Final Order / Judgement | :::नि का ल प ञ ::: (आयोगाचे निर्णयान्वये,सौ. कल्पना जांगडे (कुटे), मा. सदस्या,) (पारीत दिनांक १२/०४/२०२३) - प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा, १९८६ चे कलम १२ सह १४ अन्वये दाखल केली असून तक्रारीचा थोडक्यात आशय खालिलप्रमाणे.
- तक्रारकर्ता हे सी.टी. इन्व्हेस्टमेंट आणि फायनान्शीअल कंन्सलटंट नावाने काम करतात. तक्रारकर्त्याने दिनांक ५/९/२०१८ रोजी विरुध्द पक्ष क्रमांक १ निर्मित केंट ग्रॅन्ड प्लस मिनरल आर.ओ. वॉटर प्युरिफायर, विरुध्द पक्ष क्रमांक २ यांचेकडून विकत घेतला आणि विरुध्द पक्ष क्रमांक ३ यांनी दिनांक ११/९/२०१८ रोजी तक्रारकर्त्याच्या कार्यालयात ते बसवून दिले. वॉटर प्युरिफायर मशिनची वॉरन्टी एक वर्ष आणि चार वर्ष मोफत सर्व्हिस होती. वादातील आर.ओ. प्युरिफायर हे मार्च २०१९ पर्यंत चांगले काम करित होते परंतु त्यानंतर वॉटर प्युरिफायर ने पाणी शुध्द करणे बंद केले. त्यामुळे तक्रारकर्त्याने दिनांक १२/४/२०१९ रोजी विरुध्द पक्षाकडे मोबाईल अॅप व्दारे तक्रार केली असता विरुध्द पक्षाने प्रतिनिधी पाठविले. परंतु प्रतिनिधीने फिल्टरच्या आतील ८ इंचाचे कार्बन सेडिमेंट फिल्टर बदलविणे आवश्यक आहे असे सांगितले. तक्रारकर्त्याने ते बसवून घेतले व त्याकरिता विरुध्द पक्ष क्रमांक ३ यांनी आकारलेले रुपये १,०००/- शुल्क सुध्दा दिले. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्रमांक ३ यांच्या सांगण्यानुसार १० इंचाचे केन्ट प्रि प्लॅस्टीक सेडिमेंट फिल्टर ला बाहेरुन बसविले आणि तक्रारकर्त्याने ते रुपये १,०००/- ला दिनांक २९/५/२०१९ रोजी अॅमेझॉन वरुन विकत घेतले होते. काही दिवसानंतर परत आर.ओ. सिस्टम मध्ये समस्या निर्माण होऊन पाणी शुध्द करणे बंद झाले. त्यामुळे तक्रारकर्त्याने परत विरुध्द पक्षाकडे दिनांक ११/६/२०१९ रोजी तक्रार नोंदविली. त्याप्रमाणे विरुध्द पक्ष क्रमांक ३ चे प्रतिनिधी श्री नितिन घुबडे यांनी तक्रारकर्त्याच्या कार्यालयात भेट देऊन वादातील आर.ओ. दुरुस्त करुन दिले. काही दिवसानंतर उपरोक्त फिल्टर खराब झाल्याने तक्रारकर्त्याने परत विरुध्द पक्ष यांच्या प्रतिनिधी कडे तक्रार केली असता त्यांनी आर.ओ. सिस्टम दुरुस्त करण्यास असमर्थ असल्याचे सांगून तक्रार रद्द केली. त्यानंतर तक्रारकर्त्याने दिनांक २९/७/२०१९, १/८/२०१९, आणि ५/८/२०१९ रोजी तक्रार केली असता त्याच्या सर्व तक्रारी विरुध्द पक्षाने रद्द केल्या. तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षाचा ग्राहक असून विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला आर.ओ. सिस्टम खरेदी करतांना दुरुस्त वा बदलवून देण्याची खाञी दिली होती. वादातील केन्ट आर.ओ. हे वॉरंन्टी कालावधीमध्ये असतांना त्यामध्ये बिघाड निर्माण झाला आहे आणि ते दुरुस्त करुन देण्याची जबाबदारी विरुध्द पक्ष क्रमांक ३ यांची आहे. परंतु विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करुन सेवेत न्युनता दिली. त्यामुळे तक्रारकर्त्याने दिनांक २१/८/२०१९ रोजी अधिवक्ता श्री रितेश संघवी मार्फत नोटीस पाठवून वादातील वॉटर प्युरिफायर दुरुस्त करुन मागितले आणि दुरुस्त करणे शक्य नसल्यास ते नवीन बदलवून मागितले. विरुध्द पक्ष क्रमांक १ व २ यांना नोटीस प्राप्त झाली परंतु विरुध्द पक्ष क्रमांक ३ यांना नोटीस मिळाली नाही. विरुध्द पक्ष क्रमांक २ यांनी नोटीसला उत्तर दिले नाही विरुध्द पक्ष क्रमांक १ यांनी नोटीसला खोटे उत्तर दिले. विरुध्द पक्षांनी तक्रारकर्त्यास दोषयुक्त केन्ट आर.ओ. दिले आणि ते दुरुस्त करुन न दिल्यामुळे तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षांविरुध्द आयोगासमक्ष तक्रार दाखल करुन त्यामध्ये विरुध्द पक्षांनी तक्रारकर्त्यास वादातील केन्ट ग्रॅन्ड प्लस मिनरल आर.ओ. दुरुस्त करुन द्यावे वा दुरुस्त करणे शक्य नसल्यास नवीन बदलवून द्यावे आणि शारीरिक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई रुपये २५,०००/- आणि तक्रारीचा खर्च रुपये ५,०००/- द्यावे.
- तक्रारकर्त्याची तक्रार दाखल करुन विरुध्द पक्ष क्रमांक १ ते ३ यांना नोटीस काढण्यात आली.
विरुध्द पक्ष क्रमांक १ प्रकरणात उपस्थित राहून त्यांनी आपले लेखी कथन दाखल करुन त्यामध्ये नमूद केले की, वादातील केन्ट ग्रॅन्ड वॉटर प्युरिफायर हे विरुध्द पक्ष क्रमांक २ कडून दिनांक २६/८/२०१८ रोजी विकत घेतले आणि त्याची वॉरंटी ही वॉटर प्युरिफायर सोबत दिलेल्या मॅन्युअल मधील अटी व शर्तीनुसार आहे. केन्ट वॉटर प्युरिफायर चे फिल्टर्स/ मेम्ब्रॅन बदलणे म्हणजे आर.ओ. मशीन मध्ये दोष नाही. मेम्ब्रॅन बदलणे हे पाणीचा दर्जा व गुणवत्तेवर अवलंबून असते. अशुध्द पाणी किती प्रमाणात रोज फिल्टर होते यावर ते अवलंबून असते. जर पाणी जास्त अशुध्द असले तर त्यामध्ये त्याचे छिद्र बंद होतात त्यामुळे ते बदलविल्या जाते. तक्रारकर्त्याच्या कथनानुसार आर.ओ. फिल्टर हे मार्च २०१९ पर्यंत चांगले चालू होते आणि त्यानंतर ते दिनांक १२/४/२०१९ रोजी शुल्क देऊन फिल्टर बदलविले. त्याची वॉरंटी ही आर.ओ. युनिट इंन्स्टॉलेशन केल्यापासून ६ महिण्यांपर्यंत होती. विरुध्द पक्षाच्या तंञज्ञाने दिनांक ११/६/२०१९ रोजी तक्रारकर्त्यास आर.ओ. मशीनचा वापर कार्यालयामध्ये करणे बंद करावे कारण जास्त वापरल्यामुळे ते खराब होत आहे, असे सांगितले होते. तक्रारकर्त्याने, दिनांक १७/८/२०१९ रोजी कायदेशीर नोटीस पाठविले त्यामुळे विरुध्द पक्षाने ताबडतोब अभियंताला वादातील मशीन दुरुस्त करण्यासाठी तक्रारकर्त्याकडे पाठविले. परंतु तक्रारकर्त्याने आर.ओ. मशीन दुरुस्त करण्याची परवानगी दिली नाही. विरुध्द पक्षाने, तक्रारकर्त्याने पाठविलेल्या तक्रारीला सुध्दा उत्तर दिले. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास वॉरंटी कालावधीमध्ये कोणतेही शुल्क न घेता सेवा दिली आहे. विरुध्द पक्षाने फिल्टर्स सारख्या कंन्सुमेबल्सलाच फक्त शुल्क आकारले कारण त्याची वॉरंटी कालावधी संपली होती. विरुध्द पक्ष क्रमांक १ यांना आयोगाची नोटीस प्राप्त झाल्यावर सुध्दा त्यांनी तक्रारकर्त्यास मशीन दुरुस्त करण्याकरिता अभियंताला परवानगी देण्याची विनंती केली होती परंतु तक्रारकर्त्याने त्यास नकार दिला. तक्रारकर्त्याने फक्त नवीन आर.ओ. बदलवून घेण्याकरिता खोटी तक्रार दाखल केली. सबब तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात यावी. - विरुध्द पक्ष क्रमांक २ प्रकरणात हजर राहून त्यांनी तक्रारकर्त्यास वादातील केन्ट आर.ओ. सिस्टम दिनांक ५/९/२०१८ रोजी त्याचेकडून खरेदी केल्याचे तसेच विरुध्द पक्ष क्रमांक ३ यांनी दिनांक ११/९/२०१८ रोजी तक्रारकर्त्याकडे बसवून दिले. तसेच वादातील मशीनला एक वर्ष वॉरंटी व चार वर्ष मोफत सेवा असल्याचे मान्य केले आणि पुढे आपल्या विशेष कथनामध्ये नमूद केले की, विरुध्द पक्ष क्रमांक २ हे विक्रेता असून त्यांनी फक्त तक्रारकर्त्यास वादातील आर.ओ. मशीन विकून त्या संदर्भातील वॉरंटी कार्ड दिले. त्यामध्ये विरुध्द पक्ष क्रमांक २ यांची मशीन बाबतची जबाबदारी संपृष्टात आली. विरुध्द पक्ष क्रमांक १ ही उत्पादित कंपनी असून विरुध्द पक्ष क्रमांक ३ हे त्याचे अधिकृत सर्व्हिस सेंटर आणि ते विरुध्द पक्ष क्रमांक १ यांच्या प्रोडक्टची सेवा पुरवितात. तक्रारकर्त्यास विरुध्द पक्ष क्रमांक २ विरुध्द कोणतीही तक्रार नाही. विरुध्द पक्ष क्रमांक २ यांनी तक्रारकर्त्यास चालू स्थितीमध्ये असलेले वादातील मशीन विकले होते आणि त्यामध्ये ६ महिण्यानंतर बिघाड निर्माण झाला. त्यामुळे विरुध्द पक्ष क्रमांक २ यांचा त्या समस्येसोबत कोणताही संबंध नाही. सबब प्रस्तुत तक्रार विरुध्द पक्ष क्रमांक २ विरुध्द खारीज करण्यात यावी.
- विरुध्द पक्ष क्रमांक ३ यांना नोटीस न मिळाल्याने त्यांचे विरुध्द दिनांक १५/७/२०२१ रोजीच्या ‘पुण्यनगरी’ वर्तमान पञामध्ये नोटीस जाहीर केली तरी सुध्दा ते प्रकरणात आयोगासमक्ष हजर झाले नाही त्यामुळे त्यांचे विरुध्द निशानी क्रमांक १ वर दिनांक २६/१०/२०२१ रोजी एकतर्फा आदेश पारित करण्यात आला.
- तक्रारकर्त्याची तक्रार, दस्तावेज, शपथपञ, लेखी युक्तिवाद, विरुध्द पक्ष क्रमांक १ यांचे लेखी उत्तर, शपथपञ, लेखी युक्तिवाद आणि विरुध्द पक्ष क्रमांक २ यांचे लेखी उत्तर तसेच तक्रारकर्ता व विरुध्द पक्ष क्रमांक १ व २ यांचे परस्पर विरोधी कथनावरुन खालिल मुद्दे आयोगाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्याबाबतची कारणमीमांसा आणि निष्कर्ष पुढीलप्रमाणे...
अ.क्र. मुद्दे निष्कर्ष १. विरुध्द पक्ष क्रमांक १ यांनी तक्रारकर्त्याला होय सेवेत न्युनतापूर्ण सेवा दिली आहे कायॽ २. विरुध्द पक्ष क्रमांक २ व ३ यांनी तक्रारकर्त्याला नाही सेवेत न्युनतापूर्ण सेवा दिली आहे कायॽ ३. आदेश काय? अंतिम आदेशाप्रमाणे कारणमीमांसा मुद्दा क्रमांक १ बाबतः- - तक्रारकर्त्याची तक्रार, विरुध्द पक्ष यांचे लेखी उत्तर आणि प्रकरणात दाखल दस्तऐवजांचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, तक्रारकर्ता यांनी दिनांक २६/८/२०१८ रोजी विरुध्द पक्ष क्रमांक १ उत्पादित केन्ट ग्रॅण्ड प्लस मिनरल वॉटर प्युरिफायर आर.ओ. मशिन विरुध्द पक्ष क्रमांक २ यांचेकडून रुपये १५,८००/- ला विकत घेतले व विरुध्द पक्ष क्रमांक ३ यांनी दिनांक ११/९/२०१८ रोजी तक्रारकर्त्याकडे सदर आर.ओ. मशिन इन्स्टॉल करुन सुरु करुन दिले. वॉरंटी कार्डनुसार उपरोक्त वादातील मशिन ची वॉरंटी ही मशिन इन्स्टॉल केलेल्या दिनांकापासून म्हणजे दिनांक ५/९/२०१८ ते दिनांक ५/९/२०१९ असा एक वर्ष वॉरंटी कालावधी आहे. तक्रारकर्त्याकडे दिनांक ११/९/२०१८ रोजी आर.ओ. मशिन इन्स्टॉल केल्यानंतर वॉटर प्युरिफायर मशिनने मार्च २०१९ पर्यंत चांगले काम केले परंतु त्यानंतर वादातील मशिनने पाणी शुध्द करणे बंद केल्यामुळे तक्रारकर्त्याने मोबाईल अॅप वरुन विरुध्द पक्षाकडे दिनांक १२/४/२०१९ रोजी मशिनने पाणी शुध्द करणे बंद केल्याची तक्रार केल्यामुळे विरुध्द पक्ष क्रमांक ३ चे प्रतिनिधी यांनी तक्रारकर्त्याकडे येऊन वादातील मशिनचे दोन्ही फिल्टर बदलवून नवीन बसवून दिले व त्याकरिता शुल्क रुपये १,०००/- आकारले तसेच तक्रारकर्त्यास विरुध्द पक्ष क्रमांक ३ च्या प्रतिनिधीने सांगितल्यानुसार तक्रारकर्त्याने वादातील मशिनच्या बाहेरच्या बाजुने १० इंचाचे प्लॅस्टीक सेडिमेंट केन्ट फिल्टर बसविले. तक्रारकर्त्याने दिनांक २९/५/२०१९ रोजी ते अॅमेझॉन वरुन रुपये १,०००/- ला विकत घेतले होते परंतु काही दिवसाने परत आर.ओ. मशिनने पाणी शुध्द न होण्याची समस्या निर्माण झाली. त्यामुळे तक्रारकर्त्याने परत दिनांक ११/६/२०१९ रोजी विरुध्द पक्षाकडे तक्रार नोंदविली त्यावेळी विरुध्द पक्ष क्रमांक ३ यांचे प्रतिनिधी श्री नितिन घुबडे यांनी येऊन मशिन दुरुस्त करुन दिले परंतु त्यानंतर परत मशिनमध्ये बिघाड निर्माण झाल्यामुळे तक्रारकर्त्याने दिनांक २९/७/२०१९, रोजी विरुध्द पक्षाकडे तक्रार नोंदविली. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाने दिलेल्या सेवेचे दस्त/जॉबशीट प्रकरणात दाखल केलेले असून त्यावर मशिनबाबत समस्या- ‘No purified water’ असे नमूद आहे. अनुक्रमे दिनांक ११/६/२०१९ आणि २९/७/२०१९ रोजी विरुध्द पक्षाचे प्रतिनिधी अभियंता श्री नितिन घुबडे हे तक्रारकर्त्याकडे मशिन दुरुस्त करण्याकरिता आले. परंतु त्यानंतर सुध्दा वादातील वॉटर प्युरिफायर मशिनने पाणी शुध्द करणे बंद केल्याने तिच समस्या परत निर्माण झाली हे दाखल दस्तावेज/जॉबशिट वरुन स्पष्ट होते तसेच दिनांक ५/८/२०१९ चे जॉबशिटच्या शेरा कॉलममध्ये ‘No purification of water’ नमूद आहे. यावरुन तक्रारकर्त्याकडील वादातील मशिनमध्ये, मशिन वॉरंटी कालावधीमध्ये पाणी शुध्द न होण्याची (No Purification of water) समस्या निर्माण झाली होती व विरुध्द पक्षाने ती दोन वेळा दुरुस्त करुन दिल्यावरही मशिनमधील दोषाचे समुळ निवारण झाले नाही. यावरुन विवादीत आर.ओ. मशिन केन्ट वॉटर प्युरिफायर मशिनमध्ये पाणी शुध्द न करण्याचा उत्पादित दोष होता व विरुध्द पक्षांनी दोन वेळा मशिन दुरुस्त करुनही त्यामध्ये असलेल्या दोषाचे निवारण झाले नाही, हे स्पष्ट होते. तक्रारकर्त्याने, विरुध्द पक्षांचे अभियंता यांना आर.ओ. मशिनचे युनिट तपासणे/दुरुस्त करण्याकरिता परवानगी दिली नाही तसेच तक्रारकर्ता हा वादातील मशिनचा वापर मोठ्या प्रमाणात व्यवसायाकरिता करतो आणि त्यामुळे मशिनने पाणी शुध्दीकरणाचे काम बंद केले व तक्रारकर्ताचा स्वयंरोजगार नसून मोठा व्यवसाय असल्याने ग्राहक नाही, ह्या सर्व बाबी दस्तावेज वा पुरावा दाखल करुन विरुध्द पक्षांनी सिध्द केलेल्या नाहीत त्यामुळे विरुध्द पक्षांनी घेतलेले आक्षेप ग्राहय धरण्यायोग्य नाही. तक्रारकर्त्याचे वादातील आर.ओ. मशिनमध्ये बिघाड झाला व तो दोनवेळा विरुध्द पक्ष क्रमांक ३ यांनी दुरुस्त करुन दिल्यावरही परत बिघाड निर्माण झाला व तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षांकडे वारंवार तक्रार केल्यावरही वादातील मशिनच्या दोषाचे कायमस्वरुपी निर्मुलन वा ते बदलवून न देऊन तसेच तक्रारकर्त्याचे तक्रारीकडे लक्ष न देऊन तक्रारकर्त्याप्रति न्युनतापूर्ण सेवा दिल्याचे सिध्द होते, या निष्कर्षाप्रत आयोग आलेले आहे. तसेच तक्रारकर्त्याने पाण्याचे मशिन सुध्दा दिनांक १०/१०/२०२० रोजी विकत घेतले त्याबाबतची पावती व पाणी विकत घेतल्याच्या पावत्या तक्रारकर्त्याने प्रकरणात दाखल केलेल्या आहेत. तक्रारकर्त्याने नवीन पाण्याचे मशिन विकत घेतलेले आहे आणि तोंडी युक्तिवादादरम्यान विरुध्द पक्षाच्या प्रतिनिधीने ते मशिनची फक्त किंमत परत देण्यास तयार असल्याचे सांगितले. अशा परिस्थितीत वस्तुस्थितीचा विचार करता तक्रारकर्ता हा विरुध्द पक्ष क्रमांक १ यांचेकडून मशिन खरेदी केल्याची पावती दिनांक २६/८/२०१८ नुसार मशिनची पूर्ण किंमत रुपये १५,८००/- तसेच त्याला झालेल्या शारीरिक, मानसिक व आर्थिक ञासापोटी नुकसान भरपाई व तक्रार खर्च मिळण्यास पाञ आहे. सबब मुद्दा क्रमांक १ चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रमांक २ बाबतः- - मशिनमध्ये दोष असल्याने त्याकरिता विरुध्द पक्ष क्रमांक २ विक्रेता तसेच विरुध्द पक्ष क्रमांक ३ सर्व्हिस सेंटर यांना जबाबदार धरता येणार नाही. सबब मुद्दा क्रमांक २ चे उत्तर नकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रमांक ३ बाबतः- - मुद्दा क्रमांक १ व २ च्या विवेचनावरुन आयोग खालिलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
अंतिम आदेश - तक्रारकर्त्याची तक्रार क्र. १४९/२०१९ अंशतः मंजूर करण्यात येते.
- विरुध्द पक्ष क्रमांक १ यांनी तक्रारकर्त्यास त्याच्याकडील विवादीत केन्ट ग्रॅन्ड प्लस आर.ओ. मशिनची किंमत रक्कम रुपये १५,८००/- तक्रारकर्त्यास परत द्यावी व त्यानंतर तक्रारकर्त्याने विवादीत आर.ओ. मशिन विरुध्द पक्ष क्रमांक १ यांना परत द्यावे.
- विरुध्द पक्षक्रमांक १ यांनी तक्रारकर्त्यास शारीरिक, मानसिक व आर्थिक ञासापोटी नुकसान भरपाई रक्कम व तक्रारीचा खर्च असे एकञीत रक्कम रुपये ५,०००/- द्यावे.
- विरुध्द पक्ष क्रमांक २ व ३ विरुध्द कोणताही आदेश नाही.
- उभयपक्षांना आदेशाच्या प्रती विनामुल्य देण्यात यावे.
| |