सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर
उपस्थिती - मा.सौ.सविता भोसले,अध्यक्षा
मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्य
मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्या.
तक्रार अर्ज क्र. 175/2013
तक्रार दाखल दि.11-11-2013.
तक्रार निकाली दि.07-09-2015.
श्री. प्रकाश यदु इथापे,
रा. मु.पो.देगांव,ता.वाई,जि.सातारा
सध्या रा.प्लॉट नं.7 ब, रि.स.नं.72,
करिष्मा गार्डन,सैदापूर,पो.कोंडवे,
ता.जि.सातारा. .... तक्रारदार.
विरुध्द
करिश्मा काप्स्ट्रोबेल प्रा.लि. तर्फे
डायरेक्टर शकिल अब्दुल सय्यद,
रा.माय लव्ह 474, गणेश कॉलनी,
सदर बझार, सातारा. .... जाबदार.
तक्रारदारातर्फे –अँड.ए.एच.जाधव.
जाबदारातर्फे – अँड.एम.एच.ओक.
न्यायनिर्णय
(सदर न्यायनिर्णय मा.सौ.सविता भोसले, अध्यक्षा यानी पारित केला)
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 नुसार दाखल केला आहे. तक्रारअर्जातील थोडक्यात मजकूर पुढीलप्रमाणे-
तक्रारदार हे देगाव,ता.वाई,जि.सातारा येथील कायमस्वरुपी रहिवाशी असून सध्या सैदापूर, जि.सातारा येथे राहणेस आहेत. जाबदार हे करिश्मा कॉन्स्ट्रॅवेल प्रा.लि. या नावाने बांधकाम व्यवसाय करतात. जाबदार हे सैदापूर परिसरात करिष्मा कॉस्ट्रवेल नावाने डयुप्लेक्स स्कीम उभारत असलेचे तक्रारदार यांना समजलेवर तक्रारदाराने प्रस्तुत जाबदार यांनी बांधलेल्या स्किमची माहिती घेतली व जाबदार बरोबर चर्चा करुन जाबदारमार्फत बांधलेल्या ‘करिश्मा गार्डन’, सि.स.नं. 72 मधील प्लॉट नं. ‘7 ब’ खरेदी करण्याचे ठरविले. सदर प्लॉट नं. 7 ब चे एकूण क्षेत्र 298.54 चौ. मी. असून त्यामधील 149.57 चौ.मी. क्षेत्रावर बांधण्यात येणारे 110.36 चौ.मी. क्षेत्राचे बांधकाम (बिल्टअप) म्हणजेच तळमजला व जीना + गार्डन क्षेत्र 72.46 चौ.मी. असे क्षेत्र रक्कम रु. 29,00,000/- (रुपये एकोणतीस लाख मात्र) यास विक्री करणेचे जाबदाराने ठरविले. त्याप्रमाणे दि. 15/2/2011 रोजी तक्रारदाराने जाबदार यांचे बरोबर रजिस्टर करारनामा केला. सदर करारनामा करताना तक्रारदाराने जाबदार यांना रक्कम रु.6,00,000/- (रुपये सहा लाख मात्र) अदा केले होते. असे असताना जाबदाराने तक्रारदार यांना दि.15/2/2011 चे करारनाम्याव्यतिरिक्त तक्रारदार यांना वाढीव क्षेत्र देणार असल्याचे खोटे अमिष दाखवून तसेच दि. 15/2/2011 चे करारनाम्यात चूकीचे क्षेत्र नमूद केले आहे ते दुरुस्त करुन घ्यावे लागेल असे तक्रारदार यांना सांगितले व तक्रारदार कडून चूक दुरुस्ती लेख करुन घेवून खर्चास भाग पाडले होते. वास्तवीक तसे कोणतेही वाढीव क्षेत्र नव्हते व नाही. परंतू जाबदाराने तक्रारदार यांना विनाकरण खर्चात पाडलेले आहे. तसेच जाबदाराने दरम्यानच्या काळात वेळोवेळी बांधकामाची रक्कम तक्रारदारकडून उचलली आहे. असे असतानाही जाबदाराने तक्रारदार यांना जाणूनबजून खरेदीपत्र लवकर करुन दिलेले नव्हते. प्रस्तुत तक्रारदार यांना जाबदाराने करारात ठरलेप्रमाणे इमारत बांधून दिली नाही. तर त्यामध्ये अनेक त्रुटी ठेवल्या आहेत. तसेच जाबदाराने जबाबदारीने सदरचे बांधकाम केलेले नाही. उभयतांमध्ये ठरले रकमेपेक्षा वाढीव रक्कम तक्रारदारास देऊनही जाबदाराने बांधकाम पूर्ण केले नाही. तक्रारदाराने सर्व रक्कम अदा केली आहे असे असतानाही तक्रारदाराचे इमारतीत जाबदार यांनी खालील नमूद केलेले काम अपूर्ण व त्रुटीयुक्त केले आहे.
1. पाण्यासाठी आ.सी.सी. टँकऐवजी सिंटेक्सची टाकी बसविण्यात आली आहे.
2. सेप्टीक टँक बसविला नाही.
3. स्पेसिफिकेशनप्रमाणे बाहेरुन सिमेंट पेंटचे काम केलेले नाही
4. इलेवेशन प्रमाणे जिन्याच्या खिडक्या बसविलेल्या नाहीत.
5. खरेदी दरवाजे व खिडक्यांचे ग्रील यांना पेंट दिलेला नाही.
वर नमूद कामे, करारपत्रात नमूद केलेप्रमाणे पूर्ण करुन देणे जाबदारांवर बंधनकारक असतानाही जाबदार यांनी वरीलप्रमाणे कामे अपूर्ण ठेवली व केले कामामध्ये कमतरता/त्रुटी ठेवल्या आहेत. तसेच जाबदाराने तक्रारदारावर यांचेसाठी स्वतंत्र असलेला सेप्टीक टँक तक्रारदाराचे पूर्व संमत्तीशिवाय परस्पर सदर इमारतीलगत दुस-या असणा-या इमारतीस जोडलेले आहे. अशाप्रकारे तक्रारदार यांना जाबदाराने अपूरी कामे ठेवून किंवा कामात त्रुटी राखून तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे. प्रस्तुत बांधकाम वेळेवर पूर्ण करुन न दिलेने जाबदाराने तक्रारदाराची घोर फसवणूक केली आहे. तसेच ठरले रकमेपेक्षा जाबदाराने रक्कम रु.4,50,000/- तक्रारदारकडून जादा वसूल केले आहेत. अशाप्रकारे जाबदार यांनी तक्रारदाराची फसवणूक केली आहे. त्यामुळे तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज मे. मंचात दाखल केला आहे.
2. तक्रारदाराने, प्रस्तुत कामी जाबदाराने सेवेत त्रुटी केलेले अपूर्ण ठेवले बांधकामाबाबत रक्कम रु.3,00,000/- (रुपये तीन लाख मात्र) जाबदार यांचेकडून वसूल होवून मिळावेत, जाबदाराचे विक्षीप्त वागण्याने तक्रारदाराला झाले मानसीक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.20,000/- जाबदारकडून वसूल होऊन मिळावेत, तक्रार अर्जाचा खर्च रक्कम रु.5,000/- जाबदाराकडून मिळावी अशी विनंती केली आहे.
3. तक्रारदाराने प्रस्तुत कामी नि. 2 कडे अँफीडेव्हीट, नि.5 चे कागदयादीसोबत नि.5/1 ते 5/4 कडे अनुक्रमे मौजे सैदापूर ता.जि.सातारा येथील गट नं. 72 मधील प्लॉट नं. 7 चा 7/12 उतारा, तक्रारदाराने जाबदार यांना दि.10/12/2013 रोजी पाठवलेली नोटीस, जाबदार यांना नोटीस मिळालेची पोहोच पावती, तक्रारदार व जाबदार यांचेत झालेले खूष खरेदीपत्र, नि. 13 चे कागदयादीसोबत नि. 13/1 ते नि.13/4 कडे अनुक्रमे तक्रारदार व जाबदार यांचे दरम्यान दि. 15/2/2011 रोजी झालेला करारनामा, तक्रारदार व जाबदार यांचेत दि.15/7/2011 रोजी झालेली चूक दुरुस्ती लेख, तक्रारदाराने नितीन शिंदे, इंजिनिअर व कॉन्ट्रॅक्टर यांचेकडून मिळकतीबाबत घेतलेला रिपोर्ट, तक्रारदार व जाबदार यांचेत झालेले खरेदीपत्र, नि.15 कडे पुराव्याचे शपथपत्र, नि.16 चे कागदयादीसोबत नि.16/1 ते नि.16/7 कडे अनुक्रमे तक्रारदाराचे वादादीत मिळकतीचे फोटोग्राफ्स, दि.16/8 कडे संजीव डिजीटल फोटो स्टुडीओ यांनी काढले फोटोची पावती, नि. 19 कडे सर्व्हेअर नितीन शिंदे यांचे पुराव्याचे शपथपत्र, नि. 20 कडे पुरावा संपलेची पुरसिस, नि.25 चे कागदयादीसोबत फौ.केस नं.1122/14 मधील नि.1 व त्यावरील आदेशाची सर्टीफाईड प्रत, नि. 27 कडे तक्रारदाराचा लेखी युक्तीवाद वगैरे कागदपत्रे तक्रारदार यांनी याकामी दाखल केली आहेत.
3. प्रस्तुत कामी जाबदाराने नि.11 कडे म्हणणे/कैफीयत, नि. 12 कडे म्हणण्याचे अँफीडेव्हीट, नि.23 कडे म्हणणेसोबत दिलेले म्हणण्याचे अँफीडेव्हीट हाच पुरावा समजणेत यावा म्हणून दिलेली पुरसिस, वगैरे कागदपत्रे जाबदाराने याकामी दाखल केली आहेत. जाबदाराने त्यांचे म्हणण्यामध्ये, तक्रारदाराचे तक्रार अर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत. त्यांनी पुढीलप्रमाणे आक्षेप नोंदवलेले आहेत. तक्रारदाराचा तक्रार अर्ज व त्यातील मजकूर मान्य व कबूल नाही. तक्रारदार यांनी जाबदाराकडून वादातीत प्लॉट वरील म्हणजेच स.न. 72 मधील प्लॉट नं.’7 ब’ यावर बांधलेला डुप्लेक्स खरेदी केला आहे हा मजकूर बरोबर आहे. परंतू सदरचा डुप्लेक्स रक्कम रु.29,00,000/- (रुपये एकोणतीस लाख मात्र) या किंमतीस विक्री करणेचे ठरले होते हे म्हणणे चूकीचे आहे. याची किंमत रु.35,00,000/- (रुपये पस्तीस लाख मात्र) ठरलेली होती. तक्रारदार ही व्यक्ती अडाणी नसून तो मिलीटरीमधून सेवानिवृत्त झालेला माणूस आहे. जाबदाराने तक्रारदार यांना रक्कम रु.33,50,000/- (रुपये तेहतीस लाख पन्नास हजार मात्र) मिळालेबाबत रितसर पावत्या दिल्या आहेत व उर्वरीत रक्कम रु.1,50,000/- (रुपये एक लाख पन्नास हजार मात्र) चा धनादेश न वटल्याने तक्रारदार विरुध्द फौजदारी केस मे. फौजदारी कोर्टात दाखल केली होती. ती प्रलंबीत आहे. सदर रकमेचा वाद जाबदाराने या तक्रार अर्जापूर्वीच उपस्थित केला आहे मात्र ही बाब तक्रारदाराने मंचापासून लपवून ठेवली आहे. जाबदाराने तक्रारदारास चूक दुरुस्ती लेख करण्यास भाग पाडले हा मजकूर खोटा व चूकीचा आहे. पाण्यासाठी आर.सी.सी. टँक बांधणेची जाबदाराची तयारी होती. परंतू इमारत जूनी झालेवर आर.सी.सी. पाण्याची टाकी कदाचित गळते म्हणून व भविष्यात जादा बांधकाम करावयाचे आहे त्यावेळी आर.सी.सी. टँक तोडावा लागेल म्हणून सिंटेक्स टाकी बसवा असे तक्रारदारानेच जाबदाराला सांगीतले होते व आहे. त्यामुळेच सिंटेक्स टाकी बसवून दिली आहे. प्रस्तुत प्रश्न तक्रारदाराने सिंटेक्स टाकी बसविताना व तदनंतर केव्हाही नोटीस पाठवेपर्यंत उपस्थित केलेला नव्हता. प्रस्तुत सिंटेक्स टाकीचा उपभोग तक्रारदाराने घेतला आहे व घेत आहेत. इलेवेशनप्रमाणे जिन्याच्या खिडक्या बसविलेल्या नाहीत हे खोटे आहे. प्रस्तुत खिडक्या तक्रारदाराने केले सूचनेप्रमाणेच बसविल्या आहेत. सदर खिडक्या बसवताना कधीही तक्रारदाराने ही तक्रार केली नाही. खरेदीपत्रामध्ये तक्रारदाराने कलम 8 व 9 मध्ये बांधकाम दर्जाबाबत तक्रारदार समाधानकारक आहेत असे म्हटलेले आहे. सेप्टीक टँक बसवलेला नाही हा मजकूर खोटा आहे. फक्त करारातील स्पेसीफिकेशननुसार सिमेंट पेंटचे काम केलेले नाही. तसेच सेप्टी दरवाजे व खिडक्यांचे ग्रील याला रंग/पेंट दिलेला नाही. एवढाच मजकूर खरा व बरोबर आहे. सदरचे खिडक्यांचे ग्रील, व सेप्टी दरवाजे तसेच सिमेंट पेंटचे काम जाबदार आजही करुन देणेस तयार आहेत. तथापी तक्रारदाराकडून जाबदार यांना मोबदलेपोटी रक्कम रु.1,50,000/- अद्याप येणे बाकी असल्याने सदर कामे जाबदार यांनी मागे ठेवली आहेत. तक्रारदार कथन करतात त्याप्रमाणे व्यवहार जर रक्कम रु.29,00,000/- (रुपये एकोणतीस लाख मात्र) चा असता तर तक्रारदाराने जाबदार यांना रक्कम रु.33,50,000/- (रुपये तेहतीस लाख पंचावन्न हजार मात्र) अदा केलेच नसते व जाबदार यांनी त्यांचे मनात खोट असती तर तक्रारदाराला रक्कम रु.33,50,000/- च्या रितसर पावत्या दिल्याच नसत्या व त्याचाच दुरुपयोग करुन तक्रारदाराने मे. दिवाणी कोर्टात दिवाणी दावादेखील जाबदार विरुध्द दाखल केला आहे. तक्रारदार हे अडाणी नाहीत सैन्यातून रिटायर्ड झालेले आहेत. असा कोणताही माणूस ठरले किंमतीपैकी साडेचारलाख रुपये जादा देणार नाही. यावरुन तक्रारदाराने जाणीवपूर्वक प्रस्तुत तक्रार अर्ज मे. मंचात दाखल केलेचे लक्षात येते. जाबदाराचे देय असलेली रक्कम रु.1,50,000/- बुडविणेचे हेतूने सदरचा तक्रार अर्ज विनाकारण केला आहे. तक्रारदारांचे तक्रार अर्जातील मागणी मान्य करणेस व ती मागणेस तक्रारदार पात्र नाहीत. सबब तक्रारदाराचा तक्रार अर्ज खर्चासह फेटाळणेत यावा. तक्रारदारानेच जाबदाराविरुध्द खोटा दावा केलेने रक्कम रु.10,000/- जाबदार यांना अदा करावेत असे म्हणणे जाबदाराने दाखल केले आहे.
5. प्रस्तुत कामी वर नमूद तक्रारदार व जाबदार यांनी दाखल केले सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने प्रस्तुत तक्रार अर्जाच्या निराकरणार्थ मे. मंचाने पुढील मुद्दयांचा विचार केला.
अ.क्र. मुद्दा उत्तर
1. तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक आहेत काय? होय.
2. जाबदार यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा
पुरवली आहे काय? होय.
3. तक्रारदार त्याचे मागणीप्रमाणे जाबदार यांचेकडून
अपूर्ण कामाबाबत रक्कम क्लेम मिळणेस पात्र आहेत काय? अंशतःहोय.
4. अंतिम आदेश काय? खाली नमूद
आदेशाप्रमाणे.
विवेचन-
6. वर नमूद मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत. कारण-तक्रारदार यांनी जाबदाराने सैदापूर कोंडवे, जि. सातारा येथील स.नं.72 मधील प्लॉट नं. 7 ब यामधील डुप्लेक्स खरेदी केले. सदर बाबतीत खरेदी करारपत्र दि.15/2/2011 रोजी जाबदारांबरोबर झाले. खरेदी करारपत्रावेळी तक्रारदाराने जाबदार यांना रक्कम रु.6,00,000/- (रुपये सहा लाख मात्र) रोख अदा केले. तसेच एकूण रक्कम रुपये 33,50,000/- (रुपये तेहतीस लाख पन्नास हजार फक्त) जाबदाराला खरेदीपत्रापर्यंत वेळोवेळी अदा केली आहे. ही बाब जाबदाराने मान्य केली आहे. म्हणजेच तक्रारदार व जाबदार हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार होते हे सिध्द होते. सबब आम्ही मुद्दा क्र. 1 चे उत्तर होकारार्थी दिले आहे.
7. वर नमूद मुद्दा क्र. 2 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत. कारण- प्रस्तुत कामी जाबदार यांनी तक्रारदाराला दिले (विक्री केले) डुप्लेक्समध्ये जाबदार यांनी खालील जाबदार यांनी खालील कामे अपूर्ण ठेवली आहेत असे तक्रारदाराने म्हटले आहे.
i पाण्यासाठी आर.सी.सी. टँक ऐवजी सिंटेक्सची टाकी बसवण्यात आली आहे.
ii सेप्टीक टँक बसवला नाही.
iii स्पेसिफिकेशन प्रमाणे बाहेरुन सिमेंट पेंटचे काम केलेले नाही.
Iv इलेवेशन प्रमाणे जिन्याच्या खिडक्या बसविल्या आहेत.
v सेप्टी दरवाजे व खिडक्यांचे ग्रील यांना पेंट दिलेला नाही.
तक्रारदार व जाबदार यांचेत ठरलेप्रमाणे जाबदाराने वर नमूद कामे बिनचूक व जबाबदारीने पूर्ण करणे गरजेचे होते. परंतू जाबदाराने ती पूर्ण केलेली नाहीत. त्यामुळे जाबदाराने तक्रारदार यांना सदोष सेवा पुरविली आहे असे तक्रारदार यांचे मत आहे. परंतू प्रस्तुत वर नमूद कामांपैकी जाबदाराने पाण्यासाठी आर.सी.सी. टँकऐवजी सिंटेक्स टाकी बसविण्यात आली ती तक्रारदाराचे सांगण्यावरुनच बसविणेत आलेचे म्हटले आहे. तसेच सेप्टीक टँकबाबत तक्रारदाराचे म्हणणे जाबदाराने फेटाळलेले आहे. मात्र इमारतीचा बाहेरुन सिमेंट पेन्ट दिला नसलेचे, सेप्टी दरवाजे व खिडक्यांचे ग्रील यांना पेंट दिलेला नाही हे जाबदाराने मान्य केले आहे. परंतु तक्रारदाराचे तक्रार अर्जात नमूद केलेप्रमाणे इलेवेशनप्रमाणे जिन्याच्या खिडक्या बसविल्या नाहीत हे तक्रारदाराचे म्हणणे जाबदाराने फेटाळलेले आहे. कारण जिन्याच्या खिडक्या तक्रारदाराने सांगीतलेप्रमाणेच बसवून दिलेचे जाबदाराने म्हटले आहे. व सदरची कामे करत असताना जर तक्रारदाराला ते पसंत नव्हते तर त्यांनी त्यावेळी सदर कामे करणेस हरकत घ्यायला हवी होती असे या मंचाचे मत आहे. त्याचप्रमाणे तक्रारदाराने ज्या खरेदीकरारपत्राचा आधार घेवून ही तक्रार दाखल केली आहे, त्या करारपत्रामध्ये कोणकोणती कामे जाबदाराने तक्रारदारांना करुन द्यावयाची आहेत ही बाब तक्रारदाराने दाखल केले नि.13/1 कडील करारनामा, नि.13/2 कडील चूकदुरुस्ती लेख, नि. 13/4 कडील खुषखरेदीपत्र याचे अवलोकन केले असता काहीही स्पष्ट होत नाही. त्यामुळे जाबदाराने करारामध्ये नमूद कोणती कामे पूर्ण केली व कोणती कामे अपूर्ण ठेवली हे स्पष्ट व सिध्द होत नाही. तरीही जाबदाराने स्वतः मान्य केलेली अपूर्ण कामे म्हणजे इमारतीला बाहेरुन सिमेंट पेंट देणे, सेफ्टी दरवाजे व खिडक्यांचे ग्रील यांना पेंट देणे ही कामे जाबदार यांनी तक्रारदार यांना करुन दिलेली नाहीत. म्हणून जाबदाराने तक्रारदाराला सदोष सेवा दिलेचे स्पष्ट होते. सबब मुद्दा क्र. 2 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिलेले आहे.
8. वर नमूद मुद्दा क्र. 3 चे उत्तर तक्रारदार हे त्यांचे तक्रार अर्जात मागणी केलेप्रमाणे जाबदाराकडून अपूर्ण कामाबाबत रक्कम मिळणेस पात्र आहे का ? याचे उत्तर आम्ही अंशतः होय असे दिले आहे. कारण- तक्रारदाराने दाखल केले कागदपत्रे, नि.13/1 कडील करारनामा, नि.13/2 कडील चूक दुरुस्तीलेख व नि.13/4 कडील खरेदीपत्र या सर्वांचे काळजीपूर्वक अवलोकन करता, प्रस्तुत तक्रारदार यांना जाबदार यांनी तक्रारदाराने खरेदी केले डुप्लेक्स इमारतीत कोणकोणती कामे करुन देणे जाबदार यांचेवर बंधनकारक होते किंवा जाबदाराने सदर कामे करुन देणेचे करारान्वये मान्य केले होते ही बाब बिलकूल स्पष्ट व सिध्द होत नाही. सबब तक्रारदाराचे म्हणणेप्रमाणे तक्रार अर्जात नमूद केलेली पॅरा क्र. 5 मधील सर्व कामांमध्ये जाबदाराने त्रुटी किंवा कमतरता ठेवली आहे हे सिध्द होत नाही व तक्रारदाराने ते सिध्द केलेले नाही. कारण कोणती कामे जाबदाराने करुन देणेचे कराराने मान्य केले होते हे सिध्द झालेले नाही. त्यामुळे सर्व्हेअरनी केलेल्या नि. 13/3 कडील रिपोर्टमधील जाबदाराने नाकारलेले मुद्दे विचारात घेणे न्यायोचीत होणार नाही. परंतू जाबदाराने इमारतीस बाहेरुन सिमेंट पेंट लावून देणे व सेफ्टी दरवाजे व खिडक्यांचे ग्रील यांना पेंट देणेचे राहीले आहे हे मान्य केले आहे. परंतू, सदर तक्रारदाराने जाबदार यांना रक्कम रु.1,50,000/- अद्याप देणेबाकी असलेचे जाबदाराने म्हटले आहे. तसेच प्रस्तुत जाबदार यांना तक्रारदाराने दिलेला सदर रकमेचा चेक वटला नसलेने जाबदाराने एस.आय.अँक्ट कलम 13 नुसार तक्रारदारविरुध्द मे. फौजदारी केस नं.1122/2014 दाखल केली होती. प्रस्तुत केसमध्ये जाबदार (फिर्यादी) गैरहजर वारंवार राहीलेने सदर केस मे. कोर्टाने डिसमीस केली आहे. त्याची सही शिक्क्याची नक्कल नि.25 चे कागदयादीने तक्रारदाराने दाखल केली आहे. परंतु सदरचा निकाल हा मेरिटवर झालेला नसून फिर्यादी गैरहजर राहीलेने प्रकरण डिसमीस झालेचे सदर निकालावरुन स्पष्ट होते.
याकामी तक्रारदार हे निवृत्त शासकीय कर्मचारी असलेचे तक्रारदाराचे कथन आहे. तक्रारदाराने खरेदी घेतलेली डुप्लेसक्स रक्कम रु.29,00,000/- (रुपये एकोणतीस लाख मात्र) या किंमतीस ठरलेचे कागदपत्रांवरुन दिसून येते. परंतू जाबदाराचे म्हणण्यानुसार प्रस्तुत डुप्लेक्स रक्कम रु.35,00,000/- (रुपये पस्तीस लाख मात्र) या किंमतीस तक्रारदाराने खरेदी करणेचे कबूल केले होते व तक्रारदाराने रक्कम रु.33,50,000/- (रुपये तेहतीस लाख पन्नास हजार मात्र) जाबदाराला अदा केले आहेत व त्याच्या रितसर पावत्या जाबदाराने तक्रारदार यांना दिलेल्या आहेत व उर्वरीत रक्कम रु.1,50,000/- (रुपये एक लाख पन्नास हजार मात्र) चा चेक तक्रारदाराने जाबदाराला खरेदीपत्रावेळी दिलेले होते. म्हणजे रक्कम रु.1,50,000/- अदा करणे राहून गेलेचे स्पष्ट होते. याकामी फौजदारी कोर्टात दाखल केलेली केस फिर्यादी (जाबदार) हे गैरहजर राहीलेने डिसमीस झालेली आहे. त्यामुळे सदर तक्रारदार हे रक्कम रु.1,50,000/- जाबदाराला देणे लागत नाहीत हे सिध्द होत नाही. कारण जाबदाराने तक्रारदाराला जर रक्कम रु.29,00,000/- (रुपये एकोणतीस लाख मात्र) ला डुप्लेक्स विकणेचे मान्य केलेले असते तर तक्रारदाराने रक्कम रु.33,50,000/- (रुपये तेहतीस लाख पन्नास हजार मात्र) अदा केलेच नसते. फक्त रक्कम रु.29,00,000/- अदा केले असते. तक्रारदार हे निवृत्त शासकीय अधिकारी आहेत. त्यामुळे त्यांना जाबदाराने फसवून त्यांचेकडून रक्कम घेतली हे म्हणणे न्यायोचीत होणार नाही. जाबदाराने तक्रारदारांना सदर रकमेच्या पावत्याही दिलेल्या आहेत व जादा क्षेत्रफळासाठी जाबदार यांनी तक्रारदाराला चूकदुरुस्ती लेख करुन दिलेचे स्पष्ट होते. चुक दुरुस्त लेख नि.13/2 कडे दाखल आहे. तक्रारदाराने स्टँम्प डयूटी वाचवणेसाठीच वाढीव क्षेत्रफळासाठी चूक दुरुस्ती लेख जाबदाराकडून केला असावा असे स्पष्ट होते. कारण कोणताही वाढीव क्षेत्रफळ विनामोबदला देणार नाही हा सरळ अर्थ आहे. म्हणजेच खरे तर व्यवहार हा तक्रारदार व जाबदार यांचेदरम्यान रक्कम रु.35,00,000/- (रुपये पस्तीस लाख मात्र) ला ठरला. परंतू तक्रारदाराने स्टँम्प डयूटी जास्त भरणेस लागू नये म्हणून व्यवहार रक्कम रु.29,00,000/- (रुपये एकोणतीस हजार मात्र) चा दाखवला व करारनामा केला व त्यानंतर वाढीव क्षेत्रासाठी जाबदारकडून चूक दुरुस्ती लेख करुन घेतला आहे असे स्पष्ट होते. कारण कोणताही बिल्डर वाढीव क्षेत्र विनामोबदला कुणालाही देणार नाही. तसेच जर तक्रारदाराचा व जाबदार यांचा व्यवहार रक्कम रु.29,00,000/- (रुपये एकोणतीस लाख मात्र) या रकमेस ठरला होता असे गृहीत धरले तरीही तक्रारदार एक निवृत्त शासकीय अधिकारी असूनही त्याने जाबदाराला रक्कम रु.33,50,000/- (तेहतीस लाख पन्नास हजार मात्र) विनाकारणच का अदा केले व ऊर्वरीत रक्कम रु.1,50,000/- (रुपये एक लाख पन्नास हजार मात्र) चा चेक जाबदाराला का अदा केला हा संभ्रम निर्माण होतो. जाबदाराने तक्रारदाराची फसवणूक केली असे म्हटले तर तक्रारदार हा कोणी अडाणी, अशिक्षीत माणूस नाही, तो निवृत्त शासकीय अधिकारी आहे. त्यामुळे जाबदाराने फसवणूक केलेने, रक्कम ठरावापेक्षा जास्त अदा केली असे म्हणणे न्यायोचीत होणार नाही. त्यामुळे जाबदाराने तक्रारदाराची कोणतीही फसवणूक केलेली नाही असे या मे. मंचाचे स्पष्ट मत आहे. फक्त वर नमूद केलेप्रमाणे जाबदाराने इमारतीस बाहेरुन सिमेंट कलर देणे व सेफ्टी दरवाजे व खिडक्यांच्या ग्रीलला पेंट देणे एवढेच काम शिल्लक आहे. मात्र तक्रारदार यांनी जाबदार यांना रक्कम रु.1,50,000/- (रुपये एक लाख पन्नास हजार मात्र) अदा करणे न्यायोचित होणार आहे व प्रस्तुत रक्कम रु.1,50,000/- (रुपये एक लाख पन्नास हजार मात्र) मे मंचाचे आदेशानुसार तक्रारदाराने जाबदाराला अदा केलेनंतर व प्रस्तुत रक्कम जाबदार यांना मिळालेनंतर जाबदार यांनी आठ दिवसात तक्रारदार यांचे घरास बाहेरुन सिमेंट पेंट करुन देणे व सेफ्टी दरवाजे व खिडक्यांचे ग्रील यांना पेंट करुन देणे न्यायोचीत होणार आहे असे या मे. मंचाचे स्पष्ट मत आहे.
9. सबब याकामी आम्ही खालीलप्रमाणे अंतीम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1. तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
2. प्रस्तुत कामी जाबदार यांनी तक्रारदार यांचे डुप्लेक्स इमारतीचे बाहेरील बाजूस
सिमेंट पेंट दिलेला नाही. तसेच सेफ्टी दरवाजे व खिडक्यांचे ग्रील यांना पेंट
दिलेला नसलेने सदरची दोन्ही कामे जाबदार यांनी तक्रारदार यांना करुन देणेस
जबाबदार धरणेत येते.
3. तक्रारदार यांनी जाबदार यांना देणे असलेली रक्कम रु.1,50,000/- (रुपये एक
लाख पन्नास हजार मात्र) जाबदार यांना अदा करावी.
4. वर नमूद केलेप्रमाणे तक्रारदाराने रक्कम रु.1,50,000/- (रुपये एक लाख
पन्नास हजार मात्र) जाबदारांना अदा केलेनंतर आठ दिवसांचे आत जाबदाराने
तक्रारदाराचे डुप्लेक्स इमारतीतील बाहेरुन सिमेंट पेंट द्यावा व सेफ्टी दरवाजे
व खिडक्यांच्या ग्रील यांना पेंट द्यावा.
5. जाबदार यांनी तक्रारदार यांना मानसिकत्रास व अर्जाचा खर्च म्हणून रक्कम
रु.15,000/- (रुपये पंधरा हजार मात्र) अदा करावेत.
6. वरील आदेशाचे पूर्तता तक्रारदार व जाबदार यांनी त्यांना वर नमूद केले
मुदतीत करणेची आहे.
7. विहीत मुदतीत आदेशाचे पालन न केल्यास तक्रारदार यांना ग्राहक संरक्षण
कायदा कलम 25 व 27 नुसार जाबदारांविरुध्द कारवाई करणेची मुभा राहील.
8. सदर न्यायनिर्णयाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य पाठवणेत याव्यात.
9. सदर न्यायनिर्णय खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
ठिकाण- सातारा.
दि. 07-09-2015.
(सौ.सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ.सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.