निकालपत्र :- (दि.29/10/2010) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्या) (1) तक्रारदाराने दि.12/12/2008 रोजी ग्राहक तक्रार क्र.774/2008 दाखल केलेली होती.प्रस्तुतची तक्रार दि.18/12/2008 रोजी स्विकृत केली. दि.16/03/2009 रोजी प्रस्तुतची तक्रार तक्रारदाराने सामनेवालांसाठी तसेच मे.मंचाचे सदस्यांसाठी आवश्यक असणारे तक्रार अर्ज व कागदपत्रे दाखल केलेले नाहीत. तसेच तक्रारदार सलग 3 तारखांना गैरहजर राहिलेने प्रस्तुतची तक्रार त्यांना चालवणेचे नाही या निष्कर्षाप्रत येऊन तक्रारदाराची तक्रार काढून टाकणेचे आदेश पारीत करणेत आले. तदनंतर दि.16/05/2009 रोजी किरकोळ अर्ज क्र.06/2009 दाखल केला. सदरचा किरकोळ अर्ज हा प्रस्तुतची तक्रार फेरफैलावर घेणेबाबतचा होता. सदर अर्जावर दि.01/06/2009 रोजी प्रस्तुतची तक्रार गुणअवगुणांवर निर्णय न झालेने इक्विटी व नैसर्गिक न्यायतत्वाचा विचार करुन प्रस्तुत प्रकरण पुन्हा फैलावर घेणेबाबतचा आदेश पारीत केला. व त्याप्रमाणे प्रस्तुतचा तक्रार अर्ज फेर फैलावर घेऊन सामनेवाला यांना नोटीसचा आदेश झाला. सामनेवाला क्र.2 हे वकीलांमार्फत मंचासमोर उपस्थित राहिले व त्यांनी लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. अंतिम सुनावणीच्या वेळेस तक्रारदाराचे वकील गैरहजर. सामनेवालांचे वकील हजर. (02) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी :- अ) सामनेवाला क्र.1 बँक ही बँकींग रेग्युलेशन अॅक्टचे अंतर्गत स्थापन झालेली व रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांचे नियंत्रणामध्ये व मार्गदर्शक तत्वाप्रमाणे कामय करणारी राष्ट्रीयकृत बँक असून सदर बँकेने सेक्युरटायझेशन अॅन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्सीयल असेटस अन्ड एन्फोर्समेंट ऑफ सेक्युरिटी इंटरेस्ट अक्ट-2002 अंतर्गत विशेष अधिकारी म्हणून सदर अधिकारी यांची नियुक्ती केलेली आहे. सामनेवाला बँकेने दिलेल्या कर्जाची वसुली व त्या अनुषंगाने नमुद कायदयांतर्गत कामकाजाचे सर्व अधिकार सदर अधिकारी यांना आहेत. सामनेवाला क्र.2 ही सदर बँकेची शाखा असून तिचे प्रधान कार्यालय मेंगलोर(कर्नाटक) येथे आहे. ब) सामनेवाला क्र.2 यांनी दैनिक सकाळ कोल्हापूर मध्ये दि.18/04/2008 रोजी फ्लॅट लिलावात विक्रि करणेत येणार असलेची जाहिरात प्रसिध्द केलेली होती.सदर जाहिरातीमध्ये सामनेवाला क्र.2कडून श्री महेंद्रकुमार हिरालाल शहा यांचे मालकी कब्जे वहीवाटीची मिळकत सि.स. नं.632/1अ शाहूपुरी 2 री गल्ली, येथे बांधलेल्या साफल्य अपार्टमेंट या निवासी इमारतीमधील दुस-या मजल्यावरील फ्लॅट क्र.8 क्षेत्र 90.40 चौ.मि. कारपेटच्या मिळकतीवर तारण कर्ज दिलेले होते. सदर कर्ज वेळेत वसुल न झालेने सामनेवाला बँकेने सदर कर्जादाराविरुध्द SARFAESI ACT अंतर्गत सदर मिळकत जप्त व सील करुन ताब्यात घेतली होती. सदर जाहिर लिलावाची नोटीस वाचून सदर मिळकतीची लिलावामध्ये रक्कम रु.11,90,000/- ची बोली लावून त्याप्रमाणे तक्रारदाराने बयाना रक्कम जमा केली. तक्रारदाराची बोली मंजूर केलेचे पत्र सामनेवाला बँकेने दि.21/05/2008 रोजी कळवले. त्यानुसार बयाणा व अतिरिक्त जमा रक्कम वगळता उर्वरित रक्कम रु.7,90,000/- पंधरा दिवसात भरणेची सुचना केली व सदर रक्कम भरताच फ्लॅटचा कब्जा व विक्री प्रमाणपत्र देणेचे मान्य केले. क) तक्रारदाराने सामनेवालांकडे प्रस्तुतची लिलावातील मिळकत मालकी हक्क निर्दोष असलेचा निर्वाळा मागितला असता सदर मिळकतीबाबत सर्व चौकशी करणेचा तुम्हास अधिकार आहे तसेच सदर मिळकतीचा सर्च तुम्ही वकीलांमार्फत घ्यावा व बँकेकडील सर्व कागद तुम्हास दिले जातील असे आश्वासन दिले. तक्रारदाराचे वकीलांनी सदर मिळकतीबाबत विचारलेल्या शंकांचे तोंडी निरसन करणेस सामनेवाला यांनी नकार दिला व आपल्या शंका लेखी मांडा आम्हास मुंबईच्या कार्यालयाशी संपर्क साधून योग्य उत्तर देता येईल असे सांगितले. सदर शंकांचे निरसन न झालेने तक्रारदाराने वकीलांमार्फत दि.26/05/2008 रोजी स्वतंत्र पत्र देऊन सदर लिलावात विक्री केलेल्या मिळकतीचे पूर्वीचे मालक श्री शहा यांचे सदर मिळकतीवरील कोमनपाचा घरफाळा,कर बराच वर्ष भरला नसलेचे तसेच विज बीलाची बाकी तसेच सदर इमारती मधील सार्वजनिक सामुदायिक खर्चाची वर्गणी देखील बराच काळ भरली गेली नसलेचे निदर्शनास आणून दिले. तसेच जाहिरातीत प्रसिध्द केल्याप्रमाणे कारपेट एरिया नसलेने व प्रस्तुतची मिळकत ‘’ब’’ सत्ता प्रकारातील असलेने प्रस्तुतची मिळकत सक्षम महसूल अधिकारी यांचे पूर्व परवानगी शिवाय विक्री करता येणार नसलेने सदर व्यवहाराची पूर्तता सामनेवाला हे कशी करणार आहेत याची माहिती मागविली. त्यास दि.09/06/2008 रोजी सामनेवाला क्र.1 यांनी अत्यंत मोघम स्वरुपात उत्तर दिले आहे. त्यानुसार सर्व प्रासंगिक खर्च व देणे तक्रारदाराने अदा करणेचे असून प्रस्तुतची मिळकत जशी आहे जिथे आहे अशा तत्वावर विक्री केलेचे कथन केले आहे. तसेच करवीर तहसीलकडून ब सत्ता प्रकाराबाबतचे ना हरकत प्रमाणपत्र मिळवता येईल असे सांगितले. मात्र सदर बाबींसाठी लागणारा प्रचंड कालावधी व संभाव्य खर्च याबाबत खुलासा केलेला नाही. ड) प्रस्तुत मिळकतीचे कर्जदार मालक श्री शहा यांनी मे.नामदार अपील प्राधिकारी डेब्ट रिकव्हरी अपील ट्रायब्युनल मुंबई यांचेकडे अपील क्र.285/2008 दाखल केले असून नामदार कोर्टाने लिलाव प्रक्रियेस स्थगीती दिलेचे सामनेवालांनी सदर प्रत्रात नमुद केले आहे. इ) तक्रारदाराने प्रस्तुत मिळकत खरेदीपोटी बयाना रक्कमसह एकूण रक्कम रु.4,00,000/- कर्ज काढून जमा केलेले आहे व त्यास 13.5 टक्के व्याज भरावे लागते. सामनेवाला बँकेने तक्रारदाराची फसवणूक केलेली आहे. त्यामुळे तक्रारदाराने लिलाव रद्द करुन सदर रक्कमेची मागणी केली असता प्रस्तुतचा लिलाव रद्द करता येणार नाही असे सामनेवालांनी दि.24/06/2008 चे पत्रात नमुद केले आहे. तसेच श्री शहा यांनी जर कर्ज बाकी भरली तर लिलाव रद्द होऊ शकतो. तक्रारदारास एकतर्फी लिलाव रद्द करता येणार नाही. तसे केल्यास तक्रारदाराने भरलेली लिलावातील बयाणा रक्कम व अन्य रक्कम जप्त करु शकतात अशा प्रकारे कळवलेले आहे. सामनेवालांनी सदर व्यवहाराबाबत तक्रारदाराची फसवणूक केल्याने तक्रारदारास मानसिक व शारिरीक त्रास सहन करावा लागला व तक्रारदारास रक्तदाबाचा त्रास होऊ लागला आहे. सबब प्रस्तुतची तक्रार मंजूर करुन सामनेवाला यांनी तक्रारदारास लिलावात विक्री केलेल्या फ्लॅटचे विनाविलंब अंतिम खरेदीपत्र पूर्ण करुन देणेबाबत सामनेवाला यांना हुकूम व्हावा तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/-,व सामनेवाला यांचेकडे फ्लॅट खरेदीसाठी भरणा केलेली रक्कम रु.4,00,000/-द.सा.द.शे.24व्याजासह तसेच वकील फी व कोर्ट खर्च रु.25,000/- सामनेवाला यांचेकडून वसुल होऊन मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे. (3) तक्रारदाराने आपल्या तक्रारीसोबत फ्लॅटचे मिळकतीचे प्रॉपर्टी कार्ड, सामनेवाला यांनी सदर मिळकतीचे लिलावाची दै.सकाळ मधील दि.18/0/2008 ची जाहिरात, लिलाव बोलीसोबत तक्रारदाराने बयाणा रक्कमेचे सामनेवाला यांना दिलेले पत्र, सामनेवाला यांनी तक्रारदाराची लिलाव बोली मंजूर केल्याचे पत्र, तक्रारदाराचे वकीलांनी सामनेवालांना दिलेले शंकांचे पत्र, त्यास सामनेवाला यांचे आलेले उत्तर, तक्रारदाराचे वकीलांनी सामनेवाला यांना दिलेली नोटीस, त्यास सामनेवाला यांचे आलेले उत्तर, सदर उत्तरास तक्रारदाराचे वकीलांनी दिलेले प्रतिउत्तर, त्याच्या रजिस्टर पोष्टाच्या पावत्या, तक्रारदाराने सामनेवाला यांना दिलेले पत्र व नोटीस इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. (4) सामनेवाला क्र.2 यांचे लेखी म्हणणेनुसार-अ) तक्रारदाराची तक्रार पूर्णत: खोटी व चुकीची असून दिशाभूल करणारी आहे. सबब ती खर्चासह नामंजूर होणेस पात्र आहे. वादातील मिळकत फ्लॅट नं.8 क्षेत्र 90.40 चौ.मि. दुसरा मजला, साफल्य अपार्टमेंट, सि.स.नं.632/1 अ,शाहूपुरी 2 री गल्ली ही मिळकत सर्फिसी अक्टनुसार कायदेशीररित्या जप्त करुन तक्रारदारांना खरेदी दिलेले आहे. सदर मिळकतीचे नोंद खरेदीपत्र करुन देणेची तयारी सामनेवालांची होती व आहे. त्यात कधीही टाळाटाळ केलेली नाही. प्रस्तुतची तक्रार पूर्णत: खोटी व चुकीची असून सामनेवाला यांना त्रास देण्याचे हेतूने केलेली आहे. ब) प्रस्तुत मिळकतीवर पद्मावती महिला नागरी सह.पत संस्था मर्या. कोल्हापूर या संस्थेच्या विशेष वसुली अधिकारी यांची जप्ती असून त्याची नोंद प्रॉपर्टी कार्डवर नमुद आहे. प्रस्तुतची नोंद ही पूर्णत: बेकायदेशीर व अधिकारबाहय असलेने सदरची नोंद रद्द होणेकरिता सामनेवाला बँकेने नमुद पत संस्थेविरुध्द विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था कोल्हापूर विभाग कोल्हापूर यांचेकडे रिव्हीजन दाखल केलेले आहे. सदर रिव्हीजनमध्ये संस्था हजर झाली असून सदरचे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. सदर बाबीमुळे कायदेशीर बाधा आलेमुळे खरेदीपत्र नोंद करता येत नाही. सदर रिव्हीजनचा निकाल लागलेनंतरच नोंद खरेदीपत्र करुन देणेस सामनेवाला हे तयार आहेत. याची तक्रारदारांना जाणीव असूनही प्रस्तुतची तक्रार दाखल केलेली आहे. यामध्ये सामनेवाला यांची कोणतीही सेवात्रुटी नाही. सामनेवाला बॅकेने सदर मिळकतीचा कब्जा तक्रारदारास दिलेला आहे. त्याबाबतची कब्जेपट्टीदेखील दिलेली आहे. सबब सामनेवाला बँकेने मुद्दाम खरेदीपत्र करुन दिले नसलेबाबतचे कथन पूर्णत: चुकीचे व खोटे आहे. सबब तक्रार अर्जातील कलम 2 ते 11 मधील विधानांचा सामनेवाला स्पष्ट इन्कार करतात. तक्रारदाराने केलेल्या मानसिक त्रासापोटीच्या रक्कमेची मागणी चुकीची आहे. सामनेवाला बँकेने तक्रारदाराची फसवणूक केलेली नाही. वादातील फ्लॅट खरेदी करणेसाठी तक्रारदाराने भरलेले रक्कम रु.4,00,000/- 24 टक्के व्याजाने देणेचा प्रश्न उदभवत नाही. सबब तक्रारदाराची कोणतीही विनंती मान्य करता येणार नाही. तक्रार अर्ज कलम 11 मधील नमुद केलेले कारण पूर्णत: खोटे व चुकीचे आहे. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह नामंजूर करावी अशी विनंती सामनेवालांनी सदर मंचास केली आहे. (5) सामनेवाला बँकेने आपले म्हणणेच्या पुष्टयर्थ नमुद मिळकतीचा उतारा दाखल केलेला आहे. (6) तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, सामनेवाला क्र.2 यांचे लेखी म्हणणे व दाखल कागदपत्रे तसेच सामनेवाला क्र.2 यांचे वकीलांचा युक्तीवाद इत्यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी येतात. 1. सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे काय? --- होय. 2. काय आदेश ? --- शेवटी दिलेप्रमाणे मुद्दा क्र.1 व 2:- नमुद सामनेवाला बँकेने त्यांचे थकीत कर्जदार श्री महेंद्रकुमार हरीलाल शहा यांचेकडील थकीत कर्ज वसुलीपोटी असणारी मिळकत सि.स.नं.632/1अ शाहूपुरी 2 री गल्ली, येथे बांधलेल्या साफल्य अपार्टमेंट या निवासी इमारतीमधील दुस-या मजल्यावरील फ्लॅट क्र.8 क्षेत्र 90.40 चौ.मि. SARFAESI ACT अंतर्गत सदर मिळकत जप्त व सील करुन ताब्यात घेतली होती व त्याप्रमाणे दै.सकाळमध्ये दि.18/04/2008 रोजी सदर मिळकतीच्या लिलावाची जाहीर नोटीस प्रसिध्द केली होती. त्यास अनुसरुन तक्रारदाराने दि.17/05/2008 रोजी सामनेवाला बॅंकेकडे रक्कम रु.1,10,000/- चा इंडसइंड बँकेचा डी.डी.क्र.3881 दि.17/05/2008 चा जमा केलेला होता. प्रस्तुतची मिळकत तक्रारदाराने लावलेली बोली रक्कम रु.11,90,000/- सामनेवाला बँकेने मंजूर केली. त्यानुसार इएमडी रक्कम रु.1,10,000/- सहीत एकूण रक्कम रु.4,00,000/- भरणा करणेबाबत दि.21/05/2008 रोजी तक्रारदारास पत्र पाठवले. त्याप्रमाणे तक्रारदाराने सदर रक्कमेचा भरणा केला व सदरची बाब सामनेवाला यांनी मान्य केली आहे. तक्रारदाराने दि.26/05/2008 रोजी अड. श्रेणीक बी.पाटील यांचेमार्फत प्रस्तुतची मिळकत ब सत्ता प्रकरात येत असलेने विक्री वयवहाराबाबतचे नोंद खरेदीखत करता येईल का याबाबतची शंका उपस्थित केली. त्याबाबत दि.09/06/2008 रोजी तक्रारदारास पाठविलेल्या पत्रात सामनेवालांनी तहसिलदार करवीर यांचेकडून ना हरकत प्रमाणपत्र घेणेचे नमुद केलेले आहे ही वस्तुस्थिती निर्विवाद आहे. तक्रारदाराने आपल्या तक्रारीत प्रस्तुत मिळकतीबाबत कोल्हापूर महानगरपालीका, महाराष्ट्र राज्य विज वितरण व इतर रक्कमांची बाकी असलेचे नमुद केले आहे. तसेच प्रस्तुत मिळकतीचे कर्जदार मालक शहा यांनी मे.नामदार अपील प्राधिकारी डेब्ट रिकव्हरी अपील ट्रायब्युनल मुंबई यांचेकडे अपील क्र.285/2008 दाखल केले असून नामदार कोर्टाने लिलाव प्रक्रियेस स्थगीती दिलेचे सामनेवालांनी सदर प्रत्रात नमुद केलेचे कथन केले आहे. सदर पत्राचे अवलोकन केले असता सदर विक्री व्यवहार झालेनंतरचे दरम्यान शहा यांनी दाखल केलेल्या नमुद अपील प्रकरणी DRAT मुंबई यांचा 8 आठवडयांचा टेस्थेस्को असलेचा हुकूम केला आहे असे नमुद केले आहे. तक्रारदार व सामनेवाला यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे साकल्याने अवलोकन केले असता प्रस्तुतच्या व्यवहारापोटी तक्रारदाराने दि.17/05/2008 रोजी रक्कम रु.1,10,000/- चा डीडी भरलेला आहे व दि.21/05/2008चे सामनेवालांचे पत्रानुसार सदर रक्कमेसहीत रक्क्म रु.4,00,000/- भरणा केलेचे सामनेवालांनी मान्य केलेले आहे. तसेच उर्वरित रक्कम रु.7,90,000/- 15 दिवसांत भरणा केलेनंतर मिळकतीचा ताबा व नोंद खत करुन देणेबाबतची नोंद केलेली आहे. तक्रारदाराने आपल्या रिजॉइन्डरमध्ये संपूर्ण रक्कम रु.11,90,000/- अदा केली असून अलिकडे सन 2009 मध्ये सामनेवालांनी जवळजवळ प्रस्तुतची तक्रार दाखल झालेनंतर वर्षभराने कब्जा दिलेचे तक्रारदाराने मान्य केलेले आहे.् प्रस्तुत सामनेवाला यांनी दाखल केलेल्या सदर मिळकतीच्या मालमत्ता पत्रक उता-याचे अवलोकन केले असता दि.24/12/2008 रोजी प्रस्तुत मालमत्ता पत्रकावर खालीलप्रमाणे जप्ती आदेश नोंद केलेला आहे.- ‘’जप्ती आदेश-वि.व.अधिकारी पद्मावती महिला नागरी सह.पत संस्था को.यांचे कडील दि.28/11/2008 चा जप्ती आदेश उपनिबंधक सहकारी संस्था करवीर यांचेकडील दि.21/11/2007 चा वसुली दाखला यानुसार रक्कम रु.5846731/-चे वसुली साठी महेंद्रकुमार हरिलाल शहा यांचे हिस्सेची मिळकत हस्तांतरण, भार,बोजा निर्माण करणेस मनाई करणेत येत आहे.’’ वरील जप्ती आदेशाचा विचार करता सदरचा व्यवहार हा मे-2008 रोजी केलेला आहे. तर प्रस्तुत जप्ती आदेश हा दि.28/11/2008 चा असून सदर जप्ती आदेशाची नोंद दि.24/12/2008 रोजी सदर मालमत्ता पत्रकावर झालेली आहे. नमुद जप्ती आदेश होणेपूर्वीच सामनेवाला बँकेने SARFAESI ACT अंतर्गत नमुद कर्जदाराची मालमत्ता जप्त केलेली होती व त्याप्रमाणे दि.18/04/2008 चे दै.सकाळमध्ये सदर मिळकतीच्या लिलावाची जाहीर नोटीसही प्रसिध्द केलेली होती. मात्र सामनेवाला बँकेने प्रस्तुत मिळकत जप्त केलेनंतर जप्ती आदेश मालमत्ता पत्रकी नोंद करणे गरजेचे असतानाही सदर मिळकत जप्त केलेबाबत नमुद मिळकतीच्या मालमत्ता पत्रकी नोंद न करुन सेवेत गंभीर त्रुटी ठेवली आहे असे या मंचाचे स्पष्ट मत आहे. त्याचवेळी जर सामनेवाला बॅंकेच्या जप्ती आदेशाची नोंद झाली असती तर कदाचित सदरची तक्रार उदभवली नसती. यामुळे तक्रारदाराने आपल्या रिजॉइन्डरमध्ये शपथेवर सदर मिळकतीपोटी संपूर्ण रक्कम रु.11,90,000/- अदा करुनही प्रस्तुत मिळकतीचे नोंद खरेदी खत सामनेवाला बॅकेने करुन दिलेले नाही. तसेच प्रस्तुत मिळकतीचा कब्जाही मे.मंचासमोर तक्रार दाखल केलेनंतर जवळजवळ एक वर्षाने म्हणजे सन2009 मध्ये दिलेला आहे हीसुध्दा सामनेवाला यांचे सेवेतील गंभीर त्रुटी आहे. प्रस्तुत कर्जदार मालक शहा यांनी मे.नामदार अपील प्राधिकारी डेब्ट रिकव्हरी अपील ट्रायब्युनल मुंबई यांचेकडे अपील क्र.285/2008 दाखल केले असून नामदार कोर्टाने लिलाव प्रक्रियेस स्थगीती दिलेचे सामनेवालांनी सदर प्रत्रात नमुद केलेचे कथन केले आहे. सदर पत्राचे अवलोकन केले असता सदर विक्री व्यवहार झालेनंतरचे दरम्यान शहा यांनी दाखल केलेल्या नमुद अपील प्रकरणी DRAT मुंबई यांचा 8 आठवडयांचा टेस्थेस्को असलेचा हुकूम केला आहे असे नमुद केले आहे. तसेच नमुद पद्मावती महिला ना.सह.पत संस्थेच्या जप्ती आदेशाविरुध्द विभागीय सह.निबंधक सहकारी संस्था कोल्हापूर विभाग, कोल्हापूर यांचेकडे रिव्हीजन दाखल केलेली आहे. प्रस्तुत प्रकरणी निकाल झालेनंतर तसेच ब सत्ता प्रकारासाठी तहसिलदार करवीर यांचे ना हरकत प्रमाणपत्र घेऊन नमुद मिळकतीचे तक्रारदारास नोंद खरेदीखत करुन देणेबाबत तयारी दर्शविलेली आहे. याचा विचार करता जरी सामनेवाला बँकेने अशी तयारी दर्शवली असली तरी प्रस्तुत मिळकत जप्त करुनही जप्ती आदेश मालमत्ता पत्रकी नोंद करणेबाबत कार्यवाही न करणे तसेच प्रस्तुत व्यवहारापोटी रक्कम रु.11,90,00/- इतकी रक्कम स्विकारुनही मिळकतीचा कब्जा देणेस विलंब करणे नोंद खरेदी खत न करणे या सामनेवालांच्या सेवेतील गंभीर त्रुटी आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सामनेवाला यांचे सेवात्रुटीमुळे तक्रारदारास प्रस्तुतची तक्रार दाखल करावी लागलेमुळे तसेच प्रस्तुत मिळकतीचे नोंद खरेदीखत कधी होईल याबाबतच्या कालावधीची अनिश्चितता असलेने तक्रारदार हा झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते. 2) सामनेवाला यांनी तक्रारदारास सि.स.नं.632/1अ शाहूपुरी 2 री गल्ली, येथे बांधलेल्या साफल्य अपार्टमेंट या निवासी इमारतीमधील दुस-या मजल्यावरील फ्लॅट क्र.8 क्षेत्र 90.40 चौ.मि.चे नोंद खरेदीखत करुन दयावे. अथवा प्रस्तुत मिळकतीचे नोंद खरेदीखत करुन देणे अशक्य असलेस तक्रारदाराने भरणा केलेली रक्कम अदा करावी व सदर रक्कमेवर भरणा केले तारखेपासून ते संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याज अदा करावे. 3) सामनेवाला तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रु.5,000/-(रु.पाच हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) अदा करावेत.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |