::: नि का ल प ञ:::
मंचाचे निर्णयान्वये, उमेश वि. जावळीकर मा. अध्यक्ष
१. सामनेवाले क्र. १ ते ३ यांनी, तक्रारदार यांना ग्राहक संरक्षण अधिनियम अन्वये तरतुदीनुसार सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याने प्रस्तूत तक्रार दाखल केली आहे.
२. तक्रारदार यांनी सामनेवाले क्र. ३ यांनी निर्मिती केलेली ह्युंदाई ग्रड आय १० वाहन सामनेवालेयांचेकडून दि. ३०.०६.२०१४ रोजी रक्कम रुपये ५,८३,१७८/- अदा करुन खरेदी केले. दि. २७.०१.२०१५ रोजी मौजा बोरखेडी गावाजवळ वाहन नादुरुस्त झाले. त्यामुळे सामनेवालेयांनी वाहन सामनेवाले क्र. २ यांच्याकडे दुरुस्तीसाठी घेऊन जाण्यास सांगितले. त्याप्रमाणे सामनेवाले क्र. २ यांच्याकडे वाहन दुरुस्तीसाठी नेण्यात आले. सामनेवाले क्र. २ यांनी वाहन दुरुस्त करुन न दिल्याने तक्रारदार यांनी दि. १२.०२.२०१५ रोजी लेखी पत्र पाठवून वाहन तात्काळ दुरुस्त करुन द्यावे अशी विनंती केली. परंतु सामनेवाले क्र. २ यांनी दि. १८.०२.२०१५ रोजी पत्र पाठवून ऑईल पंप बाहेरून नादुरुस्त झाल्याने ऑईलची गळती झाल्याने इंजीनला ऑईलचा पुरवठा न झाल्याने इंजीनचे नुकसान झाले, सदर बाब हमी कालावधीत नसल्याने मोफत दुरुस्त करता येणार नाही असे तक्रारदारास कळविले. तक्रारदार यांनी सामनेवाले यांना दि. ३१.१०.२०१४ रोजी वाहन दुरुस्त करणेसाठी रक्कम रु. ३२,३७८/- अदा केले होते, त्यावेळी ऑईल पण व इतर पार्टची दुरुस्ती सामनेवाले यांनी केली होती. तक्रारदार यांनी वाहनातील इंजिनमधील बिघाड हमी कालावधीतील असल्याने सामनेवालेयांनी मोफत दुरुस्त करुन न दिल्याने, इंजिन मोफत दुरुस्त करुन द्यावे अथवा नवीन वाहनाची मागणी करुन तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार दाखल केली असून दंड व खर्चासह तक्रार मान्य करावी, अशी विनंती केली आहे.
३. सामनेवाले क्र. १ व २ यांना मंचाची नोटीस पाठविली असता, सामनेवाले क्र. १ व २ यांनी तक्रारीतील मुद्द्यांचे खंडन करुन, दि. ३१.१०.२०१४ रोजी वाहन दुरुस्तीनंतर इंजीनमधील बिघाड झाल्यास सामनेवाले क्र. १ व २ जबाबदार राहणार नाहीत असे तक्रारदार यांनी कबुल केले होते. तक्रारदार यांच्या वाहनाची दुरुस्ती हमी कालावधीतील नसल्याने व रक्कम अदा न केल्याने वाहन नादुरुस्त अवस्थेत आहे. तक्रारदार यांनी रक्कम अदा केल्यास दुरुस्ती करुन वाहन तक्रारदारास देण्यात येईल. सबब, तक्रारदार यांची कृती न्यायोचित नसल्याने, तक्रार खर्चासह अमान्य करण्यात यावी, अशी विनंती सामनेवाले क्र. १ व २ यांनी केली आहे.
४. सामनेवाले क्र. ३ यांना मंचाची नोटीस पाठविली असता, सामनेवाले क्र. ३ यांनी तक्रारीतील मुद्द्यांचे खंडन करुन, रस्त्यावरील दगडामुळे वाहनास इजा झाली आहे. सामनेवाले क्र. २ हे मूळ वितरक असून त्यांची जबाबदारी निश्चित आहे. सामनेवाले क्र. ३ यांनी सामनेवाले क्र. २ यांना वाहन विक्रीसाठी दिले असले तरी विक्री व दुरुस्तीबाबत वाद उद्भवल्यास सामनेवाले क्र. २ जबाबदार आहेत. तक्रारदार यांचे वाहनाची दुरुस्ती हमी कालावधीतील नसल्याने, तक्रारदार यांनी सामनेवाले क्र. २ यांना रक्कम अदा करुन वाहन दुरुस्त करुन घावे, असे नमूद केले. तक्रारदार यांनी मोफत दुरुस्तीबाबत केलेली वादकथने न्यायोचित नसल्याने व वाहनामध्ये तांत्रिक बिघाड नसल्याने सामनेवाले क्र. ३ यांच्याविरुद्धची तक्रार खर्चासह अमान्य करण्यात यावी, अशी विनंती सामनेवाले क्र. ३ यांनी केली आहे.
५. तक्रारदारांची तक्रार, कागदपत्रे, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तिवाद तसेच सामनेवालेयांचा लेखी जवाब, कागदपत्रे, व सामनेवाले क्र. ३ यांचा लेखी जवाब, कागदपत्रे, पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद पुर्शीस व तज्ञ अहवाल व उभय पक्षांचा तोंडी युक्तिवाद यावरून तक्रार निकाल कामी खालील मुद्दे कायम करण्यात येतात.
मुद्दे निष्कर्ष
१. सामनेवाले क्र. १ ते ३ यांनी तक्रारदार
यांना कराराप्रमाणे वाहनदुरुस्ती बाबत सेवासुविधा
पुरविण्यात कसूर केल्याची बाब तक्रारदार
सिद्ध करतात काय ? होय
२. सामनेवाले क्र. १ ते ३ तक्रारदार यांना
नुकसानभरपाई अदा करण्यास पात्र आहेत काय ? होय
३. आदेश ? अंशतः मान्य
कारण मिमांसा
मुद्दा क्र. १ व २ :
६. सामनेवाले क्र. १ व २ यांनी तक्रारदार यांचे वाहन दुरुस्त करण्यासाठी तक्रारदार यांना रक्कम अदा करावयास सांगितले. तक्रारदार यांनी सामनेवाले क्र. २ यांच्याकडे वाहन दुरुस्तीसाठी दिल्यानंतर वाहनातील दोष निश्चित करुन दुरुस्त करण्यासाठी तक्रारदार यांना प्रत्यक्ष बोलावून सविस्तर माहिती देण्याची जबाबदारी सामनेवाले क्र. १ व २ यांची होती. हमी कालावधीतील दुरुस्तीबाबत बाबी मध्ये सदर दुरुस्ती येत नसल्यास तक्रारदार यास सदर दुरुस्तीबाबतचे देयक कळविण्याची जबाबदारी सामनेवाले क्र. १ व २ यांनी पार पडल्याची बाब कागदोपत्री दिसून येत नाही. सामनेवाले क्र. १ व २ यांनी हमी कालावधीमध्ये सदर दुरुस्ती होऊ शकत नसल्याबाबत कोणताही कागदोपत्री पुरावा दाखल केला नाही. उभय पक्षांसमक्ष तांत्रिक तज्ञाकडून वाहनाची तपासणी केली असता वाहनामध्ये इंजिनला ऑईलचा पुरवठा करणारा पाईप तुटल्यामुळे इंजिनला ऑईलचा पुरवठा न झाल्याने इंजिन मध्ये बिघाड निर्माण झाला. त्यामुळे इंजिन दुरुस्त करणे न्यायोचित असून त्याबाबत फोटो तांत्रिक तज्ञ यांनी सादर केले आहेत. सदर तज्ञ अहवालाप्रमाणे इंजिन मधील ऑईल चांगल्या प्रकारचे असून पाईप तुटणे हा MANUFACTURING FAULT आहे. सबब इंजिनची दुरुस्ती करणे आवश्यक आहे, असा स्पष्ट अभिप्राय कागदोपत्री दाखल आहे. सामनेवाले क्र. १ ते ३ यांनी तक्रारदार यास वाहन विक्री पश्चात दुरुस्ती व देखभालसाठी न्यायोचित उपाययोजना न केल्याची बाब कागदोपत्री पुराव्यावरून सिद्ध होते. ग्राहक संरक्षण अधिनियम कलम २ (१)(ओ) अन्वये “सेवा” या संज्ञेची व्याप्ती पाहता वैध वाहन दुरुस्ती करार सेवेबाबतची तक्रार मंचाकडे दाखल करता येते, असे न्यायतत्व आहे. वाहन दुरुस्तीची बाब हमी कालावधीमध्ये येत असल्याची बाब हमी बाबत अटी व शर्तीमधील बाब क्र. २ वरून सिद्ध होते. सबब, तक्रारदार यांची तक्रार वर नमूद निष्कर्षावरून, तक्रारदार यांनी सदर तक्रार वाहन दुरुस्ती करार सेवेबाबत दाखल केल्याने व ही बाब कागदोपत्री पुराव्याने सिध्द झाल्याने, सामनेवाले यांनी तक्रारदारास वाहन दुरुस्ती कराराबाबत सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केल्याची बाब सिध्द झाल्याने व परिणामी तक्रारदार यास मानसिक, शारीरिक, आर्थिक त्रास झाला आहे, ही बाब सिध्द झाल्याने मुद्दा क्रं. १ व २ चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्र. ३:
७. मुद्दा क्रं. १ व २ मधील विवेचनावरुन खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो.
आदेश
१. ग्राहक तक्रार क्र. ५८/२०१५ अंशतः मान्य करण्यात येते.
२. सामनेवाले क्र. १ ते ३ यांनी यांनी वैयक्तिक व संयुक्तीकपणे तक्रारदार यांना ग्राहक संरक्षण अधिनियम अन्वये तरतुदीनुसार वाहन दुरुस्ती कराराप्रमाणे सेवासुविधा पुरविण्यात कसुर केल्याची बाब जाहीर करण्यात येते.
३. सामनेवाले क्र. १ ते ३ यांनी वैयक्तिक व संयुक्तीकपणे तक्रारदार यांचे वाहन क्र. MH-34-AM-3611 चे नादुरुस्त इंजिनची दुरुस्ती स्वखर्चाने या आदेशप्राप्ती दिनांकापासून ३० दिवसात करुन द्यावी.
४. सामनेवाले क्र. १ ते ३ यांना वैयक्तिक व संयुक्तीकपणे वर नमूद क्र. ३ ची पूर्तता करणे शक्य नसल्यास, नवीन ह्युंदाई ग्रड आय १० वाहन या आदेशप्राप्ती दिनांकापासून ३० दिवसात तक्रारदारास द्यावे.
५. सामनेवाले क्र. १ ते ३ यांनी वैयक्तिक व संयुक्तीकपणे वर नमूद क्र. ४ ची पूर्तता केल्यास तक्रारदारांचे वाहन क्र. MH-34-AM-3611 तक्रारदार यांनी सामनेवाले क्र. २ यांना या आदेशप्राप्ती दिनांकापासून ३० दिवसात परत करावे.
६. सामनेवाले क्र. १ ते ३ यांना वैयक्तिक व संयुक्तीकपणे वर नमूद क्र. ३ व ४ ची पूर्तता करणे शक्य नसल्यास, तक्रारदारास रक्कम रु. ५,८३,१७८/- दि. १०.०४.२०१५ पासून अदा करेपर्यंत द. सा. द. से. १२ टक्के व्याजासह अदा करावे.
७. सामनेवाले क्र. १ ते ३ यांनी वैयक्तिक व संयुक्तीकपणे तक्रारदार यांना वाहन दुरुस्ती कराराबाबत सेवासुविधा पुरविण्यात कसूर करुन मानसिक, शारीरिक, आर्थिक त्रास व तक्रार दाखल खर्चापोटी एकत्रित नुकसानभरपाई रक्कम रु. ३०,०००/- या आदेशप्राप्ती दिनांकापासून ३० दिवसात अदा करावे.
६. उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी.
श्रीमत श्रीमती. कल्पना जांगडे श्री. उमेश वि. जावळीकर श्रीमती. किर्ती गाडगीळ
(सदस्या) (अध्यक्ष) (सदस्या)