न्यायनिर्णय
सदर न्यायनिर्णय मा.श्री.श्रीकांत कुंभार, सदस्य, यानी पारित केला
1. तक्रारदाराने सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 नुसार दाखल केली आहे. तक्रारअर्जातील थोडक्यात कथन खालीलप्रमाणे-
2. तक्रारदार हे गुरुवार पेठ कराड येथील रहिवासी असून ते व्यावसायिक आहत. त्यांनी त्यांच्या वृध्द आईवडिलांसाठी प्रवासासाठी म्हणून मारुती 800 रजि.नं. MH-12-PA-6094 या क्रमांकाची कार खरेदी केली होती. यातील जाबदार क्र.1 हे हुंदाई मोटर्स इंडिया लि. कंपनी यांचे सातारा जिल्हयाचे अधिकृत वितरक आहेत. कंपनीचे कार्यकारी संचालक या नात्याने जाबदार क्र.1 दैनंदिन व्यवहार व कामकाज पहातात. जाबदार क्र.2 व 3 हे जाबदार क्र.1 चे नोकर आहेत. जाबदार क्र.2 यानी जाबदार क्र.3 यांची दि.25-1-13 रोजी नेमणूक पत्राप्रमाणे Organization for used car department मध्ये संपूर्ण रक्कम गोळा करणे, बँक व्यवहार व इतर वापरलेल्या गाडयांची किंमत ठरवणे, विक्री करणे इ.साठी जाबदार क्र.3 यांची नेमणूक केली होती, त्यामुळे जाबदार क्र.2 यांनी त्यांचे नोकरीचे कालावधीत जाबदार क्र.1 या कंपनीकरिता ग्राहकाशी केलेल्या व्यवहारासाठी जाबदार क्र.3 यांचे मालक या नात्याने सर्वस्वी जबाबदार होते. जाबदार क्र.1 यांचे कंपनीतर्फे नवीन वाहनविक्रीसाठीचा अदलाबदल मेळावा मे 2012 मध्ये हॉटेल संगम कराड शेजारील संगम पेट्रोलपंपाचे आवारात जुन्या गाडया मेळाव्यात कंपनीतर्फे खरेदी घेऊन नवीन गाडीचे बुकींगसाठीची रक्कम जाबदार क्र.2 यांचेकडे जमा करुन नवीन बुकींग केलेनंतर 4 दिवसामध्ये देणेचे जाबदार क्र.1 यानी जाहिरातीद्वारे जाहीर केले होते, त्याप्रमाणे तक्रारदाराने त्यांचे मालकीची मारुती कार 800 MH-12-PA-6094 ही कार एक्स्चेंज मेळाव्यात देऊन नवीन हुंदाई एल.पी.जी.खरेदी करणेबाबत जाबदार क्र.2 यांचेशी चर्चा केली व त्यांनी सदर कारची किंमत रु.50,000/- केली, तसेच एक्स्चेंज बोनस रु.10,000/- तक्रारदाराना देणेचे मान्य केले व हुंदाई युवान या गाडीचे बुकींगपोटी रक्कम रु.15,000/- कंपनीकडे जमा करणेस सांगितले. त्याप्रमाणे तक्रारदारांनी त्यांची वर नमूद कार गाडीचे मूळ कागदपत्रासह व ट्रान्स्फर फॉर्मवर सहया करुन जाबदाराकडे जमा केली. नवी गाडीचे बुकींगपोटी रु.15,000/- जाबदाराकडे जमा केले. त्याप्रमाणे जुन्या कारची किंमत रु.50,000/-, बोनस रु.10,000/-, नवीन गाडीचा अँडव्हान्स रु.15,000/- व कॅश डिस्काऊंट रु.4,799/- अशी एकूण रु.79,799/- व नवीन गाडीची एकूण किंमत रु.3,79,799/- मधून वजा जाता उर्वरित रक्कम रु.3,00,000/-(रु.तीन लाख मात्र) 3 ते 4 दिवसात नवीन कारची डिलीव्हरी देणेचे ठरले होते. दि.10-6-2012 रोजी तक्रारदारानी एल.आय.सी.कडून कर्ज घेऊन रक्कम तयार ठेवली व कारचे डिलिव्हरीची मागणी जाबदाराकडे केली परंतु जाबदारानी सदर गाडीचा ताबा दिला नाहीच व त्यांचे जुन्या कारची ठरलेली किंमत रु.50,000/- व वाहन बुकींगपोटीची रक्कम रु.15,000/- तक्रारदारांना परत केलीनाही त्यामुळे तक्रारदारानी जाबदारांनी दिलेल्या सदोष सेवेबाबत वाहनाची किंमत रु.50,000/-, वाहन बुकींगचे रु.15,000/-, शारिरीक, मानसिक त्रासापोटी रु.50,000/- असे एकूण रु.1,15,000/-, त्यावर दि.31-5-2012 पासून द.सा.द.शे.15 टक्के दराने होणारे व्याज अशी रक्कम जाबदाराकडून तक्रारदारास मिळावी अशी विनंती मे.मंचाला केली आहे.
3. सदर प्रकरणाच्या नोटीसा जाबदार क्र.1 ते 3 यांना मे.मंचातर्फे रजि.पोस्टाने पाठवणेत आल्या. त्या त्यांना मिळाल्या, त्याप्रमाणे जाबदार क्र.1 व 2 प्रकरणी हजर होऊन त्यानी नि.2 कडे अँड.गव्हाणे या वकीलांतर्फे हजर झाले. त्यांनी त्यांचेविरुध्द झालेला नो से चा आदेश नि.9 कडे अर्ज देऊन रद्द करुन घेतला व त्यांनी त्यांचे म्हणणे नि.13कडे व त्याचे पृष्टयर्थ प्रतिज्ञापत्र नि.14 कडे दाखल केले असून नि.18 कडे पुराव्याचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. नि.19 कडे जाबदार क्र.1 व 2 यानी सादर केलेले म्हणणे व पुराव्याचे प्रतिज्ञापत्र हाच लेखी युक्तीवाद समजणेत यावा अशी पुरसीस दाखल केली. यातील जाबदार क्र.3 यांनी "प्रस्तुत प्रकरणातील सर्व कागदपत्रासाह मला नोटीस मिळाली असून याकामी मला म्हणणे व तोंडी पुरावा देणेचा नाही" अशी पुरसीस दाखल केली असून याशिवाय जाबदार क्र.3 यानी कोणतेही स्वतंत्र म्हणणे/कैफियत व तक्रारदाराचे तक्रारीस आक्षेप प्रकरणी दाखल केलेले नाहीत. जाबदार क्र.1 यांनी तक्रारदारांचे तक्रारीस जोरदार हरकत घेऊन खालीलप्रमाणे आक्षेप नोंदवलेले आहेत ते खालीलप्रमाणे-
तक्रारदारांचा अर्ज खोटा व लबाडीचा आहे. तक्रारीचे कलम 2 ते 9 मधील कथन खोटे व लबाडीचे आहे, त्यातील कथनाप्रमाणे घडलेले नसून तक्रारीस कोणतेही कारण घडलेले नाही. तक्रारदारानी त्यांचे वकील अँड.हरदास यांचेतर्फे दि.24-7-2012 रोजी पाठवलेल्या तक्रारीतील मजकूर हा मान्य नाही. सदर प्रकरणी तक्रारदारानी दाखल केलेली नि.12 कडील पुराव्याची कागदपत्रे पहाता नि.12/1 ते 12/3 कडील कागदपत्रे पाहिली असता त्यावर जाबदार क्र.2 यांच्या सहया नाहीत, त्यामुळे सदर कागदपत्रे जाबदार क्र.1 साठी जाबदार क्र.2 यांनी दिलेली नाहीत. तक्रारदारांनी रु.15,000/- रोखीने जाबदार क्र.1 व 2 कडे भरणा केल्याच्या पावत्या नाहीत, त्या जाबदार क्र.2 कडे तक्रारदारानी जमा केलेल्या नाहीत. तक्रारदारांनी प्रत्यक्ष ज्या घटना घडल्या त्याची माहिती त्याबाबत पत्रव्यवहार जाबदार क्र.1 व क्र.2 यांचेशी केलेला नाही. सदर प्रकरणातील जाबदार क्र.3 याना व जाबदार क्र.2 यांचेतर्फे जाबदार क्र.1 साठी दि.25-1-2012 रोजी वापरलेल्या कार्स विभागात (Advantage Incharge) अँडव्हांटेज इनचार्ज म्हणून नेमणूक दिली असून त्यात नमूद केलेल्या अटी व शर्तीस अनुसरुन जाबदार क्र.2 यांची नेमणूक जाबदार क्र.1 व 2 यांनी केलेली होती. सदर नेमणूकपत्र व त्यातील मजकूर हा जाबदार क्र.1 ते 3 यांचेमधील करार असून जाबदार क्र. 1यांचा अँडव्हांटेज इनचार्ज या नात्याने त्याने केलेल्या व्यवहाराची संपूर्ण जबाबदारी जाबदार क्र.3 वर येते. तसेच तक्रारदारानी प्रकरणी पुराव्यासाठी दाखल केलेली नि.5/9 व नि.12/3 इ.कागदपत्रावर जाबदार क्र.1 व 2 यांची सहीशिक्का नाही. वरील कागदपत्रे जाबदार क्र.1 व 2 यानी तक्रारदाराना दिलेली नव्हती व नाहीत. तक्रारदारांचे जाबदार क्र.1 व 2 कडे कोणतेही पैसे जमा केलेले नव्हते व वाहन बुकींगसाठी पैसे भरुन नवीन वाहन बुक केलेले नव्हते. तक्रारदारानी जाबदार क्र.3 कडे सर्व व्यवहार केलेचे दिसतात त्यामुळे प्रत्यक्ष तक्रारदारांनी झाल्या प्रकाराची कोणतीही माहिती जाबदार क्र.1 व 2 याना दिलेली नव्हती व नाही व प्रस्तुत जाबदार क्र.1 व 2 यांनी तक्रारदारांना कोणतीही सदोष सेवा दिलेली नव्हती त्यामुळे जाबदार क्र.1 व 2 यांचेवर कोणतीही जबाबदारी येत नाही. सबब अर्ज फेटाळून लावावा, रद्द करावा किंवा ती जबाबदारी जाबदार क्र.3 यांचेवर बसवावी. जाबदार क्र.1 व 2 यांनी जाबदार क्र.3 यांचे गैरकृत्याविरुध्द फौजदारी गुन्हा दाखल केलेला आहेच. सबब तक्रार फेटाळावी असे आक्षेप नोंदवलेले आहेत.
4. जाबदार क्र.3 यानी प्रस्तुत तक्रारदाराचे तक्रारीस अनुसरुन कोणतेही म्हणणे किंवा तोंडी पुरावा देणेचा नाही अशी पुरसीस नि.29 कडे दाखल केलेली आहे.
5. वरील जाबदार क्र.1 व 2 यांचे आक्षेप व तक्रारदारांचा नि.1 चा अर्ज, त्यासोबतचे नि.2 कडील प्रतिज्ञापत्र, नि.5 कडील व नि.12 कडील पुराव्याची कागदपत्रे, नि.10 कडील पुराव्याचे प्रतिज्ञापत्र, नि.15 कडील लेखी युक्तीवाद व त्यातील कथनांचा आशय तपासला असता प्रस्तुत प्रकरणाचा न्यायनिर्णय करणेसाठी आमचेपुढे खलील मुद्दे उपस्थित होतात-
अ.क्र. मुद्दा निष्कर्ष
1. तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक आहेत काय? होय.
2. जाबदार क्र.1 व 2 यानी तक्रारदाराना सदोष सेवा दिली आहे काय? नाही.
3. अंतिम आदेश काय? तक्रार अंशतः मंजूर.
कारणमीमांसा- मुद्दा क्र.1 ते 3-
6. सदर प्रकरणातील व्यवहार पहाता यातील जाबदार हे हुंदाई मोटर्स लि.कंपनीचे अधिकृत विक्रेते (डिलर) असून ते त्यांची कोयना वसाहत, मलकापूर रोड, कराड येथे त्यांची शाखा आहे. त्यांचे मुख्य कार्यालय हे प्लॉट नं.1, सर्व्हे क्र.40/212 पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्र.4, सातारा येथे आहे. जाबदार क्र.1 यांचेसाठी जाबदार क्र.2 यांनी जाबदार क्र.3 यांची नेमणूक कोयना वसाहतीमध्ये असलेल्या वापरलेल्या कार्स विभागात काम करणेसाठी अँडव्हान्स इनचार्ज म्हणून जाबदार क्र.3 यांची नेमणूक दि.25-1-2012 रोजी त्यांच्या अटी व शर्तीनुसार केली होती व जाबदार क्र.3 यानी जाबदार क्र.1 व 2यांच्या अटी व शर्ती स्विकारुन वरील पदभार स्विकारला होता. हे तक्रारदारानी नि.5/9 कडे दाखल केलेल्या जाबदार क्र.3 यांच्या नेमणूक पत्रावरुन स्पष्ट होते. सदर प्रकरणातील नि.5/9 चे नेमणूकपत्र अभ्यासले असता ते नेमणूकपत्र उभयतामधील अटी व शर्तीनुसार असून जाबदार क्र.3 ने ते मान्य करुन जाबदार क्र.1 व 2 यांची नेमणूक स्विकारली होती. सदर नेमणूकपत्रातील अटी व शर्तीप्रमाणे वापरलेल्या कार विभागाच्या अँडव्हान्स इनचार्ज या नात्याने 'Total responsible cash collection/Bank transaction and all other issues regarding valuation and sale and purchase for used cars'. असे स्पष्ट कथन केलेले आहे. यावरुन असे स्पष्ट होते की, जाबदार क्र.3 यांचेकडे फक्त वापरलेल्या कार्सची किंमत ठरवणे, त्याची विक्री करणे व त्याप्रमाणे जाबदार क्र.1 व 2 यानी ठरवून दिलेप्रमाणे बँकेद्वारा जाबदार क्र.1 यांचेशी व्यवहार करणे, याबाबत निर्माण होणा-या कोणत्याही बेकायदेशीर कृत्यास तोच एकटा जबाबदार असलेचे स्पष्ट होते. वरील जबाबदारीशिवाय प्रस्तुत जाबदाराकडे जाबदार क्र.1 व 2 यांनी नवीन गाडयांचे बुकींग करणे, त्यापोटी अँडव्हान्स घेणे, त्याची डिलीव्हरी देणे अशा प्रकारचे कोणतेही व्यवहार/जबाबदा-या सोपवलेल्या नव्हत्या हे शाबित होते व त्यावेळी प्रस्तुत जाबदार क्र.3 यानी वरील जाबदाराचे शाखेवरील वर नमूद पदभार स्विकारलेनंतर त्याने जे गैरव्यवहार केले त्याबाबत जाबदार क्र.2 याना जाबदार क्र.3 यांचेविरुध्द कराड पोलिस स्टेशन येथे फौजदारी गुन्हा नोंदवून त्याचा फौजदारी गुन्हा नोंद केला हे तक्रारदारानी प्रकरणी दाखल केलेल्या नि.5/6 कडील खबरी जबाब, नि.5/7 कडील जाबदार क्र.3 चा जबाब इ.कागदपत्रावरुन शाबित होते.
6.1- वरील वस्तुस्थितीला अनुसरुन यातील तक्रारदारानी त्याना जाबदार क्र.1 कडून खरेदी करावयाच्या हुंदाई कंपनीची युवान हुंदाई (LPG) ही गाडी खरेदी करणेची होती. त्यासाठी जाबदार क्र.1 कडे प्राथमिक (Booking Advance) वाहन नोंदणी रक्कम भरणे, त्याचे पैसे स्विकारणे, रोखीची पावती देणे व नवीन गाडी रजिस्टर (booking) करुन त्याची पावती देणे ही सर्व कामे, जबाबदा-या जाबदार क्र.1 व 2 यांची होती ही वस्तुस्थिती स्पष्ट होते. त्यास अनुसरुन तक्रारदारांनी नवीन वाहनासंबंधी सर्व पूर्तता जाबदार क्र.1 व 2 कडे करणे आवश्यक होते, परंतु वरील वस्तुस्थितीची माहिती असूनही तक्रारदारांनी याबाबत जाबदार क्र.1 व 2 शी असा कोणताही नवीन गाडीबाबत नोंदणी व्यवहार केलेचे दिसून येत नाही. प्रत्यक्षात यातील तक्रारदारांनी नवीन वाहन बुकींग नोंदणी त्याचा बुकींग अँडव्हान्स भरणे वगैरे सर्व बाबी यातील जाबदार क्र.3 यांचेशी केलेले असलेचे त्यांचे कथनावरुन दिसते. प्रस्तुत प्रकरणी जाबदार क्र.3 यांची कोणती भूमिका आहे व त्यांचे अधिकार काय आहेत त्यांचेकडे जाबदार क्र.1,2 यांनी कोणती कामे सोपवली आहेत याची संपूर्ण माहिती तक्रारदाराना होती ही बाब तक्रारदारानी त्यांच्या तक्रारअर्ज कलम 2 मध्ये स्पष्टपणे मान्य केलेली आहे. याचा विचार करता येथे दोन गोष्टी निर्माण होतात-
1. तक्रारदारांनी त्यांच्या जुन्या गाडीच्या विक्रीचा व्यवहार जाबदार क्र.3 यांचेशी करणे.
2. नवीन हुंदाई कंपनीच्या युवान हुंदाई गाडीच्या बुकींगसाठी जाबदार क्र.1 व 2 यांचेशी व्यवहार करणे.
अशा दोन संकल्पना निर्माण होतात व या दोन्ही संकल्पना ज्याच्या त्याच्या अधिकारक्षेत्राप्रमाणे वेगवेगळया आहेत. त्यास अनुसरुन पहाता यातील जाबदार क्र.1 साठी क्र.2 कडे वाहन बुकींगसाठी तक्रारदार हे जाबदार क्र.2 कडे आलेले नव्हते. सदर प्रकरणी नि.12 कडे नि.12/2 व 12/3कडे तक्रारदारानी दाखल केलेली कागदपत्रे पहाता त्यावर जाबदार क्र.2 यांच्या सहया नाहीत. जाबदार क्र.1 यांचा त्यावर अधिकृत शिक्का नाही. तक्रारदारानी जाबदार क्र.1 व 2 च्या भेटीबाबत, चर्चेबाबतचे कथन केले आहे त्याबाबतचा कोणताही अधिकृत पुरावा किंवा प्रतिज्ञापत्रे तक्रारदारानी दाखल केलेली नाहीत. त्यामुळे जाबदार क्र.1 व 2 यांचेशी झालेल्या व्यवहाराबाबत नेमका पुरावा तक्रारदारानी सादर केलेला नाही, त्यामुळे जाबदार क्र.1 व 2 याना विषयांकित व्यवहाराची सर्व माहिती होती असे म्हणता येणार नाही. नि.12/3 चे कागदपत्र हे कोटेशन आहे, त्याचप्रमाणे तक्रारदार हे तक्रारअर्ज कलम 5 मध्ये कथन करतात की, जुन्या कारची किंमत रु.50,000/- बोनस रक्कम रु.1,00,000/- व कार बुकींगची रक्कम रु.15,000/- अशी एकूण रक्कम जाबदार क्र.1 साठी जाबदार क्र.2 कडे जमा केली आहे, परंतु त्याबाबत सदर रक्कम जाबदार क्र.2 कडे जमा केलेची कोणतीही पावती प्रकरणी तक्रारदारानी दाखल केलेली नाही. जर तक्रारदारानी जाबदार क्र.2 कडे रु.75,000/- भरले असते तर जाबदार क्र.2 यानी त्याना पैसे मिळणेची पावती नक्कीच दिली असती. आमचे मते तक्रारदारानी त्यांचे सोयीसाठी ही कथने घेतलेली दिसतात. या प्रकरणातील तक्रारदारानी जाबदार क्र.3 कडेच जुन्या गाडीची किंमत ठरवताना जाबदार क्र.3 यांनी तक्रारदारांच्या जुन्या गाडीची किंमत रु.50,000/- ठरविली. परंतु ती प्रत्यक्षात तक्रारदारांना जाबदार क्र.3 यांनी अदा केलेचे दिसत नाही, त्याचप्रमाणे यातील जाबदार क्र.3 हाच जाबदार क्र.1 व 2 यांचा सर्वेसर्वा आहे असे गृहित धरुन जाबदार क्र.3 कडेच रु.15,000/- दिलेचे दिसते परंतु जाबदार क्र.3 कडील रोखीची पावती तक्रारदारानी घेतलेचे दिसून येत नाही. परंतु केवळ या व्यवहारावरुन प्रस्तुत तक्रारदार हा जाबदार क्र.1 ते 3 यांचा ग्राहक आहे असे म्हणता येईल व जाबदार क्र.3 च्या नेमणुकपत्रातील अटी व शर्ती पाहिल्यास जाबदार क्र.3 यांची नेमणूक फक्त जुन्या गाडया घेणे, त्याची किंमत ठरविणे, व त्या पुन्हा जादा किंमतीला विकून त्याचे पैसे जाबदार क्र.2 चे माध्यमातून जाबदार क्र.1 कडे जमा करणे व तेथून पुढे जाबदार क्र.1 व 2 यांची जबाबदारी सुरु होते असे स्पष्ट चित्र सदर प्रकरणी दिसते. त्यामुळे वादाकरिता जरी नि.12/3 कडील कोटेशन (प्रोफॉर्मा इन्व्हॉईस) नि.12/2 चा ऑर्डर बुकींग फॉर्म पाहिला तर त्यावरुन गाडीच्या किंमतीबाबतची माहिती तक्रारदाराला जाबदारानी दिली व संभाव्य गाडीचे बुकींग तक्रारदारानी जाबदार क्र.1,2 कडे केले हे स्पष्ट होते. परंतु सदर नि.12/2 चे कागपत्रावर कंपनीचा सही शिक्का नाही, त्यावर नमूद केलेप्रमाणे तक्रारदाराकडून रु.15,000/-(रु.पंधरा हजार मात्र)booking amount जाबदार क्र.1,2 कडे भरलेची पावती मात्र तक्रारदारानी सादर केलेली नाही, त्यामुळे प्रस्तुत तक्रारदारानी वैधरित्या गाडी बुकींगची रक्कम रितसर जाबदार क्र.1,2 कडे भरुन गाडी बुकींग केले होते असे म्हणता येणार नाही वा जाबदाराकडे तक्रारदारानी हुंदाई युवान (एल.पी.जी.) या गाडीचे रितसर जाबदार क्र.1 व 2 कडे वाहन बुकींग केल्याबाबत कोणताही निर्णायक पुरावा मंचात दाखल केलेला नाही. त्यामुळेच यातील जाबदार क्र.1,2 यांनी अधिकृतरित्या त्याना तक्रारदाराचे वाहनाचे अधिकृत बुकींगबाबत काही माहिती नसलेचे कथन केले आहे. वरील परिस्थिती पहाता प्रस्तुत जाबदार क्र.1 व 2 यानी तक्रारदाराना कोणतीही सदोष सेवा दिली नसल्याचे पूर्णतः शाबित होते त्यामुळे मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी देतो व मुद्दा क्र.2 चे उत्तर नकारार्थी देतो.
6.2- सदर प्रकरणातील जाबदार क्र.1 साठी जाबदार क्र.2 यानी जाबदार क्र.3 यांची केलेली नेमणूक त्याबाबतचे तक्रारदारानी नि.5/9 कडे दाखल केलेले नेमणूकपत्र पाहिले असता ते करारपत्र व नेमणूकपत्र अशा स्वरुपाचे आहे व जाबदार क्र.3 यांना वापरलेल्या वाहनांचा विभागाचा प्रमुख म्हणून कार्यभार दिला असून त्याठिकाणी होणा-या व्यवहाराची संपूर्ण जबाबदारी रकमांचा भरणा, रकमा बँकेत भरणे, बँक व्यवहार करणे व इतर वाहनांच्या त्या विभागाच्या सर्व जबाबदा-या, वाहनाच्या किंमती, खरेदी विक्री यांची सर्वंकष जबाबदारी जाबदार क्र.3 याची आहे हे त्यावरुन स्पष्ट होते. जाबदार क्र.3 यांनी त्यांची जबाबदारी व्यवस्थित पार पाडली नाही म्हणून जाबदार क्र.2 यानी जाबदार क्र.3 विरुध्द JMFC कोर्ट कराड यांचे कोर्टात RCC No. 354/2012 ची फिर्यादसुध्दा दाखल केली आहे व तक्रारदारानी जाबदार क्र.1,2 कडे विषयांकित नवीन गाडीचे बुकींग करणेपूर्वी जुन्या गाडीचे सर्व व्यवहार जाबदार क्र.3 कडेच केलेचे स्पष्ट होते व त्यामुळे तक्रारदारांच्या सदर तक्रारीची भरपाईची जबाबदारी जाबदार क्र.3 यांचीच आहे हे निर्विवादरित्या स्पष्ट होते. याबाबत जाबदाराना सदर प्रकरणाची नोटीस मिळूनही त्यानी मंचात येऊन नि.29 कडे दि.17-4-2015 रोजी त्यांना "प्रस्तुत तक्रारदाराचे तक्रारदसंबंधी कोणतेही लेखी म्हणणे वा तोंडी पुरावा देणेचा नाही" अशी पुरसीस प्रकरणी दाखल केलेली आहे. या सर्व बाबींचा, वस्तुस्थितीचा विचार करता जाबदार क्र.3 यांचेवर तक्रारदारांचे तक्रारीची जबाबदारी निश्चित करणे आम्हांस योग्य,न्याय्य व कायदेशीर वाटते व तक्रारदारांची तक्रार जाबदार क्र.3 विरुध्द अंशतः मंजुरीस पात्र आहे या निष्कर्षाप्रत मंच येत आहे.
7. वरील सर्व कारणीमीमांसा व विवेचन यांस अधीन राहून खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करणेत येत आहेत-
-ः आदेश ः-
1. तक्रारदारांची तक्रार अंशतः मंजूर करणेत येते.
2. यातील जाबदार क्र.1 व 2 यानी तक्रारदारांना कोणतीही सदोष सेवा दिलेली नसल्याचे घोषित करणेत येते.
3. जाबदार क्र.3 यांनी तक्रारदाराचे मागणीप्रमाणे जुन्या वाहनाची किंमत रु.50,000/-(रु.पन्नास हजार मात्र) त्यावर दि.31-5-2012 पासून द.सा.द.शे.10 टक्के दराने रक्कम पदरी पडेपर्यंतचे होणारे व्याजासह रक्कम तक्रारदाराना दयावी तसेच जाबदार क्र.3 यानी शारिरीक, मानसिक त्रासापोटी रु.40,000/- व अर्जाचे खर्चापोटी रु.3,000/- तक्रारदाराना अदा करावेत. सदर आदेशाची अंमलबजावणी जाबदार क्र.3 यानी प्रस्तुत आदेश प्राप्त झालेपासून 30 दिवसात करणेची आहे.
4. तक्रारदारांनी रक्कम प्रस्तुत जाबदार क्र.1 ते 3 यांचेकडे जमा केलेली तक्रारदारांनी मागणी केलेली रक्कम रु.15,000/- सदर रक्कम जाबदार क्र.1 ते 3 यांचेकडे जमा केलेबाबत रोखीची पावती तक्रारदारानी सादर न केल्याने सदर तक्रारदारांची मागणी रद्द करणेत येते.
5. जाबदार क्र.1 व 2 विरुध्दची तक्रारदारांची तक्रार रद्द करणेत येते.
6. सदरचा न्यायनिर्णय खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
7. सदर आदेशाचे पालन विहीत मुदतीत जाबदारानी न केल्यास तक्रारदाराना ग्राहक संरक्षण कायदा कलम 25 व 27 अन्वये कारवाई करणेची मुभा राहील.
8. सदर न्यायनिर्णयाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य पाठवणेत याव्यात.
ठिकाण- सातारा.
दि.8-5-2015.
(सौ.सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ.सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.