सा.वाले क्र.1 यांच्या विमानतळावरील अधिकारी यांचेशी संपर्क साधला त्यांनी त्यांना योग्य तो प्रतिसाद दिला नाही. अंतीमतः तक्रारदाराने विमानतळावर नविन तिकिट खरेदीकरुन मुंबई हे गोहाट्टी असा प्रवास केला. सा.वाले यांच्या अधिका-यांनी तक्रारदारांना विमान तिकिटाचे खर्चात कोणतीही सुट देण्यास नकार दिला. त्याचप्रमाणे तिकिटाची रक्कम परत करण्यास नकार दिला. अंतीमतः तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार दाखल करुन सा.वाले यांनी तक्रारदारांना विमान प्रवासाचे संदर्भात सेवा पुरविण्यास कसुर केली असे कथन करुन 2 लाख रुपयाची नुकसान भरपाई मागणी केली. 2. सा.वाले क्र.1 यांनी आपली कैफियत दाखल केली व त्यामध्ये असे कथन केले की, तक्रारदाराने विमानाचे तिकिट खरेदी केल्यानंतर विमानाचे वेळेमध्ये बदल करण्यात आला होता व विमान सुटण्याची वेळ 11.00 ऐवजी 10.30 करण्यात आली होती. तक्रारदाराने त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक दिलेला नसल्याने तक्रारदारांना बदललेल्या वेळेची माहिती पुरविण्यात आलेली नाही. सा.वाले यांनी असेही कथन केले की, तक्रारदार विमान सुटण्यापूर्वी 75 मिनिटे विमानतळावर पोहोचले नाहीत तर 10.30 वाजताचे सुमारास विमानतळावर पोहोचले व बदललेल्या वेळेनुसार 10.30 वाजता गोहाट्टीकडे विमान रवाना झाले. या प्रकरणी सा.वाले यांनी तक्रारदार हेच स्वतः निष्काळजीपणे वागले व तक्रारदाराने विमान प्रवासाचे संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यास कसुर झाला या आरोपास नकार दिला. 3. तक्रारदाराने सा.वाले यांची कैफियत प्राप्त झाल्यानंतर आपले प्रतिउत्तर दाखल केले. व त्यामध्ये आपल्या पुराव्याचे शपपत्र तसेच तक्रारीतील कथनांचा पुर्नउच्चार केला. दोन्ही पक्षकारांनी आपला लेखी युक्तीवाद दाखल केला. 4. प्रस्तुत मंचाने उपलब्ध पुराव्याचे, कागदपत्राचे एकत्रित वाचन केले. त्यावरुन तक्रार निकालीकामी खालील मुद्दे उपस्थित होतात. अ.क्र. | मुद्दे | उत्तर | 1 | सा.वाले यांनी तक्रारदार व त्यांचे कुटुंबिय यांचे दि.6.11.2006 राजीच्या मुंबई गोहाट्टी विमान प्रवासाचे वेळेचे संदर्भात तक्रारदाराची दिशाभूल केली व सेवा सुविधा पुरविण्यास कसुर केली ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय ? | नाही. | 2 | तक्रारदार सा.वाले यांचेकडे नुकसान भरपापाईची दाद मिळण्यास पात्र आहे काय ? | नाही. | 3 | अंतीम आदेश | तक्रार रद्द करण्यात येते. |
कारण मिमांसा 5. तक्रारदाराने आपल्या तक्रारीसोबत त्यांचे पुराव्याचे शपथपत्र, तिकिटाची छायांकित प्रत, हजर केलेली आहे. त्यामध्ये विमान प्रवासाचा वेळ मुंबई ते गोळाट्टी दि.6.11.2007 रोजी 11.00 वाजता होता असे दिसून येते. तथापी सा.वाले यांनी आपल्या कैफियतीमध्ये परिच्छेद क्र.7 मध्ये असे स्पष्टपणे नमुद केले आहे की, तक्रारदाराने 19 ऑक्टोबर, 2007 रोजी विमानाचे तिकिट खरेदी केल्यानंतर विमान सेवा संचालक यांच्या आदेशाप्रमाणे 6 नोव्हेंबर, 2007 रोजी मुंबई ते गोहाट्टी ही विमानाची वेळ 11.00 चे ऐवजी 10.30 करण्यात आली. कैफियतीमध्ये असेही कथन करण्यात आले की, हिवाळयामध्ये विमान सेवेच्या वेळात विमान सेवा संचालक यांचे आदेशाप्रमाणे 28 ऑक्टोबर, 2007 रोजी पासून मुंबई ते गोहाट्टी जाणा-या विमान वेळेमध्ये 11.00 चे ऐवजी 10.30 असा बदल करण्यात आला होता. सा.वाले यांनी आपल्या कैफियतीमध्ये असेही कथन केले आहे की, तक्रारदाराने त्यांचे तिकिट खरेदी करताना आपला भ्रमणध्वनी क्रमांक दिलेला नव्हता. त्यामुळे सा.वाले यांनी तकारदारांना बदललेल्या वेळेची सूचना देता आलेली नाही. सा.वाले यांचे म्हणणे की, तक्रारदाराने एजंटकडून तिकिटे खरेदी केली होती. त्याचेशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तथापी त्यांचेकडून काही प्रतिसाद दिलेला नाही. 6. सा.वाले यांनी आपल्या कैफियतीसोबत काही कागदपत्र दाखल कलेली आहेत. त्यामध्ये दूरध्वनीचा क्रमांक दिलेला आहे. यावरुन असे दिसते की, सा.वाले यांनी क्र.1 चे एजंट मार्फत तक्रारदारास संपर्क करण्याचा प्रयत्न केला. तथापी तो प्रस्तापित होऊ शकला नाही. या संदर्भात तक्रारदाराचे असे कथन आहे की, तक्रारदार यांनी सा.वाले यांच्या कार्यालयास 5.11.2007 रोजी भेट दिली असता सा.वाले यांनी तक्रारदारांना बदललेल्या वेळेची कल्पना दिली नाही. तक्रारदाराच्या स्वतःच्या कथनाप्रमाणे तक्रारदाराने सा.वाले यांच्या कार्यालयास जी भेट दिली होती ती सोईचे आसन मिळणेकामी दिली होती व तकारदाराच्या तक्रारीतील शपथपत्रात असा कोठेही उल्लेख नाही की, त्यांनी वेळेबद्दल चौकशी केली, परंतु बदललेली वेळ सा.वाले यांच्या अधिका-यांनी त्यांना सांगीतली नाही. तक्रारदाराने जेव्हा वेळेबद्दल चौकशी केली त्यावेळी सा.वाले यांचे अधिका-यांनी त्यांना बदललेली वेळ सांगण्यास कुचराई केली असा निष्कर्ष काढणे योग्य होणार नाही. 7. तक्रारदार आपल्या शपथपत्रात असे कथन करतात की, तक्रारदार नियमित विमानाने प्रवास करणारे असल्याने सा.वाले यांचेकडे त्यांचा दूरध्वनी व भ्रमणध्वनी क्रमांक उपलब्ध होता. त्याचा वापर करुन सा.वाले हे तक्रारदारांना बदललेल्या वेळेबद्दलची माहिती देवू शकले असते. या संदर्भात सा.वाले यांच्याकडे तक्रारदाराचे दूरध्वनी व प्रभणध्वनी उपलब्ध होते असा पुरावा उपलब्ध नाही. तक्रारदार हे केवळ विमानाने नेहमी प्रवास करत असत व तक्रारदारांचा दूरध्वनी व भ्रमणध्वनी क्रमांक सा.वाले यांचेकडे उपलब्ध होता असा निष्कर्ष काढणे उचित होणार नाही. यावरुन सा.वाले यांनी तक्रारदारांना बदललेल्या वेळेची सूचना देण्यास कुचराई केली किंवा टाळाटाळ केली अथवा निष्काळजीपणा केला असा निष्कर्ष काढणे सयूक्तीक ठरणार नाही. 8. तक्रारदाराने सा.वाले त्यांचेविरुध्द निष्काळजीपणाचे आरोपाचे उत्तरात सा.वाले यांनी असा अरोप केला आहे की, तिकिटावरील शर्ती व अटीप्रमाणे तक्रारदार यांनी कमीत कमी 75 मिनिटापूर्वी विमान निघण्यापूर्वी विमानतळावर यावयास पाहिजे होते. परंतु तक्रारदार हे 10.30 चे सुमारास विमानतळावर पोहोचले नाहीत. त्यांना विमानतळाकडे पोहोचण्यास उशिर झाला व दरम्यान मुंबई ते गोहाट्टी विमानाने प्रयाण केले. या संदर्भात सा.वाले यांनी कैफियतीमध्ये निशाणी अ येथे शर्ती व अटींची प्रत दाखल केलेली आहे. विमान तिकिटावर शर्ती व अटी लागू राहातील असा उल्लेख करण्यात आलेला आहे. त्या शर्ती व अटी सा.वाले यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. शर्ती व अटींमध्ये विमानतळावर पोहोचण्याचे संदर्भात असे नमुद करण्यात आले होते की, विमानतळावर प्रवाशाची तपासणी विमान निघण्यापूर्वी दिडशे मिनिटे अगोदर सुरु होईल व प्रवाशानी विमानतळावर विमान निघण्याचे वेळेपूर्वी कमित कमि 75 मिनिटे अगोदर पोहोचावे. शर्ती व अटीमध्ये असेही नमुद करण्यात आले होते की, तपासणीची खिडकी ही विमान सुटण्याचे वेळेपूर्वी 30 मिनिटे बंद होईल व विमान सुटण्याचे वेळेपुर्वी 15 मिनिटे विमानाकडे जाणारे दरवाजे बंद होतील. 9. या संदर्भात तक्रारदाराने आपल्या तक्रारीमध्ये असेही नमुद केलेले आहे की, तक्रारदार त्या दिवशी 10 वाजून 10 मिनिटांनी विमानतळावर पोहोचले. याउलट तक्रारदाराचे विमान तिकिटावर जी नोंद करण्यात आलेली आहे, त्यामध्ये तक्रारदार विमानतळावर सा.वाले यांचे अधिका-यांकडे 10 वाजून 35 मिनिटांनी उपलब्ध्द झाले अशी नोंद आहे. क्षणभर तक्रारदारांचे त्यांचे तक्रारीतील तसेच शपथपत्रातील हे म्हणणे की, ते 10.10 वाजता विमानतळावर पाहिले ही गृहीत धरले तरीही सेवा शर्तीतील अटीप्रमाणे तक्रारदार 75 मिनिटे विमान निघेणेपूर्वी विमानतळावर पोहोचले नव्हते असे दिसून येते. तक्रारदार जर 10.10 वाजताना विमानतळावर पोहोचले असते तर निच्छितच विमान निघण्याचे वेळेपूर्वी किमान 20 मिनिटेपूर्वी ते विमानतळावर पोहोचले व 40 मिनिटे पूर्विचे वेळेपूर्वी म्हणजे 11.00 वाजता पोहोचले. या दृष्टीकोनातून पाहीले असता तक्रारदार विमानतळावर पुरेसा अवधी ठेऊन पोहोचले नव्हते व तक्रारदारांना विमानतळावर पोहोचण्यास उशिर झाला ही बाब सिध्द होते. हयाप्रकारे तक्रारदाराचे दिनांक 6.11.2007 गोहाट्टीकडे जाणारे विमान तक्रारदार गाठू शकले नाहीत. यात तक्रारदारांचा दोष दिसून येतो. 10. तक्रारदारांनी विमानाची तिकिटे खरेदी केल्यानंतर वेळेत झालेला बदल हा सा.वाले क्र.1 यांनी आपल्या सोईकरीता केलेला नव्हता तर तो विमान सेवा संचालक यांचे आदेशाप्रमाणे करण्यात आलेला होता. ज्यास सर्वच विमा सेवा पूरविणा-या कंपन्या तसेच विमान पवासी बांधील होते. त्यामुळे बदललेल्या वेळेच्या संदर्भात तक्रारदार तक्रार करु शकत नाहीत. बदललेला वेळ प्रवाशांना कळविणे ही जबाबदारी विमान सेवा पुरविणा-या कंपन्यांची असलीतरी प्रस्तुतचे प्रकरणात तक्रारदराने त्यांचा दूरध्वनी क्रमांक व भ्रमणध्वनी क्रमांक सा.वाले क्र.1 विमान कंपनी यांचेकडे पूर्विच दिला होता व तो उपलब्ध होता या बद्दल पुरावा दिसून येत नाही. उलट सा.वाले यांनी त्यांच्या कैफियतीतील कथनाप्रमाणे विमान एजंट मार्फत म्हणजे सा.वाले क्र.2 यांचेमार्फत तक्रारदारांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असे दिसून येते. तथापी तो संपर्क प्रस्तापित होऊ शकला नाही. 11. उपलब्ध पुराव्यांचा एकत्रितपणे विचार केला असता प्रस्तुतचे प्रकरणात तक्रारदाराना गोहाट्टीकडे जाणा-या विमानाच्या वेळेच्या संदर्भात सा.वाले यांनी दिशाभूल केली किंवा योग्य माहिती पुरविण्यास कसुर केली व निष्काळजीपणा केला असा निष्कर्ष काढणे उचित होणार नाही. सबब तक्रारदाराने तक्रारीत कथन केल्याप्रमाणे सा.वाले यांनी तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्यास कसुर केली असा निष्कर्ष काढणे शक्य होत नाही. 12. वरील विवेचनावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश करीत आहे. आदेश 1. तक्रार क्रमांक 725/2007 रद्दबातल करण्यात येते. 2. खर्चाबद्दल काहीही आदेश नाही. 3. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.
| [HONABLE MRS. Mrs.DEEPA BIDNURKAR] Member[HONABLE MR. Mr. J. L. Deshpande] PRESIDENT[HONABLE MR. MR.V.G.JOSHI] Member | |