तक्रार दाखल ता.11/03/2015
तक्रार निकाल ता.17/03/2017
न्यायनिर्णय
द्वारा:- - मा. अध्यक्षा –सौ. सविता पी.भोसले.
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम-12 प्रमाणे दाखल केला आहे.
2. तक्रार अर्जातील थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे:-
तक्रारदार हे मु.पो.सरवडे, ता.राधानगरी, जि.कोल्हापूर येथील कायमस्वरुपी रहिवाशी असून त्यांचा शेती हा व्यवसाय आहे. वि.प.हे टिशुकल्चर लॅब व नर्सरीचा व्यवसाय करतात. तक्रारदार यांनी वि.प.यांचेकडून श्री.नामदेव विष्णु मुसळे यांचेमार्फत दि.06.06.2014 रोजी 500 नग टिश्यु कल्चर बनाना प्लॅन्टस रक्कम रु.6,250/- ला खरेदी केले. तक्रारदारांनी दि.06.06.2014 रोजी 500 नग टिश्यु कल्चर बनाना प्लॅन्टस हे श्री.नामदेव विष्णु मुसळे यांचेमार्फत वि.प.कडून खरेदी केलेली असलेने सदरहू रोपांचे बिल हे श्री.नामदेव विष्णु मुसळे यांचे नावे आहे. तक्रारदाराने सदर रोपांची लावण त्यांचे मालकीचे सरवडे, ता.राधानगरी, जि.कोल्हापूर येथील गट नं.793 मध्ये केलेली आहे. लागवडीनंतर लगेचच 15 दिवसांत लागण केलेल्या रोपांमध्ये ब-याचशा रोपांना बंचीटॉप (पुर्णगुच्छ) या रोगांची लागण झालेचे निदर्शनास आले. त्यावेळी तकारदार यांनी वि.प.यांना फोन करुन सदर रोगांची माहिती दिली असता, वि.प.यांनी रोगाची लागण झालेली रोपे नष्ट करण्यास सांगितले त्याप्रमाणे व वेगवेगळया औषधांचा वापर करण्यास सांगितले त्याप्रमाणे वि.प.यांचे सांगणेवरुन तक्रारदाराने रोगाची लागण झालेली रोपे नष्ट केली. तसेच वि.प.ने दिले सुचनेनुसार औषधांची फवारणी केली. तथापि त्यानंतर दर आठवडयाला त्या रोगाचा प्रसार इतका वाढला की, 3 महिन्यात कमीत कमी 200 ते 250 रोपांना या रोगाची लागणी होऊन ती रोपे खराब व नष्ट करणेत आली. त्यामुळे बागेचे फार मोठे नुकसान झाले. सदरची बाब तक्रारदाराने वि.प.यांचे निदर्शनास आणून दिली असता, वि.प.ने तक्रारदाराला उडवाउडवीची उत्तरे देऊन टाळले.
3. माहे नोव्हेंबर, 2014 मध्ये तक्रारदाराने मा.तालुका कृषी अधिकारी, कृषी विभाग, कोल्हापूर यांचेकडे तक्रार केली. सदर तक्रारीची दखल घेऊन तालुका स्तरीय तक्रार निवारण समितीची स्थापना करण्यात येऊन अहवाल मागविण्यात आला. सदर तालुका स्तरीय समितीने दि.19.11.2014 रोजी तक्रारदार यांचे शेतामध्ये प्रत्यक्ष भेट घेऊन पाहणी केली. सदर पाहणीचे वेळा स्वत: तक्रारदार व इतर शेतकरी उपस्थित होते.
4. तालुका स्तरीय निवारण समितीने दि.04.12.2014 रोजीचा अहवाल दिला असून सदरच्या अहवालाप्रमाणे वि.प.यांनी तक्रारदार यांना उतीसंवर्धीत रोपे पुरविल्यामुळे सदरचा रोग झाला असून शेतक-यांच्या नुकसानीस वि.प.हेच जबाबदार आहेत असा अहवाल आलेनंतर तक्रारदार वि.प.यांचेशी संपर्क साधून नुकसानभरपाईची मागणी केली असता, वि.प.यांनी तक्रारदारांना नुकसानभरपाई देणेस नकार दिला व तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे. सबब, वि.प.यांचेकडून तक्रारदाराचे झाले नुकसानीची रक्कम वसुल होऊन मिळणेसाठी तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज या मे.मंचात दाखल केला आहे.
5. तक्रारदाराने प्रस्तुत कामी वि.प.यांचेकडून नुकसानभरपाई रक्कम रु.1,10,000/- वसुल होऊन मिळावी, मानसिक त्रासापोटी रक्कम रु.25,000/- तसेच अर्जाचा खर्च रक्कम रु.5,000/-, नोटीसीचा खर्च रक्कम रु.1,000/- वसुल होऊन मिळावा. प्रस्तुत सर्व रक्कमेवर दि.04.12.2014 रोजीपासून पूर्ण परतफेड होईपर्यंत द.सा.द.शे.18टक्के व्याज देणेबाबत आदेश व्हावा अशी विनंती तक्रारदाराने या कामी केली आहे.
6. तक्रारदाराने प्रस्तुत कामी अॅफीडेव्हीट, निशाणी-3 चे कागद यादीसोबत अ.क्र.1 ते 5 कडे तक्रारदाराचे 7/12 उतारा, समितीचा अहवाल, नोटीस, नोटीस उत्तर, तालुका तक्रार निवारण समितीचा क्षेत्रीय भेटीचा अहवाल, तक्रारदाराने वि.प.ला वकीलामार्फत पाठविलेली नोटीस, वि.प.यांनी तक्रारदाराला वकीलामार्फत पाठविलेली नोटीस, दि.01.02.2016 रोजीचे तक्रारदाराचे पुराव्याचे शपथपत्र, दि.01.02.2016 रोजीचे तक्रारदार तर्फे तक्रारदारांचे मित्राचे वडील-श्री.नामदेव विष्णु मुसळे यांचे शपथपत्र, पुरावा संपलेची पुरशिस, वगैरे कागदपत्रे तक्रारदाराने या कामी दाखल केलेली आहेत.
7. वि.प.यांनी प्रस्तुत कामी म्हणणे/कैफियत, दुरुस्ती अर्जास जादा म्हणणे, पुराव्याचे शपथपत्र, ICAR National Research Centre for Banana ची माहितीपत्रक, कॅलस बायोटेकचे माहितीपुस्तिका, वि.प.ने तक्रारदाराला पाठविलेली नोटीस उत्तर, लेखी युक्तीवाद, मे.वरिष्ठ न्यायालयांचे न्यायनिवाडे, उपविभागीय कृषी अधिकारी, करवीर यांनी वि.प.यांना दिले तक्रार अहवालाची प्रत, तक्रारदाराचे तक्रारी संबंधीत दिलेले कृषी अधिका-यांचे अहवाल, तक्ररदाराला दिलेली नोटीस तसेच जाबदार तर्फे साक्षीदार क्र.1 तर्फे-श्री.सुदर्शन शिवाजीराव चव्हाण यांचे शपथपत्र, अॅड.मोरे यांनी वि.प.ला पाठविलेली नोटीस, वगैरे कागदपत्रे वि.प.ने प्रस्तुत कामी दाखल केलेली आहेत.
8. वि.प.यांनी कैफियतीमध्ये तक्रारदाराचे तक्रार अर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत. वि.प.ने तक्रारदाराचे तक्रार अर्जावर पुढीलप्रमाणे आक्षेप नोंदवलेले आहेत.
अ तक्रारदाराचा तक्रार अर्ज व त्यातील कथने मान्य व कबुल नाही.
ब तक्रारदार यांनी श्री.नामदेव विष्णू मुसळे यांचेकडून टिश्यु कल्चर बनाना प्लँटस नग 500, रक्कम रु.6,250/- ला खरेदी केलेचे मान्य आहे. वि.प.यांनी तक्रारदारास केव्हाही व कधीही 500 नग टिश्यु कल्चर बनाना प्लॅंटची विक्री तक्रारदार यांना केलेली नाही. तक्रारदार यांनी लागणी केलेली रोपे ही वि.प.यांचेकडून घेतले नसलेचे स्पष्टपणे सांगितले.
क तक्रारदाराने दि.15.01.2015 रोजी वकीलांमार्फत पाठविले नोटीसीमधील गट नंबर व प्रस्तुत तक्रार अर्जात नमुद केलेले गट नंबर हे भिन्न भिन्न आहेत. त्यामुळे तक्रारदाराने पाठविलेली नोटीस ही केवळ वि.प.ला त्रास देणेसाठी तयार केलेचे स्पष्ट होते. तसेच वि.प.यांचेकडून रक्कम उकळणेसाठी पुर्णपणे चुकीची व तथ्यहीन तक्रार तक्रारदाराने वि.प. विरुध्द केली आहे.
ड प्रस्तुत तक्रारीच्या अनुषंगाने दिलेला अहवाल हा चुकीचा व सदोष आहे. तसेच वस्तुस्थिती विरोधी आहे. तसेच प्रस्तुत तक्रारीतील किडी/रोगांचा प्रादुर्भाव निरंक असलेचे स्पष्टपणे नमुद केलेले आहे. त्याचप्रमाणे सदर अहवाल, तक्रारदाराने लावण केलेली रोपे व त्याने विक्री केलेल्या रोपांची तथाकथित संख्या विचारात घेतली असता, त्याचा ताळमेळ लागत नाही. तसेच प्रस्तुत पिक पाहणी दिसून वि.प.ने ब-याच हरकती घेऊन सुध्दा त्यांचा कोणताही विचार संबंधीत कृषी अधिकारी यांनी केला नाही व केवळ तक्रारदार व अन्य शेतक-यांच्या दबावास बळी पडून सदरचा तथाकथित अहवाल तयार केला आहे. प्रस्तुत समितीच्या अहवालानुसार वि.प.यांनी तक्रारदारांना उतीसंर्वधीत रोपे पुरविल्यामुळे सदरचा रोग झाला असून शेतक-यांच्या नुकसानीस वि.प.हे जबाबदार असून वि.प.ने तक्रारदाराला नुकसानभरपाई देणेस टाळाटाळ केली हे खोटे व चुकीचे आहे. तक्रारदार हे मागणी केलेली नुकसानभरपाईची रक्कमही दुरस्थ नुकसानभरपाई (Remote Damage) अशी होते व अशी तथाकथित नुकसानभरपाई मागणेचा हक्क व अधिकार तक्रारदारास नाही, तक्रारदाराचे नोटीसला वि.प.ने समाधानकारक उत्तर दिलेले आहे. रोपांची विक्री केलेनंतर त्यांची नंतरची कोणतीही जबाबदारी वि.प.यांचे वर राहत नाही अशा रोपांची निगा व काळजी त्या त्या संबंधीत शेतक-याने घेणेची असते.
इ वि.प.यांची कॅलस बायोटेक प्रा.लि. या नावाची टिश्यु कल्चर लॅब असून त्या ठिकाणी वि.प.हे टिश्यू कल्चर पध्दतीने केळाची रोपे उत्पादित करतात. केळी हा असा प्रकार आहे की त्याचे रोप नसते. केळीच्या झाडास आलेल्या कोंबापासून असे टिश्यु कल्चर निर्माण करणेचा वि.प.यांचा व्यवसाय आहे असे टिश्यु कल्चर निर्माण करणेस बरीच मोठी प्रक्रिया आहे. वि.प.हे केळीच्या झाडातून जमीनीत आलेल्या एका छोटया कोंबापासून प्रयोग शाळेमध्ये टिश्यु कल्चर निर्माण करतात असे निर्माण करणेची प्रक्रिया कमीत कमी आठ ते दहा महिने कालावधीकरीता चालते. त्यानंतर असे केळीचे तयार झालेले टिश्यु कल्चर सशक्तीकरणाकरीता साधारण चार ते सहा महिने कालावधीकरीता बाहेर जमीनीत संगोपले जातात. असे संगोपलेले व उत्तम प्रतीचे तसेच कोणताही रोग नसलेले निरोग टिश्युकल्चर वि.प.शेतक-यांना पुढील लागवडीसाठी विक्री करतात. रोप एकदा विक्री केल्यानंतर त्याची कोणतीही जबाबदारी वि.प.यांचेवर रहात नाही व अशा रोपांची पुर्णपणे निगा व खबरदारी ज्या त्या संबंधीत शेतक-याने घेणेची असते.
ई वि.प.यांनी तक्रारदारास दि.06.06.2014 रोजी 500 नग टिश्यू कल्चर बनाना प्लँटसची विक्री कधीही केलेली नाही. वि.प.यांचेकडून तक्रारदाराने अशा रोपांची खरेदी केलेली नाही व तसा वि.प. व तक्रारदार यांचेत कोणताही व्यवहार झालेला नाही.
तक्रारदाराने कृषी विभाग यांचेकडे तक्रार केलेनंतर, त्या अनुषंगाने गट नं.793 मधील रोपांची तपासणी होऊन पंचनामा झाला. सदरचा पंचनामा पूर्णपणे सदोष आहे. ती समिती रोपे तपासणीकरीता आली होती. वि.प.यांनी समितीसमोर तक्रारदारांना कोणतेही रोपे विक्री केले नसलेचे स्पष्टपणे सांगितले व तक्रारदारांकडून बिलाची मागणी करावी अशी विनंती केली. वि.प.यांचेकडून रोपे विकत घेतले नसलेची बाब तक्रारदारांनी समितीसमोर मान्य केले. तरीसुध्दा समितीने पुर्णपणे चुकीचा पंचनामा तयार केला. तक्रारदार यांचे शेतातील रोपांचा व वि.प.यांचा काहीही संबंध नाही. त्यामुळे तक्रारदारांचे तथाकथित नुकसानीस वि.प.बिलकुल जबाबदार नाहीत.
उ तक्रारदाराने वि.प.यांना विनाकारण त्रास देणेच्या उद्देशाने सदरचा तक्रार अर्ज दाखल केला असून तक्रारदाराचे वि.प.यांचेवर केलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत. त्यामुळे तक्रार अर्ज चालवणेस पात्र नाही. तक्रारदारांची तक्रार Vexatious and Frivoluas अशी आहे. सबब, तक्रारदाराचा तक्रार अर्ज खर्चासह फेटाळणेत यावा अशा स्वरुपाचे आक्षेप वि.प.ने तक्रार अर्जावर नोंदवलेले आहेत.
9. वर नमुद तक्रारदार व वि.प. यांनी दाखल केले सर्व कागदपत्रांचे, पुराव्याचे लेखी व तोंडी युक्तीवाद, वगैरेचे अवलोकन करुन मे.मंचाने प्रस्तुत तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | तक्रारदार व वि.प.हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ? | होय |
2 | वि.प.ने तक्रारदाराला सदोष सेवा दिली आहे काय ? | होय |
3 | तक्रारदार वि.प.यांचेकडून नुकसानभरपाई मिळणेस पात्र आहेत काय ? | होय |
4 | अंतिम आदेश काय ? | खालील नमुद आदेशाप्रमाणे |
विवेचन:-
10. मुद्दा क्र.1 ते 4:- वर नमुद मुद्दा क्र. 1 ते 3 चे उत्तर आम्हीं होकारार्थी देत आहोत कारण तक्रारदार यांनी श्री.नामदेव विष्णु मुसळे यांचेमार्फत वि.प.यांचेकडून दि.06.06.2014 रोजी 500 नग टिश्यु कल्चर बनाना प्लॅन्टस रक्कम रु.6,250/- या किंमतीस खरेदी केली आहेत. तक्रारदारांनी दि.06.06.2014 रोजी 500 नग टिश्यु कल्चर बनाना प्लॅन्टस हे वि.प.कडून मात्र श्री.नामदेव विष्णु मुसळे यांचेमार्फत खरेदी केलेली असलेने सदरहू रोपांचे बिल हे श्री.नामदेव विष्णु मुसळे यांचे नावे आहे. प्रस्तुत खरेदीची पावती तक्रारदाराने या कामी दाखल केली आहेत. तसेच सदरची बाब वि.प.यांनी मान्य व कबुल केली आहे. ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम-2(1)(d) ची संज्ञा पुढीलप्रमाणे-
Section-2 (1)(d) “consumer” means any person who,–
(i) buys any goods for a consideration which has been paid or promised or partly paid and partly promised, or under any system of deferred payment and includes any user of such goods other than the person who buys such goods for consideration paid or promised or partly paid or partly promised, or under any system of deferred payment when such use is made with the approval of such person, but does not include a person who obtains such goods for resale or for any commercial purpose; or
(ii) hires or avails of any services for a consideration which has been paid or promised or partly paid and part by promised, or under any system of deferred payment and includes any beneficiary of such services other than the person who hires or avails of the services for consideration paid or promised, or partly paid and partly promised, or under any system of deferred payment, when such services are availed of with the approval of the first mentioned person.
सबब, तक्रारदार व वि.प.हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत ही बाब निर्वीवादपणे स्पष्ट व सिध्द झालेली आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
11. तसेच तक्रारदाराने सदर रोपांची लागण त्यांचे मालकीचे सरवडे, ता.राधानगरी, जि.कोल्हापूर येथील गट नं.793 मध्ये केलेली आहे. लागणीनंतर लगेचच 15 दिवसांत लागण केलेल्या रोपांमध्ये ब-याचशा रोपांना बंचीटॉप (पुर्णगुच्छ) या रोगाची लागण झालेचे निदर्शनास आले. त्यावेळी तक्रारदारांनी वि.प.यांना फोन करुन सदर रोगाची माहिती दिली असता, वि.प.यांनी तक्रारदाराला रोगाची लागण झालेली रोपे नष्ट करणेस सांगितले व वेगवेगळया औषधांचा वापर करणेस सांगितले. तसेच रोगाचा प्रसार होणार नाही अशी हमी दिली. त्याप्रमाणे तक्रारदाराने रोगग्रस्त रोपे नष्ट केली व उर्वरीत रोपांवर वि.प.चे सांगणेवरुन औषधांची फवारणी केली. तथापि त्यानंतरही दर आठवडयाला या रोगाचा प्रसार इतका वाढला की, तीन महिन्यात कमीतकमी 200 ते 250 रोपांना या रोगाची लागण होऊन ती रोपे खराब झाली व नष्ट करण्यात आली. त्यामुळे बागेचे फार मोठे नुकसान झाले. सदरची बाब तक्रारदाराने वि.प.यांचे निदर्शनास आणून दिली असता, वि.प.ने टाळाटाळ केली. त्यामुळे तक्रारदाराने नोव्हेंबर, 2014 मध्ये मा.तालुका कृषी अधिकारीसो, कृषी विभाग, कोल्हापूर आणि कृषी अधिकारीसो पंचायत समिती राधानगरी, जि.कोल्हापूर यांचेकडे तक्रार केली. सदर तक्रारीची दखल घेऊन तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीची स्थापना करण्यात येऊन अहवाल मागविण्यात आला. सदर तालुकास्तरीय समितीमध्ये उपविभागीय कृषी अधिकारी व अन्य कृषीतज्ञ यांचा समावेश होता. प्रस्तुत दि.19.11.2014 रोजी तक्रारदाराचे शेतामध्ये प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. सदर पाहणीवेळी वि.प.स्वत: तक्रारदार व इतर शेतकरी उपस्थित होते. प्रस्तुत पाहणीवरुन तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीने दि.04.12.2014 रोजी अहवाल दिला असून सदरच्या अहवालाप्रमाणे “वि.प.यांनी तक्रारदारांना उतीसंवर्धीत रोपे पुरविल्यामुळे सदरचा रोग झाला असून शेतक-यांच्या नुकसानीस वि.प. जबाबदार आहेत” असा अहवाल दिला. त्यानंतर तक्रारदाराने वि.प.यांचेशी संपर्क साधून नुकसानभरपाईची मागणी केली असता, वि.प.यांनी तक्रारदाराला नुकसानभरपाई देणेस स्पष्टपणे नकार दिला, ही बाब दाखल सर्व कागदपत्रांवरुन स्पष्ट होते. म्हणजेच तक्रारदारांना वि.प.ने उतीसंर्वधीत रोपांची विक्री करुन अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेचे स्पष्ट व सिध्द झाले आहे. तसेच तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीने दिले अहवालानुसार सुध्दा तक्रारदाराने नुकसानीची मागणी करुन देखील वि.प.ने तक्रारदाराला कोणतीही नुकसानभरपाई दिली नाही तर नुकसानभरपाई देणेस वि.प.ने नकार दिला आहे. सबब, तक्रारदारांना वि.प.ने सदोष सेवा पुरविलेचे तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीचे अहवालावरुन स्पष्ट व सिध्द झाले आहे. सबब, मुद्दा क्र.2 चे उत्तर आम्हीं होकारार्थी दिले आहे.
12. वि.प.ने दाखल केलेल्या माहितीपत्रकात केळीच्या बागेत अंतरपिके घेऊ नयेत अंतरपिके घेतलेने उत्पन्न कमी होते तसेच बागेत वेलवर्गीय अंतरपिके घेऊ नयेत, उदा.कलींगड, काकडी, दोडका, मिरची, इत्यादी असे नमुद आहे. तक्रारदाराने वर नमुद वेलवर्गीय आंतरपिके घेतली नव्हती तर मिरची हे अंतरपीक घेतलेचे स्पष्ट होते. परंतु त्यामुळे बंचीटॉप रोग पडला हे सिध्द होत नाही. कारण तक्रारदाराची तक्रार ही उत्पन्न कमी प्रमाणात मिळाले या संदर्भात नसून वि.प.ने तक्रारदाराला विक्री केलेली रोपे ही रोगग्रस्त/उतीसंर्वधीत असलेने पुर्णगुच्छ जादाचा रोग- केळीच्या रोपांवर पडलेबाबत व नुकसानीबाबत दाखल केली आहे. त्यामुळे तक्रारदाराने आंतरपीक भुईमुग घेतलेने रोगांचा प्रादुर्भाव झाला हा निष्कर्ष काढणे न्यायोचित होणार नाही.
13. प्रस्तुत कामी, तक्रारदाराने दोनवेळा तालुका स्तरीय कृषी समितीचा अहवाल क्षेत्रीय भेटीचा अहवाल पंचनामा दाखल केला आहे. ते पुढीलप्रमाणे:-
1. दि.04.12.2014 रोजीचा तालुका स्तरीय तक्रार निवारण समितीचा क्षेत्रीय भेटीचा अहवालामध्ये पुढीलप्रमाणे निष्कर्ष मांडलेले आहेत.
-“तक्रारीचे पार्श्वभूमीवर केळी प्रक्षेत्रास भेट दिली असता, प्राथमिक माहितीनुसार लावणीनंतर 20 ते 25 दिवसांनी 65 रोपे काढून टाकणेत आली आहेत. दि.19.11.2014 रोजी साधारण केळीचे वय साडे पाच ते सहा महिने असून काही झाडे रोगग्रस्त दिसून आली आहेत. रोगाची लक्षणे गेल्या 10 ते 15 दिवसांपुर्वी सुरु झाल्याचे दिसते. उपलब्ध संदर्भीय संशोधन अवलोकनीय होता, पर्णगुच्छ हा रोग विषाणुजन्य असून रोगाचा प्रसार प्रामुख्याने रोगग्रस्त मुनवे व त्यांची उती संवर्धता रोपे व केळीवरील मावा (Pentalogonia Nigronervasa) या मार्फत होतो. हा रोग 70 ते 125 दिवसांपर्यंत झाडामध्ये सुप्त अवस्थेत राहू शकतो व लागणीनंतर 20 ते 25 दिवसानंतर लक्षणे दाखवण्यास सुरुवात करतो. प्रक्षेत्र भेटी दरम्यान केळी पिकाच्या सभोवताली ऊस हेच प्रमुख पिक आढळून आले. केळीच्या बागेमध्ये विविध भाजीपाला वर्गीय आंतरपिके घेतलेली आहेत. ऊस व भाजीपाला वर्गातील माव्याच्या प्रजाती वेगळया असून त्यांचा या रोगाच्या प्रसारामध्ये काहीही संबंध नाही. रोगाच्या प्रादुर्भाव हा उतीसंवर्धीत रोपापासून झाल्याची शक्यता आहे. साडेपाच ते सहा महिन्याच्या पिकामध्ये सध्या काही रोपांवर रोगांचा प्रादुर्भाव अल्प प्रमाणात दिसून आला. हा प्रादुर्भाव पुर्वीच झाला असल्याची शक्यता आहे. रोगाच्या गुणधर्मानुसार रोप लागणीनंतर 70 ते 125 दिवसांपर्यंत झाडावर लक्षणे दिसु लागली आहेत. परंतु भारतीय हवामान विभागानुसार पश्चिम घाट व कोकण विभागामध्ये सदर रोगावर संशोधनाचे निष्कर्ष उपलब्ध नाहीत. समितीच्या पाहणी दिवसांपर्यंत एकूण 85 रोपे रोगग्रस्त असल्याचे आढळले” प्रस्तुत तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीचे अहवाल हा उक्त कारणासाठी घेतला आहे व अहवाल पुराव्यात वाचणे न्यायोचित होणार आहे. तसेच पंचनाम्यामध्ये तक्रार अर्जात नमुद केलेप्रमाणे तक्रारदाराचे केळी पिकाचे नुकसान झालेचे म्हटले आहे.
14. म्हणजेच तक्रारदाराने तक्रार अर्जात नमुद केलेली कथने भारतीय पुराव्याच्या कायद्यातील तरतुदीप्रमाणे सबळ पुराव्यासह शाबीत केली आहेत तर वि.प.यांनी त्यांनी तक्रार अर्जावर म्हणणे/कैफियतीत घेतलेले आक्षेप सिध्द करणेसाठी माहितीच्या अधिकाराअंतर्गत ICAR-National Research Centre for Banana यांचेकडून मागवलेली माहिती या कामी दाखल केली आहे. तसेच कॅलस बायोटेक ही माहितीपुस्तिका व पुराव्याचे शपथपत्र तक्रारदाराने दाखल केले. तक्रार अर्जातील कथने खोडून काढणेसाठी इतर कोणताही पुरावा या कामी वि.प.ने दाखल केलेला नाही, म्हणजेच तक्रारदाराने दाखल केले तक्रार निवारण समितीचे अहवालातील नमुद निष्कर्ष वि.प.ने मुद्देसुद खोडून काढलेले नाहीत किंवा अहवाल खोटा आहे हे सिध्द करणेसाठी कोणताही पुरावा या कामी वि.प.ने दाखल केलेला नाही. सबब, वि.प.ने त्यांचे कैफियतीत नमुद कथने शाबीत केलेली नाहीत.
15. सबब, या कामी वि.प.यांनी तक्रारदाराला विक्री केलेली वादातीत केळीची रोपे ही उतीसंवर्धीत व सदोष तसेच भेसळयुक्त होती ही बाब शाबीत झाली आहे. तसेच त्यामुळे तक्रारदाराचे सरासरी उत्पन्नामध्ये घट झालेली आहे हे स्पष्ट झाले आहे. सबब, वि.प.ने तक्रारदाराला सदोष व भेसळयुक्त व उतीसंवर्धीत रोपांची विक्री करुन अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे हे स्पष्ट व सिध्द झाले आहे. सबब, वर नमुद विवेचन, कागदपत्रे व कृषी समितीचे (तक्रार निवारण समितीचे) अहवाल यांचा ऊहापोह करता, प्रस्तुत कामी तक्रारदार हे वि.प.यांचेकडून नुकसानभरपाई मिळणेस पात्र आहेत असे या मे.मंचाचे स्पष्ट मत आहे.
16. परंतु तक्रारदाराने या कामी तक्रार अर्जात मागणी केलेप्रमाणे रक्कम रु.1,10,000/- चे नुकसान कसे झाले ? या पूर्वी सरासरी किती उत्पन्न मिळत होते ? हे सिध्द करणेसाठी कोणताही पुरावा या कामी दाखल केलेला नाही. तरीही मे.कोर्टास असले अधिकारानुसार तक्रारदाराचे सरासरी वार्षिक उत्पन्न गृहीत धरुन या कामी तक्रारदाराचे सर्वसाधारणपणे रक्कम रु.80,000/- चे नुकसान झाले असावे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, तक्रारदार हे वि.प.यांचेकडून पुढीलप्रमाणे नुकसानभरपाई मिळणेस पात्र आहेत.
अ. उतीसंवर्धीत व भेसळयुक्त रोपांमुळे तक्रारदाराचे झालेले नुकसान रक्कम रु.80,000/- (अक्षरी रक्कम रूपये ऐंशी हजार फक्त) अर्ज दाखल तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे.9टक्के व्याजदराने,
ब. शारिरीक व मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- (अक्षरी रक्कम रूपये दहा हजार फक्त) तसेच तक्रार अर्जाचा खर्च रक्कम रु.5,000/- (अक्षरी रक्कम रूपये पाच हजार फक्त) अशी नुकसानभरपाई वि.प.कडून मिळणेस तक्रारदार पात्र आहेत असे या मे.मंचाचे स्पष्ट मत आहे.
या कामी वि.प.ने मे.तत्कालीन मंचाचे न्यायनिवाडे दाखल केले आहेत. परंतु सदर न्यायनिवाडे या मे.मंचावर बंधनकारक नाहीत. तसेच वि.प.ने दाखल केलेला मे.राज्य आयोगाचा दाखल केलेला न्यायनिवाडा या कामी लागू होत नाही असे आमचे स्पष्ट मत आहे.
17. सबब, या कामी आम्हीं खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1. तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.
2. तक्रारदार यांना वि.प.यांनी उत्तीसंवर्धीत रोपे पुरविलेने झाले नुकसानीपोटी रक्कम रु.80,000/- (अक्षरी रक्कम रूपये ऐंशी हजार फक्त) अदा करावी. प्रस्तुत रक्कमेवर अर्ज दाखल तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे.9टक्के व्याजाची रक्कम वि.प.ने तक्रारदाराला अदा करावी.
3. मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- (अक्षरी रक्कम रूपये दहा हजार फक्त) व तक्रार अर्जाचा खर्च रक्कम रु.5,000/- (अक्षरी रक्कम रूपये पाच हजार फक्त) वि.प.ने तक्रारदाराला अदा करावी.
4. वरील सर्व आदेशांची पूर्तता आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत वि.प.यांनी करावी.
5. विहीत मुदतीत आदेशांची पुर्तता न केलेस ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 कलम-25 व कलम-27 प्रमाणे वि.प.विरुध्द कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
6. आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.