तक्रारदार : वकील श्री आर.के.झा हजर.
सामनेवाले : श्री.वकील एस एस बिजलानी मार्फत हजर.
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
न्यायनिर्णय
1. सा.वाले ही विमान सेवा पुरविणारी कंपनी आहे. तक्रारदार हे एकाच कुटुंबातील सदस्य आहेत. तक्रारदारांनी मुंबई ते दिल्ली , दिल्ली ते वाराणसी, लखनौ ते वाराणसी व दिल्ली ते मुंबई अशा प्रवासाकामी सा.वाले यांच्या विमानाची तिकिटे पूर्वीच आरक्षीत केलेली होती. तक्रारदारांनी मुंबई ते दिल्ली व दिल्ली ते वाराणसी हा प्रवास सा.वाले यांच्या विमानाने पूर्ण केला व त्यामध्ये कुठलीही असुविधा निर्माण झाली नाही. तथापी लखनौव विमानतळावर दिनांक 2.11.2008 रोजी 10.00 वाजता सुटणा-या विमानात बसणेकामी तक्रारदार लखनौव विमानतळावर 8.15 वाजता पोहोचले असता तक्रारदारांना असे सांगण्यात आले की, लखनौव ते दिल्ली विमान सकाळी निघून गेले. सा.वाले यांनी विमानाच्या वेळेत झालेल्या बदलाची सूचना तक्रारदारांना अजिबात दिलेली दिली नाही. त्यानंतर तक्रारदार टॅक्सीने लखनौ ते दिल्ली असे पोहचले व दिल्ली वरुन त्यांनी सा.वाले यांचे विमान पकडले. या सर्व प्रकरणामध्ये लखनौ ते दिल्ली हा प्रवास टॅक्सीने केल्यामुळे तक्रारदारांना टॅक्सी भाडयाचे ज्यादा पैसे भरावे लागले. तसेच त्यांना शाररिक व मानसिक त्रास सहन करावा लागला. या प्रकारे सा.वाले यांनी तक्रारदारांना विमान प्रवासाचे संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असा आरोप करुन व नुकसान भरपाई मागणारी नोटीस तक्रारदारांनी वकीलामार्फत सा.वाले यांना दिनांक 22.11.2008 रोजी पाठविली. परंतु सा.वाले यांनी त्या नोटीसीला उत्तर दिले नाही. त्यानंतर तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दिनांक 30.3.2009 रेाजी दाखल केली. व सा.वाले यांनी तक्रारदारांना विमान सेवेच्या संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असे जाहीर होऊन मिळावे व नुकसान भरपाई मिळावी अशी दाद मागीतली.
2. सा.वाले यांनी आपली कैफीयत दाखल केली व त्यामध्ये असे कथन केले की, हिवाळयाचा हंगाम सुरु झाल्याने लखनौ ते दिल्ली या विमानाच्या वेळेमध्ये बदल करण्यात आला होता व शर्ती व अटी प्रमाणे विमानाच्या वेळेमध्ये बदल करण्याचा अधिकार विमान कंपनीस होता. त्याच प्रमाणे तक्रारदारांना तिन दूरध्वनी क्रमांक व भ्रमणध्वनी क्रमांक यावर सूचना देण्याचा प्रयत्न केला. परंतू तक्रारदारांकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर दिनांक 2.1.2011 रोजी तक्रारदार लखनौ विमानतळावर आले असतांना व लखनौ ते दिल्ली विमान पूर्वीच निघालेले असल्याने सा.वाले यांनी टॅक्सीची व्यवस्था केली व सा.वाले यांच्या खर्चाने तक्रारदारांना लखनौ ते दिली असे टॅक्सीने पोहचविले. या बद्दलची नोंद सा.वाले यांचे व्यवस्थापक श्री.नितीन डे यांनी तक्रारदारांच्या तिकिटावर केली आहे. या प्रकारे तक्रारदारांना सा.वाले यांनी विमानाच्या वेळेमध्ये झालेल्या बदलाची सूचना देण्याचे सर्व प्रयत्न करण्यात आलेले होते. तरी देखील तक्रारदारांसी संपर्क प्रस्तापित होऊ शकला नाही व त्यानंतर तक्रारदारांची पुढील गैरसोय टाळण्याचे हेतुने तक्रारदारांना लखनौ ते दिल्ली टॅक्सीने पोहचते केले व या प्रकारे सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली या आरोपास नकार दिला.
3. तक्रारदारांनी आपले पुराव्याचे शपथपत्र दाखल केले. तर सा.वाले यांनी त्यांचे व्यवस्थापक श्री.हमीद यांचे पुराव्याचे शपथपत्र दाखल केले. दोन्ही बाजुंनी आपली कागदपत्रे दाखल केली. तसेच लेखी युक्तीवाद दाखल केला. दोन्ही बाजुंच्या वकीलांचा तोंडी युक्तीवाद ऐकण्यात आला.
4. प्रस्तुत मंचाने तक्रार, कैफीयत, शपथपत्रे, कागदपत्रे, व लेखी युक्तीवाद यांचे वाचन केले. त्यावरुन तक्रारीचे निकालीकामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र. | मुद्दे | उत्तर |
1 | सा.वाले यांनी तक्रारदारांना विमान सेवेच्या संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय ? | नाही. |
2 | तक्रारदार सा.वाले यांचेकडून नुकसान भरपाई वसुल करण्यास पात्र आहेत ? | नाही. |
3 | अंतीम आदेश | तक्राररद्द करण्यात येते. |
कारण मिमांसा
5. तक्रारदारांनी आपल्या दौ-याचा कार्यक्रम सा.वाले यांच्या विमानाने प्रवास करुन पूर्ण करुन करण्याचे ठरविले होते, व तो कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
a) Mumbai to Delhi on 26/10/2008 bearing ticket No.PGCTWV 0902463484143 to 146 Flight No.331 departure time 6.20 A.M.
b) Delhi to Varanasi on 26/10/2008 bearing ticket No.PGCTWV Flight No.231 departure time 9.10 A.M.
c) Lucknow to Delhi on 02/11/2008 bearing ticket 902463484154 to 157 Flight No.652 departure time 10.00 A.M.
d) Delhi to Mumbai on 02/11/2008 since ticket has been surrendered thus details cannot be provided.
वरील प्रवासापैकी क्र.1 व 2 म्हणजे मुंबई ते दिल्ली व दिल्ली ते वाराणसी हा प्रवास नियोजित कार्यक्रमाप्रमाणे पार पाडला. तक्रारदारांना लखनौ ते दिल्ली हा प्रवास दिनांक 2.11.2008 रोजी सा.वाले यांच्या विमानाने सकाळी 10.00 वाजता करावयाचा होता. त्याप्रमाणे तक्रारदार लखौनो येथील विमानतळावर सकाळी 8.15 वाजता पोहोचले. परंतु विमानतळावर सा.वाले अधिकारी श्री.नितीन डे यांनी तक्रारदारांना असे सांगीतले की, लखनौ ते दिल्ली येथे जाणारे विमान सकाळी 8 वाजता सुटले होते. तक्रारदारांचे असे कथन आहे की, विमानाच्या बदललेल्या वेळेची सा.वाले यांनी तक्रारदारांना अजीबात सुचना दिलेली नव्हती. त्यामुळे तक्रारदारांना गैरसोय व कुचंबणा सहन करावी लागली. व तक्रारदारांना लखनौ ते दिल्ली हा विमान प्रवास टॅक्सीने करावा लागला. व ते दिल्ली येथे रात्री 12.30 वाजता म्हणजे जवळपास 12 तास उशिराने पोहोचले. या सर्व गैरसोई बद्दल सा.वाले जबाबदार आहेत असे तक्रारदारांचे कथन आहे. या उलट सा.वाले यांची त्यांचे कैफीयत व पुराव्याचे शपथपत्र या मध्ये असे कथन केले आहे की, हिवाळयाचा हंगाम सुरु झाल्यानंतर विमानाच्या वेळेमध्ये बदल करण्यात आला व लखनौ ते दिल्ली या विमानाची वेळ सकाळी 8.00 कशी करण्यात आली. व हा बदल तक्रारदारांनी विमानाची तिकिटे आरक्षीत केल्यानंतर झाला असल्याने सा.वाले यांनी तक्रारदारांना उपलब्ध दूरध्वनी व भ्रमणध्वनीव्दारे संपर्क साधून सूचना देण्याचा प्रयत्न केला परंतु तक्रारदारांशी संपर्क प्रस्तापित होऊ शकला नाही.
6. सा.वाले यांनी त्यांचे व्यवस्थापक श्री.हमीद यांचे शपथपत्र दाखल केले. व त्या शपथपत्रासोबत सा.वाले विमान कंपनी व विमान प्रवास सुविधा घेणारे प्रवासी यांचे दरम्यानच्या शर्ती व अटीची प्रत दाखल केली. त्यामध्ये शर्ती व अटीचे शेवटी तिकिटाचे आरक्षण रद्द करणे किंवा विमान प्रवासाचे वेळेत बदल करणे हा अधिकार विमान कंपनीचा आहे अशी नोंद होती. त्यामध्ये विमान रद्द झाले तर अथवा वेळेमध्ये बदल झाला तर विमान प्रवाशास तिकिटाचे पैसे परत देणे अथवा अन्य विमानाने अथवा टॅक्सीने नियोजित ठिकाणी पोहचते करणे ही तरतुद आहे.
7. प्रस्तुत प्रकरणामध्ये सा.वाले यांनी आपल्या कथनाचे पृष्टयर्थ पीएनआर च्या प्रती हजर केलेल्या आहेत. त्यामधील नोंदी असे दर्शवितात की, तक्रारदारांनी सा.वाले यांना तिन दूरध्वनी व 1 भ्रमणध्वनी उपलब्ध करुन दिले होते. पीएनआर मधील नोंदी असे दर्शवितात की, सा.वाले यांनी त्यांच्या दूरध्वनीवर तक्रारदारांना दिनांक 1.11.2008 म्हणजे लखनौ ते दिल्ली विमान प्रवासाचे आदले दिवशी दूरध्वनी केला होता परंतु संपर्क प्रस्तापित होऊ शकला नाही. या प्रकारे सा.वाले यांनी तक्रारदारांना उपलब्ध दूरध्वनी वरुन विमानाची वेळ बदलल्याची सूचना देण्याचा प्रयत्न केला असे दिसून येते.
8. त्यातही महत्वाची बाब म्हणजे तक्रारदार लखनौ विमान तळावर सकाळी 8.15 वाजता पोहोचले असता त्यांना विमानतळावर सा.वाले यांचे व्यवस्थापकाने विमान पूर्वीच निघाल्याचे कळविले व त्यानंतर तक्रारदारांची गैरसोय टाळण्याचे हेतुने लखनौ ते दिल्ली अशी टॅक्सीची व्यवस्था केली. व त्याचा खर्च सा.वाले यांनी केला. सा.वाले यांचे व्यवस्थापक श्री.हमीद यांनी आपल्या शपथपत्रात तसेच लेखी युक्तीवादात याच स्वरुपाचे कथन केले. सा.वाले यांनी तक्रारदारांच्या तिकिटाची प्रत हजर केलेली आहे. त्यावर श्री.नितीन डे यांनी पुढील प्रमाणे नोंद केलेली आहे.
“ Surface Travel provided for LKO/DEL Sector”
त्या तिकिटावर श्री.नितीन डे यांनी आपला भ्रमणध्वनी क्रमांक नोंदविलेला आहे. या प्रकारच्या तिकिटाचे प्रतीवर श्री.नितीन डे यांनी केलेली नोंद सा.वाले यांच्या कथनास पुष्टी देते व असे दर्शविते की, लखनैा ते दिल्ली हे विमान पूर्वीच निघाले असल्याने व त्या बद्दलची कल्पना तक्रारदारांना नसल्याने तक्रारदारांना टॅक्सीची व्यवस्था करुन दिल्ली विमानतळावर पोहचविण्याची व्यवस्था केली.
9. या संदर्भात तक्रारदारांनी आपल्या तक्रारीमध्ये ही बाब मान्य केली आहे की, त्यांनी लखनौ ते दिल्ली हा प्रवास टॅक्सीने केला. तथापी तक्रारदारांनी त्या अॅक्सीचे भाडे सा.वाले यांनी अदा केले ही बाब लपवून ठेवली व तसे स्पष्ट कथन केलेले नाही. परंतु तक्रारदार आपल्या तक्रारीमध्ये तसेच आपल्या पुराव्याचे शपथपत्रामध्ये लखनौ ते दिल्ली या टॅक्सीचे भाडे नेमके किती झाले होते असे कथन करत नाहीत. व त्याबद्दल पावती देखील हजर करत नाहीत. तक्रारदारांनी स्वतःचे खर्चाने जर लखनौ ते दिल्ली हा प्रवास टॅक्सीने केला असता तर निच्छितच तक्रारदारांनी टॅक्सी चालकाकडून पावती उपलब्ध केली करुन घेतली असती व त्याची प्रत हजर केली असती. व आपल्या तक्रारीमध्ये नेमके किती टॅक्सी भाडे व कुठल्या दराने अदा करावे लागले ही बाब नमुद केली असती. या सर्व मुद्यांवर तक्रारदार आपल्या तक्रारीमध्ये व पुराव्याचे शपथपत्रात संदिग्धता पाळतात. ही बाब असे दर्शविते की, टॅक्सीचे भाडे सा.वाले विमान कंपनीने दिले होते. या प्रकारे तक्रारदारांना टॅक्सीचा ज्यादा खर्च करावा लागला असे दिसून येत नाही.
10. तक्रारदारांना विमानाचे ऐवजी टॅक्सीने लखनौ ते दिल्ली असा 12 तासाचा प्रवास करावा लागल्याने तक्रारदारांची निच्छितच गैरसोय व कुचंबणा झाली असेल व त्यांना शाररिक व मानसिक त्रास झाला असेल. परंतु उपलब्ध पुराव्यावरुन असे दिसून येते की, सा.वाले यांनी तक्रारदारांना उपलब्ध दूरध्वनीवर व भ्रमणध्वनीवर सूचना देण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा तक्रारदारांशी संपर्क प्रस्तापित होऊ शकला नाही. त्यातही सा.वाले यांनी तक्रारदारांची गैरसोय टाळण्याचे दृष्टीने लखनौ ते दिल्ली प्रवासाकरीता टॅक्सीची व्यवस्था केली व तक्रारदारांना दिल्ली विमानतळावर पोहचते केले. जेणे करुन तक्रारदारांना दिल्ली ते मुंबई हा प्रवास नियोजित कार्यक्रमाप्रमाणे करु शकतील.
11. या संपूर्ण प्रकरणामध्ये महत्वाची बाब म्हणजे तक्रारदारांनी आपल्या तक्रारीत व पुराव्याचे शपथपत्रामध्ये टॅक्सी खर्चाचे संदर्भात केलेली खोटी विधाने होय. तक्रारदारांनी आपल्या तक्रारीमध्ये कोठेही असे नमुद केलेले नाही की, सा.वाले यांनी लखनौ ते दिल्ली विमान प्रवासाकरीता टॅक्सीची व्यवस्था केली होती. थोडक्यात सा.वाले यांनी पर्यायी व्यवस्था केली होती ही बाब लपवून ठेवण्याचा तक्रारदारांनी प्रयत्न केला. या प्रकारचे तक्रारदारांचे वरील वर्तन त्यांचा अप्रमाणिकपणा दर्शवितो. या संदर्भात सा.वाले यांनी आपल्या युक्तीवादासोबत मा.राष्ट्रीय आयोगाच्या NEW INDIA ASSURANCE CO.LTD. V/S JHANKAR SIGH I (2007) VPJ 341 ( NC) या न्याय निर्णयाचा आधार घेतला. त्यामध्ये मा.राष्ट्रीय आयोगाने असा अभिप्राय नोंदविला की, पक्षकारांनी त्यांची तक्रार अथवा पुराव्याचे शपथपत्रात खोटी विधाने केली असतील तर त्यांना दंड बसविण्याची कार्यवाही मंचाने करावी. याच प्रकारचा निष्कर्ष सर्वोच्च न्यायालयाने S.P. CHENGALVARAYA NAIDU V/S JAGANNATH AIR 1994 SC 853 या प्रकरणामध्ये नोंदविला आहे.
12. प्रस्तुत प्रकरणामध्ये तक्रारदारांनी महत्वाची बाब लपवून ठेवल्याने, खोटी विधाने केल्याने महत्वाच्या बाबीवर त्यांचा अप्रमाणिकपणा दिसून येतो. या प्रकारे तक्रारदारांना नुकसान भरपाईची दाद देणे योग्य व न्याय्य ठरत नाही असे प्रस्तुत मंचाचे मत झाले आहे.
13. वरील चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन पुढील प्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
1. तक्रार क्रमांक 235/2009 रद्द करण्यात येते.
2. खर्चाबाबत आदेश नाही.
3. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य
पाठविण्यात याव्यात.