(मंचाचा निर्णय: श्री. मिलींद केदार- सदस्य यांचे आदेशांन्वये) -// आ दे श //- (पारित दिनांक : 21/01/2011) 1. प्रस्तुत तक्रार ही तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारां विरुध्द मंचात दिनांक 17.06.2010 रोजी दाखल केली असुन प्रस्तुत तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :- 2. प्रस्तुत तक्रारीत तक्रारकर्त्याने नमुद केले आहे की, त्याने गैरअर्जदार क्र.1 कडून दि.11.07.2009 रोजी गैरअर्जदार क्र.4 व्दारे निर्मीत वातानुकूलीन यंत्र (Air Conditioner) 1.5 टन रु.25,400/- ला खरेदी केले. सदर वातानुकूलीन यंत्र खरेदी केल्यानंतर ते त्याचे घरी गैरअर्जदार क्र.2 तर्फे गैरअर्जदार क्र.3 व्दारा लावण्यांत आले. तेव्हा त्यात गॅस नव्हता, त्यामुळे वातानुकूलीन यंत्र वातावरण थंड करीन नव्हते. याबाबतची तक्रार तक्रारकर्त्याने गैरअर्जदारांना दिली व वातानुकूलीन यंत्र बदलवुन द्यावे अशी विनंती केली. तरी पण गैरअर्जदारांनी त्याचे विनंतीकडे दुर्लक्ष केले, त्यामुळे दि.24.05.2010 रोजी वकीला मार्फत नोटीस पाठविला त्यालाही गैरअर्जदारांनी कोणताही प्रतिसाद न दिल्यामुळे सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केली व त्याव्दारे मागणी केली की, दोषयुक्त वातानुकूलीन यंत्रा ऐवजी नवीन वातानुकूलीन यंत्र बदलवुन द्यावे. तसेच शारीरिक, मानसिक त्रासाकरीता रु.50,000/- व तक्रारीच्या खर्चाकरीता रु.15,000/- द्यावे अशी मागणी केलेली आहे. 3. सदर तक्रारीची नोटीस गैरअर्जदारांना बजाविण्यांत आली असता गैरअर्जदार क्र.1,2 व 4 यांनी सदर तक्रारीला खालिल प्रमाणे आपले उत्तर दाखल केलेले असुन त्यांनी तक्रारकर्त्याला सेवेत कोणतीही त्रुटी न दिल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी नमुद केले आहे की, त्यांनी तक्रारकर्त्यास दि.29.06.2010 रोजी रु.25,400/- वातानुकूलीन यंत्राची किंमत धनादेशाव्दारे परत केलेली आहे. त्यामुळे त्यांनी तक्रारकर्त्याला सेवेत कोणतीही त्रुटी दिलेली नसुन सदर तक्रार खारिज करण्याची विनंती केलेली आहे. 4. सदर तक्रारीची नोटीस गैरअर्जदार क्र.3 यांना बजाविण्यांत आली असता सदर नोटीस मिळूनही ते मंचात हजर झाले नाही, त्यामुळे मंचाने दि.12.10.2010 रोजी गैरअर्जदार क्र.3 विरुध्द प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश पारित केला. 5. प्रस्तुत प्रकरण मंचासमक्ष दि.11.01.2011 रोजी मौखिक युक्तिवादाकरीता आले असता तक्रारकर्ता व त्याचे वकील हजर, गैरअर्जदार क्र.1,2 व 4 यांचे वकील हजर त्याचा युक्तिवाद ऐकला. उभय पक्षांचा युक्तिवाद व दाखल दस्तावेजांचे अवलोकन केले असता मंच खालिल प्रमाणे निष्कर्षांप्रत पोहचले. -// नि ष्क र्ष //- 6. तक्रारकर्त्याने गैरअर्जदार क्र.1 यांचेकडून वातानुकूलीन यंत्र खरेदी केले होते ही बाब तक्रारकर्त्याने तक्रारीसोबत दाखल केलेल्या दस्तावेजांवरुन स्पष्ट होते, त्यामुळे तक्रारकर्ता हा गैरअर्जदारांचा ‘ग्राहक’ ठरतो असे मंचाचे मत आहे. 7. सदर वातानुकूलीन यंत्रामध्ये वारंवार दोष निर्माण होत होते व याबाबतची तक्रार तक्रारकर्त्याने गैरअर्जदारांना दिल्याचे सुध्दा दस्तावेजांवरुन सिध्द होते. तक्रारकर्त्याने दाखल केलेला दस्तावेज क्र.5 वरुन ही बाब स्पष्ट होते की, तक्रारकर्त्याकडे जेव्हा वातानुकूलीन यंत्र लावले तेव्हा त्यामध्ये गॅस नव्हता. गैरअर्जदारांनी आपल्या उत्तरात नमुद केले आहे की, त्यांनी तक्रारकर्त्याला योग्य ती सेवा दिली असुन तक्रारकर्त्याचे समाधान न झाल्यामुळे त्याला वातानुकूलीन यंत्राची संपूर्ण रक्कम धनादेशाव्दारे परत दिलेली आहे. सदर बाब गैरअर्जदारांनी दाखल केलेल्या दस्तावेजांवरुन स्पष्ट होते. तक्रारकर्त्याने आपल्या प्रतिउत्तरात म्हटले आहे की, सदर धनादेशाव्दारे वातानुकूलीन यंत्राची किंमत त्याने आक्षेप नोंदवुन स्विकारला आहे. गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्यास वातानुकूलीन यंत्राची किंमत 29, जून-2010 चे धनादेशाव्दारे दिल्याचे तक्रारीत दाखल दस्तावेजांवरुन स्पष्ट होते. तसेच तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचासमक्ष दि.16.06.2010 रोजी दाखल केली, यावरुन तक्रारकर्त्याने सदर तक्रार दाखल केल्यानंतर गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्यास वातानुकूलीन यंत्राची किंमत परत केल्याचे स्पष्ट होते. 8. गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्याने दिलेल्या नोटीसला प्रतिसाद दिला नाही त्यामुळे त्यास प्रस्तुत तक्रार मंचात दाखल करावी लागली व तक्रारीचा खर्च करावा लागला. म्हणून तक्रारकर्ता तक्रारीचा खर्च मिळण्यांस पात्र आहे व न्यायोचितदृष्टया तक्रारकर्ता रु.2,000/- मिळण्यास पात्र ठरतो असे मंचाचे मत आहे. गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्यास वातानुकूलीन यंत्राची किंमत परत दिल्यामुळे तक्रारीतील आक्षेपात काही तथ्य राहत नसल्यामुळे प्रस्तुत तक्रार निकाली काढण्यांत येते. प्रस्तुत प्रकरणात दाखल दस्तावेजांचे तसेच युक्तिवादाचे अवलोकन केले असता मंच वरील निष्कर्षांवरुन खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे. -// अं ति म आ दे श //- 1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते. 2. गैरअर्जदारांना आदेश देण्यांत येतो की, त्यांनी संयुक्तपणे किंवा वैयक्तिकपणे तक्रारकर्त्यास तक्रारीच्या खर्चाचे रु.2,000/- अदा करावे. 3. वरील आदेशाची अंमलबजावणी गैरअर्जदारांनी आदेशाची प्रत मिळाल्याचे दिनांकापासुन 30 दिवसांचे आंत करावी.
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |