(आदेश पारीत व्दारा - श्रीमती चंद्रिका कि. बैस, मा.सदस्या)
(पारीत दिनांक : 09 फेब्रुवारी 2017)
1. तक्रारकर्त्याने सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केली असून तक्रारकर्त्याच्या तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालील प्रमाणे आहे.
2. विरुध्दपक्ष हे भूखंड विकासक असून भूखंड खरेदी-विक्रीचा व्यवसाय करते, तसेच ठेवीदारांकडून ठेवी स्विकारुन त्यावर व्याज देण्याचे आमिष दाखवून रक्कम स्विकारतात. ‘’अडीच वर्षात दाम दुप्पट’’ असे विरुध्दपक्षाचे योजनेचे स्वरुप आहे. विरुध्दपक्ष क्र.2 हे सदर संस्थेचे संचालक आहे व विरुध्दपक्ष क्र.3 हे सदर संस्थेवर नेमलेले प्रशासक आहे.
3. तक्रारकर्ता हे नागपूर येथील रहिवासी असून त्याने विरुध्दपक्षाकडे 50,000/- रुपये 24 महिण्याचे मुदत ठेवीत दिनांक 9.7.2007 रोजी गुंतविले. विरुध्दपक्षाने यावर 13 टक्के व्याजदराने मुदत ठेव रसिद क्रमांक 5086 वर या रकमेची नोंद आहे. या रकमेची परिपपक्वता मुल्य रुपये 64,580/- एवढे असून त्याची नियम तारीख 9.7.2007 ही दर्शविली आहे. दिनांक 5.5.2009 रोजी तक्रारकर्ता यांनी विरुध्दपक्ष क्र.3 यांना घरगुती कारणास्तव पैशाची आवश्यकता असल्याने आपल्या पैशाची मागणी केली. परंतु, त्यांच्या या मागणीकडे विरुध्दपक्षाने हेतुपुरस्पररित्या दुर्लक्ष केले. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष यांचे कार्यालयाला वारंवार भेट देवून गुंतविलेल्या रकमेची व व्याजाची मागणी केली. परंतु, विरुध्दपक्षाकडून किंवा त्यांच्या कार्यालयातून कोणतेही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. तक्रारकर्त्याने दिनांक 4.4.2011 रोजी विरुध्दपक्षाचे कार्यालयाला भेट दिली असता, विरुध्दपक्षाने त्याच्या सहीचे स्वलिखीत एक पञ तक्रारकर्त्यास दिले. या पञानुसार एप्रिल महिण्यात सर्व गुंतवणूकदारांना त्याचे पैसे परत घेण्याचे आश्वासन विरुध्दपक्षाने दिले. परंतु, तक्रार दाखल करेपर्यंत विरुध्दपक्षाने त्याची रक्कम परत केली नाही. विरुध्दपक्षाने दाम दुप्पट रक्कम अथवा त्यावरील व्याज देण्यास नकार दिला. जणतेच्या स्वकष्टार्जीत ठेवीवर आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून ठेवीदाराचे दिशाभूल करणे, ही अनुचित व्यापारी पध्दती आहे. तसेच, ठेवीदाराच्या ठेवी परत न करणे आणि त्यामधील व्याजही न देणे ही विरुध्दपक्षाच्या सेवेतील ञुटी आहे.
4. तक्रारकर्त्याच्या मागणीनुसार विरुध्दपक्ष यांनी तक्रारकतर्यास रुपये 64,580/- त्वरीत परत करावे व त्यावर देय तारखेपर्यंत 24 टक्के दराने व्याज द्यावे. त्याचप्रमाणे शारिरीक, मानसिक व आर्थिक ञासापोटी रुपये 1,00,000/- आणि तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 25,000/- तक्रारकर्त्याने मागितले आहे.
5. तक्रारकर्त्याचे तक्रारीनुसार विरुध्दपक्षाला नोटीस बजावण्यात आली. तसेच विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांना मंचाची नोटीस दैनिक वृत्तपञ ‘पुण्य-नगरी’ दिनांक 20.9.2015 च्या दैनिक वृत्तपञातून प्रसिध्द केल्याचा अहवाल नि.क्र.12 वर दाखल केला. तसेच विरुध्दपक्ष क्र.3 यांना मंचाची नोटीस प्राप्त झाल्याबाबत पोष्टाची पोचपावती नि.क्र.15 वर दाखल आहे, तरी सुध्दा विरुध्दपक्ष क्र.3 ला नोटीस तामील होऊनही मंचात हजर झाले नाही व संधी मिळूनही लेखीउत्तर दाखल केले नाही. त्यामुळे विरुध्दपक्ष क्र.1 ते 3 चे विरुध्द एकतर्फा आदेश निशाणी क्र.1 वर दिनांक 22.8.2016 रोजी पारीत करण्यात आला.
6. तक्रारकर्ताचे वकीलांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला. सदर प्रकरणातील अभिलेखावर दाखल केलेल्या दस्ताऐवजाचे अवलोकन करण्यात आले, त्याप्रमाणे खालील प्रमाणे मुद्दे व निष्कर्ष देण्यात येते.
मुद्दे : निष्कर्ष
1) तक्रारकर्त्याची तक्रार मंजूर होण्यास पाञ आहे काय ? : होय.
2) अंतिम आदेश काय ? : खालील प्रमाणे
// निष्कर्ष //
7. तक्रारकर्ता यांनी रुपये 50,000/- विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांचेकडे 24 महिण्याचे मुदत ठेवीत गुंतविले. तक्रारकर्ता यांनी दिनांक 9.7.2007 रोजी गंतविलेले रुपये 50,000/- व त्यावर 13 टक्के दराने व्याज देण्याचे विरुध्दपक्ष यांना सांगितले, तो निशाणी क्र.3 वरील दस्त क्र. अ प्रमाणे जोडलेला आहे. रसिद क्रमांक 5086 वर या रकमेची नोंद आहे. या रकमेची परिपक्वता मुल्य रुपये 64,580/- ऐवढी असून त्याची नियत तारीख 9.7.2009 ही दर्शविली आहे. दिनांक 5.5.2009 रोजी काही घरगुती कामाकरीता तक्रारकर्त्यास पैशाची आवश्यकता पडली, त्यामुळे तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडे पञ लिहून पैशाची मागणी केली. परंतु विरुध्दपक्षाकडून त्यांना कोणतेही समाधानकारक उत्तर मिळाले नाही.
8. त्यानंतर, तक्रारकर्त्याने दिनांक 4.4.2011 रोजी विरुध्दपक्षाच्या कार्यालयात भेट दिली असता, विरुध्दपक्षाने त्याच्या सहीचे एक पञ तक्रारकर्त्यास दिले. या पञानुसार एप्रिल महिण्यात सर्व गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत करण्याचे आश्वासन विरुध्दपक्षाने दिले. परंतु, आजपावेतो विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यास त्याची रक्कम परत केली नाही, त्यामुळे विरुध्दपक्षाने अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला असल्याचे दिसून येते. तक्रारकर्त्याने दिनांक 20.9.2015 रोजी दैनिक वृत्तपञ ‘पुण्य-नगरी’ या वृत्तपञाव्दारे विरुध्दपक्षास मंचात उपस्थित राहण्याबात सुचीत करण्यात आले होते. तरीसुध्दा विरुध्दपक्ष क्र.1 ते 3 उपस्थित राहीले नाही. वारंवार मंचात उपस्थित राहण्याकरीता नोटीस पाठवून देखील विरुध्दपक्ष क्र.1 व 2 मंचात उपस्थित झाले नाही. करीता दिनांक 22.8.2016 रोजी विरुध्दपक्ष क्रमांक 1 ते 3 विरुध्द तक्रार एकतर्फा चालविण्याचा निर्णय घेतला.
करीता, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
// अंतिम आदेश //
(1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजुर करण्यात येते.
(2) विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांना आदेशीत करण्यात येते की, विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांनी संयुक्तीकरित्या किंवा वैयक्तीकरित्या तक्रारकर्त्याचे रुपये 64,580/- द.सा.द.शे. 13 टक्के व्याजासह पैसे देय तारखेपर्यंत रक्कम तक्रारकतर्यास द्यावी.
(3) तसेच, विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांनी तक्रारकर्त्यास झालेल्या शारिरीक, मानसिक व आर्थिक ञासापोटी रुपये 4,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 2,000/- असे एकूण रुपये 6,000/- तक्रारकर्त्यास द्यावे.
(4) त्याचप्रमाणे विरुध्दपक्ष क्र.3 यांना निर्देशीत करण्यात येते की, त्यांनी विरुध्दपक्षाच्या संस्थेच्या जमा रकमेतून, अथवा त्यांच्या वैयक्तीक संपत्तीतून वरील रक्कम तक्रारकर्त्यास देण्यात यावी.
(5) विरुध्दपक्ष पक्षाने आदेशाचे पालन आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसाचे आत करावे.
(6) उभय पक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्क पाठविण्यात यावी.
नागपूर.
दिनांक :- 09/02/2017