तक्रारदारातर्फे वकील : श्री. मित्तल विरा
सामनेवालेतर्फे वकील : श्री. सुखेश शाह
आदेशः- श्री. एम.वाय. मानकर अध्यक्ष, -ठिकाणः बांद्रा
न्यायनिर्णय
1. तक्रारदार यांचे प्रतिनीधी दि. 17/12/2009 ला सामनेवाले कडे दि. 24/12/2009 च्या विमान प्रवासाचे तिकीट रद्द करण्याकरीता गेले असता त्यांना ते तिकीट 20/10/2009 लाच रद्द करण्यात आले व रक्कम अदा करण्यात आल्याचे सांगीतले. तक्रारदार यांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण त्यांनी तिकीट रद्द केली नव्हती. सबब, नुकसान भरपाईकरीता ही तक्रार दाखल करण्यात आली. सामनेवाले हे नोटीस प्राप्त झाल्यानंतर हजर झाले व सविस्तर लेखीकैफियत कागदपत्रासह दाखल केली.
2. तक्रारदार यांच्या अनुसार त्यांच्याकरीता व कुटूंबियाकरीता विमान प्रवासाचे 4 तिकीट सामनेवाले यांच्याकडून दि. 17/10/2009 ला मुंबई ते कांडला करीता दि. 24/12/2009 च्या यात्रेकरीता प्राप्त केले होते हे 4 तिकीट त्यांनी त्यांचे भूज ते मुंबई च्या दि. 28/10/2009 च्या प्रवास यात्रे ऐवजी किंवा समायोजित करून देण्यात आले होते. त्यांचे प्रतिनीधी दि. 17/12/2009 ला विमान तळावर सामनेवाले यांच्या तिकीट खिडकीवर तिकीट रद्द करण्याकरीता गेले असता त्यांना ते 4 तिकीट दि. 20/10/2009 लाच रद्द करण्यात आल्याबाबत कळविण्यात आले. हे 4 तिकीट दि. 24/12/2009 च्या यात्रेकरीता होती. प्रतिनीधीकडून हे ऐकल्यानंतर तक्रारदार यांना धक्का बसला. कारण, त्यांनी तिकीट रद्द केली नव्हती. सदरहू बाबीवरून कोणत्यातरी इसमानी लबाडी करून सामनेवाले कडून त्यांच्या संमतीशिवाय तिकीट रद्द केली व पैसे अफरातफर केले. तक्रारदाराप्रमाणे सामनेवाले यांनी तिकीट रद्द करतांना आवश्यक खबरदारी घेतली नाही. सामनेवाले यांना नोटीस देण्यात आली. परंतू योग्य प्रतिसाद न मिळाल्यामूळे ही तक्रार दाखल करून 4 तिकीटांचे पैसे व रू. 2,00,000/-, नुकसान भरपाईसह मागण्यात आले. तक्रारदारानी तक्रारीसोबत तिकीटांच्या प्रती व इतर आवश्यक कागदपत्रे दाखल केली.
3. सामनेवाले यांच्या नूसार तक्रारदारानी दि. 30/07/2009 ला 5 तिकीट दोन वेगवेगळया यात्रेसाठी आरक्षित केली होती व त्यामध्ये दि. 17/10/2009 ला मोठा फेरबदल करण्यात आला. श्री. श्यामजी पासू विरा यांचे तिकीट तसेच कायम ठेवण्यात आले व इतरांच्या यात्रेमध्ये बदल करण्यात आला. तक्रारदाराचे दि. 24/12/2009 च्या यात्रेकरीता असलेले 4 तिकीट दि. 20/10/2009 ला रद्द करण्यात आली व तिकीट रद्द करण्याकरीता आवश्यक असलेली माहिती त्या प्रतिनीधींनी दिली. त्या माहितीची कर्मचा-यांनी खातरजमा केली व नंतर तिकीट रद्द करून त्या प्रतिनीधीला कंपनीच्या नियमाप्रमाणे पैसे देण्यात आले. सामनेवाले यांनी तिकीट रद्द करतांना आवश्यक ती खबरदारी घेतली. त्यामुळे तक्रारदार यांचा दावा त्यांच्याविरूध्द चालु शकत नाही. तक्रारदारांना कारवाई करावयाची असल्यास त्यांनी तिकीट रद्द करणा-या इसमाविरूध्द करणे आवश्यक आहे. तक्रारीमध्ये नमूद केल्याप्रमाणे लबाडी झाल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे ही तक्रार या मंचात चालु शकत नाही. तक्रारदारानी यात्रेकरीता रक्कम अदा केल्याबाबत स्पष्टपणे नमूद केलेले नाही. त्यामुळे ही तक्रार खारीज करण्यात यावी.
4. तक्रारदार यांनी पुराव्याचे शपथपत्र व लेखीयुक्तीवाद दाखल केला. सामनेवाले यांनी त्यांचे पुराव्याचे शपथपत्र दाखल केले. सामनेवाले यांनी त्यांची लेखीकैफियत व पुराव्याचे शपथपत्र हाच लेखीयुक्तीवाद समजण्यात यावा अशी पुरसीस दाखल केली. तक्रारदार यांच्या वकीलांनी त्यांचा लेखीयुक्तीवाद हाच तोंडीयुक्तीवाद समजण्यात यावा असे निवेदन केले. सामनेवाले हे तोंडीयुक्तीवादाच्या दिवशी गैरहजर होते.
5. उपरोक्त बाबीवरून खालील बाबी मान्य आहेत असे समजता येईल.
तक्रारदार यांच्याकडे सामनेवाले यांची विमान सेवा मुंबई ते कांडला यात्रेकरीता दि. 24/12/2009 चे 4 तिकीट होते. तक्रारदार यांच्या प्रमाणे दि. 17/12/2009 ला 4 तिकीट रद्द करण्यास गेले असता, ते तिकीट दि. 24/10/2009 लाच रद्द करण्यात आले व रक्कम अदा करण्यात आल्याचे सामनेवाले यांना सांगीतले.
6. तक्रारदार यांनी ही तक्रार फारशी गांर्भीयाने दाखल केल्याचे दिसून येत नाही. त्रोटक वा अर्धवट माहिती दिलेली आहे. तिकीटाकरीता किती रक्कम अदा केली होती व त्यांना सामनेवाले यांच्याकडून किती रक्कम त्याकरीता हवी आहे हे सुध्दा तक्रारीमध्ये कुठेच नमूद केलेले नाही. 4 तिकीटांचा परतावा मिळावा असा सरळ व मोघम उल्लेख मागणीच्या परिच्छेदमध्ये आहे.
7. तक्रारदार यांनी तक्रारीचे परिच्छेद 3 मध्ये सामनेवाले यांनी भूज ते मुंबई यात्रेकरीता दि. 28/10/2009 च्या विमान यात्रेऐवजी समायोजन करून दि. 17/10/2009 ला मुंबई ते कांडला करीता दि. 24/12/2009 चे विमान प्रवासाचे तिकीट दिले होते. असे नमूद केले. परंतू, त्यांनी भूज ते मुंबई या प्रवासाची तिकीट केव्हा आरक्षीत केली होती व त्याकरीता रक्कम अदा केली होती हे कुठेच नमूद केलेले नाही. तसेच हा बदल त्यांनी केव्हा कसा व कोणामार्फत केला याचा उल्लेख नाही.
8. सामनेवाले यांच्या प्रमाणे दि. 30/07/2009 ला 5 व्यक्तीकरीता तिकीट आरक्षीत करण्यात आली होती व एका व्यक्तीशिवाय इतर प्रवासाच्या बाबतीत मोठया प्रमाणावर दि. 17/10/2009 ला फेरबदल करण्यात आला होता त्याबाबत सामनेवाले यांनी कागदपत्रे दाखल केली परंतू तक्रारदार यांनी 5 व्यक्तीच्या प्रवासाबाबत व दि 17/10/2009 ला बदल करण्याबाबत कुठेच उल्लेख केलेला नाही.
9. सामनेवाले यांच्यानूसार तक्रारदार यांचे 4 ही तिकीट दि. 20/10/2009 ला रद्द करण्यात आले. तिकीट रद्द करण्याकरीता आलेल्या इसमानी आवश्यक माहिती, जी प्रवाशाला ज्ञात असते ती दिली होती व तिची पडताळणी करून तिकीट रद्द करण्यात आली व रक्कम अदा करण्यात आली. उल्लेखनीय बाब ही की, तक्रारदार यांनी दि. 17/12/2009 ला सुध्दा त्यांच्या प्रतिनीधींनाच पाठविले होते. त्यामुळे सामनेवाले यांचा कथनाला पुष्टी मिळते. तक्रारदार यांनी तक्रारीच्या परिच्छेद 6 मध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की, कोणत्यातरी इसमाने लबाडी करून 4 तिकीटाचे पैसे सामनेवालेकडून तक्रारदार यांच्या संमतीशिवाय प्राप्त करून अफरातफर केली. परंतू, तक्रारदारांनी त्याबाबत पोलीसांकडे तक्रार किंवा फौजदारी खटला दाखल केल्याबाबत उल्लेख केलेला नाही.
10. सामनेवाले यांनी तिकीट रद्द करतांना योग्य व माफक खबरदारी घेतल्याचे त्यांच्या पुराव्यावरून स्पष्ट होते. सामनेवाले यांनी जरी तक्रारदार यांच्या अपेक्षेप्रमाणे खबरदारी घेतली नसली तरी सामनेवाले यांनी घेतलेल्या खबरदारीबाबत दोष देता येणार नाही व त्यांना सेवा देण्यात कसुर केला असे म्हणता येणार नाही.
11. उपरोक्त चर्चेनूसार व निष्कर्षानूसार आम्ही खालील आदेश पारीत करीत आहोत.
12. या मंचाचा कार्यभार व इतर प्रशासकिय बाबी विचारात घेता ही तक्रार यापूर्वी निकाली काढता आली नाही.
आदेश
- तक्रार क्र. 294/2010 खारीज करण्यात येते.
- खर्चाबाबत आदेश नाही.
- आदेशाच्या प्रती उभयपक्षांना निःशुल्क पाठविण्यात याव्या
- अतिरीक्त संच तक्रारदारांना परत करण्यात यावे.
npk/-