:: निकालपत्र ::
(पारीत व्दारा श्री. भास्कर बी.योगी, मा.अध्यक्ष)
(पारीत दिनांक–09 जुलै,2021)
01. तक्रारकर्त्याने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 खाली विरुध्दपक्ष क्रं-1व क्रं-2 अनुक्रमे कल्पवृक्ष मार्केटींग प्रायव्हेट लिमिटेड ही वित्तीय कंपनी व सदर कंपनीचा एजंट यांचे विरुध्द त्याने विरुध्दपक्ष क्रं 1 कंपनीमध्ये मुदतठेवी मध्ये गुंतवणूक केलेल्या रकमा देयलाभांसह व व्याजासह मिळण्यासाठी दाखल केलेली आहे.
02.तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
तक्रारकर्ता हा सेवानिवृत्त शिक्षक असून त्याने सेवानिवृत्तीनंतर मिळालेल्या रकमेची गुंतवणूक करण्याचे ठरविले. यातील विरुध्दपक्ष क्रं 1कल्पवृक्ष मार्केटींग प्रायव्हेट लिमिटेड ही एक कंपनी असून ती ग्राहकां कडून ठेवी मुंतवणूकी करीता स्विकारते तर विरुध्दापक्ष क्रं 2 हा सदर कंपनीचा एजंट असून तो तक्रारकर्त्याचे गावात राहतो. विरुध्दपक्ष क्रं 2 एजंट याचे सांगण्यावरुन तक्रारकर्त्याने खालील प्रमाणे विरुध्दपक्ष क्रं 1 कंपनी मध्ये मुदतठेवी मध्ये रकमा गुंतवणूक केल्यात, त्याचे विवरण परिशिष्ट- अ प्रमाणे आहे.
-परिशिष्ट-अ-
अक्रं | दिनांक | मुदतठेव प्रमाणपत्राचा क्रमांक | मुदतठेवी मध्ये गुंतवणूक केलेली रक्कम | मुदतठेव परिपक्व दिनांक | परिपक्व दिनांका नंतर मिळणारी मुदतठेवीची रक्कम |
01 | 02 | 03 | 04 | 05 | 06 |
| | | | | |
01 | 19.12.2002 | 4600750746 | 50,000/- | 19.12.2003 | 55,000/- |
02 | 29.01.2003 | 4600830146 | 25,000/- | 29.01.2004 | 27,500/- |
03 | 20.02.2003 | 4600893646 | 20,000/- | 20.02.2004 | 22,000/- |
| | एकूण रक्कम | 95,000/- | | 1,04,500/- |
उपरोक्त परिशिष्ट- अ मध्ये दर्शविल्या प्रमाणे विरुध्दपक्ष क्रं 1 कंपनी मध्ये मुदतीठेवी मध्ये रकमा गुंतवणूक केल्यात, त्या बददल विरुध्दपक्ष क्रं 1 कंपनीने मुदतठेव प्रमाणपत्र् सुध्दा तक्रारकर्त्याला दिलेत व त्यामुळे तो विरुध्दपक्षांचा ग्राहक आहे. तो जेष्ठ नागरीक असून म्हातारपणाची सोय व्हावी म्हणून त्याने मुदतठेवी मध्ये रकमा गुंतवणूक केल्या होत्या. मुदतठेवीच्यापरिपक्व दिनांका नंतर तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं 1 कंपनी मध्ये परिपक्व रकमांची मागणी केली तसेच विरुदपक्ष क्रं 2 कंपनीच्या एजंटने सुध्दाविरुध्दपक्ष क्रं 1 कंपनी कडून रकमा लवकरात लवकर मिळवून देण्याचे वेळोवेळी आश्वासित केले होते परंतु आज पर्यंत त्याला रकमा मिळालेल्यानाहीत. अशाप्रकारे विरुध्दपक्ष क्रं 1 कंपनी आणि विरुध्दपक्ष क्रं 2 कंपनीचा एजंट यांनी त्याची फसवणूक केली, त्यामुळे त्याने विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 यांचे विरुध्द पोलीस स्टेशन, लाखनी, जिल्हा भंडारा येथे दिनांक-25.04.2016 रोजी तक्रार केली होती परंतु पोलीसांनी कोणतीही कार्यवाही न केल्यामुळे शेवटी त्याने जिल्हा ग्राहक आयोगा समोर तक्रार दाखल करुन विरुध्दपक्षां विरुध्द खालील प्रमाणे मागण्या केल्यात-
- विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या तिन्ही मुदतठेवीची परिपक्व तिथी नंतर देय रक्कम रुपये-1,04,500/- आणि सदर रकमेवर तिसरी मुदतठेव परिपक्व दिनांक-20.02.2004 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-15 टक्के दराने व्याज यासह येणारी रक्कम तक्रारकर्त्याला देण्याचे आदेशित व्हावे.
- विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 यांचे दोषपूर्ण सेवेमुळे त्याला झालेल्या शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्हणून रुपये-10,000/- आणि तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-5000/- विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या त्याला देण्याचे आदेशित व्हावे.
03. विरुध्दपक्ष क्रं 1 कल्पवृक्ष मार्केटींग प्रायव्हेट लिमिटेड वसई ठाणे पश्चीम या नाव आणि पत्त्यावर जिल्हा ग्राहक आयोगा मार्फतीने पाठविलेली रजिस्टर नोटीस तामील न झाल्यामुळे विरुध्दपक्ष क्रं 1 याचे नावाची जाहिर नोटीस दैनिक पुण्यनगरी या वृत्तपत्रा मध्ये दिनांक-17 जानेवारी, 2021 रोजी प्रसिध्द करण्यात आली परंतु विरुध्दपक्ष क्रं 1 कंपनी तर्फे कोणीही जिल्हा ग्राहक आयोगा समोर उपस्थित झाले नाही म्हणून विरुध्दपक्ष क्रं 1 याचे विरुध्द प्रस्तुत तक्रार एकतर्फी चालविण्याचा आदेश प्रकरणात दिनांक-04.03.2021 रोजी पारीत करण्यात आला.
04. विरुध्द पक्ष क्रं 2 श्री भेनाथ लक्ष्मण मोहतुरे याने जिल्हा ग्राहक आयोगा समोर उपस्थित होऊन आपले लेखी उत्तर दाखल केले. त्त्याने कधीही तक्रारकर्त्याला विरुध्दपक्ष क्रं 1 कल्पवृक्ष मार्केटींग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी मध्ये मुदतठेवी मध्ये रक्कम गुंतवणूक करण्यास सांगितलेले नाही. त्याचे विरुध्द प्रस्तुत तक्रार दाखल करण्यास कोणतेही कारण घडलेले नाही. सदर तक्रार चालविण्याचे कार्यक्षेत्र हे जिल्हा ग्राहक आयोग ठाणे यांना येते परंतु तक्रारकर्त्याने जिल्हा ग्राहक आयोग भंडारा येथे तक्रार दाखल केलेली असल्याने सदर तक्रार चालविण्याचे कार्यक्षेत्र जिल्हा ग्राहक आयोग भंडारा यांना येत नाही. तसेच प्रस्तुत तक्रार मुदती मध्ये येत नाही. त्याने कधीही तक्रारकर्त्याला मुदतठेवीच्या रकमा परत मिळवून देण्याचे आश्वासन दिलेले नाही. तक्रारकर्त्याने त्याचे विरुध्द तक्रारीतून केलेले सर्व आरोप नामंजूर केलेत. तक्रारकर्त्याची संपूर्ण तक्रार ही खोटी व काल्पनीक आहे. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 यांचे विरोधात दिनांक-24.04.2016 रोजी तक्रार केली होती याची त्याला माहिती नाही परंतु तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या रिपोर्ट वरुन त्याचे विरुध्द तक्रार केल्याचे दिसून येते परंतु सदर तक्रार खोटी असल्याने पोलीसांनी त्यावर कोणतीही कार्यवाही केलेली नाही. विरुध्दपक्ष क्रं 2 याने पुढे असे नमुद केले की, तक्रारकर्त्याचे गावातीलच लांजेवार कुटूंबा सोबत मालमत्तेचा वाद आहे आणि त्यामध्ये तंटामुक्तीचा अध्यक्ष म्हणून विरुध्दपक्ष क्रं 2 याचेकडे त्याने अर्ज केला होता परंतु तंटामुक्त समितीने तक्राकर्त्याचे विरोधात निर्णय दिल्याने विरुध्दपक्ष क्रं 2 हा विरुध्दपक्ष क्रं 1 कंपनीचा एजंट असल्याचा आरोप करुन खोटी व बनावट तक्रार दाखल केलेली आहे. त्याला विनाकारण या तक्रारीमध्ये प्रतिपक्ष केल्यामुळे सदर तक्रार ही खर्चासह खारीज करण्यात यावी असे विरुध्द पक्ष क्रं 2 याने नमुद केले.
05. तक्रारकर्त्याची तक्रार, त्याने दाखल केलेले दस्तऐवज, शपथे वरील पुरावा तसेच विरुध्दपक्ष क्रं 2 चे लेखी उत्तर ईत्यादीचे अवलोकन जिल्हा ग्राहक आयोगा तर्फे करण्यात आले. तक्रारकर्त्याचे वकील श्री महेंद्र गोस्वामी यांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला, त्यावरुन जिल्हा ग्राहक आयोगा समोर खालील मुद्दे न्यायनिवारणार्थ उपस्थित होतात-
अक्रं | मुद्दा | उत्तर |
01 | तक्रारकर्ता हा विरुदपक्षाचा ग्राहक होतो काय | होय |
02 | सदर तक्रार चालविण्याचे कार्यक्षेत्र जिल्हा ग्राहक आयोगास येते काय | होय |
03 | सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदी प्रमाणे मुदतीमध्ये आहे काय | होय |
04 | परिपक्वता तिथी उलटून गेल्या नंतरही तक्रारकर्त्याची मदत ठैवीची रक्कम परत न करुन विरुध्दपक्षाने दोषपूर्ण सेवा दिल्याची तक्रार सिध्द होते काय | -होय- |
05 | काय आदेश | अंतीम आदेशा नुसार |
-कारणे व मिमांसा-
मुद्दा क्रं 1 ते 5
06. तक्रारकर्त्याने तक्रारी मधील परिशिष्ट अ प्रमाणे विरुध्दपक्ष क्रं 1 कल्पवृक्ष मार्केटींग प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मध्ये मुदतठेवी मध्ये रकमा गुंतविल्या होत्या त्या संबधाने पुराव्या दाखल विरुध्दपक्ष क्रं 1 कंपनीने त्याचे नावे निर्गमित केलेल्या मुदतठेवीच्या पावत्यांच्या प्रती दाखल केलेल्या आहेत. त्या पावत्यांच्या अवलोकन केले असता तक्रारकर्त्याने परिशिष्ट – अ मध्येनमुद केलेल्या रकमा व परिपक्वता तिथी नंतर देय असलेल्या रकमा बरोबर असल्याचे दिसून येते. त्यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष क्रं 1 कंपनीचा ग्राहक होत असल्याची बाब सिध्द होत असल्यामुळे आम्ही मुद्दा क्रं 1 चे उत्तर होकारार्थी नोंदवित आहोत.
07. विरुध्दपक्ष क्रं 2 ने लेखी उत्तरात असा आक्षेप घेतला की, सदर तक्रार चालविण्याचे कार्यक्षेत्र हे जिल्हा ग्राहक आयोग, ठाणे यांना आहे कारण विरुध्दपक्ष क्रं 1 कंपनीचे कार्यालय हे ठाणे येथे आहे आणि त्यामुळे प्रस्तुत जिल्हा ग्राहक आयोगास तक्रार चालविण्याचे कार्यक्षेत्र नाही. नविन ग्राहक संरक्षण कायदा-2019 मधील तरतुदी प्रमाणे तक्रारकर्ता राहत असलेल्याठिकाणच्या जिल्हा ग्राहक आयोगास तक्रार चालविण्याचे कार्यक्षेत्र येते. तक्रारकर्त्याचे तक्रारी मध्ये अदयाप पर्यंत अंतिम निर्णय झालेला नसल्याने तक्रारी मध्ये निर्णय देण्याचे कार्यक्षेत्र् जिल्हा ग्राहक आयोगास येते. या शिवाय हे स्पष्ट करण्यात येते की, जुना ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम-11 (2) (ग) नुसार भंडारा जिल्हयात अंशतः तक्रारीमधील वादाचे कारण उदभवले असल्याने या आयोगाला सदर तक्रार ऐकण्याचे पूर्ण अधिकार येतात. त्यामुळे विरुध्दपक्ष क्रं 2 चे सदरचे आक्षेपा मध्ये काहीही तथ्य दिसून येत नाही आणि म्हणून सदर तक्रार चालविण्याचे कार्यक्षेत्र प्रस्तुत जिल्हा ग्राहक आयोगास येत असल्याने आम्ही मुद्दा क्रं 2 चे उत्तर होकारार्थी नोंदवित आहोत.
08. विरुध्दपक्ष क्रं 2 ने आपले लेखी उत्तरा मध्ये असाही आक्षेप घेतला की, ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदी प्रमाणे सदर तक्रार मुदतबाहय आहे. जो पर्यंत तक्रारकर्त्यास त्याने मुदतठेवी मध्ये गुंतवणूक केलेल्या रकमा देयलाभांसह मिळत नाही तो पर्यंत तक्रारीचे कारण सतत घडत असल्यामुळे तक्रार मुदतीत आहे आणि त्यामुळे आम्ही मुद्दा क्रं 3 चे उत्तर होकारार्थी नोंदवित आहोत.
09. तक्रारकर्त्याने परिशिष्ट- अ मध्ये नमुद केलया प्रमाणे रकमा विरुध्दपक्ष क्रं 1 कंपनी मध्ये गुंतवणूक केल्या बाबत पुराव्या दाखल मुदतठेवींच्या पावत्यादाखल केलेल्या आहेत, त्यावरुन असे दिसून येते की, सदर मुदतठेवी सन-2004 मध्ये परिपक्व होऊन आज पर्यंत म्हणजे सन-2021 पर्यंत त्याला मुदतठेवीच्या रकमा देयलाभांसह व व्याजासह मिळालेल्या नाहीत. त्याचे असे म्हणणे आहे की, विरुध्दपक्ष क्रं 2 जो विरुध्दपक्ष क्रं 1 कंपनीचा एजंट आहे याचे मार्फतीने वेळोवेळी सदर रकमांची मागणी केली परंतु विरुध्दपक्ष क्रं 1 कंपनीने आज पर्यंत त्याला रकमा दिलेल्या नाहीत त्यामुळे त्याची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्याने पोलीस स्टेशन लाखनी येथे दिनांक-25.04.2016 रोजी लेखी तक्रार केली परंतु पोलीसांनी कोणतीही कार्यवाही केलेली नाही, त्याने आपले कथनाचे पुराव्यार्थ पोलीस स्टेशन लाखनी येथे केलेल्या रिपोर्टची प्रत दाखल केलेली आहे. ईतकेच नव्हे तर विरुध्दपक्ष क्रं 1 कंपनीचे विरुध्द दैनिक पुण्यनगरी या वृत्तपत्रातून जाहिर नोटीस प्रकाशित करुन विरुध्दपक्ष क्रं 1 कंपनीला जिल्हा ग्राहक आयोगा समोर उपस्थित राहण्यास सुचित केले होते परंतु अशी जाहिर नोटीस प्रकाशित होऊनही विरुध्दपक्ष क्रं 1 कंपनी तर्फे कोणीही जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष उपस्थित झाले नाही वा त्यांनी आपले लेखी उत्तर दाखल केले नाही तसेच तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं 1 कंपनी विरुध्द केलेले आरोप खोडून काढलेले नाहीत. वरील सर्व परिसिथतीजन्य पुराव्या वरुन असा निष्कर्ष निघतो की, विरुध्दपक्ष क्रं 1 कंपनीने आज पर्यंत तक्रारकर्त्याला त्याच्या मुदतठेवी परिपक्व होऊनही त्यारकमा देयलाभांसह आणि व्याजासह परत दिले नाहीत आणि विरुध्दपक्ष क्रं 2 हा तक्रारकर्त्याच्या गावात राहणारा असून त्याने तक्रारकर्त्यास विरुध्दपक्ष क्रं 1 कंपनी मध्ये मुदतठेवीची रक्कम गुंतवणूक करण्यास सांगितले नव्हते हे विरुध्दपक्ष क्रं 2 याचे कथन मान्य नाही कारण की विरुध्दपक्ष क्रं 1 कंपनीचे कार्यालय हे ठाणे (मुंबई) येथे असून तक्रारकर्ता स्वतः तेथे गेले नाहीत आणि विरुध्दपक्ष क्रं 1 कंपनी ही तक्रारकर्त्याचे गावात आलेली नाही. त्याच बरोबर तक्रारकर्त्याने शपथे वर पुरावा दाखल करुन नमुद केले आहे की, विरुध्दपक्ष क्रं 2 ने गुंतवणूक करीता पैसे स्विकारले होते यावरुन हे स्पष्ट आहे की, दोन्ही विरुध्दपक्षांनी तक्रारकर्त्याची फसवणूक केलेली आहे म्हणून दोन्ही विरुध्दपक्षांनी तक्रारकर्त्याला दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब सिध्द होते आणि अनुचित व्यापारी पध्दतीचा अवलंब केल्याची बाब सिध्द होते म्हणून मुद्दा क्रं 4 चे उत्तर आम्ही होकारार्थी नोंदवित आहोत.
10. वर नमुद केल्या प्रमाणे मुद्दा क्रं 1 ते 4 यांचे उत्तर होकारार्थी आल्याने तक्रारकर्त्याची तक्रार विरुध्दपक्ष क्रं 1 कंपनी व विरुध्दपक्ष क्रं 2 विरुध्द अंशतः मंजूर करण्यात येते आणि मुद्दा क्रं 5 अनुसार सदर तक्रारी मध्ये खालील प्रमाणे अंतिम आदेश पारीत करण्यात येत आहे-
::अंतिम आदेश::
- तक्रारकर्त्याची तक्रार विरुध्दपक्ष क्रं-1 कल्पवृक्ष मार्केटींग प्रायव्हेट लिमिटेड, ठाणे ही कंपनी आणि विरुध्दपक्ष क्रं 2 यांचे विरुध्द वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या खालील प्रमाणे अंशतः मंजूर करण्यात येते.
- विरुध्दपक्ष क्रं-1 कंपनी व विरुध्दपक्ष क्रं 2 यांना आदेशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्त्याला मुदत ठेवीच्या परिपक्व रकमा व त्यावरील व्याज खालील प्रमाणे दयावेत-
अ) विरुध्दपक्ष क्रं 1 कंपनी व विरुध्दपक्ष क्रं-2 यांनी तक्रारकर्त्याला मुदत ठेव क्रमांक 4600750746 परिपक्व दिनांक-19.12.2003 प्रमाणे देय रक्कम रुपये-55,000/- आणि त्यावर परिपक्व दिनांका नंतर म्हणजे दिनांक-20/12/2003 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9 टक्के दराने व्याजाची रक्कम अदा करावी.
ब) विरुध्दपक्ष क्रं 1 कंपनी व विरुध्दपक्ष क्रं 2 यांनी तक्रारकर्त्याला मुदत ठेव क्रं-4600830146 परिपक्व दिनांक-29.01.2004 प्रमाणे देय रक्कम रुपये-27,500/- आणि त्यावर परिपक्व दिनांका नंतर म्हणजे दिनांक-30.01.2004 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पोवते द.सा.द.शे.-9 टक्के दराने व्याजाची रक्कम अदा करावी.
क) विरुध्दपक्ष क्रं 1 कंपनी व विरुध्दपक्ष क्रं 2 यांनी तक्रारकर्त्याला मुदत ठेव क्रं-4600893646 परिपक्व दिनांक-20.02.2004 प्रमाणे देय रक्कम रुपये-22,000/- आणि त्यावर परिपक्व दिनांका नंतर म्हणजे दिनांक-21.02.2004 पासून ते रकमेच्या प्रतयक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9 टक्के दराने व्याजाची रक्कम अदा करावी.
- विरुध्द पक्ष क्रं 1 कंपनी व विरुध्दपक्ष क्रं 2 यांनी तक्रारकर्त्याला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल भरपाई म्हणून रुपये-20,000/- (अक्षरी रुपये विस हजार फक्त) आणि प्रस्तुत तक्रारीचा खर्च रुपये-5000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्त) अशा रकमा दयाव्यात.
(4) विरुध्दपक्ष क्रं 2 हा सदर आदेशा नुसार तक्रारकर्त्याला अदा केलेली रक्कम स्वतंत्ररित्या विरुध्दपक्ष क्रं 1 कंपनी कडून कायदया नुसार वसूल करु शकतो.
- सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं- 1 कल्पवृक्ष मार्केटींग प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आणि विरुध्दपक्ष क्रं 2 यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या प्रस्तुत निकालपत्राची प्रथम प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांकापासून 30 दिवसांचे आत करावे.
(06) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
(07) उभय पक्षां तर्फे दाखल अतिरिक्त फाईल्स त्यांना परत करण्यात याव्यात.