(पारित दि. 12 मार्च, 2020)
(पारित व्दारा श्री नितीन मा.घरडे, मा.पिठासीन अध्यक्ष)
01 उभय तक्रारदारांनी ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम 12 खाली प्रस्तुत तक्रार विरुध्दपक्ष क्रं 1 ते 12 विरुध्द प्रस्तुत ग्राहक मंचा समोर दाखल केलेली आहे.
02. तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे आहे-
उभय तक्रारदार हे विरुध्दपक्ष क्रं 1 ते 10 यांचे भाडेकरु असून विरुध्दपक्ष क्रं 1 ते 10 यांचे मालकीचे मौजा भंडारा नझूल तलाठी साझा क्रं 16, नगर परिषद भंडारा यातील तालुका जिल्हा भंडारा येथील गट क्रं 232/233/1/7 मधील आराजी 6753 चौरसफूट त्यावरील बांधकाम तळमजला, पहिला मजला व दुसरा मजला असे एकूण बांधकाम क्षेत्रफळ 6000 चौरसफूटाचे सामाईक मालक आहेत. सदर मालमत्तेपैकी तळमजल्या वरील मालमत्ता क्रं 27 खोली क्रं 1 क्षेत्रफळ-140 चौरसफूट हे दुकान तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं 1 ते 10 यांचे कडून भाडयाने घेतले. सदर मालमत्तेचा व्यवहार विरुध्दपक्ष क्रं 3 ते 10 यांचे वतीने विरुध्दपक्ष क्रं 1 बघतात, त्या अनुषंगाने दिनांक-29.03.2017 रोजी विरुध्दपक्ष क्रं 3 ते 10 यांनी, विरुध्दपक्ष क्रं 1 आममुखत्यार यांचे मार्फतीने भाडेपत्राचा करारनामा करुन घेतला, करारा प्रमाणे भाडयाचा कालावधी हा दिनांक-01.04.2017 पासून ते दिनांक-31.03.2023 पर्यंत ठरविण्यात आला व करारा प्रमाणे खोलीचे भाडे दरमहा रुपये-2000/- ठरविण्यात आले.
तक्रारकर्ता क्रं 1 व 2 यांनी पुढे असे नमुद केले की, त्यांनी सदरच्या दुकानामध्ये मे. साई सेवा मेडीकल अॅन्ड जनरल स्टोअर्सची भागीदारी औषधाचे दुकान चालविण्यासाठी सदर दुकानाचा उपयोग केला. तसेच करारनाम्या प्रमाणे दुकानाचे विजेचे देयक हे तक्रारकर्ता भरतील असे ठरले होते. तसेच तक्रारकर्ता यांनी सदर औषधीचे दुकान चालविण्या करीता औषधी अधिकारी यांचे कडून परवाना प्राप्त करुन घेतला.सदरच्या दुकानात विजेचे मीटर लावलेले असून त्याचा मीटर क्रं-5804086956 असून त्याचा ग्राहक क्रं-413890218663 असा आहे. उभय तक्रारदार हे सदरच्या विज वापराचे विज देयक नियमितपणे विरुध्दपक्ष महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी क्रं 11 व 12 यांचेकडे जमा करीत होते. उभय तक्रारदार व विरुध्दपक्ष यांच्या मध्ये कोणताही वाद नसताना अचानक दिनांक-24.09.2018 रोजी विरुध्दपक्ष यांनी संगनमत करुन कोणतीही पूर्व सुचना न देता उभय तक्रारदारांच्या दुकानातील विज पुरवठा गैरकायदेशीररित्या बंद केला व या बाबत विरुध्दपक्ष क्रं 1 यांचेकडे विचारणा केली असता त्यांनी टाळाटाळ केली. विज पुरवठा बंद झाल्यामुळे तक्रारदारांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम सुरु झाला. आवश्यक औषधीचा पुरवठा शितपेटी मध्ये करण्याचे अनिर्वाय असल्याने विज पुरवठा बंद असल्यामुळे तक्रारदारांच्या आवश्यक औषधीचा साठा सुध्दा खराब झाला. तसेच ईतरही औषधांचा साठा वाया गेला. विरुध्दपक्ष क्रं 11 व 12 महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीचे विजेचे मीटर हे विरुध्दपक्ष क्रं 1 यांचे नावे असल्याने आणि विरुध्दपक्ष क्रं 1 हे ईतर विरुध्दपक्षांचे आममुखत्यार असल्याने त्यांना ना-हरकत-प्रमाणपत्राची मागणी केली व बंद विज पुरवठा पूर्ववत सुरु करुन देण्याची विनंती केली परंतु त्यांनी योग्य तो प्रतिसाद दिला नाही. या कारणास्तव तक्रारदारांच्या औषधी दुकानाचे विक्रीवर परिणाम झाला व त्यांचा व्यवसाय बंद पडल्याने त्यांचेवर उपासमारीची वेळ आली. करीता तक्रारदारांनी दिनांक-15.10.2018 रोजी विरुध्दपक्ष यांना वकीलांचे मार्फतीने कायदेशीर नोटीस पाठवून त्यांचे दुकानातील खंडीत विज पुरवठा पूर्ववत सुरु करण्याची विनंती केली परंतु नोटीसला सुध्दा कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. सदरच्या विरुध्दपक्षांच्या कृतीमुळे तक्रारदारांचा औषधी विक्रीचा परवाना सुध्दा रद्द करण्यात आला. तक्रारदारांनी पुढे असे नमुद केले की, सदरचा वाद मिटविण्यासाठी त्यांनी मृतक श्री केशव व विरुध्दपक्ष क्रं 11 व 12 यांचे विरुध्द दुसरे सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर भंडारा यांचे न्यायालयात नियमित दिवाणी दावा क्रं-197/2018 दाखल केला होता. परंतु मृतक श्री केशव निनावे यांचा आधीच मृत्यू झालेला आहे असे कळल्यावर अधिकार कायम ठेऊन सदरचा दिवाणी दावा तक्रारदारांनी मागे घेतला. तक्रारदारांचे औषध विक्रीचे एकमेव उत्पनाचे साधन असून विरुध्दपक्ष यांचे गैरवर्तणूकीमुळे विज पुरवठा बंद केल्यामुळे त्यांचा संपूर्ण व्यवसाय बंद झाला व ही विरुध्दपक्षांचे सेवेतील त्रृटी असल्याने तक्रारदारांना अतिशय मोठया प्रमाणावर शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. करीता तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार दाखल करुन खालील प्रमाणे मागण्या केलेल्या आहेत-
- विरुध्दपक्ष क्रं 1 ते 12 यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन तक्रारदारांना सेवेत त्रृटी दिल्याचे जाहिर करण्यात यावे.
- विरुध्दपक्ष क्रं 1 ते 12 यांनी तक्रारदारांना दिनांक-24.09.2018 ते प्रत्यक्ष विज पुरवठा सुरु होई पर्यंतचे कालावधी करीता प्रतीदिन रुपये-2000/- प्रमाणे नुकसान भरपाई देण्याचे आदेशित व्हावे.
- तक्रारदारांना झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-50,000/- विरुध्दपक्षांनी देण्याचे आदेशित व्हावे.
- विरुध्दपक्ष क्रं 11 ते 12 महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी यांना करारनामा अस्तित्वात असे पर्यंत बंद विज पुरवठा पूर्ववत सुरु करुन देण्याचे आदेशित व्हावे व विरुध्दपक्ष क्रं 1 ते 10 यांची ना-हरकत-प्रमाणपत्राची मागणी न करता आवश्यक बाबीचा अवलंब करुन तक्रारदारांच्या नावे स्वतंत्र विज मीटर भाडयाचे दुकानात उपलब्ध करुन दयावे असे आदेशित व्हावे.
- प्रस्तुत तक्रारीचा खर्च रुपये-10,000/- विरुध्दपक्षां कडून मिळावा.
03. विरुध्दपक्ष क्रं 1 ते 10 यांनी वि.प.क्रं 1 चे वतीने एकत्रीत लेखी उत्तर ग्राहक मंचा समक्ष पान क्रं 57 ते 60 वर दाखल केले. विरुध्दपक्ष क्रं 1 ते 10 यांचे मालकीचे मौजा भंडारा नझूल तलाठी साझा क्रं 16, नगर परिषद भंडारा यातील तालुका जिल्हा भंडारा येथील गट क्रं 232/233/1/7 मधील आराजी 6753 चौरसफूट त्यावरील बांधकाम तळमजला, पहिला मजला व दुसरा मजला असे एकूण बांधकाम क्षेत्रफळ 6000 चौरसफूटाचे ते सामाईक मालक असल्याची बाब मंजूर केली. मात्र तळमजल्या वरील मालमत्ता क्रं 27 खोली क्रं 1, क्षेत्रफळ 140 चौरसफूटाचे दुकान तक्रारदारांनी विरुध्दपक्ष क्रं 1 ते 10 यांचे कडून भाडयाने घेतले होते ही बाब नामंजूर केली. तक्रारकर्ता क्रं 1 व 2 हे मे. साई सेवा मेडीकल अॅन्ड जनरल स्टोअर्सचे भागीदार असल्याची बाब माहिती अभावी अमान्य केली. तक्रारकर्त्याने दिवाणी दावा क्रं 197/2018 दाखल केला होता व नंतर तो मागे घेतला होता ही बाब मान्य केली. आपल्या विशेष कथनात असे नमुद केले की, तक्रारकर्त्याने दिनांक-24 मार्च, 2017 रोजीचा दाखल केलेला भाडे करारनामा खोटा असून त्यावर विरुध्दपक्ष क्रं 1 यांचे नावाची सही बनावट केलेली आहे. विरुध्दपक्ष क्रं 1 ते 10 यांनी गट क्रं-232/233/1/7 वर बांधलेल्या तळमजल्या वरील दोन हॉल, दोन बाथरुम व दोन संडास असे एकूण बांधकाम 2000 चौरसफूट दवाखाना, प्रसुती गृह व मेडीकल लावण्या करीता श्री सुयोग नामदेव मेश्राम व श्री प्रदिप दयाराम आकरे यांना दिनांक-23 फेब्रुवारी, 2017 रोजी दुय्यम निबंधक, नोंदणी व मुद्रांक कार्यालय यांचे समोर नोंदणीकृत दस्तऐवज क्रं 545/2017 अनुसार प्रतीमाह रुपये-50,000/- भाडयाने दिलेला आहे. सदर नोंदणीकृत दसतऐवज भाडे करारावर विरुध्दपक्ष क्रं 1 यांनी केलेली सही आणि तक्रारदारांनी दाखल केलेल्या भाडे करारनाम्यावरील वि.प.क्रं 1 यांनी केलेली सही यामध्ये फार मोठी तफावत आहे. तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दिवाणी दावा क्रं 197/2018 मध्ये विरुध्दपक्ष क्रं 2 ने दाखल केलेल्या उत्तरामध्ये तक्रारदार हे किरायेदार असल्याची बाब आणि सदरचा भाडे करारनामा नाकारलेला आहे. तक्रारकर्ता याने दावा दाखल करण्या अगोदर सुध्दा वकील श्री जयेश बोरकर यांचे मार्फतीने विरुध्दपक्ष क्रं 1 आणि श्री सुयोग नामदेव मेश्राम व श्री प्रदिप दयाराम आकरे यांचे नावाने दिनांक-15.10.2018 रोजीची नोटीस दिली होती. सदर नोटीस मध्ये तक्रारदारांनी स्पष्टपणे कबुल केले होते की, वादातीत मालमत्ते मध्ये भावना नर्सींग होम व आकरे हॉस्पीटल आहे. वि.प.क्रं 1 ते 10 यांनी त्यांच्या घरातील तळमजल्या वरील संपूर्ण बांधकाम रजिस्टर्ड करारनामा दिनांक-23 फेब्रुवारी, 2017 नुसार भावना नर्सींग होम आणि आकरे हॉस्पीटलचे मालक श्री सुयोग नामदेव मेश्राम व श्री प्रदिप दयाराम आकरे यांना दिले असल्याने वि.प.क्रं 1 ते 10 यांनी तक्रारदारांना भाडयाने दुकान देण्याचा प्रश्नच उदभवत नाही. सदर नोटीस मध्ये तक्रारदारांनी स्पष्टपणे नमुद केलेले आहे की, श्री सुयोग मेश्राम व श्री प्रदिप आकरे यांनी त्यांच्या कडन रुपये-7,50,000/- घेऊन त्याच्याकडे पेशंट पाठविण्याचे कबुल केले. मूळात तक्रारदारांनी विरुध्दपक्ष क्रं 1 ते 10 यांना कधीही भाडे दिलेले नाही वा त्या संबधीच्या भाडे पावत्या दाखल केलेल्या नाहीत. तक्रारदार हे वादग्रस्त जागे मध्ये कसे काय आलेत या बद्दलची माहिती विरुध्दपक्ष क्रं 1 ते 10 यांना नाही. तक्रारदारांनी विरुध्दपक्ष मालमत्तेचे मालक यांना भाडे दिल्या बाबतच्या भाडेपावत्या अभिलेखावर दाखल केलेल्या नाहीत.वादग्रस्त जागा ही राजीव गांधी चौक, भंडारा येथे असून त्याठिकाणी भाडयाचे दर रुपये-10,000/- महिना असे असताना तक्रारदारांना केवळ प्रतीमाह रुपये-2000/- प्रमाणे दुकान भाडयाने देण्याचा प्रश्नच उदभवत नाही. तक्रारदारांनी वकील श्री भुजाडे यांचे मार्फतीने दिलेल्या नोटीस वरुन तक्रारदारांना विरुध्दपक्ष क्रं 1 ते 10 यांनी भाडयाने दुकान दिल्याचे स्पष्ट होत नाही. तक्रारदारांचे प्रकरणात मोठया प्रमाणावर साक्षी पुरावा आवश्यक असल्याने केवळ दिवाणी न्यायालयात जाऊन तेथे वाद सोडविल्या जाऊ शकतो. तक्रारदारांनी दाखल केलेला दिवाणी दावा क्रं 197/18 दिनांक-24.01.2019 रोजी मागे घेऊन नविन दावा दाखल करण्याची परवानगी न्यायालयास मागितली होती परंतु त्यांनी विहित मुदतीत दिवाणी दावा दाखल केलेला नाही. तक्रारदारांनी दिनांक-24 मार्च, 2017 रोजी केलेला करारनामा हा विरुध्दपक्ष क्रं 1 यांची खोटी सही करुन तयार केलेला आहे. करीता तक्रार खर्चासह खारीज करण्याची विनंती विरुध्दपक्ष क्रं 1 ते 10 यांनी केली.
04. विरुध्दपक्ष क्रं 11 व 12 महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी तर्फे लेखी उत्तर पान क्रं 114 ते 118 वद दाखल केले. त्यांनी वादातील विज मीटर क्रं 5804086956 व विज ग्राहक क्रमांक-413890218663 हे विज ग्राहक श्री केशवराव नारायणराव निनावे यांचे नावे असल्याने त्यामुळे तक्रारदार हे विरुध्दपक्ष क्रं 11 व 12 चे ग्राहक होत नसल्याने जिल्हा ग्राहक न्यायमंचा समोर तक्रार चालविल्या जाऊ शकत नाही असा प्राथमिक आक्षेप घेतला. विरुध्दपक्ष क्रं 11 व 12 महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीने वादातील मालमत्ते मधील विज मीटरचा विज पुरवठा कधीही खंडीत केलेला नाही त्यामुळे वि.प.क्रं 11 व 12 यांचे विरुध्द तक्रार दाखल करण्याचे कोणतेही कारण घडलेले नाही. तक्रारदार हे औषध विक्रीचा व्यवसाय करीत असल्याने व्यवसायिक या कारणास्तव ते ग्राहक या सज्ञेत मोडत नाही. कारण ते औषधी खरेदी करुन त्या औषधांची पुर्नविक्री करतात. वादातील मालमत्तेचे मालक, वादातील भाडेपत्र हा एक अभिलेखाचा भाग असून त्याचेशी विरुध्दपक्ष क्रं 11 व 12 चा कोणताही संबध येत नाही. तक्रारदारांनी विरुध्दपक्ष क्रं 11 व 12 विज वितरण कंपनीकडे विरुध्दपक्ष क्रं 1 यांनी सदर वादातील विज कनेक्शनचा विज पुरवठा दिनांक-24 सप्टेंबर, 2018 रोजी खंडीत केला होता या बाबत विरुध्दपक्ष महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीचे कार्यालयात दिनांक-12.11.2018 रोजी लेखी अर्ज दाखल करुन कळविले होते ही बाब मंजूर केली. यावरुन ही बाब सिध्द होते की, विरुध्दपक्ष क्रं 11 व 12 महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी तर्फे तक्रारदारांचे दुकानाचा विजपुरवठा खंडीत करण्याचा प्रश्नच उदभवत नाही. ज्या ग्राहकाचे नावे विज कनेक्शन आहे त्याच ग्राहकाने अर्ज केल्या शिवाय खंडीत विज पुरवठा पूर्ववत सुरु केल्या जाऊ शकत नाही अशी तरतुद महाराष्ट्र विद्दुत कायदा-2003 चे तरतुदी मध्ये आहे. त्यांनी तक्रारदारांना कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नसल्याने ते कोणतेही नुकसान भरपाई देण्यास पात्र नाहीत करीता तक्रारदारांची तक्रार खर्चासह खारीज करण्याची विनंती वि.प.क्रं 11 व 12 महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी तर्फे करण्यात आली.
05. तक्रारदारांनी पान क्रं 23 वरील दसतऐवज यादी नुसार केशव नारायण निनावे तर्फे मुखत्यार श्री रोशन सुखदेव निनावे यांनी मे. साई सेवा मेडीकल अॅन्ड जनरल स्टोअर्स भंडारा तर्फे भागीदार श्री सुनिल दामोधर धाबेकर व श्री राहूलदामोधर पवनकर यांचे नावे दुकान दिनांक-23 मार्च, 2017 रोजी भाडयाने दिलेल्या करारनाम्याची प्रत, तसेच तळमजल्या वरील शॉप क्रं 1, हाऊस क्रं 27 मधील श्री साई सेवा मेडीकल अॅन्ड जनरल स्टोअर्स बाबत सहायक आयुक्त अन्न व औषधी प्रशासन विभाग, भंडारा तर्फे निर्गमित परवाना फॉर्म क्रं-20, 21 व 20-सी ची प्रत, महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी भंडारा यांचेकडे दिलेला अर्ज अशा दसतऐवजाच्या प्रती दाखल केल्यात. या शिवाय तक्रारदारांनी पान क्रं 106 वर दाखल केलेल्या दस्तऐवज यादी प्रमाणे एकूण 1 ते 7 दसतऐवजाच्या प्रती दाखल केल्यात. तक्रारदारांनी पान क्रं 131 ते 133 वर पुराव्या दाखल प्रतिज्ञालेख दाखल केला.
06. विरुध्दपक्ष क्रं 1 ते 10 यांनी पान क्रं 61 वरील दस्तऐवज यादी नुसार दुय्यम निबंधक कार्यालयात वि.प.क्रं 1 ते 10 यांनी श्री सुयोग नामदेव मेश्राम आणि श्री प्रदिप दयाराम आकरे यांचे नावाने दिनांक-23.02.2017 रोजी नोंदवून दिलेला भाडेकरारनाम्याची प्रत दाखल केली. दिवाणी न्यायालयात उत्तरवादी क्रं 2 यांनी दिनांक-14.01.2019 रोजीचे दाखल केलेल्या उत्तराची प्रत, तक्रारकर्त्याने त्याचे वकील श्री भुजाडे यांचे मार्फतीने दिनांक-09.10.2018 रोजीच्या विरुध्दपक्षांना पाठविलेल्या नोटीसची प्रत, तक्रारकर्त्याने वकील श्री जयेश बोरकर यांचे मार्फतीने विरुध्दपक्षांना दिनांक-15.10.2018 रोजीच्या पाठविलेल्या नोटीसची प्रत, तक्रारदारांनी दाखल केलेल्या दिवाणी दाव्यामध्ये डॉ. श्री सुयोग मेश्राम आणि डॉ.श्री प्रदिप आकरे यांना प्रतिपक्ष म्हणून दाव्यामध्ये समाविष्ठ करण्या बाबत दुसरे सहन्यायाधीश भंडारा यांचे न्यायालयात डॉ.श्री मेश्राम आणि डॉ.श्री आकरे यांनी केलेल्या अर्जाची प्रत अशा दस्तऐवजाच्या प्रतींचा समावेश आहे. विरुध्दपक्ष क्रं 11 व 12 महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी तर्फे पान क्रं 134 ते 136 वर पुराव्या दाखल प्रतिज्ञालेख दाखल केला. विरुध्दपक्ष क्रं 1 यांनी पुराव्याचे शपथपत्र पान क्रं 137 ते 140 वर दाखल केले. तर वि.प.क्रं 1 ते 10 यांनी पान क्रं 144 व 145 वर लेखी युक्तीवाद दाखल केला. तर वि.प.क्रं 11 व 12 विज वितरण कंपनी तर्फे पान क्रं 141 ते 143 वर लेखी युक्तीवाद दाखल करण्यात आले.
07 तक्रारदारांची तक्रार, विरुध्दपक्ष क्रं 1 ते 10 यांचे एकत्रित लेखी उत्तर तसेच विरुध्दपक्ष क्रं 11 व 12 महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीचे लेखी उत्तर याचे अवलोकन करण्यात आले. तक्रारदारां तर्फे वकील श्रीमती एस.पी.अवचट तर वि.प.क्रं 1 ते 10 तर्फे वकील श्रीमती के.बी.ढोमणे तर विरुध्दपक्ष क्रं 11 व 12 महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी तर्फे वकील श्री डी.आर.निर्वाण यांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला. प्रकरणातील उभय पक्षां तर्फे दाखल दसतऐवज, लेखी युक्तीवाद आणि मौखीक युक्तीवाद यावरुन ग्राहक मंचा समोर प्रकरणात न्यायनिवारणार्थ खालील मुद्दे उपस्थित होतात-
अक्रं | मुद्दा | उत्तर |
01 | दोन्ही तक्रारदार हे विरुध्दपक्ष क्रं 1 ते 10 यांचे ग्राहक ठरतात काय व सदर वाद हा ग्राहक वाद स्वरुपात मोडतो काय? | -नाही- भाडेकरु व मालक असे संबध येत असून वादाचे स्वरुप पाहता तो घरमालक आणि भाडेकरु यांचे मधील वाद असल्याने त्यास ग्राहक वाद म्हणता येणार नाही. |
02 | दोन्ही तक्रारदार हे वि.प.क्रं 11 व 12 महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीचे ग्राहक ठरतात काय? | -लाभधारी ग्राहक ठरतात परंतु वि.प.क्रं 11 व 12 यांनी विज पुरवठा खंडीत केलची तक्रार नाही. |
03 | काय आदेश? | -अंतिम आदेशानुसार- |
-कारणे व मिमांसा-
मुद्दा क्रं 01 ते 03 बाबतीत-
08. विरुध्दपक्ष क्रं 1 ते 10 हे वादातील मालमत्ता मौजा भंडारा नगर परिषद हद्दीतील तलाठी साझा क्रं 16 मधील गट क्रं-232/233/1/7 जागा एकूण क्षेत्रफळ 6753 चौरसफूट आणि त्यावरील तळमजला, पहिला मजला व दुसरा मजला असे एकूण बांधकाम क्षेत्रफ 6000 चौरसफूट बांधकामाचे सामाईक मालक असून विरुध्दपक्ष क्रं 2 ते 10 तर्फे मुखत्यार म्हणून विरुध्दपक्ष क्रं-1 श्री रोशन वल्द सुखदेव निनावे हे काम पाहतात व करारनामे करतात या बाबी सर्व पक्षांना मान्य आहेत.
09. तक्रारदारांचे तक्रारी प्रमाणे विरुध्दपक्ष क्रं 1 ते 10 तर्फे आममुखत्यार म्हणून विरुध्दपक्ष क्रं 1 श्री रोशन सुखदेव निनावे यांनी दोन्ही तक्रारदारांचे नावे दिनांक-24 मार्च, 2017 रोजी तळमजल्या वरील मालमत्ता क्रं 27 मधील एक खोली भाडयाने देण्याचा करार केला होता व कराराव्दारे तक्रारदारांना मेडीकल स्टोअर्स लावण्याची परवानगी दिली होती. सदर भाडेकरारनामा हा दिनांक-01.04.2017 ते दिनांक-31 मार्च, 2023 अशा कालावधी करीता होता. सदर खोलीत उभय तक्रारदारांनी श्री साईसेवा मेडीकल अॅन्ड जनरल स्टोअर्स औषध विक्रीचे दुकान लावले होते, त्याचे पुराव्यार्थ त्यांनी सहाय्यक आयुक्त अन्न व औषधी प्रशासनाच्या परवान्याच्या प्रती सुध्द पुराव्या दाखल सादर केलेल्या आहेत. परंतु विरुध्दपक्ष क्रं 1 ते 10 यांनी संगनमत करुन तक्रारदारांच्या औषधी दुकानाचा विज पुरवठा दिनांक-24.09.2018 रोजी कोणतीही पूर्व सुचना न देता खंडीत केला.
10. तक्रारदारांनी दिवाणी न्यायालयात दिवाणी मुकदमा क्रं 197/18 दाखल केला होता व नंतर त्यामध्ये योग्य ती दुरुस्तीची परवानगी घेऊन तो दावा मागे घेतला होता आणि त्यानंतर त्यांनी दिवाणी दावा दाखल केलेला नाही ही बाब सुध्दा सर्व पक्षांना मान्य आहे.
11. विरुध्दपक्ष क्रं 1 ते 10 तर्फे विरुध्दपक्ष क्रं 1 यांनी लेखी उत्तरात तक्रारदारांना करुन नोटरी समोर करुन दिलेला दिनांक-23 मार्च, 2017 रोजीचा पान क्रं 24 ते 26 वर दाखल भाडे करारनामा नाकारलेला असून त्यावरील स्वाक्षरी नाकारलेली आहे व तो नोटरी समोर केलेला करारनामा असून त्यावर वि.प.क्रं 1 ची बनावट स्वाक्षरी असल्याची भूमीका घेतली. आपले म्हणण्याचे समर्थनार्थ विरुध्दपक्ष क्रं 1 ते 10 तर्फे दुय्यम निबंधक कार्यालयात वि.प.क्रं 1 ते 10 यांनी श्री सुयोग नामदेव मेश्राम आणि श्री प्रदिप दयाराम आकरे यांचे नावाने दिनांक-23.02.2017 रोजी नोंदवून दिलेला भाडेकरारनाम्याची प्रत दाखल केली. दिनांक-23 फेब्रुवारी, 2017 रोजीचा भाडेकरारनामा हा दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदवून दिलेला आहे. तक्रारदारांना नोंदवून दिलेल्या कराराची वैधता ठरविण्यासाठी मोठया प्रमाणावर साक्षी पुरावा येणे आवश्यक आहे, त्याचे कारण असे आहे की, सदर करारनाम्यावरील साक्षीदार यांना तपासणे आवश्यक आहे.
12 यातील विरुध्दपक्ष क्रं 11 व 12 ही महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी असून त्यांनी वादातील दुकानात विज पुरवठा केलेला आहे. त्यांनी वादातील मालमत्ते मध्ये विज मीटर क्रं 5804086956 व विज ग्राहक क्रमांक-413890218663 हे विज ग्राहक श्री केशवराव नारायणराव निनावे यांचे नावे असल्याने त्यामुळे तक्रारदार हे विरुध्दपक्ष क्रं 11 व 12 चे ग्राहक होत नसल्याने जिल्हा ग्राहक न्यायमंचा समोर तक्रार चालविल्या जाऊ शकत नाही असा प्राथमिक आक्षेप घेतला आणि पुढे असाही बचाव घेतलेला आहे की, तक्रारदारांनी स्वतःचे तक्रारी मध्येच विरुध्दपक्ष क्रं 1 ते 10 जे मालमत्तेचे मालक आहेत त्यांनीच तक्रारदारांचे दुकानातील विज पुरवठा संगनमताने खंडीत केला होता ही बाब नमुद केलेली आहे त्यामुळे विरुध्दपक्ष क्रं 11 व 12 महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी तर्फे तक्रारदारांना कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नसल्याने तक्रार खारीज करण्याची विनंती केली.
13 परंतु मूळ तक्रारीत गुणवत्तेवर जाण्यापूर्वी येथे पाहणे जरुरीचे आहे की, तक्रारदार भाडेकरु आणि विरुध्दपक्ष क्रं 1 ते 10 वादातील मालमत्तेचे मालक यांच्यामधील वाद हा ग्राहक वाद या स्वरुपात मोडतो काय. थोडक्यात दोन्ही तक्रारदार हे विरुध्दपक्ष क्रं 1 ते 10 मालमत्ता मालक यांचे ग्राहक होतात काय हे तपासणे जरुरीचे आहे. तक्रारदार आणि विरुध्दपक्ष क्रं 1 ते 10 यांच्या मधील संबध भाडेकरु आणि मालक असे असल्याने व सदरचा वाद सुध्दा भाडेकरु व मालक यांच्यामधील असल्याने तक्रारदार हे विरुध्दपक्ष क्रं 1 ते 10 यांचे ग्राहक होऊ शकत नाही. तक्रारदारांचे असे म्हणणे आहे की, त्यांनी वि.प.क्रं 1 ते 10 कडून भाडयाने घेतलेल्या दुकानातील विज पुरवठा अचानकपणे विरुध्दपक्षांनी संगनमत करुन बंद केला. भाडेकरुला मालमत्ते मधून हुसकावून लावण्यासाठी तसेच मालमत्ते संबधी न्यायालयीन वाद सोडविण्याऐवजी सदर भाडेकरुचा विज पुरवठा तसेच पाणी पुरवठा मालमत्ता मालक बंद करतात आणि हातातील प्रकरणातील वाद सुध्दा त्याच स्वरुपाचा आहे. त्या संबधात दोन्ही तक्रारदार हे भाडे नियंत्रण कायदया अंतर्गत (Under Rent Control Act) सक्षम न्यायालयात दाद मागू शकतात. तसेच विरुध्दपक्ष क्रं 11 व 12 महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीने तक्रारदारांचे दुकानातील विज पुरवठा खंडीत केला अशी तक्रारदारांची तक्रार नाही त्यामुळे विरुध्दपक्ष क्रं 11 व 12 महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीने तक्रारदारांना कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही. त्याच बरोबर वादातील मालमत्ते बाबत दोन भाडे करार आहेत व तक्रारदारांना करुन दिलेल्या भाडे कराराचे वैधते बाबत विस्तृत साक्ष पुरावा ग्राहक मंचा समोर येणे आवश्यक आहे, ग्राहक मंचाचे मर्यादित अधिकारक्षेत्रात ही बाब निकाली काढल्या जाऊ शकत नाही. उभय तक्रारदारांनी त्यांचे तक्रारीचे संबधात योग्य अशा सक्षम न्यायालयात जाऊन व तेथे योग्य तो पुरावा दाखल करुन दाद मागणे जरुरीचे आहे. तक्रारदार आणि विरुध्दपक्ष यांचे मध्ये भाडेकरु व मालक असे संबध प्रस्थापित होत असल्याने आणि विरुध्दपक्ष क्रं 1 ते 10 यांनी तक्रारदारांचे दुकानातील विज पुरवठा खंडीत केलेला आहे अशी तक्रारदारांचीच तक्रार आहे त्यामुळे उभय तक्रारदार हे विरुध्दपक्ष क्रं 1 ते 10 यांचे ग्राहक होत नाहीत. करीता तक्रारदारांची सदरची तक्रार खारीज होण्यास पात्र आहे असे ग्राहक मंचाचे मत आहे.
14 उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन आम्ही हातातील प्रकरणात खालील प्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहोत-
-अंतिम आदेश-
(01) उभय तक्रारदारांची तक्रार विरुध्दपक्ष क्रं 1 ते 10 मालमत्तेचे मालक आणि वि.प.क्रं 11 व 12 महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी तर्फे तिचे अधिकारी यांचे विरुध्दची खारीज करण्यात येते.
(02) खर्चा बद्दल कोणतेही आदेश नाहीत.
(03) निकालपत्राची प्रथम प्रमाणित प्रत सर्व पक्षांना निःशुल्क उपलब्ध करुन दयावी
(04) सदर तक्रारीचा ब व क संच तक्रारदारांना परत करण्यात यावा.