तक्रारदारातर्फे : स्वतः
सामनेवालेतर्फे : सामनेवाले क्रमांक 1 व 2 गैरहजर
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
न्यायनिर्णय
1. सामनेवाले क्रमांक 1 हे इच्छूक प्रवाशांना विमान सेवा पुरविणारी कंपनी आहे, तर सामनेवाले क्रमांक 2 हे प्रवासाचे आरक्षण करणारी कंपनी आहे. तक्रारदार क्रमांक 1 हे तक्रारदार क्रमांक 2 चे पती आहेत. तक्रारदारांचा विवाह दिनांक 23/5/2010 रोजी झाला व तक्रारदारांना मधुचंद्र साजरा करण्याकामी श्रीनगर येथे जावयाचे होते. तक्रारदार क्रमांक 1 यांनी सामनेवाले क्रमांक 2 यांचेमार्फत सामनेवाले क्रमांक 1 यांचे उड्डाण क्रमांक आयटी 3132 (Flight No. IT 3132) मुंबई ते श्रीनगर यामध्ये दिनांक 26/5/2010 रोजी दोन जागा आरक्षित केल्या. तक्रारदारांना त्याप्रमाणे दोन तिकिटांची जागा निश्चित केल्याचे इन्व्हॉईस प्राप्त झाले.
2. तक्रारदारांचे तक्रारीतील कथनाप्रमाणे आरक्षणाप्रमाणे तक्रारदार दिनांक 26/5/2010 रोजी सांताक्रूझ विमानतळावर गेले असतांना तक्रारदारांना मुंबई ते श्रीनगर असा बोर्डिंग पास देण्याऐवजी केवळ मुंबई ते दिल्ली असा बोर्डिंग पास देण्यात आला, व तक्रारदारांना असे सांगण्यात आले की दिल्ली ते श्रीनगर असा बोर्डिंग पास दिल्ली विमानतळावर दिला जाईल. या आश्वासनावर विसंबून तक्रारदारांनी उड्डाण क्रमांक आयटी 3132 या विमानाने मुंबई ते दिल्ली असा प्रवास केला. परंतु विमान दोन तास उशिराने 12-20 मिनिटांनी दिल्ली येथे विमानतळावर पोहचले.
3. तक्रारदाराच्या तक्रारीतील कथनाप्रमाणे सामनेवाले क्रमांक 1 यांच्या अधिका-यांनी तक्रारदारांना दिल्ली ते श्रीनगर त्याच विमानाकरीता बोर्डिंग पास दिला नाही, व काही वेळानंतर तक्रारदारांना सांगण्यात आले की, दिल्ली ते श्रीनगर उड्डाण क्रमांक आयटी 3132 यामधील सर्व जागा पूर्वीच आरक्षित असल्याने तक्रारदारांना नंतरच्या विमानाने जावे लागेल. तक्रारदारांचे सामनेवाले यांच्या अधिका-यांनी समाधान करण्याचे प्रयत्न केले, परंतु 3132 विमान फेरीमध्ये दिल्ली ते श्रीनगर प्रवासासाठी तक्रारदारांना सामावून घेण्यात आले नाही. तक्रारदारांना दिनांक 26/5/2010 रोजी दिल्ली येथे मुक्काम करावा लागला, व दिनांक 27/5/2010 रोजी तक्रारदार दिल्ली येथून विमानाने श्रीनगर येथे पोहचले.
4. तक्रारीत तक्रारदारांचे पुढे असे कथन आहे की, सामनेवाले यांच्या बेजबाबदार वर्तणूकीमुळे तक्रारदारांची खूप गैरसोय व कुंचबना झाली. तक्रारदारांनी सामनेवाले यांना वकीलामार्फत नोटीस पाठविली, व नुकसानभरपाईची मागणी केली. सामनेवाले यांनी तक्रारदारांच्या मागणीस नकार दिला.
5. सामनेवाले क्रमांक 1, विमान कपंनी यांनी आपली लेखी कैफीयत दाखल केली, व त्यामध्ये असे कथन केले की, तक्रारदारांचे दिनांक 26/5/2010 रोजीचे उड्डाण क्रमांक 3132 चे तिकिट मुंबई ते दिल्ली असे होते, व दिल्ली ते श्रीनगर करीता 352 क्रमांकाच्या उड्डाणामध्ये तक्रारदारांचे आरक्षण होते. उड्डाण क्रमांक आयटी 3132 दिल्ली विमानतळावर सकाळी 10-20 मिनिटांनी अपेक्षित होते. परंतु विमानतळावर विमानांची गर्दी झाल्याने, उड्डाण क्रमांक आयटी 3132 उतरण्याकामी धावपट्टी उपलब्ध नसल्याने उड्डाण क्रमांक आयटी 3132 हे जयपूर येथे उडवण्यात आले, व त्यानंतर धावपट्टी उपलब्ध झाल्यानंतर उड्डाण क्रमांक आयटी 3132 हे 1 वाजून 10 मिनीटांनी दिल्ली येथे पोहचले. दरम्यान दिल्ली ते श्रीनगर विमानाने उड्डाण केले. याप्रकारे सामनेवाले क्रमांक 1 यांची या प्रकारामध्ये कुठलीही चूक नव्हती. तक्रारदारांनी जर उड्डाण क्रमांक आयटी 3132 मध्येच मुंबई ते श्रीनगर असे आरक्षण केले असते तर निश्चितच तक्रारदारांना उड्डाण क्रमांक आयटी 3132 मध्ये सामावून घेण्यात आले असते, परंतु तक्रारदारांनी दोन वेगळया उड्डाणाची आरक्षणे केल्याने, व उड्डाण क्रमांक आयटी 3132 हे दिल्ली येथे वेळेवर पोहचले नसल्याने तक्रारदारांचा खोळंबा झाला त्यामध्ये सामनेवाले क्रमांक 1 यांची कुठल्याही प्रकारची चूक नव्हती. सामनेवाले क्रमांक 1 यांनी असे कथन केले आहे की, सौजन्याचा भाग म्हणून सामनेवाले क्रमांक 1 यांनी तक्रारदारांची दिल्ली येथे रहाण्याची सोय केली, व दिनांक 27/5/2010 रोजी त्यांच्या विमान सेवेने तक्रारदारांना दिल्ली ते श्रीनगर असे पठविले. याप्रकारे तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्यात कसूर झाली या आरोपास सामनेवाले क्रमांक 1 यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला.
6. सामनेवाले क्रमांक 2 यांनी आपली वेगळी कैफीयत दाखल केली त्यामध्ये तक्रारदारांच्या सूचनेप्रमाणे विमान तिकिटांचे आरक्षण करण्यात आलेले होते, असे कथन केले.
7. तक्रारदारांनी सामनेवाले यांच्या कैफीयतीला प्रतिउत्तराचे शपथपत्र व कागदपत्रे दाखल केले, सामनेवाले क्रमांक 2 यांनी पुराव्याचे वेगवेगळे शपथपत्र दाखल केले. तक्रारदार तसेच सामनेवाले क्रमांक 1 यांनी लेखी युक्तीवाद दाखल केला. तक्रारदारांचा तोंडी युक्तीवाद ऐकण्यात आला.
8. प्रस्तुत मंचाने तक्रार, शपथपत्र व कागदपत्रे, तसेच कैफीयत, शपथपत्र व कागदपत्र यांचे वाचन केले. त्यावरुन तक्रारीच्या निकाल कामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र. | मुद्दे | उत्तर |
1 | सामनेवाले क्रमांक 1 अथवा 2 यांनी तक्रारदारांना विमान प्रवासाच्या संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केली, ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय ? | नाही. |
2 | तक्रारदार सामनेवाले यांचेकडून नुकसानभरपाई वसूल करण्यास पात्र आहेत काय ? | नाही. |
3. | अंतीम आदेश ? | तक्रार रद्द करण्यात येते. |
कारण मिमांसा
9. तक्रारदारांनी आपल्या तक्रारीसोबत आवश्यक ती कागदपत्रे दाखल केलेले आहेत. त्यामध्ये सामनेवाले क्रमांक 2 यांनी तक्रारदारांच्याकरीता विमान आरक्षण केलेल्या तिकिटाची प्रत दाखल केलेली आहे. त्याचे काळजीपूर्वक वाचन केल्यानंतर असे दिसून येते की, तक्रारदारांचे सामनेवाले यांचे उड्डाण क्रमांक आयटी 3132 यामध्ये दिनांक 26/5/2010 रोजीचे मुंबई ते दिल्ली असे आरक्षण होते. तर दिल्ली ते श्रीनगर या प्रवासाकरीता उड्डाण क्रमांक 352 चे आरक्षण होते. उड्डाण क्रमांक आयटी 3132 हे सकाळी 8-5 मिनीटांनी उड्डाण घेणार होते, तर उड्डाण क्रमांक 352 हे दिल्ली येथून 12-50 मिनीटांनी उड्डाण घेणार होते. तक्रारदारांनी निशाणी 2 वर प्रवासाच्या कार्यक्रमाची (Itinerary) ची प्रत दाखल केलेली आहे. त्यावरुन असे दिसते की, मुंबई ते दिल्ली उड्डाण क्रमांक आयटी 3132 याची दिल्ली येथे विमानतळावर पोहचण्याची वेळ 10.20 मिनीटांनी होती, तर उड्डाण क्रमांक 352 हे दिल्ली येथून उड्डाण घेण्याची वेळ 12.50 मिनिटांनी होती. या प्रकारे दोन उड्डाणाच्या वेळेमध्ये साधारणतः दोन तासांचा अवधी होता असे दिसून येते.
10. सामनेवाले क्रमांक 1 यांनी त्यांचे अधिकारी श्री. हमीद सुलेमान खान यांचे पुराव्याचे शपथपत्र दाखल केलेले आहे, त्यांनी आपल्या शपथपत्रात असे कथन केलेले आहे, उड्डाण क्रमांक आयटी 3132 हे विमान दिल्ली विमानतळावर 10-20 मिनिटांनी पोहचणे अपेक्षित होते. परंतु दिल्ली विमानतळावर विमानांची गर्दी झाल्याने, व धावपट्टी उपलब्ध नसल्याने उड्डाण क्रमांक आयटी 3132 हे जयपूरला उडवण्यात आले, व धावपट्टी उपलब्ध झाल्यानंतर उड्डाण क्रमांक आयटी 3132 हे दिल्ली विमानतळावर पोहचले. याप्रकारे 2 तास 32 मिनिटांचा उशिर उड्डाण क्रमांक आयटी 3132 ला दिल्ली विमानतळावर पोहचण्याकामी झाला. सामनेवाले क्रमांक 1 यांच्या अधिका-यांनी कथन केलेले आहे की, विमान सेवा संचालक (Dy. General Manager _ Legal) यांच्या आदेशाप्रमाणे ही कार्यवाही करण्यात आली होती. दरम्यान मुंबई ते श्रीनगर उड्डाण क्रमांक 352 या विमानाने दिल्ली विमानतळावरुन उड्डाण घेतले व तक्रारदारांना त्यात सामावून घेण्याचा प्रश्नच निर्माण झाला नाही. श्री. हमीद यांनी आपल्या शपथपत्रात असे कथन केले आहे की, सौजन्याचा भाग म्हणून व तक्रारदर नवविवाहीत असल्याने तक्रारदारांची दिल्ली येथे हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली व दुस-या दिवशीच्या म्हणजे 27/5/2010 रोजीच्या दिल्ली श्रीनगर विमानाने श्रीनगर येथे पाठविण्यात आले.
11. तक्रारदारांनी तक्रारीत व लेखी युक्तीवादात असे कथन केले आहे की, त्यांनी मुंबई ते श्रीनगर असे विमान तिकिटाचे आरक्षण केले होते, व दोन वेगवेगळया विमानांचे मुंबई ते दिल्ली व दिल्ली ते श्रीनगर असे त्यांचे आरक्षण नव्हते. तथापि तक्रारदारांनी दाखल केलेली विमान आरक्षण तिकिटाची प्रत सुस्पष्टपणे असे दर्शविते की, तक्रारदारांच्या प्रवासाचे आरक्षण उड्डाण क्रमांक आयटी 3132 या उड्डाणामध्ये फक्त मुंबई ते दिल्ली असे होते, तर उड्डाण क्रमांक 352 मध्ये दिल्ली ते श्रीनगर असे होते. याप्रमाणे एकाच उड्डाणाने मुंबई ते श्रीनगर असे प्रवासाचे आरक्षण तक्रारदारांचे नव्हते. या वस्तुस्थितीच्या विपरित तक्रारदारांचे तक्रारीत व लेखी युक्तीवादात असे कथन केले आहे की, त्यांनी सामनेवाले क्रमांक 1 यांच्या अधिका-यांनी मुंबई ते श्रीनगर असा बोर्डिंग पास देण्याचे टाळले केवळ मुंबई ते दिल्ली असा बोर्डिंग पास दिला. तक्रारदाराची ही कथने वस्तुस्थितीच्या उलट असून विमान तिकिटाच्या नोंदीच्याविरुध्द आहेत. तक्रारदाराचे विमान उड्डाण क्रमांक 3132 चे आरक्षण जर मुंबई ते श्रीनगर असते तर तक्रारदारांना मुंबई ते श्रीनगर असा बोर्डिंग पास मिळाला असता. पण मुळातच तक्रारदारांचे तिकिट उड्डाण क्रमांक आयटी 3132 मध्ये आरक्षण फक्त मुंबई ते दिल्ली होते, व ते मुंबई ते श्रीनगर असे नव्हते. तक्रारदारांनी ही बाब लपवून ठेवली व कांगावा करण्याचा प्रयत्न केला की, त्यांचे तिकिटाचे आरक्षण असतांना देखील सामनेवाले यांनी उड्डाण क्रमांक आयटी 3132 चा बोर्डिंग पास फक्त दिल्लीपर्यंत दिला.
12. सामनेवाले क्रमांक 1 यांनी तक्रारदारांना दिनांक 26/5/2010 रोजी दिल्ली येथे मुक्काम करणेकामी हॉटेलचे आरक्षण केले, व त्यानंतर दुस-या दिवशी दिनांक 27/5/2010 रोजी त्यांना दिल्ली ते श्रीनगर येथे पाठविले. तक्रारदारांच्या तक्रारीमध्ये ही बाब मान्य केलेली आहे. याप्रकारे सामनेवाले क्रमांक 1 यांनी तक्रारदारांना विमान सेवेच्या संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केली, ही बाब तक्रारदार सिध्द करु शकले नाहीत.
13. सामनेवाले क्रमांक 2 यांनी तक्रारदारांच्या सूचनेप्रमाणे मुंबई ते श्रीनगर असे तिकिटांचे आरक्षण केले होते, ते आरक्षण करीत असतांना उड्डाण क्रमांक 3132 जर मुंबई ते श्रीनगर असे उपलब्ध होते तरी देखील ते आरक्षण केवळ दिल्ली पर्यंत करण्यात आले, व 352 क्रमांकाच्या उड्डाणामध्येच तक्रारदारांकरीता दोन जागा राखून ठेवण्यात आल्या. तक्रारदारांनी प्रवास सुरु करण्यापूर्वी मुंबई येथे त्यांना विमान तिकिटाची प्रत उपलब्ध होती, त्यावरील नोंदीवरुन देखील तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याविरुध्द आक्षेप घेणे शक्य होते, परंतु तक्रारदारांनी आपला आक्षेप नोंदविला नाही तक्रारदार हे सुशिक्षीत असून तक्रारदार क्रमांक 1 हे संगणक कंपनीत कामाला आहेत, तर तक्रारदार क्रमांक 2 या विमा कंपनीत कामाला आहेत. याप्रकारे सामनेवाले क्रमांक 2 यांनी तक्रारदारांना विमान सेवेच्या संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केली ही बाब देखील तकारदार सिध्द करु शकले नाहीत.
14. एकूणच दोन्ही सामनेवाले यांनी तक्रारदारांना विमान सेवेच्या संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केली ही बाब दखील तकारदार सिध्द करु शकले नाहीत. सहाजिकच तक्रारदार सामनेवाले यांचेकडून नुकसानभरपाई मिळणेस पात्र नाहीत.
15. वरील चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन पुढील प्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
1. तक्रार क्रमांक 596/2010 रद्द करण्यात येते.
2. खर्चाबद्दल आदेश नाही.
3. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.
ठिकाणः मुंबई.
दिनांकः 13/08/2013
( एस. आर. सानप ) ( ज. ल. देशपांडे )
सदस्य अध्यक्ष