तक्रारदारातर्फे : वकील – सिध्दीकी अॅण्ड असोसिएटस
सामनेवालेतर्फे : वकील श्री. बिजलानी
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
न्यायनिर्णय
1. सामनेवाले हे इच्छूक प्रवाशांना विमान सेवा पुरविणारी कंपनी आहे, तक्रारदार यांना मिझोरमची राजधानी एैझवाल येथे जायचे असल्याने तक्रारदारांनी दिनांक 18/12/2009 रोजीकरीता मुंबई ते एैझवाल व्हाया कलकत्ता असे सामनेवाले विमान कंपनीच्या विमानाचे तिकिट आरक्षित केले. तक्रारदारांनी मुंबई ते कलकत्ता इंडिगो एअरलाईन्सच्या विमानाने प्रवास केला, व तक्रारदार सामनेवाले यांच्या कलकत्ता ते एैझवाल हा प्रवास करणेकामी कलकत्ता विमानतळावर सामनेवाले यांच्या कार्यालयात दिनांक 18/12/2009 रोजी सकाळी 11.35 वाजता पोहचले.
2. तक्रारदाराच्या तक्रारीतील कथनाप्रमाणे तक्रारदाराकडे त्यांच्या खाजगी वस्तू असलेल्या दोन बॅगा होत्या. सामनेवाले यांच्या प्रतिनिधीने तक्रारदारांना असे सांगितले की, बॅगांमध्ये केवळ 30 किलो वजन जाऊ शकते व उर्वरित चिजवस्तू काढून टाकण्याचे सुचविले. तक्रारदारांच्या बॅगांमध्ये महत्वाच्या चिजवस्तू असल्याने तक्रारदारांनी त्यांच्या कलकत्ता येथील नातेवाईकांना विमानतळावर बोलवले होते, परंतु तक्रारदारांच्या नातेवाईकांना विमानतळावर प्रवेश देण्यात आला नाही. दरम्यान सामनेवाले यांचे कलकत्ता ते एैझवाल सुटणारे विमान 1.00 वाजता कलकत्ता येथून निघाले व तक्रारदार विमानामध्ये बसू शकले नाहीत. थोडक्यात तक्रारदारांच्या कथनाप्रमाणे सामनेवाले यांच्या प्रतिनिधीने कलकत्ता येथील विमानतळावर तक्रारदारांना त्यांच्या दोन बॅगांमधील वजनाच्या संदर्भात व चिजवस्तूंच्या संदर्भात सतत अटकाव केल्याने व चर्चा केल्याने तक्रारदार कलकत्ता विमानतळावरुन एैझवालकडे 1 वाजता सुटणा-या विमानात बसू शकले नाहीत. याप्रमाणे सामनेवाले यांनी तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केली. त्यातही तक्रारदारांना इंग्रजी येत नसल्याने सामनेवाले यांच्या कर्मचा-यांनी त्यांचा गैरफायदा घेतला व तक्रारदारांची अडवणूक केली, व तक्रारदारांचे 1 वाजताचे सुटणारे विमान चुकल्यानंतर स्पाईस जेट कंपनीच्या विमानाने तक्रारदारांना बॅगडोगरा (IXB) येथे पाठविले. परिणामतः तक्रारदारांना खूपच मानसिक त्रास झाला. तक्रारदारांची कुचंबना झाली. तक्रारदार हे एैझवाल मिझोरम येथे जाऊ शकले नाहीत व तक्रारदार मुंबई येथे परत आले. तक्रारदार हे मुंबई येथे परत आल्यानंतर सामनेवाले यांना नोटीस दिली, व नुकसानभरपाईची मागणी केली. सामनेवाले यांनी त्या नोटीशीला उत्तर दिले व तक्रारदारांच्या कथनास नकार दिला त्यानंतर तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केली.
3. सामनेवाले यांनी हजर होऊन आपली कैफीयत दाखल केली व त्यात असे कथन केले की, तक्रारदार हे मुंबई ते कलकत्ता हा प्रवास इंडिगो एअरलाईन्सच्या विमानाने करणार होते. परंतु तक्रारदारांचे विमान मुंबई येथून उशिराने सुटले व कलकत्ता येथे उशिराने पोहचले, दरम्यान तक्रारदारांकडे दोन बॅगा होत्या ज्यामध्ये ब-याच चिजवस्तू होत्या व सामनेवाले यांचे कलकत्त्ता ते एैझवाल जाणा-या विमानामध्ये सामान वाहून नेण्याबद्दल मर्यादा होती त्यामुळे सामनेवाले यांच्या प्रतिनिधीने तक्रारदारांना बॅगांचे वजन कमी करण्याचे सुचविले व तक्रारदार त्यास तयार नव्हते. तक्रारदार लवकर निर्णय घेऊ शकले नसल्याने सामनेवाले यांच्या 1 वाजता सुटणा-या विमानामध्ये तक्रारदार बसू शकले नाहीत. याप्रकारे सामनेवाले यांनी तक्रारदारांना विमान प्रवासाच्या संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केली या आरोपास सामनेवाले यांनी नकार दिला.
4. तक्रारदार व सामनेवाले यांनी आपले पुराव्याचे शपथपत्र व कागदपत्रे दाखल केले. सामनेवाले यांच्या वकीलांचा तोंडी युक्तीवाद ऐकण्यात आला.
5. प्रस्तुत मंचाने तक्रार, तक्रारदारांचे पुराव्याचे शपथपत्र, तसेच कागदपत्रे, सामनेवाले यांची कैफीयत, शपथपत्र व कागदपत्रे यांचे वाचन केले. त्यावरुन तक्रारीच्या निकाल कामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र. | मुद्दे | उत्तर |
1 | सामनेवाले यांनी तक्रारदारांना कलकत्ता ते एैझवाल विमान प्रवासाच्या दरम्यान सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केली, ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय ? | नाही. |
2 | तक्रारदार सामनेवाले यांचेकडून नुकसानभरपाई वसूल करणेस पात्र आहेत काय? | नाही. |
3 | अंतीम आदेश ? | तक्रार रद्द करण्यात येते. |
कारण मिमांसा
6. तक्रारदारांनी मुंबई ते कलकत्ता हा विमान प्रवास सामनेवाले यांच्या विमानाने केला नव्हता तर इंडिगो एअरलाईन्सच्या विमानाने केला. सबब त्या संदर्भात सामनेवाले यांची काही एक जबाबदारी नव्हती. तक्रारदारांच्या तक्रारीतील कथनाप्रमाणे मुंबई ते कलकत्ता विमान मुंबई येथून सकाळी 7.50 वाजता सुटणारे होते, ते कलकत्ता येथे पोहचण्यास अपेक्षित वेळ 10.40 होता, तर सामनेवाले यांचे कलकत्ता येथून एैझवाल येथे जाणारे विमान दुपारी 1.00 वाजता सुटणार होते व एैझवाल येथे 2 ½ वाजता पोहचणार होते. तक्रारदारांच्या तक्रारीतील परिच्छेद क्रमांक 4 मध्ये ही बाब मान्य केली आहे की, इंडिगो ऐअरलाईन्सचे मुंबई कलकत्ता विमान मुंबई येथून सकळी 7.50 ला सुटण्याच्याऐवजी उशिराने म्हणजे, 9.00 वाजता सुटले. तक्रारदाराचे तक्रारीत असेही कथन आहे की, ते कलकत्ता विमानतळावर पोहचल्यानंतर आपल्या बॅगा घेऊन 11.35 वाजता सामनेवाले यांच्या कक्षामध्ये पोहचले.
7. सामनेवाले यांनी तक्रारदारांच्या वरील कथनास नकार दिलेला आहे, व तक्रारदार 12.15 वाजता सामनेवाले यांच्या कक्षामध्ये पोहचले असे कथन केले आहे. तक्रारदारांच्या तक्रारीतील कथने असे दर्शवितात की, तक्रारदारांचा मुंबई ते कलकत्ता विमानप्रवास करणेकामी सकाळी 7.50 ते 10.40 वाजता म्हणजेच तीन तासांचा प्रवास अवधी अपेक्षित होता. तक्रारदारांचे विमान सकाळी 7.50 च्याऐवजी 9.00 वाजता निघाले, तर निश्चितच ते 12.00 वाजता कलकत्ता येथे पोहचले असता, त्यानंतर तक्रारदारांनी आपल्या बॅगा मिळविणेकामी बॅगबेल्टजवळ काही वेळ थांबावे लागले व त्यानंतर तक्रारदार बॅग घेऊन सामनेवाले यांच्या कक्षामध्ये पोहचले. सामनेवाले यांची कैफीयतीत व पुराव्याच्या शपथपत्रामध्ये असे स्पष्ट कथन आहे की, तक्रारदार सामनेवाले यांच्या कक्षामध्ये कलकत्ता विमानतळावर 11.55 वाजता पोहचण्या ऐवजी ते 12.15 वाजता पोहचले.
8. विमान प्रवाशास विमानातून उतरण्यास लागणारा वेळ तसेच बॅगांचा बेल्टजवळ मिळविण्याकामी करावी लागणारी प्रतिक्षा व त्यानंतर बॅगा घेऊन सामनेवाले यांच्या कक्षामध्ये पोहचण्यास लागणारा वेळ गृहीत धरला तर तक्रारदार 11.55 वाजता सामनेवाले यांच्या कक्षामध्ये कलकत्ता विमानतळावर पोहचणे अशक्य होते. मुळातच मुंबई ते कलकत्ता विमान प्रवासास तीन तासांचा वेळ लागणार असल्याने तक्रारदारांचे विमान मुंबई येथून 9.00 वाजता सुटले असल्याने ते 12 वाजण्याच्या सुमारास कलकत्ता येथे पोहचले असते, व त्यानंतर तक्रारदारांनी विमानतळावर बॅगा घेऊन सामनेवाले यांच्या कक्षामध्ये पोहचण्यास लागणारा वेळ गृहीत धरला तर तक्रारदार हे सामनेवाले यांचे कलकत्ता येथील विमानतळावर कक्षामध्ये 12.15 वाजता पोहचले हे सामनेवाले यांचे कथन योग्य व संयुक्तीक दिसते.
9. तक्रारदारांकडे दोन बॅगा होत्या, ज्यामध्ये एकूण 81 किलो वजनाच्या चिजवस्तू होत्या. सामनेवाले यांच्या कथनाप्रमाणे कलकत्ता ते एैझवाल विमानामध्ये विमानप्रवाशी केवळ 25 किलो चेक-इन बॅगमध्ये व 7 किलो वजनाच्या वस्तू हॅण्डबॅगमध्ये ठेवू शकत होते. सामनेवाले यांच्या कैफीयतीमध्ये व शपथपत्रामध्ये असे स्पष्ट कथन आहे की, सामनेवाले यांचे कलकत्ता ते एैझवाल जाणारे विमान हे लहान आकाराचे होते. त्यामध्ये प्रवाशीबॅगांच्या वजनावर मर्यादा होती, व प्रवाशी एकूण 32 किलो पेक्षा जास्त वजनाच्या वस्तू त्या प्रवासादरम्यान नेऊ शकत नव्हते. सामनेवाले यांनी आपल्या कैफीयतीसोबत निशाणी आर.डब्ल्यू-3 येथे इमेल संदेशाची प्रत दाखल केलेली आहे, त्यामध्ये या सर्व बाबींचा खुलासा आलेला आहे. तक्रारदारांकडे जादा वजनाच्या दोन बॅगा असल्याने तक्रारदारांना त्यातील वजन कमी करण्याचे सांगण्यात आले होते. परंतु तक्रारदार आवश्यक तो निर्णय लवकर घेऊ शकले नाहीत, तसेच आपल्या बॅगांमधील वजन कमी करु शकले नाहीत. परिणामतः सामनेवाले यांचे कलकत्त्याहून 1.00 वाजता सुटणा-या विमानामध्ये तक्रारदार बसू शकले नाहीत.
10. वरील सर्व बाबी नमूद करणारे सामनेवाले यांचे अधिकारी शीखा राय यांचे शपथपत्र सामनेवाले यांनी दाखल केलेले आहे. सदरील साक्षीदार शीखा राय या दिनांक 18/12/2009 रोजी सामनेवाले यांच्या कलकत्ता विमानतळावरील कक्षामध्ये काम करीत होत्या व त्यामुळे त्यांच्या कथनास महत्व प्राप्त होते. मुळातच तक्रारदारांनी आपल्या तक्रारीमध्ये ही बाब मान्य केली आहे की, त्यांच्याकडे अधिकचे वजन असलेल्या दोन बॅगा होत्या व त्यांना मुंबई ते कलकत्ता प्रवासा दरम्यान रुपये 5,000/- जादा शूल्क भरावे लागले. तक्रारदारांचे असे कथन आहे की कलकत्ता विमानतळावर देखील सामनेवाले यांचेकडे जादा शूल्क भरण्यास ते तयार होते, परंतु सामनेवाले यांच्या कर्मचा-यांनी त्यांना सहकार्य केले नाही, व तक्रारदारांना सफाईदार इंग्रजी संभाषण येत नसल्याने त्यांची कोंडी करण्यात आली. सामनेवाले यांच्या साक्षीदाराच्या शपथपत्राचे वाचन केले असतांना परिस्थिती उलट होती असे दिसून येते, व तक्रारदार आपल्या नातेवाईकाच्या संपर्कात होते ज्यांना विमानतळावर पोहोचण्यास उशिर झाला. दरम्यान तक्रारदार आपल्या बॅगेतील चिजवस्तू कमी करुन 1.00 वाजता सुटणा-या विमानामध्ये बसू शकले नाहीत. यामध्ये सामनेवाले यांनी तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केली असे दिसून येत नाही.
11. त्यातही महत्वाची बाब म्हणजे सामनेवाले यांनी तक्रारदारांना कलकत्ता ते एैझवाल या विमान प्रवासाचे भाडे तक्रारदारांच्या एजंटमार्फत परत केले ही बाब तक्रारदारांनी नाकारलेली नाही. तक्रारदारांनी कलकत्ता ते बॅगडोगरा, व बॅगडोगरा ते पुन्हा कलकत्ता हा विमान प्रवास सामनेवाले यांच्या विमानाने केलेला नाही, त्यातही तक्रारदारांना त्या प्रवासाच्या दरम्यान सेवा सुविधा पुरविण्यात कसूर झाली असे तक्रारदारांचे कथन नाही. एकूणच उपलब्ध पुराव्याचा विचार करता सामनेवाले यांचे कलकत्ता ते एैझवाल जाणा-या विमानाचा आकार कमी असल्याने व त्या विमानामध्ये प्रती प्रवासी 32 किलो वजनाची मर्यादा असल्याने व तक्रारदारांकडे त्यापेक्षा कितीतरी अधिक म्हणजेच 81 किलो वजन होते व तक्रारदार दरम्यानच्या काळामध्ये आपल्याकडील चिजवस्तूंची विल्हेवाट करु शकले नाहीत यासर्व बाबींमध्ये बराच वेळ गेला व तक्रारदारांचे कलकत्ता ते एैझवाल दुपारी 1.00 वाजता सुटणारे विमान निघून गेले त्यामध्ये तक्रारदार बसू शकले नाहीत, ही बाब दुर्दैवी असली तरी त्यामध्ये सामनेवाले यांच्या कर्मचा-यांचा दोष होता असे दिसून येत नाही.
12. वरील चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन पुढील प्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
1. तक्रार क्रमांक 198/2010 रद्द करण्यात येते.
2. खर्चाबद्दल आदेश नाही.
3. न्याय निर्णयाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामूल्य पाठविण्यात याव्यात.
ठिकाणः मुंबई.
दिनांकः 05/09/2013
( एस. आर. सानप ) ( ज. ल. देशपांडे )
सदस्य अध्यक्ष
एम.एम.टी./-