द्वारा- मा. अध्यक्ष, श्रीमती अंजली देशमुख
:- निकालपत्र :-
दिनांक 30/9/2011
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे-
[1] तक्रारदारांनी जाबदेणार क्र.2 उत्पादित वॉटर प्युरिफायर केन्ट ग्रॅन्ड आर.ओ प्लस सिरी. नं. के आर 090252711 जाबदेणार क्र.1 यांच्याकडून दिनांक 19/5/2009 रोजी खरेदी केला. वॉटर प्युरिफायर ची मशिन तक्रारदारांच्या घरी दिनांक 21/5/2009 रोजी बसविण्यात आली. त्यानंतर दोन महिन्यांच्या आतच वॉटर प्युरिफायर योग्य रितीने चालत नव्हते. म्हणून तक्रारदारांनी दिनांक 4/8/2009 रोजी जाबदेणारांकडे तक्रार दिली. त्यानंतर आठव्या दिवशी जाबदेणारांच्या एका प्रतिनिधीने मशिन दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला. परंतू त्यास जमले नाही. मशिन दुरुस्त तर केले नाहीच परंतू मशिनच्या इतर वायर्स तोडून टाकल्या. त्यांनतर दुसरा इंजिनिअर आला. त्यांनी काही भाग [parts] बदलले. परंतू दोन दिवसांनी पुन्हा तीच समस्या निर्माण झाली. म्हणून तक्रारदारांनी दुस-यांदा दिनांक 23/8/2009 रोजी तक्रार दाखल केली. त्यानंतर दिनांक 27/8/2009, 29/8/2009 रोजी ई-मेल्स केले. परंतू कुणीही मशिन दुरुस्तीसाठी आले नाही. त्यानंतर श्री. राजिंदर कौल यांनी मेल करुन तक्रारदारांना फोन नंबर घेतला व मशिनच्या समस्येचे निराकरण वैयक्तिकरित्या करु असे सांगितले. परंतू त्यांनी काहीही केले नाही. त्यानंतर तक्रारदारांनी अनेक फोन कॉल्स केले परंतू काहीही उपयोग झाला नाही. यावरुन तक्रारदारांना असे वाटते की मशिन दुरुस्त करण्यालायक नाही. अशी मशिन तक्रारदारांना दिल्यामुळे त्यांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला. तक्रारदारांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळावे म्हणून ही मशिन खरेदी केली होती, ते सर्व व्यर्थ ठरले. म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणारांकडून ब्रिच ऑफ अॅग्रिमेंट अॅन्ड वॉरंटी म्हणून रुपये 10,000/-, मानसिक त्रासासाठी नुकसान भरपाई पोटी रुपये 10,000/-, नोटीस व तक्रारीचा खर्च असे रुपये 11,000/-, असे एकूण 31,000/- मागतात.
[2] तक्रारदारांनी तक्रारी सोबत शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
[3] जाबदेणार क्र.1 व 2 यांना मंचाची नोटीस लागूनही गैरहजर. म्हणून त्यांच्याविरुध्द दिनांक 12/10/2010 रोजी मंचाने एकतर्फा आदेश पारीत केला.
[4] तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचानी पाहणी केली. तक्रारदारांनी खरेदी केलेले वॉटर प्युरिफायर हे वॉरंटी कालावधीत असतांनाच त्यात समस्या/दोष निर्माण झाले व ते दोष/समस्या जाबदेणार यांनी दुरुस्त करुन दिले नाहीत, ही जाबदेणार क्र.1 व 2 यांच्या सेवेतील त्रुटी ठरते. म्हणून मंच जाबदेणार क्र.1 व 2 यांना असा आदेश देतो की, त्यांनी तक्रारदारांच्या वॉटर प्युरिफायर मधील समस्यांचे [दोष] पूर्णपणे निराकरण , पार्टस, वॉरंटी सहित बदलून दयावेत व वॉटर प्युरिफायर स्मुथली चालेल अशा प्रकारे दुरुस्त करुन दयावा. तक्रारदारांनी वॉटर प्युरिफायर खरेदी केल्यापासून दोन महिन्यातच त्यात समस्या/दोष निर्माण झाल्यामुळे, तक्रारदारांना जो त्रास सहन करावा लागला त्यासाठी नुकसान भरपाई म्हणून रक्कम रुपये 3,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1,000/- जाबदेणारांकडून मिळण्यास तक्रारदार पात्र आहेत, असे मंचाचे मत आहे.
मंचाचा आदेश खालीलप्रमाणे,
:- आदेश :-
1. तक्रार मान्य करण्यात येते.
2. जाबदेणार क्र.1 व 2 यांनी वैयक्तिकरित्या अथवा संयुक्तिकरित्या तक्रारदारांस वॉटर प्युरिफायर मधील समस्यांचे [दोष] पूर्णपणे निराकरण करुन, नवीन पार्टस, वॉरंटी सहित बदलून दयावेत व वॉटर प्युरिफायर स्मुथली चालेल अशा प्रकारे दुरुस्त करुन दयावा.
3. जाबदेणार क्र.1 व 2 यांनी वैयक्तिकरित्या अथवा संयुक्तिकरित्या तक्रारदारांस नुकसान भरपाई म्हणून रक्कम रुपये 3,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1,000/- दयावा.
4. जाबदेणार क्र.1 व 2 यांनी वैयक्तिकरित्या अथवा संयुक्तिकरित्या वरील आदेशाची पुर्तता आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत करावी.
5. आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.