निशाणी क्रं-1 वरील आदेश
(पारीत दिनांक-27 जुन, 2016)
श्री नितीन माणिकराव घरडे, मा.सदस्य-
(01) उभय पक्षाचे वकीलांचा युक्तीवाद ऐकला.
(02) गैरअर्जदाराने त्याचे विरुध्द ग्राहक संरक्षण कायद्दातील कलम-12 खालील तक्रारीतील मंचाचे आदेशाचे अनुपालन न केल्याने त्याचे विरुध्द ग्राहक संरक्षण कायद्दाचे कलम-27 अन्वये दंडात्मक कारवाई करण्यात आली होती, ज्यामध्ये त्याला 06 महिने साध्या कैदेची शिक्षा व रुपये-10,000/- दंड, दंड न भरल्यास एक महिन्याची शिक्षा ठोठावण्यात आली होती.
(03) मंचाचे आदेशाचे अनुपालन का केले नाही या बद्दल कुठलेही समाधानकारक स्पष्टीकरण गैरअर्जदाराने दिलेले नाही. अर्जदाराला, गैरअर्जदारा कडून मंचाचे आदेशा प्रमाणे रुपये-1,85,000/- दिनांक-28/01/1991 पासून द.सा.द.शे.12% दराने व्याजासह घेणे आहेत. त्यानुसार अर्जदाराने ग्राहक संरक्षण कायद्दाचे कलम-25 अन्वये आदेशित रकमेची वसुली गैरअर्जदारा कडून करण्यासाठी प्रस्तुत दरखास्त अर्ज दाखल केलेला आहे, त्यानुसार अर्जदाराला गैरअर्जदारा कडून रुपये-5,60,550/- एवढी रक्कम घेणे आहे.
(04) आदेशीत रकमेच्या वसुलीसाठी गैरअर्जदाराकडे असलेल्या काही जंगम वस्तुंची यादी दाखल केलेली आहे. प्रकरणातील एकंदरीत वस्तुस्थिती व परिस्थितीजन्य पुराव्या वरुन सोबत जोडलेल्या यादी प्रमाणे गैरअर्जदाराकडील जंगम वस्तु जप्त करण्याचा आदेश आम्ही याव्दारे देत आहोत. त्यानुसार जिल्हा दंडाधिकारी, नागपूर यांना पत्र पाठविण्यात यावे की, त्यांनी किंवा त्यांचे वतीने इतर सक्षम अधिका-याने सोबत जोडलेल्या यादी नुसार गैरअर्जदारा कडील जंगम मालमत्ता/वस्तु जप्त कराव्यात व तसा अहवाल ग्राहक मंचाकडे पाठविण्यात यावा.
गैरअर्जदाराच्या जप्त करावयाच्या वस्तुंची यादी-
1) फ्रीज
2) सोफा
3) डायनिंग टेबल आणि खुर्च्या.
4) टु व्हीलर.