(घोषित दि. 29.07.2011 व्दारा श्री.डी.एस.देशमुख,अध्यक्ष) गैरअर्जदाराच्या सेवेत त्रुटी असल्याच्या आरोपावरुन ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. थोडक्यात तक्रारदाराची तक्रार अशी आहे की, त्याने दिनांक 20.10.2009 रोजी सायली एजन्सीज् यांच्याकडून टेक्स्मो कंपनीची पाच हॉर्स पॉवरची इलेक्ट्रीक मोटार खरेदी केली होती. परंतू ती मोटार जळाली आणि सायली एजन्सीजने ती मोटार त्यास बदलून दिली नाही. म्हणून दिनांक 09.10.2010 रोजी त्याने गैरअर्जदार कावले मशिनरी यांच्याकडून सी.आर.आय. कंपनीची नविन इलेक्ट्रीक मोटार खरेदी केली. सदर इलेक्ट्रीक मोटारबाबत गैरअर्जदाराने एक वर्षाची गॅरंटी दिलेली होती आणि गैरअर्जदाराने मोटार सोबत गॅरंटीकार्ड देखील दिले होते. त्याने गैरअर्जदाराकडून खरेदी केलेली सदर इलेक्ट्रीक मोटार दोन महिन्यानंतर दिनांक 14.12.2010 रोजी खराब झाली. म्हणून ती त्याने गैरअर्जदारकडे दुरुस्तीसाठी दिली असता गैरअर्जदाराने मोटार कंपनीकडे पाठवितो आणि कंपनीकडून मोटार बदलून आल्यास देतो असे सांगितले. परंतू दिनांक 15.01.2011 रोजी गैरअर्जदाराने त्याची मोटार दुरुस्त करुन आल्याचे सांगितले आणि त्याच्याकडे रुपये 2,500/- ची मागणी केली. वास्तविक गैरअर्जदाराने मोटार खरेदी करत असतांना दुरुस्तीसाठी रक्कम लागणार नाही असे सांगितले होते. गैरअर्जदाराने त्यानंतर रक्कम दिल्याशिवाय मोटार देणार नाही असे सांगितले म्हणून नाईलाजाने त्याने रुपये 2,500/- गैरअर्जदारला देऊन मोटार घेतली. परंतू गैरअर्जदाराने रक्कम घेतल्याबाबत कोणतीही पावती दिली नाही. गैरअर्जदाराने गॅरंटी कालावधीमध्ये मोटार दुरुस्तीबाबत बेकायदेशीररित्या रुपये 2,500/- वसुल करुन त्रुटीची सेवा दिली. म्हणून तक्रारदाराने अशी मागणी केली आहे की, त्यास गैरअर्जदाराकडून एकूण रुपये 13,500/- देण्यात यावेत. गैरअर्जदाराने लेखी निवेदन दाखल केले. गैरअर्जदाराचे म्हणणे असे आहे की, तक्रारदाराने त्याच्याकडून इलेक्ट्रीक मोटार खरेदी केली होती. परंतू इलेक्ट्रीक मोटार नादुरुस्त झाल्यामुळे ती दुरुस्त करण्यासाठी तक्रारदाराने ती मोटार कधीही त्याच्याकडे आणली नाही आणि तक्रारदाराकडून त्याने इलेक्ट्रीक मोटार दुरुस्तीसाठी कोणतीही रक्कम घेतलेली नाही. तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार खोटी असुन ही तक्रार फेटाळावी अशी मागणी गैरअर्जदाराने केली आहे. दोन्ही पक्षाच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात मुद्दे उत्तर 1.गैरअर्जदाराच्या सेवेत त्रुटी आहे काय ? नाही 2.आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे कारणे मुद्दा क्रमांक 1 ते 3 – दोन्ही पक्षातर्फे युक्तीवाद करण्यात आला. तक्रारदाराच्या वतीने अड.आर.के.रामरख्या आणि गैरअर्जदाराच्या वतीने अड.संजय वैद्य यांनी युक्तीवाद केला. तक्रारदाराचे म्हणणे असे आहे की, त्याने गैरअर्जदाराकडून खरेदी केलेली इलेक्ट्रीक मोटार गॅरंटी कालावधीमध्ये नादुरुस्त झाल्यामुळे त्याने ती बदलून मिळण्यासाठी गैरअर्जदाराकडे दिली. परंतू गैरअर्जदाराने ती मोटार बदलून न देता दुरुस्ती करुन दिली आणि गॅरंटी कालावधीमध्ये मोफत दुरुस्ती करुन देणे आवश्यक असतांना त्याच्याकडून बेकायदेशीररित्या दुरुस्तीचा खर्च म्हणून रुपये 2,500/- बळजबरीने वसुल केले. तक्रारदाराने त्याची मोटार नादुरुस्त झाल्यामुळे गैरअर्जदाराकडे दिली होती आणि गैरअर्जदाराने मोटार दुरुस्त करुन दिल्यानंतर तक्रारदाराकडून रुपये 2,500/- घेतले होते, हे दर्शविणारा कोणताही पुरावा तक्रारदाराने दिलेला नाही. त्यामुळे तक्रारदाराच्या तक्रारीत कोणतेही तथ्य असल्याचे दिसुन येत नसुन गैरअर्जदाराच्या सेवेत त्रुटी असल्याचे सिध्द् होत नाही. म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर वरील प्रमाणे देण्यात आले. म्हणून खालील प्रमाणे आदेश करण्यात येतो. आदेश - तक्रारदाराची तक्रार फेटाळण्यात येते.
- तक्रारीचा खर्च संबंधितांनी आपापला सोसावा.
- संबंधितांना आदेश कळविण्यात यावा.
| | HONABLE MRS. Sow. Madhuri Vishwarupe, MEMBER | HONORABLE Mr. D. S. Deshmukh, PRESIDENT | , | |