जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे समोर
ग्राहक तक्रार क्रमांक –67/2011 तक्रार दाखल तारीख –02/05/2011
बाळू पि.साहेबराव बोडखे
वय 31 वर्षे,धंदा वकिली ..तक्रारदार
रा.खिळद ता.आष्टी, जि.बीड
द्वारा बी.एस.सानप,शाहू नगर,
पांगरी रोड, बीड.ता. व जि.बीड
विरुध्द
1. कायनेटीक इंजिनियरिंग लिमिटेड
विभाग सेवा अधिकारी,
द्वारा, कायनेटीक इंजिनियरिंग लिमिटेड,
डी-1 ब्लॉक, प्लॉट नं.18/1,चिंचवड,
पुणे-411 019. ..सामनेवाला
2. मे.माणिक मोटार्स, बीड
जालना रोड, बीड, ता.जि.बीड
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य.
तक्रारदारातर्फे :- अँड.एस.एम.नन्नवरे
सामनेवाले क्र.1 व 2 तर्फे :- कोणीही हजर नाही.
निकालपत्र
(घोषित द्वारा श्री.अजय भोसरेकर, सदस्य)
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदार हा खिळद ता.आष्टी येथील रहिवासी असून व्यवसायाने विधीज्ञ आहे, त्यांने आष्टी येथे वकिली व्यवसाय करतात. तक्रारदाराने एक दुचाकी वाहन खरेदी केले. त्यांचा वाहन क्रमांक एम.एच.-23-एल-6883 असा आहे. तक्रारदाराने सामनेवाला क्र. 2 यांचेकडे दि.22.02.2005 रोजी कायनेटीक व्हेलॉसिटी (सिल्व्हर) रंगाची रक्कम रु.39,400/-रोख भरुन खरेदी केली. सामनेवाला क्र.2 हे सामनेवाला क्र.1 यांचे अधिकृत विक्रेते आहेत. तक्रारदार हा दि.11.09.2009 रोजी बीडहून आष्टी येथे न्यायालयीन कामकाजासाठी जात असताना बीड-नगर रोडवर मौजे सौताडा ता.पाटोदा येथे तक्रारदाराच्या मोटार सायकलचे अचानक पूढील चाकाचे मडगार्ड फुटले. तसेच खोपडीला चिर पडून तीही फुटली व मोटार सायकल विद्रूप दिसू लागली. म्हणून तक्रारदाराने सामनेवाला क्र.2 यांचेकडे नवीन मडगार्ड व खोपडी विकत मिळण्याची मागणी केली परंतु सामनेवाला क्र.2 यांनी स्पष्ट शब्दात देण्यास नकार दिला म्हणून तक्रारदार हे नगर येथील देवेंद्र अँटोमोबाईल्स यांचेकडे 3-4 वेळेस सुटटे भाग विकत मागितले परंतु ते त्यांचेकडे उपलब्ध नसल्याबददलचे सांगितले. तक्रारदाराने सामनेवाले यांच्या अहमदनगर येथील कार्यालयात दूरध्वनीवरुन संपर्क करुन मोटारसायकलच्या मडगार्ड व खोपडीची मागणी केली असता श्री.चोरडीया यांनी हे मिळत नसल्याचे सांगून अपमानास्पद वागणूक दिल्याबददलचे म्हटले आहे.
तक्रारदाराने सामनेवाला क्र.1 व 2 यांना दि.20.11.2009 रोजी कायदेशीर नोटीस पाठविली. त्या नोटीसचे उत्तर दि.25.11.2009 रोजी सामनेवाला क्र.1 यांनी दिले व त्यात सामनेवाला क्र.1 यांनी श्री.अजीत जोशी हे त्यांचे प्रतिनीधी असून त्यांचा मोबाईल नंबर देऊन त्यांचे बरोबर संपर्क साधण्यास सांगितले. तक्रारदाराने दि.25.11.2009 पासून श्री.अजीत जोशी या प्रतिनिधी बरोबर दूरध्वनी वरुन 15 वेळेस संपर्क केला परंतु उडवाउडवीचे उत्तरे देऊन त्यांनी तक्रारदारास मडगार्ड व खोपडी देऊ केली नाही.
म्हणून तक्रारदाराने पून्हा दि.30.12.2009 रोजी सामनेवाला क्र.1 व 2 यांना कायदेशीर स्मरण नोटीस पाठविली.त्या नोटीसचे उत्तर सामनेवाला क्र.1 यांनी दि.15.02.2010 रोजी देऊन तक्रारदारास पून्हा श्री.अजीत जोशी यांचेशी संपर्क साधण्यास सांगितले. तक्रारदाराने किमान 20 ते 25 वेळेस कंपनी प्रतिनीधी श्री. अजीत जोशी यांचे बरोबर दूरध्वनीवरुन संपर्क साधला परंतु तक्रारदाराचे मागणीप्रमाणे मडगार्ड व खोपडी देण्यास नकार देऊन उडवाउडवीची उत्तरे दिली असे म्हटले आहे. त्यामुळे तक्रारदारास त्यांचे सोबतच्या वकिल मित्रांनी हास्यास्पद व खजील करणारे वक्तव्य होऊ लागले.
तक्रारदाराने सामनेवालाकडून मानसिक त्रासापोटी रक्कम रु.75,000/-, आर्थिक त्रासापोटी रु.15,000/- व तक्रारीचे खर्चापोटी रु.10,000/- असे एकूण रु.1,00,000/- ची मागणी केली आहे.
तक्रारदाराचे आपले म्हणण्याचे पूष्टयर्थ एकूण 21 कागदपत्रे दाखल केली आहेत.
सामनेवाला क्र.1 व 2 यांना मंचाची नोटीस तसेच तक्रारदाराच्या दोन कायदेशीर नोटीस मिळूनही सामनेवाला क्र.1 व 2 हे मंचात हजर झाले नसल्यामुळे त्यांचे विरोधात दि.02.09.2011 रोजी एकतर्फा आदेश पारीत करण्यात आलेला आहे.
तक्रारदाराने दि.08.11.2011 रोजी आपले शपथपत्र व यूक्तीवाद पूर्ण केला.
तक्रारदाराने दाखल केलेले कागदपत्रे व तक्रारदाराच्या वकिलांनी केलेला यूक्तीवाद यांचे बारकाईने अवलोकन केले असता तक्रारदाराच्या लेखी म्हणण्यास सामनेवाला क्र.1 व 2 यांनी कोणत्याच प्रकारचे आवाहन देऊन त्यासाठी आवश्यक असणारे पुरावा दाखल केला नाही त्यामुळे या न्यायमंचासमोर सामनेवाला क्र.1 व 2 यांनी तक्रारदारास देऊ करावयाच्या सेवेत त्रूटी केली आहे हे दिसून येते.
सबब हे न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रारदाराचा अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
2. सामनेवाला क्र. 2 यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारास कायनेटिक व्हेलासिटी या दुचाकी वाहनाचे सिल्व्हर रंगाचे मडगार्ड व खोपडीची तक्रारदाराकडून योग्य रक्कम घेऊन आदेश प्राप्ती पासून 30 दिवसांचे आंत वाहन नं.एम.एच.-23-एल-6883 ला बसवून दयावे.
3. सामनेवाला क्र. 2 यांना आदेश देण्यात येतो की,आदेश क्र.2 चे पालन मुदतीत न केल्यास तक्रारदारास रक्कम रु.3,000/-(अक्षरी रु.तिन हजार फक्त) आदेश प्राप्ती पासून 30 दिवसांचे आंत अदा करावेत.
4. सामनेवाला क्र. 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी प्रत्येकी रु.1500/-(अक्षरी रु.दिड हजार फक्त) व दाव्याच्या खर्चापोटी प्रत्येकी रु.1,000/- (अक्षरी रु.एक हजार फक्त) आदेश प्राप्तीपासून 30 दिवसांचे आंत अदा करावेत.
5. ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम- 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
6.
(अजय भोसरेकर) (पी.बी.भट)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड