द्वारा मा. श्रीमती अंजली देशमुख, अध्यक्ष
** निकाल **
1] तक्रारदार हे जाबदेणारांच्या सोसायटीमधील दुसर्या मजल्यावरील ए/10 क्रमांकाची सदनिकाधारक आहेत. त्याच सोसायतीतील ए/13 या तिसर्या मजल्यावरील सदनिकेची “खाजगी” गच्ची तक्रारदाराच्या सदनिकेच्या वर आहे. गेली 5-6 वर्षे पावसाळ्यात होणार्या पावसाच्या पाण्याच्या गळतीमुळे तक्रारदाराचे अंदाजे रक्कम रु. 20,000/- चे नुकसान झाले आहे. सोसायटीकडे वारंवार तक्रारी करुनसुद्धा सोसायटीने दुरुस्तीचे काम केले नाही, म्हणून तक्रारदार व सदनिका क्र. ए/13 चे सदनिकाधारक यांनी संयुक्तरित्या हे काम करुन घेतले व सोसायटीकडे रक्कम रु. 40,000/- इतका परतावा मागितला. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार सोसायटीच्या मॉडेल बायलॉजमध्ये वरील कामे सोसायटीच्या खर्चाने करण्याविषयी स्पष्ट उल्लेख आहे. तरीही सोसायटीने हा खर्च दिला नाही, म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणारांकडून रक्कम रु. 20,000/- व मानसिक व शारिरीक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मागतात.
2] तक्रारदारांनी तक्रारीच्या पुष्ठ्यर्थ शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली व मा. उच्च न्यायाजयाचा आदेश दाखल केला.
3] जाबदेणारांनी त्यांच्या लेखी म्हणण्याद्वारे तक्रारदाराच्या मागणीस विरोध दर्शविला. जाबदेणारांच्या म्हणण्यानुसार गाळा क्र. 13/ए हा श्री. तिजारे यांच्या मालकीचा असून तक्रारदाराने उल्लेख केलेली गच्ची श्री तिजारे याच्या ताब्यात असल्याने व पुणे महानगरपालिकेने मंजूर केलेल्या नकाशाप्रमाणे सदर गच्चीची मालकी श्री तिजारे यांच्याकडे असल्याने तक्रारदार यांच्या गाळ्यामध्ये होणार्या गळतीस श्री तिजारे हे जबाबदार असून गळतीचा प्रश्न श्री तिजारे व तक्रारदार यांनी आपापसांत सोडवायचा आहे. संस्थेचे उपविधी क्र. 160 (13, 14, 16) मध्ये उल्लेख केलेले नियम संस्थेच्या समाईक मालमत्तेसाठी लागू असून संस्था त्यानुसारच निक्षेप निधीतून खर्च करु शकेल. त्यामुळे तक्रारदार यांचे म्हणणे कायदेशीर नाही. चंद्रकमल (विंग एकतर्फा आदेश+बी) गृहरचना संस्था समाईक मालमत्तेची देखभाल, दुरुस्ती करण्यास बांधील आहे, परंतु वैयक्तिक सदनिकांची दुरुस्ती करण्यास बांधील नाही. म्हणून तक्रारदाराची तक्रार अमान्य करावी अशी मागणी जाबदेणार करतात.
4] जाबदेणारांनी, त्यांनी दाखल केलेल्या लेखी जबाबापुष्ठ्यर्थ शपथपत्र व कागदपत्रे त्यामध्ये सोसायटीचे बायलॉज दाखल केले आहेत व सहकारी गृह निर्माण संस्था, मार्गदर्शक पुस्तिका दाखल केली आहे.
5] दोन्ही बाजूंनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली.
6] तक्रारदारांच्या घरातील स्लॅबवरील गळती त्यांच्या सदनिकेच्या वर रहणारे श्री तिजारे यांच्या सदनिका क्र. ए/13 यांच्या घरातून होत असल्यामुळे तक्रारदारांनी व श्री तिजारे यांनी दोघांनी मिळून संयुक्तरित्या गळती दुरुस्त करुन घेतली, परंतु त्याचा खर्च तक्रारदार हे जाबदेणार सोसायटीकडून मागतात. सहकारी गृह निर्माण संस्था, मार्गदर्शक पुस्तिकेमध्ये सोसायटीच्या दुरुस्ती व देखभालीच्या खर्चामधून खालील कामे करता येतात.
1] सर्व अंतर्गत रस्ते
2] आवार भिंती
3] बाहेरील नळ मार्ग
4] पाण्याचे पंप
5] पाण्याच्या टाक्या
6] ड्रेनेज पाईप्स
7] सेप्टीक टाकी
8] जिने
9] गच्ची व कठड्याच्या भिंती
10] गाळ्यांची छ्ते
11] जिन्यातील दिवे
12] रस्त्यावरील दिवे
13] इमारतीच्या बाहेरील भिंती
14] सर्व प्रकारच्या पाण्याची गळती, ज्यामध्ये पावसाच्या पाण्याची
गळती (टेरेस फ्लॅट सोडून) तसेच बाहेरील नळमार्ग आणि
निचरा पाईपमुळे होणार्या गळतीचा समावेश असेल.
15] फ्लॅटच्या मुख्य स्विचपर्यंत येणार्या विजेच्या तारा
16] लिफ्ट
17] शेवटच्या मजल्यावरील गाळ्याचे छ्प्पर पावसामुळे गळत
असल्यास त्याची दुरुस्ती.
वरील सर्व कामे सोसायटीच्या दुरुस्ती व देखभालीच्या खर्चामधून करावयाची
आहेत. सर्व कामांची यादी पाहिली असता, असे लक्षात येते की ही सर्व कामे संपूर्ण
सोसायटीची सामाईक कामे आहेत. कुठल्याही वैयक्तिक सदनिकांची कामे वरील यादीमध्ये
नमुद केलेली नाहीत. प्रस्तुतच्या प्रकरणामध्ये तक्रारदाराच्या सदनिकेमध्ये होणारी गळती
ही श्री तिजारे यांच्या सदनिकेतील गच्चीमधून होत होती, हे काम सोसायटीच्या सामाईक
कामांच्या यादीमध्ये येत नाही, म्हणून ते सदनिका धारकांचे वैयक्तिक काम आहे असे
मंचाचे मत आहे. सोसायटीच्या बायलॉजमध्येही वैयक्तिक सदनिकांच्या कामाचा स्प्ष्ट
उल्लेख केलेला आढळून येत नाही, जेणेकरुन तक्रारदाराची तक्रार मंचास मान्य करता
येईल.
तक्रारदारांनी मा. हाय कोर्टाचा निकाल दाखल केलेला आहे. सदर निकालाची
पाहणी केली असता असे आढळून येते की, त्या प्रकरणामधील वादातीत टेरेस हा
सोसायटीचा सामाईक भाग आहे म्हणून सोसायटीने त्याचा खर्च द्यावा, असा आदेश मा.
उच्च न्यायालयाने दिलेला आहे. परंतु प्रस्तुतच्या प्रकरणामध्ये श्री तिजारे यांच्या खाजगी
गच्चीमधून गळती होत होती. म्हणून सदरचा निकाल प्रसुतच्या प्रकरणामध्ये लागू होत
नाही असे मंचाचे मत आहे. म्हणून मंच तक्रारदाराची तक्रार नामंजूर करते.
7] वरील सर्व विवेचनावरुन व कागदपत्रांवरुन मंच खालील आदेश पारीत करते.
** आदेश **
1. तक्रारदारांची तक्रार नामंजूर करण्यात येते.
2. निकालाच्या प्रती दोन्ही बाजूंना नि:शुल्क पाठविण्यात
याव्यात.
(एस. के. कापसे) (अंजली देशमुख)
सदस्य अध्यक्ष