तक्रारदार :- स्वत:
जाबदेणार क्र. 1 व 2 :- एकतर्फा
****************************************************************
// निकालपत्र //
पारीत दिनांकः- 31/12/2013
(द्वारा – एस्.के. पाचरणे, सदस्य)
तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार जाबदेणारांकडून खरेदी केलेला मोबाईल बदलून मिळण्यासाठी ग्राहक संरक्षण कायदा – 1986 च्या कलम 12 अन्वये दाखल केली आहे. तक्रारदारांची संक्षिप्त तक्रार पुढीलप्रमाणे आहे.
2. तक्रारदार श्री. अमोल अमृत बाबर रा. भोसरी, पुणे यांनी जाबदेणार कडून दि. 30/7/2013 रोजी कार्बन टायटॅनियम (Karbonn Titanium) एस-5 हा मोबाईल रु.10,700/- ला ऑन-लाईन खरेदी केला. जाबदेणार क्र. 1 हे कार्बन मोबाईलचे उत्पादक आहेत. जाबदेणार क्र. 2 हे प्रस्तुतच्या मोबाईल उत्पादक कंपनीचे अधिकृत सर्व्हीस स्टेशन आहे. मोबाईल खरेदीचे दि. 30/7/2013 रोजीचे टॅक्स ईनव्हॉईस तक्रार अर्जासोबत सादर केले आहे. टॅक्स ईनव्हॉईसमध्ये कार्बन टायटॅनियम एस-5 (व्हाईट) मोबाईलची एकूण किंमत रु.10,740/- नमुद केली आहे. मोबाईल प्राप्त झाल्यापासूनच त्याच्या स्क्रीन मध्ये काहीतरी प्रॉब्लेम असल्याचे जाणवत होते. त्यामुळे तक्रारदारांनी ऑगस्ट - 2013 च्या पहिल्या आठवडयात जाबदेणार क्र. 2 यांच्याशी संपर्क साधला. जाबदेणार क्र. 2 यांनी मोबाईलचे फॉरमॅटींग करुन दिले आणि मोबाईल व्यवस्थित काम करतोय असे सांगितले. परंतु त्यानंतरही स्क्रीन प्रॉब्लेम कमी झाला नाही. तक्रदारांनी पुन्हा ऑगस्ट – 2013 च्या दुस-या आठवडयात जाबदेणार क्र. 2 यांचेशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी मोबाईलचा टच पॅड (Touch Pad) फॉल्टी असल्याचे सांगून जाबदेणार क्र. 1 कडे नवीन टच पॅडसाठी मागणी नोंदविली. परंतु जाबदेणार क्र. 1 कडून नवीन टचपॅड उपलब्ध झाला नाही आणि सदोष मोबाईल बदलून दिला नाही. जाबदेणार यांचेशी ई-मेल द्वारे वारंवार संपर्क साधूनही त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. ही जाबदेणारांची त्यांच्या सेवेतील त्रुटी आहे, म्हणून तक्रारदारांनी प्रस्तुतचा तक्रार अर्ज दाखल केलेला आहे.
3. जाबदेणार क्र. 1 व 2 यांना मंचाने पाठविलेली नोटीस प्राप्त होऊनही ते मंचासमोर हजर झाले नाही. करिता मंचाने जाबदेणार क्र. 1 व 2 यांच्याविरुध्द एकतर्फा सुनावणीचे आदेश दि. 10/12/2013 रोजी पारीत केले.
4. तक्रारदारांनी तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ शपथपत्र, कागदपत्रे सादर केली. तक्रारदारांनी स्वत: तोंडी युक्तिवाद केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, जाबदेणारांकडून खरेदी केलेला मोबाईल सदोष असल्याचे निदर्शनास आल्यानंतर अधिकृत सर्व्हिस सेंटर मार्फत दुरुस्त करण्याचे प्रयत्न करण्यात आले. तरीसुध्दा मोबाईल दुरुस्त झाला नाही. तसेच जाबदेणारांनी नादुरुस्त मोबाईल बदलून दिला नाही. अशाप्रकारे जाबदेणारांनी तक्रारदारांना त्रुटीयुक्त सेवा प्रदान केलेली आहे. तक्रारदारांनी सादर केलेल्या दि. 14/10/2013 रोजीच्या “ सर्व्हिस जॉब शिट “ नुसार त्यांच्या मोबाईलमध्ये टच-पॅनेल फॉल्टी असल्याचे जाबदेणार क्र. 2 यांनी नमुद केले आहे. त्याचप्रमाणे जाबदेणार क्र. 2 यांनी दिलेल्या दि. 16/11/2013 रोजीच्या सर्व्हिस रिसीटमध्ये डिसप्ले ईश्यू (Display Issue) चा उल्लेख केलेला आहे. यावरुन तक्रारदारांच्या मोबाईलमध्ये दोष असल्याचे स्पष्ट होते. तक्रारदार, जाबदेणारांकडून प्रस्तुतचा मोबाईल बदलून मिळण्याची आणि शारीरिक, मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई मिळण्याची मागणी करतात.
5. प्रस्तुतच्या प्रकरणातील मंचासमोर सादर झालेली कागदपत्रे, शपथपत्र आणि तक्रारदाराचा युक्तिवाद मंचाने विचारात घेतला. तक्रार अर्जात उल्लेख केल्याप्रमाणे तक्रारदारांनी खरेदी केलेल्या मोबाईलमध्ये बिघाड असल्याचे खरेदी दिनांकापासून पहिल्याच आठवडयात निदर्शनास आले. त्यानंतर तक्रारदारांनी जाबदेणारांच्या अधिकृत सर्व्हीस सेंटरशी वारंवार संपर्क साधून दुरुस्ती करण्याबाबत कळविले. परंतु जाबदेणारांनी योग्य प्रतिसाद दिला नाही. तक्रारदारांनी जाबदेणार यांचेशी ई-मेल द्वारे संपर्क साधून मोबाईल मध्ये आवश्यक दुरुस्ती करणे अथवा दुरुस्ती शक्य नसल्यास मोबाईल बदलून देणेबाबत मागणी केलेली आहे. जाबदेणारांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी उपलब्ध असूनही, त्यांनी आपले म्हणणे सादर केलेले नाही. जाबदेणारांनी कोणताही प्रतिसाद न देऊन तक्रारदारांना त्रुटीयुक्त सेवा प्रदान केलेली आहे. तसेच अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला असल्याचे सिध्द होते. जाबदेणारांनी, तक्रारदारांना प्रस्तुतचा मोबाईल बदलून त्याच मेक व मॉडेलचा नवीन मोबाईल द्यावा आणि तक्रारदारांना झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल नुकसानभरपाई म्हणून रु.2,000/- द्यावे असे मंचाचे मत आहे.
6. वरील विवेचनावरुन व कागदपत्रांवरुन मंच पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
// आदेश //
1. तक्रार अर्ज अंशत: मंजूर करण्यात येत आहे.
2. जाबदेणारांनी वैयक्तिक व संयुक्तपणे तक्रारदारांना मोबाईल बदलून त्याच मेक व मॉडेलचा नवीन मोबाईल द्यावा.
3. जाबदेणारांनी वैयक्तिक व संयुक्तपणे तक्रारदारांना झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई रु. 2,000/- (रक्कम रुपये दोन हजार फक्त) प्रदान करावी.
4. उपरोक्त क्र. (2) व (3) च्या आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयात करावी.
5. निकालाच्या प्रती दोन्ही पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात याव्यात.