न्या य नि र्ण य : (व्दाराः- मा. सौ. रुपाली डी. घाटगे, सदस्या)
1) तक्रारदार यांनी वि. प. पतसंस्थेत मुदतबंद ठेव स्वरुपात गुंतविलेल्या रक्कमेची मागणी करुनही परत दिली नाही. म्हणून तक्रारदारानी प्रस्तुतचा तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 अन्वये या मंचात दाखल केला आहे.
2) प्रस्तुत कामी तक्रार स्विकृत करुन वि.प. नं. 1 ते 3 यांना नोटीसीचा आदेश झाला. वि.प. नं. 1 ते 3 यांनी मंचात उपस्थित राहून म्हणणे दाखल केले. तक्रारदार तर्फे लेखी युक्तीवाद दाखल केला. सदरचा तक्रार अर्ज गुणदोषांवर निकाली करणेत येतो.
3) तक्रारदारांची थोडक्यात तक्रार अशी –
तक्रारदार नं 1 व 2 हे पती-पत्नी असून तक्रारदार नं. 3 हे तक्रारदार नं. 1 व 2 यांचा मुलगा आहे. तक्रारदारांनी खालील तपशिलाप्रमाणे मुदतबंद ठेव पावत्या वि.प. पतसंस्थेकडे गुंतविलेल्या आहेत.
अ. क्र. | ठेवीदार/तक्रारदाराचे नांव | ठेव पावती नं. | ठेव रक्कम रु. | ठेव ठेवलेची तारीख | ठेवीची मुदत संपलेची तारीख |
1 | मधुकर सदाशिव शेटे | 7249 | 12,673/- | 27-05-2006 | 27-06-2007 |
2 | रजनी व विवेक मधुकर शेटे | 7251 | 20,088/- | 27-05-2006 | 27-06-2007 |
3 | मधुकर सदाशिव शेटे | 7639 | 15,000/- | 27-10-2006 | 12-12-2006 |
तक्रारदार नं. 1 व 2 हे वयोवृध्द आहेत. त्यांना त्यांचे औषधोपचारासाठी लोकांचेकडून हातउसणे पैसे घ्यावे लागत आहेत तसेच तक्रारदार नं. 3 यांना संसारिक गरजेसाठी पैशाची जरुरी आहे. तक्रारदारांनी ठेव रक्कमांची मुदत संपताच व्याजासह ठेवीच्या रक्कमेची मागणी केली वेगवेगळी कारणे सांगून वि.प. यांनी रक्कम देणेस टाळाटाळ करुन तक्रारदारांना यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली आहे. वि.प. यांनी तक्रारदारांना मुदतीत रक्कम न दिलेने तक्रारदार यांना मनस्ताप व मानसिक व कौंटुंबिक नुकसान झालेले आहे. सबब, तक्रारदारांनी मुदत बंद ठेवीच्या रक्कमा व्याजासह मिळाव्यात व मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 30,000/- व तक्रार अर्जाचा खर्च व वकील फी रु. 5,000/- वि.प. कडुन वसुल होऊन मिळावी म्हणून प्रस्तुतचा तक्रार अर्ज दाखल केलेला आहे.
4) तक्रारदारांनी तक्रारीसोबत 5 कागदपत्रे दाखल केली असून तक्रारदार यांनी वि.प. यांना पाठविलेली नोटीस, सदर नोटीसीची पोस्टाची पावती, मुदत बंद ठेव पावती क्र. 2751, 7639, व 7249 दि. 15-07-2016 रोजीचे तक्रारदारांचे पुराव्याचे शपथपत्र इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
5) वि.प. नं. 1 ते 3 यांनी दि. 30-01-2016 रोजी म्हणणे दाखल करुन तक्रारदाराची तक्रार परिच्छेदनिहाय नाकारलेली आहे. वि.प. संस्थेचे बरीच कर्ज थकीत असून ती वसूल करणेचा वि.प. संस्था प्रयत्न करीत आहे. त्यासाठी मा. सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, हातकणंगले यांचेकडे बरीच कर्जे वसुलीकरीता दावे दाखल केलेले आहेत. ज्याप्रमाणे कर्जाची वसुली होईल त्याप्रमाणात तक्रारदारांचे ठेवी परत देणेस वि.प. तयार आहेत. सबब, तक्रारदारांचा तक्रार अर्ज नामंजूर करणेत यावा अशी विनंती वि.प. यांनी केलेली आहे.
6) तक्रारदाराचा तक्रार अर्ज, वि.प. नं. 1 ते 3 यांचे म्हणणे, पुराव्याचे शपथपत्र, उभय वकिलांचे युक्तीवादाचा विचार करता खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ. क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार वि.प. यांचे ग्राहक आहेत काय ? | होय |
2. | वि.प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेमध्ये त्रुटी केली आहे काय ? | होय |
3. | तक्रारदार हे वि.प. यांचेकडून ठेव पावती रक्कम व त्यावरील व्याज मिळणेस पात्र आहे काय ? | होय |
4. | तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहे काय ? | होय |
5. | अंतिम आदेश काय ? | अंशत: मंजूर. |
वि वे च न -
7) मुद्दा क्र. 1 व 2 –
प्रस्तुत कामी तक्रारदारांनी वि.प. पतसंस्थेत खालील तपशिलात नमूद केलेल्या मुदतबंद ठेव पावत्या गुंतविलेल्या होत्या. त्या अनुषंगाने सदर ठेव पावत्यांचा तपशिल पुढीलप्रमाणे.
अ. क्र. | ठेवीदार/तक्रारदाराचे नांव | ठेव पावती नं. | ठेव रक्कम रु. | ठेव ठेवलेची तारीख | ठेवीची मुदत संपलेची तारीख |
1 | मधुकर सदाशिव शेटे | 7249 | 12,673/- | 27-05-2006 | 27-06-2007 |
2 | रजनी व विवेक मधुकर शेटे | 7251 | 20,088/- | 27-05-2006 | 27-06-2007 |
3 | मधुकर सदाशिव शेटे | 7639 | 15,000/- | 27-10-2006 | 12-12-2006 |
सदर मुदतबंद ठेव पावती क्र. 7249, 7251 व 7639 च्या छायाकिंत प्रती तक्रारदारांनी प्रस्तुत कामी दाखल केलेल्या असून त्यावर वि.प. पतसंस्थेचे नाव नमूद आहे. तसेच चेअरमन यांची सही आहे. सदरच्या मुदतबंद ठेव पावत्या व त्यावरील व्याज वि.प. यांनी नाकारलेल्या नाहीत. सबब, मुदत बंद ठेव स्वरुपात गुंतविलेल्या पावत्यांचा विचार करता, तक्रारदार हे वि.प. पतसंस्थेचे ग्राहक आहेत. सदरचे मुदत बंद ठेव पावत्याची रक्कम सव्याज परत करणेची जबाबदारी वि.प. पतसंस्थेची होती. तक्रारदारांनी दि. 25-08-2015 रोजी वकिलामार्फत वि.प. यांना नोटीस पाठवून सदरचे मुदतबंद ठेव पावत्याच्या रक्कमांची व्याजासह मागणी केलेली होती. सदरची नोटीसीची पोहच पावती तक्रारदारांनी मंचात दाखल केलेली आहे. तक्रारदार नं. 1 व 2 हे वयोवृध्द आहेत. त्यांना त्यांचे औषधोपचारासाठी लोकांचेकडून हातउसणे पैसे घ्यावे लागत आहेत तसेच तक्रारदार नं. 3 यांना संसारिक गरजेसाठी पैशाची जरुरी आहे. सदर मुदतबंद ठेव पावत्यांची व्याजासह रक्कमेची मागणी तक्रारदार यांनी वि.प. पतसंस्थेकडे केलेली आहे. वि.प. यांनी त्यांचे लेखी म्हणणेमध्ये सदर पतसंस्थेने बरीच कर्जे थकीत असून ती वसूल करणेचा वि.प. संस्था प्रयत्न करीत आहे. त्यासाठी सहाय्यक निबंधक, ता. हातकणंगले यांचेकडे बरीच कर्ज वसुलीकरिता दावे दाखल केलेले आहेत असे कथन केले आहे. तथापि त्याअनुषंगने कोणताही कागदोपत्री पुरावा वि.प. यांनी या मंचात दाखल केलेला नाही. पुराव्याअभावी वि.प. संस्थेचे सदरचे कथन हे मंच विचारात घेत नाही. तसेच ज्याप्रमाणे कर्जाची वसुली होईल त्याप्रमाणे अर्जदारांचे ठेवी परत देणेस वि.प. तयार आहेत असे कथन केले आहे. म्हणजेच सदरच्या मुदतबंद ठेव पावत्यावरील व्याजासहची रक्कम वि.प. यांनी मान्य केलेली आहे. त्याकारणाने सदरची मुदतबंद ठेव रक्कम व्याजासह अदा करणेची सर्वस्वी जबाबदारी वि.प. यांची असतानादेखील सदर रक्कम आजतागायत अदा न करुन वि.प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे असे या मंचाचे मत आहे.
वि.प. पतसंस्थेत असे ठेवीदारांचे पैसे न देणेची वेळ, चेअरमन, वि.प. संस्थेचा गैरकारभार, कायदेशीर बाबीच कारणीभूत असतात. मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाच्या रिट याचिका क्र.5223/09 सौ.वर्षा रविंद्र ईसाई विरुध्द राजश्री राजकुमार चौधरी या मधील निकालाचा तसेच मंदाताई संभाजी पवार वि. महाराष्ट्र शासन व इतर प्रकरणात घालून दिलेल्या दंडकाचा विचार करता सदर न्यायदंडक मा. राज्य आयोगाच्या सुनिता थरवाल वि. गोरेगाव अर्बन बँक व इतर अपील क्र. 250/2010 व इतर संबधित अपिलामधील निकालाचा विचार करता असे दिसून येते की, पतसंस्थेत जमा असणा-या ठेव पावत्यांच्या मुदतीअंती देय असणा-या रकमा देणेची प्राथमिक जबाबदारी ही पतसंस्थेवर असते. वर नमूद न्यायदंडकाचा विचार करता, वि.प. पतसंस्था ही सहकार कायदयाअन्वये नोंदणीकृत सहकारी संस्था ही कायदेशीर अस्तित्व असलेली कायदेशीर व्यक्ती असून ती आपल्या संचालक मंडळामार्फत कारभार बघत असते. सबब, वरील सर्व बाबींचा विचार करता तक्रारदारांनी वि.प. नं. 1 ते 3 यांचेकडे सदर मुदतबंद ठेव पावत्यांचे व्याजासह मागणी करुन देखील सदरची मुदतबंद ठेव पावतीची रक्कम व्याजासह परत करणेची जबाबदारी वि.प. नं. 1 ते 3 यांचे वैयक्तीक व संयुक्तिकरित्या असताना देखील सदरच्या रकमा व त्यावरील व्याज तक्रारदारांना आजतागायत परत न देवून तक्रारदार द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे असे या मंचाचे मत आहे. मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहोत.
8) मुद्दा क्र. 3 व 4 –
उपरोक्त मुद्दा क्र. 1 व 2 मधील विस्तृत विवेचनाचा विचार करता, वि.प. नं. 1 ते 3 यांनी तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे. सबब, तक्रारदार हे वि.प. नं. 1 ते 3 यांचेकडून वैयक्तीक व संयुक्तिकरित्या न्यायनिर्णय कलम (7) मधील कोष्टकात नमूद मुदतबंद ठेव पावतीची रक्कमा, पावतीवर नमूद व्याजासह मिळणेस पात्र आहेत. तसेच सदरच्या मुदत ठेव पावत्यांवरील देय तारखेपासून सदरची संपुर्ण रक्कम मिळोपावेतो द.सा.द.शे. 6 % व्याज मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
सदरच्या मुदतबंद ठेव रक्कमांची मागणी करुनही वि.प. नं. 1 ते 3 यांनी व्याजासह सदरच्या रक्कमा परत न दिल्याने तक्रारदार सदरच्या रक्कमा मिळणेपासून वंचित रहावे लागले. त्यामुळे तक्रारदार हे मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु. 5,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रक्कम रु. 3,000/- मिळणेस तक्रार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
9) हे मंच या प्रकरणी पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. सबब, आदेश.
- आ दे श -
1) तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.
2) वि.प. नं. 1 संस्था, वि. प. नं. 2 व 3 यांनी वैयक्तीक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना खालील तपशिलात नमूद केलेप्रमाणे मुदत बंद ठेव पावत्यावरील व्याजासह रक्कमा तक्रारदारांना अदा कराव्यात.
अ. क्र. | ठेवीदार/तक्रारदाराचे नांव | ठेव पावती नं. | ठेव रक्कम रु. | ठेव ठेवलेची तारीख | ठेवीची मुदत संपलेची तारीख |
1 | मधुकर सदाशिव शेटे | 7249 | 12,673/- | 27-05-2006 | 27-06-2007 |
2 | रजनी व विवेक मधुकर शेटे | 7251 | 20,088/- | 27-05-2006 | 27-06-2007 |
3 | मधुकर सदाशिव शेटे | 7639 | 15,000/- | 27-10-2006 | 12-12-2006 |
तसेच सदर संपुर्ण रक्कमेवर ठेव पावत्या देय तारखेपासून सदरची रक्कम संपुर्ण तक्रारदारांना मिळेपर्यंत द.सा.द.शे. 6 % प्रमाणे तकारदारांना व्याज अदा करावे.
3) वि.प. नं. 1 संस्था, वि. प. नं. 2 व 3 यांनी वैयक्तीक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 5,000/- (अक्षरी रक्कम रुपये पाच हजार फक्त ) तसेच अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु. 3,000/- (अक्षरी रक्कम रुपये तीन हजार फक्त ) अदा करावी.
4) वर नमुद आदेशामधील रक्कमेपैकी काही रक्कम अगर व्याज अदा केले असल्यास अगर त्यावर कर्ज दिले असल्यास सदरची रक्कम वजावट करुन उर्वरीत रक्कम अदा करावी.
5) वर नमूद आदेशांची पुर्तता वि.प. यांनी आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी.
6) वरील आदेशांची पूर्तता वि.प. यांनी विहीत मुदतीत न केलेस तक्रारदार यांना वि.प. यांचेविरुध्द ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 कलम 25 व 27 प्रमाणे कारवाई करणेची मुभा राहील.
7) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.