द्वारा: मा.अध्यक्षा : श्रीमती प्रणाली सावंत .
// नि का ल प त्र //
1) प्रस्तुत प्रकरणातील जाबदारांनी दिलेल्या सदोष सेवे बाबत योग्य ते आदेश होऊन मिळण्यासाठी तक्रारदारांनी सदरहू तक्रार अर्ज दाखल केला आहे.
या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, तक्रारदार श्री. अमित मोहन वाघफळे यांनी जाबदार नं 1 कॅर रॉक्स टेक्नॉलॉजी लि. यांच्या पुणे येथील शाखेमध्ये कॉम्प्युटरच्या कोर्ससाठी दिनांक 16.01.2009 रोजी प्रवेश घेतला. हया कोर्ससाठी तक्रारदारांनी एकुण रक्कम रु. 7,000/- जाबदारांना फी साठी अदा केले आहेत. तक्रारदाराने कोर्सची रक्कम भरुन सुध्दा जाबदारांनी तक्रारदारांना कोर्स कधी सुरु होणार याची माहीती दिली नाही. तक्रारदारांच्या कोर्सची बॅच सुरु न झाल्यामुळे तक्रारदारांनी जाबदारांना नोटिस पाठवून आपल्या रकमेची मागणी केली. ही नोटिस जाबदारांना प्राप्त झाली तरीही त्यांनी तक्रारदारांची रक्कम परत केली नाही म्हणून तक्रारदारांनी सदरहू अर्ज दाखल केला आहे. जाबदारांमुळे आपले शैक्षणिक नुकसान झालेले असून आपले शैक्षणिक भवितव्य धोक्यात आलेले आहे. सबब जाबदारांकडे भरलेलें रक्कम रु. 7,000/- ( रु सात हजार) अन्य अनुषंगीक रकमांसह देवविण्यात यावी अशी तक्रारदारांनी विनंती केली आहे. तक्रारदारांनी तक्रार अर्जाचे पुष्ठयर्थ प्रतिज्ञापत्र व निशाणी – 4 अन्वये एकुण 7 कागदपत्रे दाखल केली आहेत.
2) प्रस्तुत प्रकरणातील जाबदार नं 1 व 2 यांचेवर मंचाच्या नोटिसीची बजावणी होऊन सुध्दा त्यांनी आपले म्हणणे मंचापुढे दाखल केले नाही. सबब सदरहू प्रकरण त्यांचे विरुध्द एकतर्फा चालविण्याचे आदेश निशाणी – 1 वर करण्यात आले.
3) प्रस्तुत प्रकरणातील तक्रारदारांच्या वर नमुद तक्रारीच्या अनुषंगे दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता त्यांनी एकुण रक्कम रु. 7,000/- जाबदारांच्या पुणे शाखेमधे भरल्याचे सिध्द होते. आपण रक्कम भरुन सुध्दा जाबदारांनी आपल्या कोर्सची बॅच सुरु केली नाही ही तक्रारदारानी वस्तुस्थितीबाबत प्रतिज्ञापत्रावर केलेली तक्रार जाबदारांनी हजर होऊन नाकारलेली नाही. सबब या अनुषंगे जाबदारां विरुध्द प्रतिकुल निष्कर्ष निघतो. तक्रारदारां तर्फे दाखल पावत्या व जाबदारांने दिलेले ओळख पत्र याचे अवलोकन केले असता “बॅच सरु होण्याची तारीख” असे जरी त्यावर नमुद केलेले असले तरी त्याचे पुढे तारीख नमुद केल्याचे आढळून येत नाही. तसेच हा तक्रार अर्ज दाखल करण्यापूर्वी तक्रारदारानी जाबदारांना नोटिस पाठवून हया सर्व तक्रारी त्यांचे कडे केल्या होत्या. नोटिस प्राप्त होऊन सुध्दा जाबदारानी या नोटिसीला उत्तर दिलेले नाही. एकुणच वर नमुद सर्व वस्तुस्थितींचे एकत्रित अवलोकन केले असता जाबदारांने तक्रारदारांकडून रक्कम स्वीकारली मात्र त्यांचे कोर्स ची बॅच सुरु केली नाही ही बाब सिध्द होते. जाबदारांची ही कृती त्यांचे सेवेत दोष निर्माण करते असा मंचाचा निष्कर्ष असल्यामुळे तक्रारदारांनी जाबदारांना अदा केलेली रक्कम रु 7,000/- ( रु सात हजार फक्त ) 15 % दंडात्मक व्याजासह परत करण्याचे आदेश करणे योग्य व न्याय ठरेल असे मंचाचे मत आहे. तक्रारदार विदयार्थि असून त्यांची फसवणूक संस्थेने केली याचा विचार करुन दंडात्मक व्याज मंजूर करण्यात आले आहे. तक्रारदारांनी शेवटची रक्कम अदा केले तारखे पासून म्हणजे दिनंाक 12/03/2009 पासून व्याज मंजूर करण्यात आलेले आहे. तसेच जाबदारांच्या सदोष सेवेमुळे तक्रारदारांचे जे शैक्षणिक नुकसान झाले आहे त्याचा विचार करुन तक्रारदारांना नुकसानभरपाईपोटी रक्कम रु 5,000/- ( रु पाच हजार ) व सदरहू तक्रार अर्जाचा खर्च म्हणून रु 3,000/- ( रु तीन हजार ) मंजूर करण्यात येत आहेत.
जाबदार क्रमांक 1 ही मुख्य शाखा असून जाबदार क्रमांक 2 ही त्यांची पुणे येथील शाखा आहे याचा विचार करता अंतीम आदेश दोन्ही जाबदारां विरुध्द करण्यात येत आहेत.
वर नमूद सर्व विवेंचनाच्या आधारे प्रस्तुत प्रकरणात पुढील प्रमाणे आदेश
निर्गमित करण्यात येत आहेत.
सबब मंचाचा आदेश की –
// आ दे श //
1) तक्रारदारांचा अर्ज मंजूर करण्यात येत आहे.
2) यातील जाबदार क्रमांक 1 व 2 यांनी वैयक्तिक
व संयुक्तरित्या तक्रारदारांस रक्कम रु. 7,000/-
( रु सात हजार फक्त) दिनांक 12.03.2009
पासून संपूर्ण रक्कम फिटे पर्यन्त 15 % व्याजासह अदा
करावेत.
3) यातील जाबदारांनी तक्रारदारांना नुकसानभरपाई म्हणून
रक्कम रु. 5,000/- ( रु पाच हजार ) व सदरहू
तक्रारीचा खर्च रु. 3,000/- ( रु तीन हजार ) अदा करावेत.
4) वर नमूद आदेशाची अंमलबजावणी जाबदारांनी निकालपत्राची
प्रत मिळाले पासून तिस दिवसांचे आत न केल्यास तक्रारदार
त्यांचे विरुध्द ग्राहक संरक्षण कायदयाच्या तरतूदी अंतर्गत
प्रकरण दाखल करु शकतील.
5) निकालपत्रांच्या प्रती दोन्ही बाजूंना नि:शुल्क पाठविण्यात याव्यात.