तक्रारदारातर्फे अॅड. श्री भंडारी हजर
जाबदेणार गैरहजर
********************************************************************
निकाल
पारीत दिनांकः- 31/05/2012
(द्वारा- श्रीमती अंजली देशमुख, अध्यक्ष)
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे आहे.
1] तक्रारदारांनी त्यांच्या किचनमध्ये फर्निचर बनवायचे होते म्हणून त्यांनी जाबदेणारांशी संपर्क साधला व जाबदेणारांनी त्यांना एकुण रक्कम रु. 73,000/- चे कोटेशन दिले. त्यानुसार तक्रारदारांनी जाबदेणारांना वेळोवेळी रक्कम रु. 70,000/- चेकद्वारे दिले. हे किचनचे फर्निचर दि. 19/7/2009 पर्यंत म्हणजेच 15 दिवसांत पूर्ण करण्याचे ठरले. परंतु, जाबदेणार किचन फर्निचरचे काम अर्धवट टाकून निघून गेले, त्यांनी फक्त 60% च काम पूर्ण केले, म्हणून तक्रारदारांनी ही कामे दुसर्याकडून रक्कम रु. 28,000/- देऊन करवून घेतली. म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणारांकडून रक्कम रु. 28,000/- द.सा.द.शे. 12% व्याजदराने, रक्कम रु. 20,000/- नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च म्हणून मागतात.
2] तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीच्या पुष्ठ्यर्थ शपथपत्र व कागदपत्रे, तसेच ज्यांच्याकडून उर्वरीत कामे करवून घेतली त्यांचे शपथपत्र दाखल केले.
3] जाबदेणारांना नोटीस पाठविली असता, त्यांची नोटीस “Not Claimed” या पोस्टाच्या शेर्यासह परत आली, म्हणून मंचाने सदरची सर्व्हिस योग्य समजून दोन्ही जाबदेणारांविरुद्ध एकतर्फा आदेश पारीत केला.
4] तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. जाबदेणारांनी तक्रारदारास त्यांच्या किचनच्या फर्निचरच्या कामासाठी एकुण रक्कम रु. 73,000/- चे कोटेशन दिले होते, त्यापैकी तक्रारदारांनी जाबदेणारांना चेकद्वारे एकुण रक्कम रु. 70,000/- दिले होते. त्यानंतर जाबदेणारांनी फर्निचरचे काम अर्धवट ठेवले म्हणून तक्रारदारांना सौरभ एंटरप्राईजेसकडून उर्वरीत काम पूर्ण करुन घ्यावे लागले व त्याकरीता रक्कम रु. 28,000/- खर्च करावे लागले. तक्रारदारांनी तक्रारीसोबत श्री संतोष आर. ओतारी यांचे शपथपत्र दाखल केले. तक्रारदारांनी श्री संतोष आर. ओतारी यांना रक्कम रु. 28,000/- दिल्याचे पावतीवरुन दिसून येते. जाबदेणार रक्कम रु. 28,000/- चे काम अर्धवट टाकून निघून गेले व ती रक्कम दुसर्यांना देऊन तक्रारदारास काम करवून घ्यावे लागले. म्हणून मंच जाबदेणारांना असा आदेश देते की, त्यांनी तक्रारदारास रक्कम रु. 28,000/- द.सा.द.शे. 9% व्याजदराने द्यावेत व तक्रारीचा खर्च म्हणून रक्कम रु. 1000/- द्यावेत.
5] वरील सर्व विवेचनावरुन व कागदपत्रांवरुन मंच खालील आदेश पारीत करते.
** आदेश **
1. तक्रारदारांची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
2. जाबदेणार क्र. 1 व 2 यांनी वैयक्तीक व संयुक्तीकरित्या
तक्रारदारास रक्कम रु. 28,000/-(रु. अठ्ठावीस हजार
फक्त) द.सा.द.शे. 9% व्याजदराने दि. 19/7/2009
पासून ते रक्कम अदा करेपर्यंत व रक्कम रु. 1,000/-
(रु. एक हजार फक्त) तक्रारीच्या खर्चापोटी, या आदेशाची
प्रत मिळाल्यापासून सहा आठवड्यांत द्यावी.
3. निकालाच्या प्रती दोन्ही पक्षकारांना नि:शुल्क
पाठविण्यात याव्यात.