::: आ दे श :::
( पारीत दिनांक : 06/02/2015 )
आदरणीय अध्यक्षा सौ. एस. एम. उंटवाले, यांचे अनुसार
1. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, सादर करण्यात आलेल्या, सदर तक्रारीचा सारांश येणेप्रमाणे, . .
विरुध्दपक्ष क्र. 1 ही कंपनी कायद्याअंतर्गत नोंदणीकृत कंपनी असून विरुध्दपक्ष क्र. 2 ते 5 हे विरुध्दपक्ष क्र. 1 चे संचालक आहेत. विरुध्दपक्ष क्र. 6 हे चारचाकी वाहनाचे निर्माते व विक्रेते आहेत व विरुध्दपक्ष क्र. 7 व 8 हे विदर्भ विभागाकरिता सक्षम अधिकारी आहेत. विरुध्दपक्ष क्र. 1 यांचे सेल्समन यांनी तक्रारकर्त्यास भेटून विरुध्दपक्ष क्र. 6 द्वारे निर्मित वाहनासंबंधी माहिती दिली तसेच मारुती एस एक्स फोर – झेड डी आय सेडन / लक्झरीयस हे इतर वाहनापेक्षा उत्कृष्ट चालणारे, दिसणारे व आरामदेह वाहन आहे, असे सांगितले. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र. 1 च्या सेल्समनद्वारे देण्यात आलेल्या माहितीवर विश्वास ठेवून स्वत:चे खाजगी वापराकरिता सदर वाहन विकत घेण्याचे ठरविले व दि. 1/3/2013 रोजी सदर वाहनाचे कोटेशन घेतले. सदर कोटेशनमध्ये वाहन किंमती व्यतिरिक्त रु. 4495/- अतिरिक्त जोडण्यात आले होते व ही रक्कम वाहन आणतांना वाहनाच्या बॉडीचे कोणत्याही प्रकारचे नुकसान अथवा त्यावर कोणत्याही प्रकारच्या स्क्रॅचेस येऊ नये म्हणून अतिरिक्त हाताळणी शुल्क म्हणून आकारण्यात येत असल्याचे सांगण्यात आले व ही रक्कम देण्याचे तक्रारकर्त्याने मान्य केले. त्याप्रमाणे तक्रारकर्त्याने सदर वाहन बुक केले व रु. 20,000/- दि. 1/3/2013 रोजी विरुध्दपक्ष क्र. 1 कडे जमा केले. तक्रारकर्त्याने सदर वाहन विकत घेण्याकरिता स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेकडून कर्ज घेतले. दि. 18/3/2013 रोजी विरुध्दपक्ष क्र. 1 कडून तक्रारकर्त्यास निरोप मिळाला की, त्यांनी बुक केलेले सदर वाहन हे त्यांचेकडे आले आहे. त्याप्रमाणे तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र. 1 कडून विरुध्दपक्ष क्र. 6 द्वारे निर्मित मारोती SX4 ZDI Sedan / Luxuries हे वाहन दि. 18/3/2013 रोजी रु. 10,36,020/- हाताळणी शुल्कासहीत खरेदी केले. तक्रारकर्त्याने सदर वाहन दाखविण्याची विनंती केली, परंतु कुठलेही कारण न सांगता पुर्ण रक्कम भरण्यानंतर वाहन दाखविण्ययात येईल, असे विरुध्दपक्ष क्र. 1 ने सांगितले व विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी सदर वाहन तक्रारकर्त्यास दाखवले नाही व वाहनाची तपासणी करु दिली नाही, तक्रारकर्त्याकडून संपुर्ण रक्कम प्राप्त झाल्यानंतर विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी सदर वाहन तक्रारकर्त्याला दाखवले. सदर वाहनाची पाहणी करतांना तक्रारकर्त्याच्या असे निदर्शनास आले की, गाडीवर ब-याच ठिकाणी वरखडे, स्क्रॅचेस, पोचे, समोरच्या व मागील भागाच्या रंगामध्ये तफावत आहे, तसेच वाहनावर दानेदार सारखे उठावदार खुणा असल्याचे जाणविले. सदरच्या वाहनावरुन हात फिरविल्यावर स्पर्शाद्वारे सदरची बाब स्पष्टपणे जाणवत होती. अशा प्रकारे तक्रारकर्त्यास सदरचे वाहन दोषपुर्ण असल्याचे आढळले. तसेच सदरच्या वाहनावर गंज चढल्याच्या खुना देखील आढळल्या. या बाबी तक्रारकर्त्याच्या लक्षात आल्यानंतर त्या बाबत तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र. 1 कडे तक्रार केली असता, सदर वाहनाची सफाई केल्यानंतर सर्व दोष निघुन जातील, असे सांगितले. सदर समस्यांचा समाधान कारक निपटारा होत नाही तो पर्यंत तक्रारकर्ता सदर वाहनाचा ताबा घेणार नाही तसेच सदर वाहनाचे आर.टी.ओ कडे रजिस्टेशन करु नये असे तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र. 1 यांना सांगितले व अशा दोषपुर्ण दिसणा-या वाहनाचा ताबा घेण्यास तक्रारकर्त्याने नकार दिला. विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी सदर दोषाबाबत वरिष्ठ अधिका-यांना कळवून त्यावर उपाय काढू असे म्हटले होते. दि. 19/3/2013 रोजी विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी तक्रारकर्त्यास असा निरोप दिला की, वाहनातील उपरोक्त सर्व दोष दुर करण्यात आले. मात्र तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडील सदर वाहनाचे निरीक्षण केले असता, उपरोक्त सर्व समस्या पहील्या सारख्याच कायम होत्या. त्यामुळे तक्रारकर्त्याने गाडीचा ताबा घेण्यास नकार दिला. तक्रारकर्त्याने गाडी निर्माता / विरुध्दपक्ष क्र. 6 यांच्या कॉल सेंटरवर इ-मेल द्वारे तक्रार केली, त्यावर विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी ई मेलद्वारे खुलासा दिला की, त्यांच्या वाहनातील सर्व दोष दुर झाले असून सदर वाहनाची आर.टी.ओ. कार्यालयात नोंदणी झालेली आहे, त्यामुळे वाहनाचा ताबा घ्यावाच लागेल. तक्रारकर्त्याने सदर वाहनाची आर.टी.ओ. कार्यालयात नोंदणी करण्यास मनाई केली असतांना सुध्दा सदर दोषपुर्ण वाहनाची नोंदणी विरुध्दपक्ष यांनी परस्पर करुन घेतली होती. तक्रारकर्ते यांनी विरुध्दपक्ष क्र. 6 कडे वारंवार तक्रारी केल्या होत्या, मात्र त्यांनी तक्रारीची दखल घेतली नाही. विरुध्दपक्ष क्र. 3 यांनी दि. 21/3/2013 रोजी तक्रारकर्त्यास बोलावून असे सांगितले की, वाहन जसे आहे तसे ताब्यात घ्यावे लागेल. तक्रारकर्त्याद्वारे वाहनाची पाहणी केली असता, सदर वाहन फक्त धुण्यात आले असून पुर्वीचे दोष जश्याच्या तसे आहेत, असे दिसून आले. त्यामुळे तक्रारकर्त्याने वाहनाचा ताबा घेण्यास नकार दिला, यावर विरुध्दपक्ष क्र. 3 यांनी उध्दटपणे अपमानास्पद शब्दांचा वापर केला. त्यानंतर विरुध्दपक्ष क्र. 6 च्या अधिका-याने अकोला येथे येवून सदर वाहनाची तपासणी करुन सदर वाहनामध्ये उपरोक्त दोष आहे, असे कबुल केले, सदर दोष दुर करण्याकरिता योग्य ती पावले उचलतील असे त्यांनी कबुल केले, परंतु ते दोष दुर करण्याकरिता सदर विरुध्दपक्ष यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. विरुध्दपक्ष क्र. 3 यांनी दि. 10/4/2013 रोजी तक्रारकर्त्याला असे सांगितले की, वाहन जसे आहे तसा ताबा तक्रारकर्त्याने घेतल्यास ते वाहनाची अतिरिक्त 3 ते 4 वर्षाची वारंटी देतील व शिवाय रु. 25,000/- सुट देतील. मात्र तक्रारकर्त्याने यास नकार दिला आहे. तक्रारकर्त्याने वेळोवेळी दि. 16/3/2013 पासून ई-मेलच्या माध्यमातून विरुध्दपक्षाकडे गाडीतील दोषांबाबत तक्रारी करुन दुसरे त्याच प्रकारचे वाहन देण्याबाबत विनंती केली होती, तसेच दि. 15/5/2013 रोजी नोंदणीकृत डाकेने सर्व विरुध्दपक्षाना नोटीस पाठविली, ज्यास विरुध्दपक्ष क्र. 1 ते 5 यांनी खोटा जबाब दिला. अशा प्रकारे सर्व विरुध्दपक्षांनी सेवेमध्ये न्युनता, निष्काळजीपणा व अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार मंचासमोर दाखल करुन विनंती केली आहे की, विरुध्दपक्ष क्र. 1 ते 8 यांनी अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब व सेवेत न्युनता, केली असे घोषित करण्यात यावे, विरुध्दपक्ष क्र. 1 ते 8 यांना एकत्रित व संयुक्तीकरित्या तक्रारकर्त्यास नवीन / दुसरे मारुती SX4-ZDI Sedan/Luxuries वाहन पुरविण्याबाबत निर्देश देण्यात यावे. जर वाहन बदलुन देणे शक्य नसेल तर वाहनाची संपुर्ण किंमत रु. 10,36,020/- तक्रारकर्त्यास व्याजासह परत करण्याचे निर्देश विरुध्दपक्षांना द्यावे. तक्रारकर्त्यास मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रासापोटी रु. 2,36,420/- देण्याचा निर्देश विरुध्दपक्षास द्यावा. सदर तक्रारीचा खर्च रु. 15,000/- विरुध्दपक्ष क्र. 1 ते 8 यांनी द्यावा.
सदर तक्रार शपथेवर दाखल असून त्यासोबत एकंदर 23 दस्तऐवज पुरावे म्हणून जोडण्यात आले आहेत.
विरुध्दपक्ष क्र.1,2 व 5 यांचा लेखीजवाब :-
2. सदर तक्रारीचे अनुषंगाने, विरुध्दपक्ष क्र. 1,2 व 5 यांनी लेखीजवाब दाखल केला, त्यानुसार त्यांनी तक्रारकर्त्याचे सर्व आरोप फेटाळले व असे नमूद केले आहे की,…
विरुध्दपक्ष क्र. 2 ते 5 हे विरुध्दपक्ष क्र. 1 चे फक्त संचालक आहेत व त्यामुळे त्यांची वैयक्तीकरित्या विरुध्दपक्ष क्र. 1 चे व्यवहाराकरिता कोणतीही प्रातिनिधीक जबाबदारी नाही व कंपनी कायद्याअंतर्गत कंपनी भागधारक व संचालक यांची जबाबदारी फक्त त्यांच्या भागापुरतीच मर्यादित आहे. त्यामुळे प्रस्तुत तक्रार विरुध्दपक्ष क्र. 2 ते 5 विरुध्द दाखल करण्याचे तक्रारकर्त्यास कोणतेही कायदेशिर कारण नाही. विरुध्दपक्षाने मान्य केले की, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र. 1 ला वाहनाची किंमत रु. 8,90,870/- अदा केले तसेच या किंमती व्यतिरिक्त व्यापक, विस्तृत विम्याची रक्कम रु. 21,608/- अदा केली, या व्यतिरिक्त तक्रारकर्त्याने आर.टी.ओ. खर्च व वाहनावरील देय ऑक्ट्राय याचा सुध्दा भरणा विरुध्दपक्ष क्र. 1 कडे केला. तक्रारकर्त्याने SX4-ZDI हे बुक केलेले वाहन अकोला येथे आल्यानंतर त्याचे विरुध्दपक्ष क्र. 1 च्या शोरुम मध्ये निरीक्षण केले आहे. त्या निरीक्षणामध्ये सदर वाहनाचे चेचिस क्र. 216736 असल्याचे तक्रारकर्त्याने नोंदले. त्यानंतर तक्रारकर्त्याने हे वाहन आर.टी.ओ. कडे दि. 18/3/2013 रोजी स्वत:च्या सहीने व स्वत:चा फोटो लावून व अंगठ्याचा ठसा देऊन, नोंदणी करुन घेतले व त्याचा टॅक्स रु. 97,996/-, तसेच रु.700/- रजिस्ट्रेशन चार्जेस व इतर खर्च असे एकूण रु. 98,696/- चा भरणा तक्रारकर्त्याने केला. सदर वाहन विरुध्दपक्ष क्र. 1 च्या शोरुम मध्ये आल्यानंतर तक्रारकर्त्याने जेंव्हा वाहनाचे निरीक्षण केले तेंव्हा सदरहू वाहन धुवून साफ करण्यात आले नव्हते. त्यामुळे त्यावर पडलेले डाग हे धुलाई नंतर साफ होणार होते, म्हणून तक्रारकर्त्याने वाहनाचे निरीक्षण केल्यानंतर उर्वरित रक्कम रु. 5,41,020/- चा भरणा विरुध्दपक्ष क्र. 1 कडे केला व तक्रारकर्त्याने त्यापुर्वी रु. 20,000/- चा भरणा बुकींगचे वेळी केला होता व रु. 4,75,000/- विरुध्दपक्ष क्र. 1 ला तक्रारकर्त्याच्या बँकेकडून दि. 11/3/2013 ला मिळाले, असे एकूण रु. 10,36,020/- विरुध्दपक्ष क्र. 1 ला तक्रारकर्त्याकडून मिळाले. त्या नंतर सदरहू वाहनाचा विमा काढण्याकरिता इंशुरंस कंपनीशी संवाद साधून तसे इंशुरंसचे प्रमाणपत्र मिळविले होते. दि. 18/3/2013 रोजी जेंव्हा वाहन पुर्णपणे धुवून त्याचे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तक्रारकर्त्यास वाहन घेवून जाण्यास कळविण्यात आले असता, तक्रारकर्त्याने सदरहू वाहन घेऊन जाण्यास टाळाटाळ केली. बहूतेक वरील कार्यवाही पुर्ण झाल्यानंतर तक्राकरर्त्याला असे माहित पडले असावे की, SX4 या वाहनामध्ये कंपनीने काही किरकोळ सुधारणा करुन नविन मॉडेल जारी केलेले आहे. तक्रारकर्त्याने नमुद केलेले कोणतेही दोष वाहनावर नव्हते. तक्रारकर्त्याने दि. 19/3/2013 व दि. 20/3/2013 रोजी केलेल्या इ-मेल मध्ये फक्त धुळीमुळे रंगावर पडलेल्या डागाव्यतिरिक्त इतर कोणत्याही बाबीचा उल्लेख केलेला नाही. फक्त धुळ साचल्यामुळे गाडीवर पडलेला डाग हा दोष मॅन्युफॅक्चरींग डिफेक्ट या संज्ञेखाली बसत नाही. वाहनामध्ये कोणतेही दोष नाहीत. सदर वाहन आजही निरीक्षणास उपलब्ध आहे. तक्रारकर्ता सदरहू वाहनाचे निरीक्षण कोणत्याही सक्षम व्यक्तीकडून करुन घेऊ शकतो. कोणतेही कारण नसतांना तक्रारकर्त्याने वाहनाचा ताबा घेतलेला नाही. एक सुचक कृती म्हणून विरुध्दपक्ष क्र. 1 ने रु. 25,000/- ची सुट व तिस-या व चौथ्या वर्षाकरिता वारंटी देण्याची तयारी दर्शविली. वास्तविक विरुध्दपक्ष क्र. 1 ला तक्रारकर्त्याकडून पार्कींग चार्जेस दि. 19/3/2013 पासून तक्रारकर्ता वाहन घेऊन जाई पर्यंतचे रु. 250/- प्रति दिवस प्रमाणे घेणे लागतात. वरील सर्व बाबींवरुन तक्रारकर्त्याची तक्रार खोटी असल्यामुळे खारीज करावी.
विरुध्दपक्ष क्र. 3 व 4 यांनी त्यांचा लेखी जवाब दाखल केला आहे. सदर लेखी जवाबामधील मजकुर उपरोक्त विरुध्दपक्ष क्र. 1,2 व 5 यांच्या लेखी जवाबासारखाच असल्याने त्याची पुनरावृत्ती टाळली आहे.
विरुध्दपक्ष क्र.6, 7 व 8 यांचा लेखीजवाब :-
विरुध्दपक्ष क्र. 6,7 व 8 यांनी त्यांचा लेखी जवाब दाखल केला आहे, त्यानुसार त्यांनी तक्रारकर्त्याचे सर्व आरोप फेटाळले व असे नमूद केले आहे की,
प्रस्तुत ची तक्रार ही कोणत्याही कारणाशिवाय सदर विरुध्दपक्षाविरुध्द दाखल करण्यात आली आहे. तक्रारकर्त्याची तक्रार या विरुध्दपक्षाविरुध्द ग्राहक संरक्षण कायद्याच्या तरतुदीअंतर्गत बसत नाही. कारण तक्रारकर्ता या विरुध्दपक्षाचा “ग्राहक” नाही. सदरहू विरुध्दपक्षासोबत तक्रारकर्त्याने गाडी विक्री संबंधी कोणताही करार केलेला नाही अथवा कोणताही मोबदला या विरुध्दपक्षास दिला नाही किंवा त्यांनी कोणतीही किंमत देवून या विरुध्दपक्षाकडून सेवा विकत घेतली नाही. विरुध्दपक्ष क्र. 6,7 व 8 हे या प्रकरणात आवश्यक पक्ष होऊ शकत नाही. सदरहू विरुध्दपक्ष हे कराराशी कोणत्याही प्रकारे संबंधीत असू शकत नाही कारण वाहन विक्रीचा करार तक्रारकर्ता व विरुध्दपक्ष क्र. 1 यांच्या मध्ये झालेला आहे व विरुध्दपक्ष क्र. 1 हे स्वतंत्र अस्तीत्व आहे. या विरुध्दपक्षाचा विरुध्दपक्ष क्र. 1 शी उत्पादक व वितरक या प्रकारचा संबंध आहे. विरुध्दपक्ष हे भारतातील सर्वोत्कृष्ट दर्जाचे मारुती सुझुकी या रेंज मधील मोटर वाहनाचे उत्पादने करतात सदरहू वाहने ही बॅचेसनिहाय रंगविली जातात व ज्या बँच मध्ये प्रस्तुतचे वाहन रंगविल्या गेले त्या बँचमधील वाहनाच्या रंगाबद्दल कोणतीही तक्रार मिळालेली नाही. विरुध्दपक्षातर्फे वाहनाच्या रंगरंगोटी करिता अल्ट्राटेक्नीक साधनांचा व तंत्राचा रोबोटद्वारे वापर करण्यात येतो. तसेच रंगरंगोटी बद्दलच्या अनेक कसोट्या पार पाडल्यानंतरच वाहन बाजारामध्ये विक्रीकरिता येते. त्यामुळे तक्रारकर्त्याने नमुद केलेले दोष गाडीवर राहणे शक्य नाही. सदर वाहनाची तज्ञ अभियंत्याकडून कसून तपासणी करण्यात आली आहे व हे तज्ञ विरुध्दपक्षाचे आहेत व ही तपासणी तक्रारकर्त्याच्या उपस्थितीत करण्यात आली असून त्यावेळी वाहनात कोणत्याही प्रकारची विकृती आढळलेली नाही. सदिच्छेच्या उपचारादाखल व ग्राहकाशी जवळीकीचे संबंध प्रस्तापित करण्याच्या दृष्टीकोणातून तक्रारकर्त्याला वारंटी ही वाढवून दिली आहे ती केवळ वाहनात दोष आहे म्हणून वाढवून देण्यात आलेली नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात यावी.
सदर लेखी जबाब, विरुध्दपक्षानी शपथेवर दाखल केला आहे व त्यासोबत दस्तएवेज दाखल केलेले आहेत.
3. त्यानंतर तक्रारकर्त्याने प्रतीउत्तर दाखल केले, तसेच विरुध्दपक्षाने प्रतिज्ञालेखावर पुरावा दाखल केला व उभय पक्षांनी तोंडी युक्तीवाद केला व न्याय निवाडे दाखल केले.
::: का र णे व नि ष्क र्ष :::
4. या प्रकरणातील तक्रारकर्ते यांची तक्रार, विरुध्दपक्ष क्र. 1 ते 5 यांचा लेखी जवाब, तसेच विरुध्दपक्ष क्र. 6 ते 8 यांचा लेखी जवाब, उभय पक्षाने दाखल केलेले सर्व दस्तऐवज, तक्रारकर्ते यांचे प्रतिउत्तर, उभयपक्षांचा तोंडी युक्तीवाद व उभय पक्षातर्फे दाखल केलेले न्यायनिवाडे यांचे काळजीपुर्वक अवलेाकन करुन खालील निर्णय पारीत केला.
या प्रकरणात तक्रारकर्ते यांचा युक्तीवाद असा आहे की, त्यांनी विरुध्दपक्ष क्र. 1 कडून विरुध्दपक्ष क्र. 6 द्वारे निर्मित मारोती SX4 ZDI Sedan/Luxuries हे वाहन दि. 18/3/2013 रोजी रु. 10,36,020/- या रकमेत वाहन किंमत, हाताळणी शुल्कासहीत खरेदी केले होते. सदर वाहन विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यास पुर्ण रक्कम भरण्यापुर्वी दाखवले नाही व वाहनाची तपासणी करु दिली नाही, त्यामुळे सदर वाहन संपुर्ण रक्कम प्राप्त झाल्यानंतर विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी तक्रारकर्त्याला दाखवले. पाहणी करतांना असे लक्षात आले की, गाडीवर ब-याच ठिकाणी वरखडे, स्क्रॅचेस, पोचे, समोरच्या व मागील भागाच्या रंगामध्ये तफावत आहे, तसेच वाहनावर दानेदार सारखे उठावदार खुणा असल्याचे जाणविले. सदरच्या वाहनावरुन हात फिरविल्यावर स्पर्शाद्वारे सदरची बाब स्पष्टपणे जाणवत होती. अशा प्रकारे तक्रारकर्त्यास सदरचे वाहन दोषपुर्ण असल्याचे आढळले. तसेच सदरच्या वाहनावर गंज चढल्याच्या खुणा देखील आढळल्या. या बाबत तक्रार केली असता, विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी सदर वाहनाची सफाई केल्यानंतर सर्व बाबी निघुन जातील, असे सांगितले. सदर वाहनाचे आर.टी.ओ कडे रजिस्टेशन करु नये असे तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र. 1 यांना सांगितले व अशा दोषपुर्ण दिसणा-या वाहनाचा ताबा घेण्यास तक्रारकर्त्याने नकार दिला होता. विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी सदर दोषाबाबत वरिष्ठ अधिका-यांना कळवून त्यावर उपाय काढू असे म्हटले होते. दि. 19/3/2013 रोजी विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी तक्रारकर्त्यास असा निरोप दिला की, वाहनातील उपरोक्त सर्व दोष दुर करण्यात आले. परंतु निरीक्षणानंतर सर्व बाबी पहील्या सारख्याच कायम असल्याचे दिसल्या. त्यामुळे तक्रारकर्त्याने गाडी निर्माता / विरुध्दपक्ष क्र. 6 यांच्या कॉल सेंटरवर इ-मेल द्वारे तक्रार केली, त्यावर विरुध्दपक्ष क्र. 6 यांचे असे म्हणणे पडले की, सदर वाहनाची आर.टी.ओ. कार्यालयात नोंदणी झालेली आहे, त्यामुळे वाहनाचा ताबा घ्यावाच लागेल. सदर दोषपुर्ण वाहनाची नोंदणी विरुध्दपक्ष यांनी परस्पर करुन घेतली होती. तक्रारकर्ते यांनी विरुध्दपक्ष क्र. 6 कडे वारंवार तक्रारी केल्या होत्या, मात्र त्यांनी तक्रारीची दखल घेतली नाही. विरुध्दपक्ष क्र. 3 यांनी दि. 21/3/2013 रोजी तक्रारकर्त्यास बोलावून असे सांगितले की, वाहन जसे आहे तसे ताब्यात घ्यावे लागेल व उध्दटपणे अपमानास्पद शब्दांचा वापर केला. त्यानंतर विरुध्दपक्ष क्र. 6 च्या अधिका-याने अकोला येथे येवून सदर वाहनाची तपासणी करुन सदर वाहनामध्ये उपरोक्त दोष आहे, असे कबुल केले, परंतु ते दोष दुर करण्याकरिता सदर विरुध्दपक्ष यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. या उलट विरुध्दपक्ष क्र. 3 यांनी दि. 10/4/2013 रोजी तक्रारकर्त्याला असे सांगितले की, वाहन जसे आहे तसा ताबा तक्रारकर्त्याने घेतल्यास ते वाहनाची अतिरिक्त 3 ते 4 वर्षाची वारंटी देतील व शिवाय रु. 25,000/- सुट देतील. मात्र तक्रारकर्त्याने यास नकार दिला आहे. तक्रारकर्त्याने वेळोवेळी दि. 16/3/2013 पासून ई-मेलच्या माध्यमातून विरुध्दपक्षाकडे गाडीतील दोषांबाबत तक्रारी करुन दुसरे त्याच प्रकारचे वाहन देण्याबाबत विनंती केली होती. अशा प्रकारे सर्व विरुध्दपक्षाने अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला आहे.
विरुध्दपक्ष क्र. 1 ते 5 यांचा युक्तीवाद असा आहे की, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र. 1 ला वाहनाची किंमत रु. 8,90,870/- अदा केले तसेच या किंमती व्यतिरिक्त विम्याची रक्कम रु. 21,608/- अदा केली, या व्यतिरिक्त तक्रारकर्त्याने आर.टी.ओ. खर्च व वाहनावरील देय ऑक्ट्राय याचा सुध्दा भरणा विरुध्दपक्ष क्र. 1 कडे केला. तक्रारकर्त्याने SX4-ZDI हे बुक केलेले वाहन अकोला येथे आल्यानंतर त्याचे विरुध्दपक्ष क्र. 1 च्या शोरुम मध्ये निरीक्षण केले आहे. त्यानंतर तक्रारकर्त्याने हे वाहन आर.टी.ओ. कडून नोंदणी करुन घेतले व त्याचा टॅक्स, इतर करांसह भरला. तक्रारकर्त्याने जेंव्हा वाहनाचे निरीक्षण केले तेंव्हा सदरहू वाहन धुवून साफ करण्यात आले नव्हते. त्यामुळे त्यावर पडलेले डाग हे धुलाई नंतर साफ होणार होते, म्हणून तक्रारकर्त्याने वाहनाचे निरीक्षण केल्यानंतर उर्वरित रकमेचा भरणा विरुध्दपक्ष क्र. 1 कडे केला होता, तसेच त्या नंतर सदरहू वाहनाचा विमा काढण्याकरिता इंशुरंस कंपनीशी संवाद साधून तसे इंशुरंसचे प्रमाणपत्र मिळविले होते. दि. 18/3/2013 रोजी जेंव्हा वाहन पुर्णपणे धुवून त्याचे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तक्रारकर्त्यास वाहन घेवून जाण्यास कळविण्यात आले असता तक्रारकर्त्याने सदरहू वाहन घेऊन जाण्यास टाळाटाळ केली. बहूतेक तक्रारकर्त्याला असे माहित पडले असावे की, SX4 या वाहनामध्ये कंपनीने काही किरकोळ सुधारणा करुन नविन मॉडेल जारी केलेले आहे. तक्रारकर्त्याने नमुद केलेले कोणतेही दोष वाहनावर नव्हते. फक्त त्यावर धुळ साचलेली होती, त्यामुळे हे दोष मॅन्युफॅक्चरींग डिफेक्ट या संज्ञेखाली बसत नाही. वाहनामध्ये कोणतेही दोष नाहीत. वाहन आजही निरीक्षणास उपलब्ध आहे. तक्रारकर्ता सदरहू वाहनाचे निरीक्षण कोणत्याही सक्षम व्यक्तीकडून करुन घेऊ शकतो. कोणतेही कारण नसतांना तक्रारकर्त्याने वाहनाचा ताबा घेतलेला नाही. एक सुचक कृती म्हणून विरुध्दपक्ष क्र. 1 ने रु. 25,000/- ची सुट व तिस-या व चौथ्या वर्षाकरिताची वारंटी देण्याची तयारी दर्शविली. वास्तविक विरुध्दपक्ष क्र. 1 ला तक्रारकर्त्याकडून पार्कींग चार्जेस दि. 19/3/2013 पासून तक्रारकर्ता वाहन घेऊन जाई पर्यंतचे रु. 250/- प्रति दिवस प्रमाणे घेणे लागतात. त्यामुळे तक्रार खारीज करावी.
विरुध्दपक्ष क्र. 6,7 व 8 च्या युक्तीवादानुसार असे आहे की, सदरहू तक्रार या विरुध्दपक्षाविरुध्द ग्राहक संरक्षण कायद्याच्या तरतुदीअंतर्गत बसत नाही. कारण तक्रारकर्ता या विरुध्दपक्षाचा ग्राहक नाही. तक्रारकर्त्याने गाडी विक्री संबंधी या विरुध्दपक्षाशी कोणताही करार केलेला नाही अथवा कोणताही मोबदला दिला नाही किंवा त्यांनी कोणतीही किंमत देवून या विरुध्दपक्षाकडून सेवा विकत घेतली नाही. हे विरुध्दपक्ष या प्रकरणात आवश्यक पक्ष होऊ शकत नाही, तसेच ही तक्रार तक्रारकर्त्याने या विरुध्दपक्षाच्या नावानिशी दाखल केल्यामुळे देखील चालू शकत नाही. वाहन विक्रीचा करार तक्रारकर्ता व विरुध्दपक्ष क्र. 1 यांच्या मध्ये झालेला आहे व विरुध्दपक्ष क्र. 1 हे स्वतंत्र अस्तीत्व आहे. या विरुध्दपक्षाचा विरुध्दपक्ष क्र. 1 शी उत्पादक व वितरक या प्रकारचा संबंध आहे. त्यामुळे अनेक न्यायनिवाड्यानुसारही ही तक्रार या विरुध्दपक्षाविरुध्द चालू शकत नाही. हे विरुध्दपक्ष भारतातील सर्वोत्कृष्ट दर्जाचे मारुती सुझुकी या रेंज मधील मोटर वाहनाचे उत्पादने करतात व वाहनाची रंगरंगोटी करिता अल्ट्राटेक्नीक साधनांचा व तंत्राचा रोबोटद्वारे वापर करतात. तसेच रंगरंगोटी बद्दलच्या अनेक कसोट्या पार पाडल्या जातात. त्यामुळे तक्रारकर्त्याने नमुद केलेले दोष गाडीवर राहणे शक्य नाही. त्यामुळे विरुध्दपक्षांना तक्रारीमधून वगळण्यात यावे व तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात यावी.
उभय पक्षांचा हा युक्तीवाद ऐकल्यानंतर मंचाच्या मते असे आहे की, तक्रारकर्त्याने ह्या तक्रारीत त्यांनी विरुध्दपक्षाकडून विकत घेतलेल्या वरील वाहनावर ब-याच ठिकाणी वरखडे, स्क्रॅचेस, पोचे, समोरच्या व मागील भागाच्या रंगामध्ये तफावत, वाहनावर दाणेदार सारखे उठावदार खुणा तसेच वाहनावर गंज चढल्याच्या खुणा आहेत, म्हणून वाहन दोषपुर्ण आहे, असे नमुद केल्यामुळे दोष दाखविण्याकरिता कोणत्याही तज्ञ व्यक्तीचा अहवाल बोलाविण्याची गरज नव्हती. कारण हे दोष उघडपणे मंचाला देखील पाहता येण्यासारखे होते, म्हणून मंचाने उभय पक्षांच्या विधीज्ञांना पुर्व कल्पना देवून, सदर वाहनाचे दि. 23/1/2015 रोजी उभय पक्षांच्या उपस्थितीत निरीक्षण / वाहनाची पाहणी केली. पाहणीच्या वेळेस मंचाला या वाहनावर तक्रारीत नमुद केलेले दोष जसे की, वरखडे, स्क्रॅचेस, पोचे, समोरच्या व मागील भागाच्या रंगामध्ये तफावत, वाहनावर गंज चढल्याच्या खुणा ई. आढळून आले नाही. फक्त वाहनाच्या खालील बाजुस दाणेदार व उठावदार खुणा दिसल्या, ज्या तेथे उभ्या असलेल्या ईतर नवीन वाहनावर देखील उपलब्ध होत्या. अशा प्रकारे वाहन निरीक्षणात असे कोणतेही दोष न आढळल्यामुळे तक्रारकर्ते यांची विनंती मंचाला मान्य करता येणार नाही. परंतु विरुध्दपक्ष क्र. 1 ते 5 यांनी एक चांगली सुचक कृती म्हणून जी कबुली दिली, जसे की, रु. 25,000/- ची सुट व 3 –या व 4 थ्या वर्षाकरिता वारंटी देणे, ही त्यांनी तक्रारकर्त्याला पुरवावी, असा आदेश देवुन प्रकरण खारीज करणे योग्य आहे, अशा निष्कर्षाप्रत मंच आलेले आहे. येथे असे नमुद करावेसे वाटते की, मंचाने वाहनाचे निरीक्षण केल्यानंतर उभय पक्षाने रेकॉर्डवर प्रतिज्ञालेख दाखल करुन युक्तीवाद केला, परंतु मंचाने वाहन निरीक्षण हे तक्रारीतील नमुद दोषांबाबत केले होते, त्यामुळे उभय पक्षांचे प्रतिज्ञालेख नव्याने विचारात घेता येणार नाहीत.
सबब अंतिम आदेश पारीत केला तो येणे प्रमाणे….
:::अं ति म आ दे श:::
- तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात येते.
- विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी सुचक कृती प्रमाणे तक्रारकर्त्याला रु. 25,000/- ची सुट व वाहनाची 3 –या व 4 थ्या वर्षाकरिता वारंटी द्यावी.
- न्यायिक खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
- सदर आदेशाच्या प्रती उभयपक्षांना निशुल्क देण्यात याव्या.
( (श्रीमती भारती केतकर ) (सौ.एस.एम.उंटवाले )
सदस्या अध्यक्षा
AKA जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,अकोला