::: आ दे श :::
( पारीत दिनांक : 06/09/2016 )
आदरणीय, अध्यक्ष श्रीमती एस.एम.उंटवाले यांचे अनुसार
1. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, सादर करण्यात आलेल्या, सदर तक्रारीचा सारांश येणेप्रमाणे, …
तक्रारकर्तीने विरुध्दपक्ष क्र. 1 यांच्या कंपनीचे पिण्याचे पाणी शुध्दीकरणाचे यंत्र, स्वत:चे घरातील वापराकरिता दि. 27/11/2014 रोजी विरुध्दपक्ष क्र. 2 यांच्याकडून, तिच्या लहान मुलाच्या नावाने पावती घेवून रु.15,700/- ला विकत घेतले. विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी दि. 28/11/2014 रोजी सदर यंत्र तक्रारकर्तीचे घरी बसवून दिले. त्यानंतर एक महिन्यांनी सदर यंत्र बंद पडले, त्यावेळी तक्रारकर्तीने विरुध्दपक्ष क्र. 1 यांचे प्रतिनिधी श्री सर्व्हीसेस अकोला यांच्याशी संपर्क साधला व त्यांनी सदर यंत्र दुरुस्त करुन दिले. त्यानंतर दि. 29/6/2015 व दि. 30/6/2015 रोजी पाणी शुध्दीकरणाचे यंत्र बंद पडले. या बाबतची तक्रार दिल्यानंतर दि. 17/7/2015 रोजी सेवा प्रतिनिधी तक्रारकर्तीकडे आले व फिल्टर खराब झाले आहे, असे सांगुन फिल्टर बदलून दिले व तक्रारकर्तीकडून रु. 800/- घेतले. अंदाजे 30 दिवसांपुर्वी सदर यंत्र पुन्हा बंद पडले. तक्रारकर्तीने विरुध्दपक्ष क्र. 1 यांच्या सेवा प्रतिनिधी, श्री सर्व्हीसेस यांच्याशी संपर्क केला व ते तक्रारकर्तीचे घरी आले, त्यांनी सदर यंत्र दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते दुरुस्त झाले नाही. त्यानंतर तक्रारकर्तीने विरुध्दपक्ष क्र. 1 च्या सेवा प्रतिनिधीशी वारंवार संपर्क साधून पाणी शुध्दीकरणाचे यंत्र दुरुस्त करुन देण्याबाबत विनंती केली. परंतु आज पर्यंत तक्रारकर्तीचे पाणी शुध्दीकरण यंत्र दुरुस्त झालेले नाही. तक्रारकर्तीने विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांना नोटीस पाठवून, सदर यंत्र दुरुस्त करुन देण्याबाबत विनंती केली. परंतु विरुध्दपक्षांनी कुठलीही कार्यवाही केली नाही. अशा प्रकारे विरुध्दपक्षांनी सेवा देण्यात न्युनता दर्शविली व म्हणून तक्रारकर्तीने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल करुन विनंती केली आहे की, तक्रारकर्तीची तक्रार मंजुर करण्यात यावी व विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी तक्रारकर्तीला शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासापोटी रु. 10,000/- द्यावे, तसेच पाणी शुध्दीकरण यंत्र बदलून द्यावे. कोर्ट खर्चापोटी रु. 5000/- विरुध्दपक्षांनी तक्रारकर्तीला द्यावे.
सदर तक्रार शपथेवर दाखल असून त्यासोबत एकंदर 05 दस्तऐवज पुरावे म्हणून जोडण्यात आले आहेत.
विरुध्दपक्ष 1 यांचा लेखीजवाब :-
2. विरुध्दपक्ष 1 यांनी लेखी जबाब दाखल करुन तक्रारीतील आरोप नाकबुल केले व असे नमुद केले की, विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी दि. 17/7/2014 रोजी सेडीमेन्ट फिल्टर व कार्बन फिल्टर बदलुन दिले व त्याकरिता तक्रारकर्तीकडून रु. 800/- घेतले. कारण वारंटी कार्ड मधील शर्ती व अटी प्रमाणे सदरहू भाग खराब होण्यासारखे असतात व सहा महिन्याच्या मुदतीनंतर सदर भाग खराब झाल्यास त्या बद्दल पैसे आकारावे लागतात. सदर मशिन मध्ये बरेच सुटे भाग असतात व त्यातील एखादा सुटा भाग काम करीत नसेल तर त्याला उत्पादनाचा दोष, असे मानता येणार नाही. मंचाची नोटीस मिळाल्यानंतर विरुध्दपक्ष क्र. 1चे सेवा अभियंता तक्रारकर्तीच्या निवासस्थानी, तक्रारीप्रमाणे मशिनचे निरीक्षण करण्याकरिता गेले असता, तक्रारकर्तीने त्यांना निरीक्षण करु दिले नाही. दि. 3/11/2015 रोजी तक्रारकर्तीला सांगितले की, विनामुल्य प्युरिफायरची दुरुस्ती करुन घेण्यात यावी, परंतु तक्रारकर्तीकडून कोणताही जबाब मिळाला नाही. तक्रारकर्तीने तक्रारीत निराधार विधाने केली आहेत व केवळ असद हेतूने प्युरिफायर बदलून मागुन, अवास्तव भरपाईची मागणी केली आहे. वरील कारणास्तव तक्रारकर्तीची तक्रार खारीज करण्यात यावी.
विरुध्दपक्ष 2 यांचा लेखीजवाब :-
विरुध्दपक्ष क्र. 2 ला नोटीस बजाविल्यानंतर देखील विरुध्दपक्ष क्र. 2 प्रकरणात गैरहजर राहीले. त्यामुळे सदर प्रकरण विरुध्दपक्ष क्र. 2 विरुध्द एकतर्फी चालविण्याचा आदेश पारीत करण्यात आला.
3. त्यानंतर उभय पक्षांनी तोंडी युक्तीवाद केला.
::: का र णे व नि ष्क र्ष :::
4. या प्रकरणात तक्रारकर्ती यांची तक्रार, विरुध्दपक्ष क्र. 1 यांचा लेखी जबाब, उभय पक्षाने दाखल केलेले सर्व दस्तऐवज, तसेच उभय पक्षांचा तोंडी युक्तीवाद यांचे काळजीपुर्वक अवलोकन करुन खालील निष्कर्ष कारणे देऊन नमुद केला.
सदर प्रकरणात विरुध्दपक्ष क्र. 2 यांना मंचाची नोटीस बजाविल्यानंतर देखील ते गैरहजर राहीले. त्यामुळे विरुध्दपक्ष क्र. 2 विरुध्द प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश मंचाने दि. 22/1/2016 रोजी पारीत केला आहे.
उभय पक्षात या बद्दल वाद नाही की, तक्रारकर्तीने विरुध्दपक्ष क्र. 1 यांच्या कंपनीचे पिण्याचे पाणी शुध्दीकरणाचे यंत्र दि. 27/11/2014 रोजी विरुध्दपक्ष क्र. 2 यांच्याकडून रु. 15,700/- या रकमेत विकत घेतले. त्यामुळे तक्रारकर्ती विरुध्दपक्षाची ग्राहक आहे, असा निष्कर्ष मंचाने काढला आहे.
तक्रारकर्तीचा युक्तीवाद असा आहे की, सदर यंत्र खरेदीनंतर एक महिन्याने, त्यातुन पाणी येत नव्हते, म्हणुन विरुध्दपक्ष क्र. 1 च्या सेवा प्रतिनिधीशी संपर्क केला, तेंव्हा त्यांनी ते यंत्र दुरुस्त केले. त्यानंतर दि. 29/6/2015 व दि. 30/6/2015 रोजी सदर यंत्र बंद पडले, त्यावेळेस विरुध्दपक्ष क्र. 1 च्या सेवा प्रतिनिधींनी फिल्टर बदलले व त्यापोटी रु. 800/- घेतले. त्यानंतर यंत्र पुन्हा बंद पडले, विरुध्दपक्ष क्र. 1 च्या सेवा प्रतिनिधींनी ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला, परंतु यंत्र दुरुस्त झाले नाही. मात्र त्यानंतर विरुध्दपक्ष क्र. 1 च्या सेवा प्रतिनिधींनी, त्यांच्याशी वारंवार संपर्क करुनही, यंत्र दुरुस्त करुन दिले नाही, म्हणून सदर यंत्र बदलुन द्यावे व नुकसान भरपाई, प्रकरण खर्च प्रार्थनेनुसार, विरुध्दपक्षांकडून मिळावा.
विरुध्दपक्ष क्र. 2 हे दुकानदार आहेत, त्यांना मंचाची नोटीस प्राप्त होवूनही ते मंचात हजर राहीले नाही. तसेच तक्रारकर्तीने विरुध्दपक्ष क्र. 1 यांचा सेवा प्रतिनिधी श्री सर्व्हीसेस लक्ष्मी नगर, मोठी उमरी अकोला यांना सदर प्रकरणात विरुध्दपक्ष केलेले नाही.
विरुध्दपक्ष क्र. 1 च्या प्रतिनिधीचे असे कथन आहे की, त्यांच्या सेवा प्रतिनिधीने सदर यंत्राचे फिल्टर, रक्कम आकारुन बदलून दिले, कारण सदर मशिन बाबत वारंटी सहा महिन्यापुरती आहे. सदर यंत्रात बरेच सुटे भाग असतात, एखादा सुटा भाग जर काम करीत नसेल तर त्याला उत्पादनाचा दोष म्हणता येणार नाही. सदर प्रकरणाची मंचातर्फे नोटीस मिळाल्यानंतर विरुध्दपक्ष क्र. 1 चे सेवा अभियंता हे तक्रारकर्तीच्या सदर यंत्राची तपासणी करण्याकरिता त्यांच्या घरी गेले असता, तक्रारकर्तीने अनेक कारणे काढून, त्यांना तपासणी करु दिली नाही, त्यामुळे मंचाने तक्रारकर्तीला निर्देश द्यावे की, ही तपासणी करु द्यावी.
अशा प्रकारे उभय पक्षांचे कथन लक्षात घेता, मंचाचे मत असे आहे की, तक्रारकर्तीने विरुध्दपक्ष क्र. 1 च्या सेवा अभियंत्याला सदर वादातील शुध्दीकरण यंत्राची तपासणी, त्यांना कोणताही मोबदला न देता करु द्यावी,म्हणजे रेकॉर्डवर सदर मशिन मधील दोष नेमका काय आहे ? ही बाब स्पष्ट लिखीत स्वरुपात येईल. कारण सदर यंत्रात दोष आहे, हे दाखविणारे दस्त रेकॉर्डवर नाही, फक्त मशिन फिल्टर विरुध्दपक्षाने बदलले, अशी स्थिती आहे. त्यामुळे विरुध्दपक्ष क्र. 1 च्या सेवा अभियंता यांनी सदर वादातील मशिन तपासून, जर कोणते दोष कथन केले किंवा त्यानंतर तक्रारकर्तीला पुन्हा काही तक्रार असल्यास, तक्रारकर्ती मंचात नवीन तक्रार, त्याबाबत दाखल करु शकेल. मात्र सदर प्रकरणात असे दिसते की, विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी तक्रारकर्तीच्या तक्रारींकडे लक्ष दिले नाही व जेंव्हा तिने मंचात हे प्रकरण दाखल केले, तेंव्हा सदर यंत्र नि:शुल्क तपासण्याची तयारी दर्शविली, हे योग्य नाही. म्हणून ह्या सेवा न्युनतेबद्दलची नुकसान भरपाई, प्रकरण खर्चासह विरुध्दपक्ष क्र. 1 कडून तक्रारकर्तीस मिळणे न्यायोचित राहील, असे मंचाचे एकमत झाले आहे.
सबब अंतीम आदेश पारीत केला, तो खालील प्रमाणे…
:::अं ति म आ दे श:::
- तक्रारकर्तीची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येते.
- विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी त्यांच्या सेवा अभियंत्याकडून तक्रारकर्तीच्या वादातील पाणी शुध्दीकरण यंत्राची / मशिनची विनामुल्य, सदर मशिन चालु होईपर्यंत, दुरुस्ती करावी व त्याचा लेखी अहवाल तक्रारकर्तीस द्यावा.
- विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी तक्रारकर्तीस सेवा न्युनतेबद्दलची शारीरीक, मानसिक व आर्थिक नुकसान भरपाई, सदर प्रकरणाच्या न्याईक खर्चासह रु. 2000/- ( रुपये दोन हजार ) द्यावी.
- सदर आदेशाचे पालन, निकालाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसांच्या आंत करावे.
- तक्रारकर्तीची विरुध्दपक्ष क्र. 2 विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येत आहे.
- सदर आदेशाच्या प्रती संबंधीतांना निशुल्क देण्यात याव्या.