::निकालपत्र ::
(पारित व्दारा- श्री शेखर प्रभाकर मुळे, मा.अध्यक्ष.)
(पारित दिनांक-31 मार्च, 2017)
01. तक्रारकर्त्याने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 खाली विरुध्दपक्षां विरुध्द ट्रॅक्टर मध्ये निर्माण झालेले दोष दुरुस्त न केल्या प्रकरणी सेवेतील कमतरता आणि अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब या आरोपा वरुन दाखल केली आहे.
विरुध्दपक्ष क्रं-4) फोर्स बलवान लिमिटेड यांचे विरुध्द ही तक्रार अगोदरच खारीज करण्यात आलेली आहे कारण तक्रारकर्त्याने तक्रारीची नोटीस विरुध्दपक्ष क्रं-4) वर त्याला पुरेशी संधी देऊनही तामील केलेली नाही. तसेच विरुध्दपक्ष क्रं-3) इलाहाबाद बँकेला तक्रारकर्त्याचे विनंती वरुन वगळण्यात आलेले आहे, त्यामुळे आता ही तक्रार विरुध्दपक्ष क्रं-1) कामधेनु एन्टरप्राईजेस आणि विरुध्दपक्ष क्रं-2) विमा कंपनी यांचे विरुध्द आहे.
02. तक्रारकर्त्या तर्फे दाखल तक्रारीचा थोडक्यात खालील प्रमाणे-
तक्रारकर्ता हा एल.एम.टी. ट्रॅक्टर बलवान-500 डी-1 चा नोंदणीकृत मालक असून ट्रॅक्टचा नोंदणीकृत क्रमांक-MH-40/L-1585 असा आहे. सदर ट्रॅक्टरचा विमा विरुध्दपक्ष क्रं-2) विमा कंपनी कडून काढण्यात आलेला आहे. या ट्रॅक्टरसाठी तक्रारकर्त्याने इलाहाबाद बँके कडून कर्ज घेतले आहे. ट्रॅक्टरचा निर्माता फोर्स बलवान लिमिटेड ही कंपनी असून तो ट्रॅक्टर विरुध्दपक्ष क्रं-1) कामधेनु एन्टरप्राईजेस या स्थानीक डिलर कडून दिनांक-14.08.2008 रोजी खरेदी केला. तक्रारकर्त्याने सदर ट्रॅक्टर हा शेती उपयोगी कामासाठी खरेदी केला होता. विकत घेतल्या पासून अंदाजे 02 वर्षा नंतर दिनांक-10.04.2011 रोजी ट्रॅक्टर शेती मध्ये गव्हाची मळणी व कापणीसाठी चालविता असताना अचानक ट्रॅक्टरचे इंजिन मध्ये मोठा आवाज झाला व क्षणातच इंजिनचे लहान-लहान तुकडे होऊन इंजिन बंद पडले. या घटनेची सुचना विरुध्दपक्ष क्रं-1) ते 3) यांना
देण्यात आली परंतु त्यांनी त्या तक्रारीवर कुठलीही कारवाई केली नाही किंवा ट्रॅक्टरचे दुरुस्तीसाठी सुध्दा काहीही कारवाई केली नाही. ज्याअर्थी त्या ट्रक्टर मध्ये विकत घेतल्या पासून थोडयाच दिवसात दोष निर्माण झालेत, त्याअर्थी त्या ट्रॅक्टर मध्ये निर्मिती दोष होता. ट्रॅक्टर सध्या तसाच पडून असून त्याचा उपयोग घेता येत नसल्याने तक्रारकर्त्याचे प्रतीदिन रुपये-2000/- प्रमाणे नुकसान होत आहे. म्हणून त्याने विरुध्दपक्ष क्रं-1) ते 3) यांचे कडून रुपये-2,50,000/- ची नुकसान भरपाई मागितली असून दिनांक-10.04.2011 पासून प्रतीदिन रुपये-2000/- प्रमाणे नुकसान भरपाई मागितली आहे.
03. विरुध्दपक्ष क्रं-1) कामधेनू एन्टरप्राईजेस स्थानीक डिलर याला मंचाची रजिस्टर नोटीस मिळूनही त्याचे तर्फे कोणीही मंचा समक्ष उपस्थित न झाल्याने त्याचे विरुध्द सदरचे प्रकरण एकतर्फी चालविण्यात आले.
04. विरुध्दपक्ष क्रं-2) विमा कंपनीने आपले लेखी उत्तर दाखल करुन त्यात असे नमुद केले की, तक्रारी मध्ये त्यांचे विरुध्द त्यांनी सेवेत कमतरता ठेवली असा कुठलाही आरोप नसल्याने ही तक्रार त्यांचे विरुध्द चालू शकत नाही. ज्याअर्थी तो ट्रक्टर नविन होता व अल्प कालावधीतच त्यात बिघाड झाला, त्याअर्थी त्यामध्ये निर्मिती दोष होता, ज्यासाठी त्यांना कुठल्याही प्रकारे जबाबदार धरता येणार नाही आणि म्हणून ते तक्रारकर्त्याला नुकसान भरपाई देण्यास बांधील नाहीत, त्यांनी तसे तक्रारकर्त्याला दिनांक-27.12.2010 ला लेखी कळविले होते. तक्रारीतील इतर सर्व मजकूर नाकबुल करुन तक्रार खारीज करण्याची विनंती विरुध्दपक्ष क्रं-2) विमा कंपनी तर्फे करण्यात आली.
05. विरुध्दपक्ष क्रं-3) इलाहाबाद बँके तर्फे लेखी उत्तर दाखल करण्यात आले परंतु विरुध्दपक्ष क्रं-3) ला मंचाचे आदेशा प्रमाणे तक्रारीतून वगळण्यात आल्यामुळे आता त्यांचे लेखी जबाबाचा विचार करण्याची काहीही गरज नाही.
06. विरुध्दपक्ष क्रं-4) फोर्स बलवान लिमिटेड या ट्रॅक्टर निर्माता कंपनी विरुध्द पूर्वी सांगितल्या प्रमाणे तक्रारकर्त्यास नोटीस तामीलीची पुरेशी संधी देऊनही तामील न केल्याने ही तक्रार एकतर्फी खारीज झालेली आहे.
07. त.क.चे वकील आणि विरुध्दपक्ष क्रं-2) विमा कंपनीचे वकीलांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला तसेच तक्रारकर्ता आणि विरुध्दपक्ष क्रं-2) विमा कंपनी तर्फे दाखल दस्तऐवज तसेच तक्रारकर्त्याचे लेखी युक्तीवादाचे अवलोकन करुन मंचाचा निष्कर्ष खालील प्रमाणे देण्यात येतो-
:: निष्कर्ष ::
08. तक्रारीचे वाचन केल्या नंतर असे दिसून येते की, तक्रार ट्रॅक्टर मध्ये उदभवलेल्या निर्मिती दोषा संबधीची आहे, त्यामुळे केवळ त्या ट्रॅक्टरचा निर्माता म्हणजेच विरुध्दपक्ष क्रं-4) फोर्स बलवान लिमिटेड हा या तक्रारीला उत्तर देण्यास जबाबदार आहे परंतु सदर तक्रार ही त्याचे विरुध्द अगोदरच खारीज झालेली आहे कारण तक्रारकर्त्यास पुरेशी संधी देऊनही त्याने त्याचेवर नोटीस तामील केलेली नाही. इतर विरुध्दपक्षानां ट्रॅक्टर मधील निर्मिती दोषा संबधी कुठल्याही प्रकारे जबाबदार धरता येणार नाही आणि म्हणून तक्रारकर्त्याला नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी त्यांचेवर येत नाही.
09. उपरोक्त नमुद वस्तुस्थिती लक्षात घेता या प्रकरणात आणखी काही भाष्य करण्याची गरज दिसत नाही, त्यामुळे ही तक्रार विरुध्दपक्षां विरुध्द
खारीज होण्यास पात्र आहे, त्यावरुन आम्ही तक्रारीत खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-
::आदेश::
(1) तक्रारकर्ता श्री देवराम पंजाराम शेंडे याची, विरुध्दपक्ष क्रं-1) कामधेनू एन्टरप्राईजेस, नागपूर आणि इतर यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
(02) खर्चा बद्दल कोणतेही आदेश नाहीत.
(03) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्क उपलब्ध
करुन देण्यात याव्यात.