जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच लातूर यांचे समोर
ग्राहक तक्रार क्रमांक – 100/2013 तक्रार दाखल तारीख – 20/07/2013
निकाल तारीख - 26/03/2015
कालावधी - 01 वर्ष , 08 म. 06 दिवस.
माणिक संतुक उर्फ संतराम सलगर,
वय- 45 वर्षे, धंदा- शेती,
रा. टाकळी (ब), ता. जि; लातुर. ....अर्जदार
विरुध्द
1) कार्यकारी संचालक,
लातुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.,
लातुर.
मुख्य कार्यालय, टिळक नगर,
लातुर ता. जि. लातुर.
2) मा. शाखाधिकारी
लातुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.,
लातुर.
शाखा – सिग्नल कॅम्प, लातुर,
ता. जि; लातुर.
3) सचिव,
विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि.,
टाकळी (ब), ता.जि.लातुर. ..गैरअर्जदार
को र म - श्रीमती ए.जी.सातपुते, अध्यक्षा.
श्री अजय भोसरेकर, सदस्य
श्रीमती रेखा जाधव, सदस्या.
तक्रारदारातर्फे :- अॅड. एल.एम.मांडे.
गैरअर्जदार क्र. 1 व 2 तर्फे :- अॅड. के.एन.देशपांडे.
गैरअर्जदार क्र. 3 तर्फे :- एकतर्फा.
निकालपत्र
(घोषितव्दारा – श्रीमती रेखा जाधव,मा.सदस्या )
अर्जदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे गैरअर्जदारा विरुध्द दाखल केली आहे.
अर्जदार हा मौजे टाकळी (ब) ता. जि. लातुर येथील रहिवाशी असून, गैरअर्जदार क्र. 3 कर्जदार व सभासद आहे. अर्जदाराने दि. 19/06/2012 रोजी गैरअर्जदार क्र. 3 च्या वतीने गैरअर्जदार क्र. 2 कडुन रक्कम रु. 10,000/- चे पीक कर्ज घेतले होते. अर्जदाराचे सन- 2012-13 या वर्षामध्ये ऊसाचे बिल रु. 36,554/- इतके गैरअर्जदार क्र. 2 कडे जमा झाले. गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांनी अर्जदाराचे कर्ज रु. 11,000/- बेकायदेशीर कपात केले. अर्जदाराच्या कर्जाची रक्कम वजा जाता रक्कम रु. 25,554/- गैरअर्जदार क्र. 2 यांचेकडे जमा करण्यात आली. अर्जदार सदरची रक्कम घेण्यासाठी गैरअर्जदार क्र. 2 कडे गेला असता त्यांनी अर्जदारास असा सल्ला दिला, रक्कम रु. 6,124/- गैरअर्जदार क्र. 2 ची शाखा कापडलाईन येथून घेण्या संदर्भात सांगितले. अर्जदाराने रक्कम रु. 19,430/- ची मागणी गैरअर्जदाराकडे केली असता, अर्जदारास सदर रक्कम देण्यास टाळाटाळ करुन खात्यावर नोंद करुन देण्यास नकार दिला. अर्जदाराने दि. 12/06/2013 रोजी गैरअर्जदारास नोटीस दिली. गैरअर्जदाराने सदर नोटीसचे उत्तर खोटे दिल्यामुळे तक्रार दाखल करण्यास कारण प्राप्त झाले. अर्जदाराने तक्रारी अर्जासोबत रक्कम रु. 19,430/- त्यावर 18 टक्के व्याज व मानसिक, आर्थिक नुकसान रु. 25,000/- तसेच तक्रारी अर्जाचा खर्च याची मागणी केली आहे.
अर्जदाराने तक्रारी अर्जासोबत पुरावा म्हणून शपथपत्र दिले आहे व एकुण – 08 कागदपत्रे दाखल केली आहेत.
गैरअर्जदार क्र. 3 विरुध्द दि. 24/01/2014 रोजी प्रकरण एकतर्फा करण्यात आले.
गैरअर्जदार क्र. 1 व 2 ने लेखी म्हणणे दिले आहे. अर्जदाराची ऊस बिलाची रक्कम रु. 36,554/- इतकी आली होती. अर्जदाराचा भाऊ नामे शिवाजी सलगर व बळीराम सलगर यांचे पीक कर्ज खाते गैरअर्जदाराकडे आहे. गैरअर्जदार क्र. 2 ने गैरअर्जदार क्र. 3 च्या सल्ल्याप्रमाणे अर्जदाराच्या नावाचे कर्ज रु. 10,100/- व शिवाजी सलगर यांच्या नावे रु. 19,330/- व बळीराम सलगर यांच्या नावे रु. 100/- कर्ज कपात केली आहे. अर्जदार हा एकत्र हिंदु कुटुंबात राहतो. अर्जदाराच्या भावाच्या नावाचे पीक कर्ज कपात करण्याबद्दल अर्जदाराची हरकत नव्हती. गैरअर्जदार क्र. 3 ने दि. 19/06/2013 रोजी सोसायटीच्या ठरावामध्ये सदरचे कर्ज कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला, त्यानुसार बँकेने सदरची रक्कम कपात केली आहे. अर्जदाराच्या सदरच्या रक्कमा गैरअर्जदार क्र. 3 च्या सांगण्यानुसार बँकेने कपात केली आहे. अर्जदाराची तक्रार रक्कम रु. 25,000/- दंडासह गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांच्याविरुध्द खारीज करण्यात यावी.
अर्जदाराचा तक्रारी अर्ज व त्यासोबत दाखल केलेली कागदपत्रे, व पुरावा म्हणून दिलेले शपथपत्र तसेच गैरअर्जदाराचे लेखी म्हणणे, अर्जदार व गैरअर्जदार यांचा युक्तीवाद याचे अवलोकन केले असता खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तरे
- अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय
- गैरअर्जदाराने अर्जदाराच्या सेवेत त्रूटी केली आहे काय ? होय
- अर्जदार अनुतोष मिळण्यास पात्र आहे काय ? होय
- काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
मुद्दा क्र. 1 चे उत्तर :- अर्जदार हा गैरअर्जदाराचा खातेदार असून, त्यासाठी लागणारा मोबदला अर्जदारानी गैरअर्जदारास दिला आहे. सदरचा मोबदला गैरअर्जदारानी स्विकारल्यामुळे अर्जदार हा ग्राहक या संज्ञेत येतो, म्हणून मुद्दा क्र. 1 चे उत्तर होय असे आहे.
मुद्दा क्र. 2 चे उत्तर :- अर्जदाराचे केसीसी खाते गैरअर्जदाराकडे आहे. अर्जदाराने दि. 19/06/2012 रोजी रक्कम रु. 10,000/- चे पीक कर्ज गैरअर्जदार क्र. 3 मार्फत गैरअर्जदार क्र. 1 व 2 कडुन घेतले होते. अर्जदारास सन-2012-13 मध्ये ऊसाचे उत्पादन रक्कम रु. 36,554/- इतके झाले, हे विकास सहकारी साखर कारखाना लि., च्या बिलावरुन दिसुन येते. सदर ऊस बिलातून पिक कर्ज गैरअर्जदार क्र. 3 ने रु. 11,000/- वजा केल्याचे दिसुन येते. अर्जदाराचे कर्ज वजा जाता रक्कम रु. 25,554/- इतकी राहिल्याचे दिसुन येते. गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी सभासदाची यादी दिली आहे, त्यात अर्जदाराचा सभासद क्र. 26 असुन रक्कम रु. 10,100/- व्याज व मुद्दलाचे कपात केल्याचे स्पष्ट होते. सदर सभासद यादीत अर्जदाराचे भाऊ नामे बळीराम सलगर व शिवाजी सलगर यांचा सभासद क्र. 30 व 31 आहे. शिवाजी सलगर यांची रु. 19,330/- कर्ज कपात केल्याचे दिसुन येते. गैरअर्जदार क्र. 3 ने दि. 15/06/2013 रोजी अर्जदाराची कायदेशीर नोटीस गेल्यानंतर सोसायटीचा ठराव घेतला आहे, त्यात शिवाजी सलगर यांचे कर्ज व्याजासह रु. 19,330/- कपात केले आहे. कारण सदरील कुटुंब हे एकत्रित हिंदु कुटुंब आहे. सदरचा ठराव संचालकाच्या सहमतीने घेतला आहे, असे ठरावात नमुद केले आहे. यावरुन असे दिसुन येते की, गैरअर्जदार क्र; 3 ने अर्जदारास सदरचा ठराव घेण्यापुर्वी किंवा घेतेवेळेस माहिती दिल्याचे व कळविल्याचे दिसुन येत नाही, त्याबद्दलचा गैरअर्जदाराने पुरावा दिलेला नाही. गैरअर्जदारानी सदरचा ठराव घेण्यापुर्वीच सदरची रक्कम कर्जात कपात केल्याचे सिध्द होते. गैरअर्जदाराने अर्जदार व त्याच्यात झालेल्या कराराचे पालन केले नसल्याचे सिध्द होते. अर्जदार हा एकत्र हिंदु कुटुंबातील असल्याचा कोणताही पुरावा दिसुन येत नाही. अर्जदाराची सहमती न घेता त्याचे व त्याच्या भावाच्या नावचे कर्ज कपात करुन अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन सेवेत त्रुटी केल्याचे दिसुन येते. गैरअर्जदार क्र. 3 विरुध्द दि. 24/01/2014 रोजी प्रकरण एकतर्फा झालेले आहे. यावरुन गैरअर्जदार क्र. 3 चा सदर तक्रारीबद्दल उजर नसल्याचे सिध्द होते. म्हणून मुद्दा क्र. 2 चे उत्तर होय असे आहे.
मुद्दा क्र. 3 चे उत्तर :- अर्जदाराने सदरचा अर्ज कागदोपत्री पुरावा देवून सिध्द केल्यामुळे अर्जदार रक्कम रु. 19,430/- व मानसिक,शारिरीक त्रासापोटी तसेच तक्रारीच्या खर्चापोटी रु. 6,000/- अनुतोष मिळण्यास पात्र आहे, हे सदर न्यायमंचाचे मत आहे.
सबब हे न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारित करत आहे.
आदेश
1) अर्जदाराची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येत आहे.
2) गैरअर्जदार क्र. 3 यांना आदेश देण्यात येतो की, अर्जदारास रक्कम रु. 19,430/-
(अक्षरी एकोणीस हजार चारशे तीस रुपये) ऊस बिल जमा झालेल्या तारखेपासुन 9
टक्के दराने व्याज आदेशाची प्रत प्राप्तीपासुन 30 दिवसाच्या आत देण्यात यावेत.
3) गैरअर्जदार क्र. 3 यांना आदेश देण्यात येतो की, आदेश क्र. 2 चे पालन मुदतीत न
केल्यास तक्रार दाखल तारखेपासुन त्यावर अतिरिक्त द.सा.द.शे. 15 टक्के व्याज
देण्यास जबाबदार राहतील.
4) गैरअर्जदार क्र. 3 यांना आदेश देण्यात येतो की, अर्जदारास मानसीक व शारिरीक
त्रासापोटी रु. 3,000/- (अक्षरी तीन हजार रुपये फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रु.
3,000/-(अक्षरी तीन हजार रुपये फक्त) आदेशाची प्रत प्राप्तीपासुन 30 दिवसाच्या
आत देण्यात यावेत.
(श्री.अजय भोसरेकर) (श्रीमती ए.जी.सातपुते) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्षा सदस्या जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, लातूर.