निकालपत्र
(घोषीत द्वारा- मा. सौ. स्मिता बी.कुलकर्णी, अध्यक्षा )
अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्या विरुध्द सेवेत त्रुटी दिल्याच्या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे आहे.
1. अर्जदार हे सांगवी जि. नांदेड येथील रहिवाशी आहेत. गैरअर्जदार 1 हे प्रेस्टीज स्मार्ट किचन वस्तु देण्याचा व्यवसाय करतात. गैरअर्जदार 1 हे गैरअर्जदार 2 यांचे अधिकृत एजंट आहेत. अर्जदारास मिक्सरची आवश्यकता असल्याने अर्जदार गैरअर्जदार 1 यांच्या दुकानात गेला असता गैरअर्जदार 1 यांनी गैरअर्जदार 2 प्रेस्टीज कंपनी विषयी माहिती दिली व सदर कंपनी इतर कंपन्यापेक्षा सर्व सुविधा देते तसेच सदर कंपनीचे सर्व्हीस सेंटरही आहे असे सांगितले. त्यावर विश्वास ठेवून अर्जदाराने प्रेस्टीज कंपनीचे मिक्सर दिनांक 06.07.2014 रोजी रक्कम रु. 4,700/- ला खरेदी केले. त्याची पावती गैरअर्जदार यांनी अर्जदारास दिलेली आहे. सदर मिक्सर चालत नसल्याने मिक्सरचा कोणताही पार्ट काम करत नव्हते. अशी समस्या निर्माण झाल्यामुळे अर्जदार दिनांक 13.02.2015 रोजी गैरअर्जदार 1 यांच्याकडे गेला व सदर मिक्सर चालू होत नाही. दुरुस्ती करुन किंवा दुरुस्ती होत नसल्याने बदलून देण्याविषयी विनंती केली. गैरअर्जदार 1 यांनी वॉरंटी काळात असल्यावर देखील मिक्सर दुरुस्ती करुन मिळणार नाही किंवा बदलून मिळणार नाही असे म्हणून अर्जदारास तुम्हाला काय करायचे ते तुम्ही करु शकता असे सांगितले. अर्जदाराकडे मिक्सर नसल्यामुळे स्वयंपाक करण्यासाठी अडचण निर्माण होत होती. त्यामुळे अर्जदारास दुसरा मिक्सर घेणे भाग पडले. अर्जदारास गैरअर्जदार यांनी मिक्सर दुरुस्ती करुन दिला असता तर दुसरा मिक्सर घ्यावयाची गरज पडली नसती. गैरअर्जदार यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन सेवेत कमतरता केल्यामुळे अर्जदाराने सदर तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारीमध्ये अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडून मिक्सरची रक्कम रु. 4,700/- दिनांक 6/7/204 पासून 12 टक्के व्याजासह तसेच गैरअर्जदार यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्यामुळे रक्कम रु. 20,000/- मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 5,000/- व दावा खर्च रक्कम रु. 2,000/- इत्यादी बाबींची मागणी गैरअर्जदाराकडून तक्रारीद्वारे केलेली आहे.
गैरअर्जदार यांना मंचाची नोटीस प्राप्त झाल्यानंतर गैरअर्जदार हे आपल्या वकीलामार्फत हजर होऊन आपले लेखी म्हणणे दाखल केले.
गैरअर्जदार क्र. 1 यांचा लेखी जबाब थोडक्यात पुढील प्रमाणे आहे.
2. अर्जदाराची तक्रार खोटी असून अर्जदारास तक्रार दाखल करण्यास कोणतेही कारण प्राप्त झालेले नाही. गैरअर्जदार 1 हे गैरअर्जदार 2 यांचे फ्रेंचायझी म्हणून काम पाहतात. अर्जदाराने गैरअर्जदाराकडून मुळ किंमत रक्कम रु. 6,495/- वजा सुट रक्कम रु. 1,795/- असे एकूण रक्कम रु. 4,700/- चा मॅस्टरो फुड प्रोसेसर खरेदी केला होता. सदरचा फुड प्रोसेसर गैरअर्जदार 1 यांनी अर्जदारास चालवून दाखवला होता. गैरअर्जदार 1 ने अर्जदारास खरेदी केलेल्या फुड प्रोसेसरमध्ये बिघाड असल्याने गैरअर्जदार 2 च्या अधिकृत सर्व्हीस सेंटरमध्ये जावून फुड प्रोसेसर दाखवून घेण्याचा सल्ला दिला होता. परंतू अर्जदाराने गैरअर्जदाराच्या सर्व्हीस सेंटरमध्ये गेलेला नाही. गैरअर्जदाराने अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला नाही. अर्जदाराने फुड प्रोसेसर बिघडलेला असल्यास गैरअर्जदार 2 च्या अधिकृत सर्व्हीस सेंटरमध्ये जावून दाखविणे क्रमप्राप्त होते परंतू अर्जदार सर्व्हीस सेंटरमध्ये न जाता सरळ ग्राहक मंचामध्ये आलेला आहे. गैरअर्जदार 1 यांना त्रास देण्याच्या उद्देशाने अर्जदार सदरील तक्रार दाखल केलेली असल्याने अर्जदाराची तक्रार नामंजूर करण्यात यावी अशी विनंती गैरअर्जदार 1 यांनी लेखी जबाबाद्वारे केलेली आहे.
गैरअर्जदार 2 यांचा लेखी जबाब थोडक्यात पुढील प्रमाणे.
3. अर्जदाराची तक्रार खोटी व काल्पनिक असून अर्जदारास तक्रार दाखल करण्यास कोणतेही कारण घडलेले नाही. अर्जदार त्याचा फुड प्रोसेसर हा गैरअर्जदार 2 यांचे अधिकृत कर्मचारी यांच्यासमोर तपासणी / निरीक्षण करण्यास नकार दिलेला आहे. अर्जदाराने सदर फुड प्रोसेसर गैरअर्जदार 1 यांच्याकडून खरेदी केल्याची पावती दाखल केलेली नाही. यावरुन अर्जदाराने सदरची तक्रार ही फक्त गैरअर्जदार 2 यांना त्रास देण्याच्या उद्देशाने केलेली असल्याचे दिसून येते. अर्जदाराच्या तक्रारीवरुन अर्जदाराने फुड प्रोसेसर खरेदी केल्यानंतर तब्बल 6 महिन्यानंतर म्हणजेच जानेवारी 2015 मध्ये प्रथमतः तक्रार फुड प्रोसेसर बाबत तक्रार केली. यावरुन अर्जदाराने सदर फुड प्रोसेसरचा वापर कोणत्याही तक्रारीशिवाय 6 महिने केलेला आहे. यावरुन सदर फुड प्रोसेसरमध्ये कोणताही मॅन्युफॅक्चरींग डिफेक्ट नाही असे दिसून येते. अर्जदाराने कोणताही दुसरा फुड प्रोसेसर खरेदी केलेला नाही. अर्जदाराने जेव्हा गैरअर्जदार 1 यांच्याकडे सदर फुड प्रोसेसरबाबत तक्रार केली तेव्हा गैरअर्जदार 2 यांचे कर्मचारी सेल्स एक्सीक्युटीव्ह यांनी अर्जदाराचा सदर फुड प्रोसेसर निरीक्षण करुन योग्य तो निर्णय घेण्याची तयारी दर्शविली होती. अर्जदाराने गैरअर्जदार यांचे कर्मचारी यांना फुड प्रोसेसरचे निरीक्षण करु दिलेले नाही. गैरअर्जदार 2 ही उत्कृष्ठ उत्पादने निर्माण करणारी कंपनी असून त्यांची उत्पादने ही अत्युच्य परिक्षणातून जातात आणि बरीच वर्षे चालतात. गैरअर्जदार 2 यांनी उत्पादित केलेल्या वस्तुमध्ये दोष आढळूच शकत नाही. अर्जदार हा स्वच्छ हाताने मंचासमोर आलेला नाही. अर्जदाराची तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी अशी विनंती लेखी जबाबाद्वारे गैरअर्जदार 2 यांनी केलेली आहे.
अर्जदार व गैरअर्जदार यांनी आपल्या म्हणण्याचे पुष्टयर्थ आपले शपथपत्र व कागदपत्रे दाखल केलेली आहेत. दोन्ही बाजुंनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता खालील बाबी स्पष्ट होतात.
4. अर्जदाराच्या तक्रारीतील प्रमुख मागणी अशी आहे की, अर्जदाराने गैरअर्जदार 2 प्रेस्टीज कंपनी यांनी उत्पादित केलेल्या फुड प्रोसेसर हा कंपनीच्या अधिकृत फ्रेंचायझी म्हणजेच गैरअर्जदार 1 यांच्याकडून दिनांक 6/7/2014 रोजी खरेदी केलेला आहे. सदरील फुड प्रोसेसर खरेदी केल्यानंतर त्यामध्ये दोष निर्माण झाल्यामुळे अर्जदाराने सदर फुड प्रोसेसर हा गैरअर्जदार 1 यांच्याकडे दुरुस्तीसाठी नेला असता गैरअर्जदार 1 यांनी सदरील फुड प्रोसेसर दुरुस्ती करुन देण्यास स्पष्टपणे नकार दिलेला आहे त्यामुळे अर्जदाराने सदरील तक्रार दाखल केलेली आहे.
5. गैरअर्जदार 1 व 2 यांना नोटीस प्राप्त झाल्यानंतर गैरअर्जदार हे मंचासमोर हजर झालेले असून गैरअर्जदार 1 व 2 यांनी अर्जदारास तडजोड करण्याचा प्रस्ताव दिला. सदर तडजोडीच्या प्रस्तावाचे अवलोकन केले असता गैरअर्जदार 1 व 2 यांनी अर्जदारास नवीन प्रोडक्ट देण्यास तयार असल्याचे प्रस्तावात नमूद केलेले आहे. गैरअर्जदार यांच्या सदरील प्रस्तावावर अर्जदाराने आपले म्हणणे दिलेले असून गैरअर्जदाराने अर्जदाराचा फुड प्रोसेसर वेळेवर दुरुस्ती करुन दिला असता तर अर्जदारास दुसरा फुड प्रोसेसर घेण्याची गरज पडली नसती. दुसरा फुड प्रोसेसर घेण्यासाठी अर्जदारास वेगळा चार्ज दयावा लागलेला आहे असे म्हणणे अर्जदाराने दिले.
6. दाखल पावतीचे अवलोकन केले असता अर्जदाराने गैरअर्जदार 2 यांनी उत्पादित केलेले फुड प्रोसेसर गैरअर्जदार 1 यांच्या दुकानातून खरेदी केलेले असल्याचे स्पष्ट होते. सदरील पावतीचे निरीक्षण केल्यानंतर सदरील फुड प्रोसेसरच्या किमतीमध्ये गैरअर्जदार 1 यांनी 1,795/- रुपयाची सुट अर्जदारास दिलेली आहे. तक्रारीसोबत अर्जदाराने कस्टमर रिस्पॉन्स कार्ड दाखल केलेले आहे. सदर कार्डाचे अवलोकन केले असता गैरअर्जदार 1 यांनी सदरील कार्डावर खरेदीदाराचे नांव, वस्तुच्या उत्पादनाविषयीचा तपशील या बाबी लिहून त्यावर डिलरचा स्टॅप मारणे बंधनकारक आहे. परंतू सदरील कार्डावर गैरअर्जदार 1 यांनी असे काहीही लिहिलेले नाही. सदरील कार्ड हे पूर्णतः कोरे असल्याचे दिसते. त्यावर फक्त वस्तुचा सिरीअल नंबर नमूद केलेला आहे. वास्तविक पाहता सदरील कार्ड गैरअर्जदार 1 यांनी भरुन देणे गरजेचे होते. अर्जदार यांच्या म्हणण्यानुसार अर्जदाराचे फुड प्रोसेसर नादुरुस्त झाल्यानंतर त्यांनी सदरील फुड प्रोसेसर गैरअर्जदार 1 यांच्याकडे दुरुस्तीसाठी नेले असता गैरअर्जदार 1 यांनी नकार दिलेला आहे. गैरअर्जदार 1 यांनी आपल्या लेखी जबाबामध्ये परिच्छेद क्र. 6 मध्ये अर्जदार हा नादुरुस्त झालेले फुड प्रोसेसर घेवून आलेला असल्याचे मान्य केलेले आहे. यावरुन अर्जदाराच्या फुड प्रोसेसरमध्ये बिघाड असल्याचे दिसून येते व गैरअर्जदार 1 यांनी अर्जदारास गैरअर्जदार 2 च्या अधिकृत सर्व्हीस सेंटरमध्ये जावून फुड प्रोसेसर दाखविण्याचा सल्ला दिलेला होता असे नमूद केलेले आहे. गैरअर्जदार 2 यांच्या लेखी जबाबातील परिच्छेद क्र. 13 मध्ये अर्जदार गैरअर्जदार 1 यांच्याकडे फुड प्रोसेसर बद्दल तक्रार घेवून आला असता गैरअर्जदार 2 यांचे कर्मचारी सेल्स एक्सीक्युटीव्ह यांना अर्जदाराने फुड प्रोसेसरचे निरीक्षण करु दिलेले नाही यावरुन गैरअर्जदार 1 व 2 यांच्यामध्ये अर्जदाराच्या फुड प्रोसेसर दुरुस्ती बद्दल संदिग्धता असल्याचे दिसून येते, कारण गैरअर्जदार 1 यांनी अर्जदारास गैरअर्जदार 2 च्या सर्व्हीस सेंटरमध्ये जाण्याचा सल्ला दिलेला होता परंतू गैरअर्जदार 2 हे अर्जदार फुड प्रोसेसरची तक्रार घेवून आल्यानंतर गैरअर्जदार 1 यांच्या दुकानात उपस्थित होते असे गैरअर्जदार 2 यांनी मान्य केलेले आहे. जर गैरअर्जदार 2 हे गैरअर्जदार 1 यांच्याकडे अर्जदाराच्या तक्रारीच्यावेळी उपस्थित होते तर गैरअर्जदार 1 यांनी गैरअर्जदार 2 यांच्याकडे जाण्याचा अर्जदारास सल्ला का दिला असा प्रश्न निर्माण होतो. यावरुन गैरअर्जदार 1 यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला असल्याचे दिसून येते.
7. उत्पादक कंपनी यांनी उत्पादित केलेली वस्तु अधिकृत फ्रेंचायझी मार्फत विकल्यानंतर सदरील वस्तुमध्ये कुठलाही दोष निर्माण झाल्यास सदरील वस्तु ही दुरुस्ती करुन देणे म्हणजेच विक्री पश्चात सेवा देणे दोन्हीही पक्षकारांवर बंधनकाकरक आहे. प्रस्तुत प्रकरणात गैरअर्जदार 1 व 2 यांनी अर्जदारास विक्री पश्चात सेवा नाकारलेली आहे. युक्तीवादाच्या वेळी अर्जदाराने सदरील फुड प्रोसेसर मंचासमोर आणलेला होता त्यावेळी गैरअर्जदार 2 यांचा सेल्स एक्सीक्युटीव्ह हजर होता. सदरील फुड प्रोसेसर चालवून बघीतला असता फुड प्रोसेसरची मशिन चालत होती परंतू सदरील फुड प्रोसेसरमधील मुख्य रॉड तुटलेला असल्याचे दिसून आले. सदरील रॉडचे निरीक्षण केले असता सदरील रॉड हा अतिशय निकृष्ठ प्लॅस्टीकचा बनवलेला असल्याचे व सदरील प्लॅस्टीकचे अनेक तुकडे झालेले असल्याचे दिसून आले. गैरअर्जदार 2 यांच्या सेल्स एक्सीक्युटीव्हला सदरील रॉडबाबत विचारणा केली असता सदरील रॉडशिवाय फुड प्रोसेसरमध्ये कुठलीच वस्तु अटॅचमेंट वापरता येवू शकत नाही असे सांगितले. त्यावरुन तुटलेला रॉड हा फुड प्रोसेसरचा महत्वाचा पार्ट आहे. सदरील पार्ट तुटल्यामुळे अर्जदार फुड प्रोसेसर वापरु शकलेला नाही. गैरअर्जदार अर्जदाराच्या फुड प्रोसेसरमधील दोष किंवा तुटलेले पार्ट त्वरीत दुरुस्तीकरुन दिले असते तर अर्जदारास दुसरा फुड प्रोसेसर खरेदी करावा लागला नसता. अर्जदाराने दिनांक 10.1.2015 रोजी नवीन फुड प्रोसेसर खरेदी केलेला असल्याचे दाखल पावतीवरुन दिसून येते. गैरअर्जदार यांनी अर्जदारास विक्रीपश्चात सेवा नाकारुन सेवेत त्रुटी दिलेली आहे. अर्जदाराच्या फुड प्रोसेसरचा तटलेला रॉड गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी दुरुस्त केलेला नाही. त्यामुळे सदरील तक्रार अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याविरुध्द दाखल केलेली आहे. तक्रारीचे स्वरुप बघता कोणताही सामान्य ग्राहक विक्रेत्याविरुध्द लहान-सहान बाबीसाठी मंचामध्ये प्रकरण दाखल करीत नाही. परंतू प्रस्तुत अर्जदाराने सदरील तक्रार दाखल केल्यामुळे सदरील तक्रार प्रतिनिधीक तक्रार समजली जाते. कोणत्याही खरेदी केलेल्या वस्तुमध्ये दोष उत्पन्न झाल्यास त्याची विक्री पश्चात सेवा उत्पादक किंवा विक्रेता यांनी नाकारली तर ग्राहक संरक्षण कायदा 1986 मधील तरतुदीनुसार सदरील बाब ही सेवेतील त्रुटी समजण्यात येते. त्यामुळे गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी अर्जदारास सेवेत त्रुटी दिलेली आहे, असे मंचाचे मत आहे.
वरील विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
1. अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
2. गैरअर्जदार 2 यांनी अर्जदारास फुड प्रोसेसरची किंमत रक्कम रु. 4,700/- आदेश तारखेपासून 30 दिवसांच्या आत दयावेत व रक्कम प्राप्त झाल्यानंतर अर्जदाराने सदरील फुड प्रोसेसर गैरअर्जदार 2 यांना परत करावा.
3. गैरअर्जदार 1 व 2 यांनी अर्जदारास विक्रीपश्चात सेवेबाबत योग्य ते मार्गदर्शन न देवून अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्याबद्दल रक्कम रु. 3,500/- दयावेत.
4. गैरअर्जदार 1 व 2 यांनी अर्जदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 2,000/- व दावा खर्चापोटी रक्कम रु. 1,000/- आदेश तारखेपासून 30 दिवसांच्या आत दयावेत.
5. आदेशाची पूर्तता झाल्याबद्दलचा अहवाल दोन्ही पक्षांनी 45 दिवसानंतर मंचात दाखल
करावा.प्रकरण 45 दिवसानंतर पुन्हा आदेशाच्या पूर्ततेच्या अहवालासाठी ठेवले जाईल.
6. निकालाच्या प्रती दोन्ही पक्षकारास मोफत देण्यात याव्यात.