::: निकालपत्र :::
( निकाल तारीख :25/03/2015 )
(घोषित द्वारा: श्रीमती ए.जी.सातपुते, मा. अध्यक्षा.)
तक्रारदाराने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारा विरुध्द दाखल केली आहे. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी की,
अर्जदार क्र. 1 ही अर्जदार क्र. 2 व 3 ची माता आहे व एकत्र कुटूंबकर्ती आहे. गैरअर्जदार क्र. 1 ते 3 चे अर्जदार हे ग्राहक असून त्यांचा ग्राहक सर्कल नं. 626300003156 असून मिटर क्र. 7612057255 असा आहे. सदरचे वीज जोडणी पासुन मयत भगवान सुर्यवंशी हे वीज बिलाचा भरणा करीत होते. दि. 20.06.2011 रोजी दु. अंदाजे 1.00 वा. सुमारास मयत भगवान सुर्यवंशी हे त्यांचे राहते घरांचे लोखंडीपत्रे काळजीपुर्वक दुरुस्त करण्याचे काम करीत होते. त्यावेळी घरावरील पत्र्यामध्ये करंट उतरल्यामुळे त्यांना विदयुत झटका बसला, व त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्याबाबत पोलिस स्टेशन निलंगा येथे आकस्मीक मृत्यू नोंद क्र. 16/11 कलम 174 सीआरपीसी प्रमाणे नोंद झालेली आहे. यावरुन मयत भगवान लिंगाप्पा सुर्यवंशी यांचा अपघाती मृत्यू हा विदयुत झटका बसुन झाला आहे. यास गैरअर्जदार क्र. 1 ते 3 चा निष्काळजीपणा दिसून येतो. मयत भगवान सुर्यवंशी यांचे राहते घरात विज जोडणी करता घेतलेला वायर ज्या विदयुत खांबावरुन घेतलेले होते ते वायर ढिले पडलेले होते व ते अर्थींगला स्पर्श होवुन विदयुत पुरवठा राहते घराचे पत्र्यात उतरले व त्यामुळे विदयुत झटका बसुन, अर्जदार क्र. 2 यांना सुध्दा बसला परंतु सुदैवाने त्यांचे प्राण वाचले. सदर विदयुत वायर लोंबकळत असले बाबत घटनेपुर्वी सुध्दा संबंधीत गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांना सांगीतलेले आहे. मयत भगवान सुर्यवंशी हे अर्जदारांचे कुटूंबकर्ते व एकमेव कमविते होते व त्यांचे उत्पन्नावर संपुर्ण कुटूंब अवलंबुन होते. मृत्यूपुर्वी त्यांचे वय 55 वर्षे होते. त्यांची प्रकृती निरोगी होती, त्यांचे अपघाती मृत्यूमळे त्यांचे भविष्यातील उत्पन्न व इतर नुकसान रु; 15,00,000/- झाले आहे. दि. 25.08.2011 रोजी डाकनोंद परत पावती पोस्टाने गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांना नोटीस पाठवली आहे. तरी सुध्दा गैरअर्जदाराने काहीच उत्तर न दिल्याने मदतीचे आत सदर तक्रार दाखल केली आहे. म्हणुन अर्जदारास गैरअर्जदार क्र. 1 ते 3 यांनी रु. 2,00,000/- किंवा जी योग्य असेल ती रक्कम द.सा.द.शे; 18 टक्के व्याजाने अर्जाचे तारखेपासुन दयावी, व तक्रारीचा खर्च देण्यात यावा.
गैरअर्जदार क्र. 1 ते 3 यांचे म्हणणे प्रमाणे, अर्जदाराचा अर्ज खोटा असून ग्राहक क्रमांक 626300492386 भगवान सुर्यवंशी यांच्याकडे विदयुत बिलाची बाकी आहे. तसेच अर्जदाराचा ग्राहक क्र. 626300003156 हा नसुन 626300492386 हा आहे. तसेच अर्जदाराच्या रेशन कार्डवर मंदोधरी नाव आहे, इतर व्यक्तीचे नाव नाही, त्यांनी वारस प्रमाणपत्र दयावयास हवे होते. योग्य पार्टी केलेले नसल्यामुळे या बाबीवर अर्जदाराचा अर्ज खारीज करण्यात यावा. दि. 20.06.2011 रोजी त्यांच्या घरावरील पत्रे उलथापालथ करत असतांना सर्व्हीस वायरला वा-याच्या झोक्याने पत्रा लागला व पत्र्याला करंट लागले व त्याचा धक्का अर्जदाराच्या पतीस लागला हे म्हणणे चुकीचे असून, अर्जदाराचा पती हा पत्र्यावर गेल्या बरोबर त्याच्या पायास जखम झाली असती म्हणुन अर्जदाराचा निष्काळजीपणा आहे, यात गैरअर्जदारक्र. 1 ते 3 यांची कोणतीही त्रूटी दिसून येत नाही. तसेच अर्जदाराचे उत्पन्न किती होते याचा कागदोपत्री पुरावा दिलेला नसल्यामुळे अर्जदाराचा अर्ज फेटाळण्यात यावा व अर्जदाराची तक्रार मुदतीत न नसल्यामुळे अर्जदाराचा अर्ज फेटाळण्यात यावा.
मुद्दे उत्तर
- अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय.
- गैरअर्जदाराने अर्जदाराच्या सेवेत त्रूटी केली आहे काय ? होय
- अर्जदार अनुतोष मिळण्यास पात्र आहे काय ? होय .
- काय आदेश ? अंतिम आदेशा प्रमाणे
मुद्दा क्र. 1 चे उत्तर होय असून, अर्जदाराचा ग्राहक क्र. 626300492386 असून श्री भगवान लिंगप्पा सुर्यवंशी या नावाने आहे. त्यामुळे अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे, ही बाब गैरअर्जदारास मान्य आहे.
मुद्दा क्र. 2 चे उत्तर होय असून, अर्जदाराचा पती हा आपल्या घरावरील पत्रे हाताने उलथापालथ करत असतांना त्या पत्र्याच्या संपर्क विदयुत सर्व्हीस वायरला आला व त्याचा करंट त्यांच्या उजव्या हाताला लागुन तो जागीच मृत्यू पावला. व तसाच करंट त्यांचा मुलगा माधव भगवान सुर्यवंशी यास देखील लागला आहे. त्यामुळे ही बाब अमान्य करता येत नाही की, मयत भगवान सुर्यवंशी याचा मृत्यू हा शवविच्छेदन अहवाला नुसार Electric Shock ने झालेला आहे. तसेच शवविच्छेदन अहवालाच्या रकाना क्र. 17 नुसार त्यास विदयुत शॉक हा उजव्या हाताला लागलेला आहे. त्यामुळे अज्रदाराचा मृत्यू हा विदयुत शॉकने झाला ही बाब असत्य नाही, हे सिध्द होते. गैरअर्जदाराच्या म्हणण्यानुसार घरावरचे सर्व्हीस वायर गेलेले आहे, मात्र अर्जदार हा त्याचा ग्राहक होत नाही हे म्हणणे न्यायमंचास पटत नाही. जर अर्जदार हा वीज मिटर स्वत:च्या घरी बाळगतो व तो त्या शहराचा नागरीक आहे व अर्जदाराच्या घरावरुन सर्व्हीस वायर जी लाईन गेली आहे तर तो व्यक्ती ग्राहक कसा होऊ शकत नाही ? सरळ सरळ गैरअर्जदाराच्या म्हणण्या नुसार गावात राहुन गावचा गावकरी नाही असे म्हणणे झाले ही बाब नयायमंचास पटत नाही. तसेच अर्जदाराच्या पतीचा मृत्यू बाबत साशंकता नाही, हे की त्याचा मृत्यू हा विजेच्या शॉकने झाला. अर्जदाराचा पती हा मृत्यू समयी 60 वर्षाचा होता हे त्याच्या पोलिस पेपर्स वरुन दिसून येते, तसेच पोलिस पंचनाम्या नुसार सदर घटनास्थळाची पाहणी करता घर हे पर्वमुखीअसून अंदाजे 40x 50 क्षेत्रफळाचे आहे. घरावर पुर्ण तीन वडी पत्र असून प्रत्येक लाईनला 18 पत्रे दिसत आहेत. घराचे उत्तर कोप-यात लाईट मिटर बसवलेले दिसत आहे, व सदर मिटर पासुन सिद्राम शिवप्पा लदे यांचे घरा समोरील पोलपर्यंत मीटरचे सर्व्हीस वायर दिसत आहे. सदर घराचे उत्तर कोप-यातून सर्व्हीस वायर घरात मिटर पर्यंत गेलेले दिसत आहे. उत्तर बाजुने चार नंबरचा पत्रा उलथत असतांना सर्व्हीस वायरला वा-याच्या झोका लागला, व पत्र्याला करंट लागले आहे असे दिसत आहे. असा पंचनामा असून, राशन कार्डवर त्याचे वय 70 वर्षे दिसत आहे. वयाचा दाखला अर्जदाराने दिलेला दिसून येत नाही तसेच राशन कार्डवर मंदोदरी या मुलीचे नाव दिसत आहे. त्याबाबत ही अर्जदाराने काही सांगीतले नाही. अर्जदार हा शेतकरी होता, त्याचे कागदपत्र 7/12, गट क्र. 165 मौजे नणंद ता. निलंगा येथे 1 हेक्टर 20 आर मयताच्या नावावर जमीन होती व 7/12 गट क्र. 183 मध्ये 76 आर एवढी जमीन मयताच्या नावावर 2010-11 या वर्षात दाखवलेली आहे. यावरुन अर्जदार हा लाभास पात्र आहे. अर्जदाराच्या पतीचा मृत्यू हा विजेच्या शॉकने झाला ही बाब सिध्द करण्यासाठी त्यांनी मोहन निवृत्ती लादे , बालाजी भानुदास वाघमारे या दोन शेजा-यांचे अर्जदाराने शपथपत्र त्याच्या पुष्टयर्थ दिलेले दिसून येतात. अर्जदाराने ग्राहक नंबर चुकीचा दिला असे म्हणणे आहे मात्र गैरअर्जदाराने तो ग्राहक असल्याचे व त्याचा ग्राहक क्रमांक दिलेला आहे, अर्जदाराने आपल्या पतीचे वय 55 वर्षे होते, असा कोणताही पुरावा दिलेला नाही, उलट राशन कार्डवर त्याचे वय 70 वर्षाचे दिसत आहे, व पोलीस पंचनामा, शवविच्छेदन यावर मयताचे वय 60 वर्षे असल्याचे स्पष्ट होते. वयाचा पुरावा सिध्द होत नसल्यामुळे व त्याच्या उत्पन्नाचा दाखला नसल्यामुळे अंदाजित रक्कम रु. 1,00,000/- अर्जदारास हे न्यायमंच मंजुर करत आहे. तसेच दाव्याच्या खर्चापोटी रु. 2000/- खर्च म्हणुन देण्यात यावेत.
सबब न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
आदेश
- अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजुर करण्यात येत आहे.
- गैरअर्जदार क्र. 1 ते 3 यांनी अर्जदाराच्या पतीच्या मृत्यूची नुकसान भरपाईची रक्कम रु. 1,00,000/- (रु. एक लाख फक्त) , आदेशा प्राप्ती पासुन 30 दिवसाचे आत दयावेत.
- गैरअर्जदार क्र. 1 ते 3 यांनी आदेश क्र. 2 चे पालन मुदतीत न केल्यास त्यावर मुदतीनंतर द.सा.द.शे. 9 टक्के व्याज देणे बंधनकारक राहील.
- गैरअर्जदार क्र. 1 ते 3 यांनी अर्जदारास तक्रारीचे खर्चापोटी रु. 2000/- आदेश प्राप्ती पासुन 30 दिवसाचे आत दयावेत.