संयुक्त निकालपत्र :- (दि.08.12.2010)(द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुत ग्राहक तक्रार केस नं. 421 ते 423/10 या तिन्ही तक्रारींच्या विषयांमध्ये साम्य आहे. तसेच, सामनेवाला हे देखील एकच असल्याने हे मंच तिन्ही प्रकरणांमध्ये एकत्रित निकाल पारीत करीत आहे. (2) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांनी म्हणणे दाखल केले. सुनावणीचेवेळेस, तक्रारदारांच्या वकिलांनी युक्तिवाद केला. (3) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, सामनेवाला बँक ही महाराष्ट्र सहकारी कायद्यातील तरतुदीनुसार नोंदणी झालेली बॅंक आहे. तक्रारदार हे सामनेवाला बँकेचे सभासद आहेत. यातील तक्रारदार यांचे सामनेवाला बँकेकडे बचत खाते व फॅमिली पेन्शन ठेव खाते आहे, त्यांचा तपशील खालीलप्रमाणे :- अ.क्र. | तक्रार क्र. | बचत खाते क्र. | फॅमिली पेन्शन ठेव खाते | दरमहा हप्ता रुपये | खाते सुरु तारीख | मुदतपूर्ण तारीख | 1. | 421/10 | SB/104 | 16 | 1500/- | 26.04.2000 | 26.05.2005 | 2. | 422/10 | SB/400 | 15 | 1100/- | 29.05.2000 | 29.10.2005 | 3. | 423/10 | SB/1879 | 4 | 500/- | 31.05.1997 | 01.10.2001 | 4. | --”-- | -- | 24 | 1000/- | 31.05.2001 | 01.07.2006 |
(4) तक्रारदार हे वयोवृध्द असलेने सदर रक्कम त्यांचे औषधोपचाराकरिता, कौटुंबिक गरजा भागविणेकरिता, वृध्दापकाळ सुखाने व्यतीत करता यावा तसेच, अडीअडचणीच्यावेळी उपयोगी याव्यात या हेतूने सामनेवाला बँकेच्या फॅमिली पेन्शन ठेव या पेन्शन योजनेमध्ये रक्कम गुंतविली होती. सदर फॅमिली पेन्शन ठेव या योजनेमध्ये दरमहा अनुक्रमे 61, 65, 52 व 61 इतक्या महिन्यांकरिता हप्ते भरलेस तक्रारदारांना खालील कोष्टकात नमूद केलेप्रमाणे दरमहा तहहयात पेन्शन मिळेल अशी योजना असलेने तक्रारदारांनी सामनेवाला बँकेच्या सदर फॅमिली पेन्शन योजनेमध्ये गुंतवणुक केली होती व आहे. तक्रारदारांनी सदर योजनेमध्ये नियमितपणे रक्कम भरलेली आहे. तसेच, दि.28.02.2010 रोजीअखेर दरमहा पेन्शनदेखील मिळालेली आहे. असे असताही सामनेवाला बँकेने दि.09.02.2010 रोजीचे पत्राने सदर फॅमिली पेन्शन ठेव ही पेन्शन योजना बंद करणेत आली असलेबाबत कळविले आहे. सामनेवाला बँकेच्या योजनेनुसार तक्रारदारांनी खालील कोष्टकात नमूद केलेप्रमाणे रक्कम गुंतविली असलेने तक्रारदारांच्या संम्मतीविना व तहहयात पेन्शन असूनदेखील सामनेवाला बँकेने बेकायदेशीरपणे तक्रारदारांची पेन्शन बंद केली आहे. अ.क्र. | तक्रार क्र. | फॅमिली पेन्शन ठेव खाते | दरमहा पेन्शन रुपये | गुंतविलेली रक्कम | मुदत | 1. | 421/10 | 16 | 1500/- | 91500/- | 61 | 2. | 422/10 | 15 | 1100/- | 71500/- | 65 | 3. | 423/10 | 4 | 500/- | 87000/- | 52 | 4. | --”-- | 24 | 1000/- | 61 |
(5) तक्रारदार त्यांच्या तक्रारीत पुढे सांगतात, तक्रारदारांनी सदर पेन्शन योजनेची माहिती सामनेवाला बँकेच्या अधिका-यांकडे केली असता माहिती देणेस जाणूनबुजून व हेतुपुरस्सररित्या टाळाटाळ केली आहे. सदरचे सामनेवाला यांचे कृत्यामुळे तक्रारदारांना मानसिक, शारिरीक तसेच आर्थिकदृष्टया त्रास सहन करावा लागला आहे. सदरचे कृत्य हे अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करणारे आहे. सबब, तक्रारदारांनी पेन्शन योजना तहहयात ठेवणेबाबत सामनेवाला बँकेला आदेश व्हावा. तसेच, 4 महिन्यांची थकित पेन्शन रककम, कोर्ट खर्च/वकिल फी रुपये 10,000/-, मानसिक त्रासापोटी रुपये 10,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 10,000/- तक्रारदारांना देणेबाबत सामनेवाला यांना आदेश व्हावेत अशी विनंती केली आहे. (6) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत पेन्शन योजना बंद झालेबाबतचे सामनेवाला यांचे दि.09.02.2010 रोजीचे पत्र व शपथपत्र दाखल केले आहे. (7) सामनेवाला यांनी त्यांच्या म्हणण्यान्वये तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, बँकेने फॅमिली पेन्शन योजना सुरु करीत असताना त्याबाबतचे नियम ठरविलेले होते, त्यास संचालक मंडळाची मान्यता घेतलेली होती व ज्या काळात योजना सुरु केली त्यावेळी प्रचलित असलेल्या कायम ठेवीच्या दरापेक्षाही थोडा जास्त व्याजदर देवून पेन्शन योजना सुरु केली. बँकेला त्या दराने ठेवीदारांना व्याज देणे परवडत होते त्यावेळेपर्यन्त बॅंकेने प्रामाणिकपणे ठेवीदारांना वेळचेवेळी व्याजाची रक्कम दिलेली आहे. तक्रारदारांच्या अनुक्रमे रुपये 91,500/-, रुपये 71,500/- व रुपये 87,000/- आजही बँकेकडे जमा असून त्याबाबत कसलीही तक्रार नाही. (8) सामनेवाला त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, ठेवीदारांनी बँकेच्या या योजनेत भाग घेताना बँकेचे सर्व नियम व अटी वाचून मान्य असल्याचे कबूल करुन बँकेच्या फॅमिली पेन्शन ठेव योजनेमध्ये रक्कम गुंतविलेली आहे. अशा स्थितीत बँकेशी केलेल्या लेखी करारातील अटींना बगल देवून ठेवीदाराला बँकेचे आर्थिक हिताचा विचार न करता बँकेला न परवडणारे व्याज सद्यस्थितीत मागता येणार नाही. तक्रारदारांचे अर्जातील स्पष्ट कथनाप्रमाणे बँकेने दि.09.02.2010 रोजी तक्रारदारांना लेखी पत्र देवून फॅमिली पेन्शन योजना बंद करीत असल्याचे आगावू पत्राने कळविले आहे. इतकेच नव्हेतर, त्याच पत्रात तक्रारदारांना त्यांची ठेव अन्य ठेव योजनेत रुपांतरित करावयाची आहे याचीही विचारणा केली. ठेव गुंतवण्याची नसलेस सेव्हींग खात्याचे व्याजदराने केंव्हाही परत देणेची बँकेची तयार होती आहे. (9) सामनेवाला त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, फॅमिली पेन्शन ठेव योजनेबाबत बँकेने केलेल्या नियमातील नियम क्र.16 अनुसार फॅमिली पेन्शन ठेव योजनेचे नियम बदलण्याचा अथवा रदृ करणेचा अधिकार बँकेचे संचालक मंडळास असल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. योजना सुरु केली त्यावेळची एकूण परिस्थिती व पेन्शन ठेव योजना बंद करण्याचे संचालक मंडळाने ठरविल्याचा काळ यामध्ये पुष्कळ फरक झाला असल्याने व एकूणच धोरणात अमुलाग्र बदल बँकिंग क्षे9त झाला असल्याने आर्थिक समस्या निर्माण करणारी कोणतीही योजना बँकेस सक्षमरित्या पुढे चालू ठेवणे शक्य होणारे नाही. अशा स्थितीत बँकेच्या संचालक बँक मंडळाने फॅमिली पेन्शन ठेव योजना दि.28.02.2010 पासून बंद करण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत योग्य असा असून तक्रारदारांवर तो बंधनकारक आहे. सबब, तक्रारदारांची तक्रार खर्चासह नामंजूर करणेत यावी कॉम्पेनसेटरी कॉस्ट रुपये 10,000/- देणेचे आदेश व्हावेत अशी विंनती केली आहे. (10) सामनेवाला यांनी त्यांच्या म्हणण्यासोबत तक्रारदारांचे खाते उघडण्याचा फॉर्म, फॅमिली पेन्शन स्कीमचे अटी व नियम, सदर योजना बंद करणेबाबतचा संचालक सभा ठराव क्र.20(25) इत्यादीच्या प्रती दाखल केलेल्या आहेत. (11) या मंचाने दोन्ही बाजूंच्या वकिलांचे युक्तिवाद सविस्तर व विस्तृतपणे ऐकले आहे. तसेच, उपलब्ध कागदपत्रांचे अवलोकन केले आहे. तक्रारदारांनी त्यांची तक्रार ही सामनेवाला बँकेने फॅमिली पेन्शन योजना बंद केली आहे व सदर पेन्शन योजना पुन्हा चालू करावी व थकीत पेन्शन रक्कम देणेचा आदेश व्हावा याबाबतची तक्रार आहे. सामनेवाला बँकेने त्यांच्या म्हणण्यामध्ये सद्याच्या आर्थिक धोरणानुसार व शासनाच्या पत धोरणानुसार व रिझर्व्ह बँकेची व्याजनिती तसेच स्पर्धेच्या युगात सहकारी बँकाना त्यांचे कर्ज व ठेवीवरील व्याजदर निश्चित करणे भाग आहे व एकूण परिस्थितीचा विचार करुन फॅमिली पेन्शन ठेव योजनेच्या नियम क्र.16 नुसार संचालक मंडळाने फॅमिली पेन्शनचा निर्णय घेतलेला यामध्ये सामनेवाला बँकेची सेवात्रुटी नाही असे प्रतिपादन सामनेवाला बँकेच्या वकिलांनी केले आहे. त्या अनुषंगाने सामनेवाला बँकेने फॅमिली पेन्शन ठेव योजनेच्या नियमांचे अवलोकन केले आहे. त्यातील नियम क्र.16 पुढीलप्रमाणे :- सदर फॅमिली पेन्शन ठेव योजनेचे नियम बदलणे, वा रद्द करणेचा अधिकार बँकेच्या संचालक मंडळास राहिल, बँकांचे आर्थिक धोरण हे भारतीय रिझर्व्ह बँकेने ठरवून दिलेल्या मार्गदर्शन तत्त्वानुसार आखावे लागते. तसेच, बँकांच्या आर्थिक धोरणावरती केंद्र शासनाच्या पत धोरणाचा प्रभाव रहात असतो. अशा वेळी पत धोरणामध्ये बदल होत असलेस त्याप्रमाणे बँकांना त्यांची आर्थिक धोरणे बदलावी लागत असतात व त्या अनुषंगाने घेतलेले निर्णय हे धोरणात्मक स्वरुपाचे असतात. अशा धोरणात्मक निर्णयामध्ये या मंचास हस्तक्षेप करता येणार नाही. उपरोक्त उल्लेख केलेप्रमाणे फॅमिली पेन्शन ठेव योजनेचे नियमाचे अवलोकन केले असता तसेच, युक्तिवादाचेवेळेस प्रस्तुत तक्रारदार हे सामनेवाला बँकेचे कर्मचारी होते ही बाब निदर्शनास आणून दिलेली आहे. त्यामुळे फॅमिली पेन्शन ठेव योजनेचे नियम तक्रारदारांना माहिती आहेत व सदर नियमांस अनुसरुन फॅमिली पेन्शन ठेव योजना बंद करणेचा संचालक मंडळाने घेतलेला निर्णय सदर ठेवीदारांवर बंधनकारक असणार आहे. सामनेवाला बँकेने सदर निर्णय घेत असताना इतर कोणत्याही बँकेच्या योजनेमध्ये तक्रारदारांच्या इच्छेनुसार गुंतवणुक करणेची मुभा दिलेली आहे. तसेच, बचत खात्यावरील देय व्याज देणेची तयारी दर्शविली आहे व अशा पूर्वसुचना फॅमिली पेन्शन ठेव योजनेतील ठेवीदारांना सदर योजना बंद करणेपूर्वी दिलेचे दिसून येते. त्यामुळे तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीमध्ये फॅमिली पेन्शन ठेव योजनेनुसार रक्कम मिळावी व सदर योजना पूर्ववत चालू करणेत यावी याबाबत घेतलेले मुद्दे हे मंच फेटाळत आहे. उपरोक्त विवेचन विचारात घेता सामनेवाला बँकेच्या सेवेत त्रुटी झाली नसल्याच्या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, हे मंच उपरोक्त तिन्ही तक्रारींमध्ये हे मंच खालीलप्रमाणे एकत्रित आदेश पारीत करीत आहे. आदेश 1. उपरोक्त तिन्ही तक्रारी फेटाळणेत येतात. 2. खर्चाबाबत आदेश नाहीत.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER | |