कोरम-
श्री.विनायक रावजी लोंढे, अध्यक्ष.
श्री.चंद्रकांत मो.येशीराव सदस्य.
तक्रारदार तर्फे कु.स्मिता रमेश झाल्टे वकील.
सामनेवाला क्र. 1,3,4 व 5 हजर.
निकालपत्र
व्दारा-श्री.विनायक रावजी लोंढे, अध्यक्षः
1. तक्रारदार यांनी सामनेवाला को ऑप क्रेडीट सोसायटीमध्ये
मुदत ठेव पावती अन्वये गुंतविलेली रक्कम मागणी करुनही परत दिली नाही म्हणुन
तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार या मंचात दाखल केली आहे.
2. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की,
तक्रारदार यांनी सामनेवाला श्री काळा हनुमान अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी लि,भुसावळ सोसायटीमध्ये मुदत ठेव पावतीत रक्कम गुंतवणूक केल्याचा तपशिल खालीलप्रमाणेः
अ.क्र. | पावती क्रमांक | ठेव दिनांक | रक्कम रुपये | देय तारीख | देय रक्कम |
1 | 16556 | 13/2/2007 | 10,000/- | 13/5/2007 | 10,263/- |
2 | 16557 | 13/2/2007 | 10,000/- | 13/5/2007 | 10,263/- |
3 | 16582 | 15/2/2007 | 15,000/- | 15/5/2007 | 15,394/- |
4 | 16583 | 15/2/2007 | 15,000/- | 15/5/2007 | 15,394/- |
5 | आर.डी.खाते क्र.1758 | | 7,000/- | | 7,000/- |
3. तक्रारदार यांनी गुंतविलेल्या रक्कमेची मागणी सामनेवाला सोसायटीकडे केली असता सोसायटीने रक्कम देण्यास नकार दिला अशी तक्रारदार यांची तक्रार आहे. सबब सामनेवाला यांचेकडे गुंतवणुक केलेली व्याजासह होणारी संपुर्ण रक्कम तसेच मानसिक त्रास व अर्जाच्या खर्चापोटी नुकसान भरपाई मिळावी अशी विनंती तक्रारदार यांनी केलेली आहे.
4. सदरची तक्रार दाखल करुन, सामनेवाला यांना ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 13(1) ब प्रमाणे नोटीसा काढण्यात आल्या.
5. सामनेवाला क्र. 1 3,4 व 5 यांनी तक्रारदाराची तक्रार नाकारली आहे. सामनेवाला संस्था ही सहकार कायदयाने नोंदविलेली संस्था असुन तिचेमध्ये व सभासदात असलेला वाद सहकार कायदयानुसार सोडवणे क्रमप्राप्त असल्याने या मंचासमोर प्रस्तुत तक्रार चालण्यास पात्र नाही. तसेच संस्थेचे कारभाराबाबत विशेष लेखापरिक्षक वर्ग 2 सहकारी संस्था,जळगांव यांनी पोलीस स्टेशन मार्फत न्यालयात गुन्हा दाखल असुन संस्थेचे संपुर्ण रेकॉर्ड जप्त केलेले असुन त्याबाबतचा निर्णय होईपावेतो खुलासा देत येणे शक्य नाही. तसेच सामनेवाला संस्था व संचालकांवर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम,1960 चे कलम 88 नुसार कुठल्याही प्रकारची जबाबदारी निश्चित करण्यात आलेली नसल्याने तक्रार रद्य होण्यास पात्र आहे. सबब तक्रारदाराची तक्रार रद्य करुन निकाली काढावी अशी विनंती सामनेवाला क्र.1,3,4 व 5 यांनी केली आहे.
6. तक्रारदार यांची तक्रार, त्यांनी दाखल केलेले कागदपत्रे, सामनेवाला क्र. 1,3,4 व 5 यांचे म्हणणे, याचे सुक्ष्म अवलोकन केले असता तसेच तक्रारदाराचे तक्रार अर्जासोबत दाखल शपथपत्र यांचे अवलोकन करता, न्यायनिवाडयासाठी पुढील मुद्ये उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालीलप्रमाणे देत आहोत.
मुद्ये उत्तर
1) सामनेवाला यांनी तक्रारदार यांना द्यावयाच्या
सेवेत त्रृटी केली आहे काय ? होय.
2) आदेश काय ? खालीलप्रमाणे.
वि वे च न
7. मुद्या क्र.1 - प्रस्तुत प्रकरणांत तक्रारदार यांनी तक्रारीचे अनुषंगाने दाखल केलेली कागदपत्रे पाहता त्यांनी सामनेवाला संस्थेत मुदत ठेव पावत्यामध्ये रक्कम गुंतविलेली होती ही बाब सिध्द होते. तक्रारदार यांनी सदरची रक्कम मिळणेसाठी मागणी केली असता, सदर रक्कम त्यांना देण्यात आलेली नाही. वास्तविक तक्रारदार यांनी मागणी केल्यानंतर तात्काळ सामनेवाला यांच्याकडील जमा असलेली रक्कम त्यांना परत करणे संस्थेचे कर्तव्य होते. परंतू मागणी करुनही संस्थेने रक्कम न देऊन सेवेत त्रृटी केली आहे या मतास आम्ही आलो आहोत. सबब मुद्या क्रमांक 1 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
8. मुद्या क्र.2 – तक्रारदार यांनी तक्रारदार यांनी त्यांची संपुर्ण रक्कम देण्याची जबाबदारी सामनेवाला क्र. 1 ते 5 यांची असल्याचे नमुद करुन त्याबाबत आदेश व्हावा अशी विनंती केली आहे. सामनेवाला क्र. 1 ही संस्था असुन सामनेवाला क्र. 2 ते 5 हे संस्थेवर महत्वाच्या पदांवर कार्यरत आहेत त्यामुळे अशा परिस्थितीत तक्रारदाराची ठेव रक्कम देण्यास सामनेवाला क्र. 1 ते 5 हे वैयक्तीक अथवा संयुक्तीकरित्या जबाबदार आहेत या मतास आम्ही आलो आहोत. सबब आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आ दे श
( अ ) तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
( ब ) सामनेवाला क्रं.1 ते 5 यांना वैयक्तीक अथवा संयुक्तीकरित्या असे निर्देशित करण्यात येते की, त्यांनी या निकालपत्राच्या परिच्छेद क्र. 2 मध्ये नमुद केलेल्या मुदत ठेव पावत्या मॅच्युअर्ड झालेली असल्याने त्यावरील मुदती अंती देय असलेली रक्कम त्या पावतीवरील देय तारखेनंतर ( मुदत ठेवीचा कालावधी संपल्यापासून ) एकत्रित रक्कमेवर द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह तक्रारदार यांना या आदेशाच्या प्राप्तीपासुन 30 दिवसाचे आंत द्यावेत. तसेच आर.डी.खाते क्रमांक 1758 मध्ये जमा असलेली एकुण रक्कम सदर खात्यावर प्रचलीत असलेल्या व्याजदरासह तक्रारदारास आदेश मुदतीत परत करावी.
( क ) सामनेवाला क्रं.1 ते 5 यांना वैयक्तीक अथवा संयुक्तीकरित्या असेही निर्देशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारदार यास झालेल्या मानसिक, शरिरिक व आर्थिक त्रासापोटी रक्कम रुपये 2,000/- व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रु.1,500/- या आदेशाच्या प्राप्तीपासुन 30 दिवसाचे आंत द्यावेत.
( ड ) वर नमुद आदेश अनुक्रमांक (ब) मधील मुदत ठेवीच्या रक्कमेपैकी काही रक्कम अगर व्याज दिले असल्यास त्यावर कर्ज दिले असल्यास सदरची रक्कम वजावट करुन उर्वरीत रक्कम अदा करावी.
ज ळ गा व
दिनांकः- 05/06/2015.
( श्री.चंद्रकांत मो.येशीराव ) ( श्री.विनायक रा.लोंढे )
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगाव