निकालपत्र
(घोषीत द्वारा- मा. सौ. स्मिता बी.कुलकर्णी, अध्यक्षा )
1. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्या विरुध्द सेवेत त्रुटी दिल्याच्या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे आहे.
2. अर्जदार हा शेती व शासकीय नौकरी करुन आपली उपजिविका भागवतो. अर्जदार यांचे एकत्र कुटूंब असून अर्जदार हा एकत्र कुटूंबाचा कर्ता आहे. अर्जदार यांचा छोटा भाऊ नामे मो. इकबाल अब्दुल हबीब कुरेशी यांच्या नावे MH 26 A K 1350 फोर्स कंपनीची ट्रावलर 9+1 सिटींगचे वाहन (LMV) घेतलेले आहे. दिनांक 07/07/2014 रोजी सकाळी 6.24 वाजताच्या सुमारास विजयनगर येथून अर्जदार वाहन क्र. MH 26 A K 1350 घेवून बिलोलीला जात होते. गैरअर्जदार 1 व 2 यांनी अर्जदारास वाहनासाठी 82.50 पैसे जास्त टोल आकारणी करुन अर्जदाराची फसवणूक केलेली आहे. तसेच अर्जदारास दमदाटीकरुन पैसे घेतलेले आहेत. गैरअर्जदार 1 व 2 यांनी आपली मनमानी करुन अर्जदाराचे वाहन LMV नसून LCV आहे असे सांगून अनेक लोकांना फसविलेले आहे. त्यामुळे त्यांच्यावर योग्य कार्यवाही व दंड होणे गरजेचे आहे. दिनांक 07/07/2014 रोजी सदर टोल ऑपरेटर जगदिश व किरण यांना अर्जदार यांनी भेटून सांगितले की, शासनाच्या नियमाप्रमाणे टोलचे पैसे वसुल करा, माझे वाहन हे 9+1 सिटींगचे आहे पण गैरअर्जदाराने उध्दट भाषा बोलून तुझे वाहन LCV आहे आम्ही आरटीओ, आरसी बुकला मानत नाही, आमचे नियम आम्ही सांगितल्याप्रमाणे आहेत. तुम्ही 82.50 पैसे दिले नाही तर वाहन जावू देणार नाही असे सांगितले व अर्जदाराकडून 82.50 रुपये जास्तीचे घेतले आहेत त्यामुळे अर्जदाराने सदर तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारीमध्ये अर्जदार यांनी भरणा केलेले रक्कम रु. 82.50 पैसे दोन वेळचे तसेच रु.20,000/- न्यायालयीन खर्च व रु.3,000/- इत्यादी रक्कमेची मागणी गैरअर्जदार यांच्याकडून केलेली आहे.
3. गैरअर्जदार 1 व 2 यांना पाठवलेल्या नोटीसा परत आल्याने अर्जदार यांनी गैरअर्जदार यांना हमदस्त नोटीस पाठविण्याची विनंती केली. सदर विनंती मान्य करण्यात येवून अर्जदाराने गैरअर्जदार यास हमदस्त नोटीस पाठवलेली आहे. सदर नोटीसा पाठवल्याची पोस्टाची दिनांक 30/09/2014 रोजीच्या पावत्या तसेच गैरअर्जदार 2 यांना नोटीस प्राप्त झाल्याची पोहच पावती अर्जदाराने दाखल केलेली आहे. तसेच गैरअर्जदार 1 यांना पाठवलेल्या नोटीसचा इंटरनेटवरील रिपोर्ट काढलेला असून सदरील अहवालामध्ये दिनांक 01/10/2014 रोजी Bag in opened असा शेरा आलेला आहे. त्यानंतरही गैरअर्जदार हे प्रकरणामध्ये हजर झालेले नाहीत. अर्जदाराने दिनांक 11/02/2015 रोजी लेखी युक्तीवाद दाखल केला तसेच दिनांक 21/02/2015 रोजी अर्जदाराने सदरील टोल नाक्यावर अर्जदार व गैरअर्जदार यांच्यात झालेल्या संभाषणाचे रेकॉडींगबाबतची सी.डी. मंचासमोर दाखल केलेली आहे. त्यानंतर प्रकरण युक्तीवादाला ठेवण्यात आले. दिनांक 04/03/2015 रोजी गैरअर्जदार 1 व 2 यांच्यातर्फे अॅड. श्री भक्कड यांनी प्रकरणात हजर होण्यासाठी पुरसीस दिला व वकीलपत्र दाखल करण्यासाठी वेळ मागीतला. दिनांक 10/03/2015 रोजीही गैरअर्जदार यांच्या वकीलानी वकीलपत्र दाखल केलेले नाही व लेखी जबाब दाखल करण्यासाठी वेळ दयावा असा अर्ज दिला. सदर अर्ज नामंजूर करण्यात आला.
अर्जदाराचा युक्तीवाद ऐकला, दाखल कागदपत्राचे अवलोकन केले असता खालील बाबी स्पष्ट होतात.
अर्जदार यांची गैरअर्जदार यांच्या विरुध्दची प्रमुख तक्रार अशी आहे की, अर्जदाराचे वाहन LMV असतांनाही गैरअर्जदार यांनी अर्जदार यांच्या वाहनाचा टोल LCV/MB या प्रकारातील वाहन समजून जास्तीचा वसूल केलेला आहे.
अर्जदाराने दिनांक 07/07/2014 रोजी सकाळी 6.24 वाजता गैरअर्जदार क्र. 1 यांच्याकडे रिटर्न जर्नीसाठी 82.50 पैसे भरलेले असल्याचे दाखल टोल रिसीटवरुन दिसून येते. तसेच दिनांक 07/07/2014 रोजी 7.14 वाजता अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 2 यांच्याकडे To And Fro साठी रक्कम रु. 82.50 पैसे भरलेले असल्याचे दिसून येते. सदर दोन्हीही पावत्यावर अर्जदाराच्या वाहनाचा क्र. MH 26 A K 1350 नमूद केलेला आहे. सदर पावतीवर गैरअर्जदार यांनी अर्जदाराचे वाहन व्हेईकल क्लॉसमध्ये LCV/MB असे दर्शविलेले आहे. अर्जदाराने आर.टी.ओ. चे आर.सी. बुक दाखल केलेले असून सदर आर.सी. बुकामध्ये अर्जदाराच्या वाहनाचा प्रकार हा LMV असल्याचे नमूद केलेले आहे. अर्जदाराने गैरअर्जदार यांच्या टोल नाक्यावर असलेल्या पथकर दराचा तक्ता दाखल केलेला असून सदर तक्त्याचे अवलोकन केले असता कार / जीप साठी एकेरी प्रवास 30/- रुपये व परतीचा प्रवास 45/- रुपये असल्याचे स्पष्ट होते. असे असतांना गैरअर्जदार यांनी अर्जदाराकडून हलकी माल वाहू वाहने या प्रकारातील वाहनाचा दर आकारलेला असल्याचे दिसून येते. अर्जदाराच्या वाहनास इतर टोल नाक्यावर लावलेल्या दरासंदर्भातील पावत्या अर्जदाराने मंचासमोर दाखल केलेल्या आहेत. सदरील पावत्यांचे अवलोकन केले असता अर्जदाराच्रूा वाहनास कार / जीप या प्रकारानुसार 30/- रुपये टोलचा दर आकारलेला आहे. अर्जदाराने दाखल केलेल्या गैरअर्जदार व अर्जदार यांच्यातील संभाषणाचे रेकॉडींग बघीतले असता अर्जदार यांनी गैरअर्जदार यांना वारंवार अर्जदाराचे वाहन LMV असल्याने अर्जदाराच्या वाहनास LMV प्रमाणे दर आकारावा अशी विनंती केलेली आहे परंतू गैरअर्जदार यांनी सदरील विनंती नाकारलेली असून अर्जदाराने दाखल केलेल्या आर.सी. बुकाची प्रतही मान्य केलेली नसल्याचे दिसून येते. गैरअर्जदार यांनी हजर होवूनही आपले म्हणणे दाखल केलेले नसल्यामुळे अर्जदाराची तक्रार गैरअर्जदार यांना मान्य असल्याचे स्पष्ट होते. गैरअर्जदार यांनी अर्जदाराच्या वाहनाला LCV चा दर लावून अनुचित व्यापारी पध्दतीचा अवलंब केलेला आहे. सदरील मार्गावरुन अनेक वाहने प्रवास करीत असतात. अशा वेळी गैरअर्जदार यांनी प्रत्येक वाहनास योग्य तोच दर आकारणे बंधनकारक आहे परंतू गैरअर्जदार यांनी तसे केल्याचे दिसून येत नाही. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांच्याकडून अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब करुन जास्तीची रक्कम वसूल केल्यामुळे निश्चितच अर्जदाराला मानसिक त्रास झालेला आहे, गैरअर्जदार यांनी अर्जदाराकडून 45 रुपयांच्या ऐवजी 82.50 पैसे वसूल केलेले आहेत. त्यामुळे गैरअर्जदार यांनी 90 रुपयांच्या ऐवजी अर्जदाराकडून 165/- रुपये म्हणजे 75 रुपये जास्तीचे वसूल केलेले आहेत, असे मंचाचे मत आहे.
वरील विवेचनावरुन मंच खालील आदेश देत आहे.
आ दे श
1. अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
2. गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी अर्जदारास जास्तीची घेतलेली रक्कम रु. 75/- पैसे आदेश तारखेपासून 30 दिवसाच्या आत अदा करावी.
3. गैरअर्जदार यांनी अर्जदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु.3,000/- व दावा
खर्चापोटी रक्कम रु.1,500/- आदेश तारखेपासून 30 दिवसाच्या आत अदा करावी.
4. आदेशाची पूर्तता झाल्याबद्दलचा अहवाल दोन्ही पक्षांनी 45 दिवसानंतर मंचात दाखल
करावा.प्रकरण 45 दिवसानंतर पुन्हा आदेशाच्या पूर्ततेच्या अहवालासाठी ठेवले जाईल.
5. निकालाच्या प्रती दोन्ही पक्षकारास मोफत देण्यात याव्यात.