निकालपत्र
(द्वारा- मा.सदस्य - श्री.एस.एस.जोशी)
(१) सामनेवाले यांनी दिलेला सदोष माल बदलवून द्यावा या मागणीसाठी तक्रारदार यांनी सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा कलम १२ अन्वये या मंचात दाखल केली आहे.
(२) तक्रारदार यांची तक्रार थोडक्यात अशी आहे की, त्यांनी सामनेवाले यांच्याकडून घराच्या अंगणात बसविण्यासाठी रु.५०,६२५/- देऊन ३० ब्रास पेव्हर ब्लॉक्स खरेदी केले होते. हे ब्लॉक्स बसविण्यासाठी रु.५०,०००/- एवढा खर्च आला. सामनेवाले यांनी ज्याप्रकारचे आणि ज्या गुणवत्तेचे ब्लॉक्स देण्याचे कबूल केले होते त्या गुणवत्तेचे पुरविले नाहीत. बसविलेल्या ब्लॉक्समध्ये दोष असल्याचे निदर्शनास आल्यावर सामनेवाले यांना कळविण्यात आले. त्यांनी घरी येवून पाहणी केली. त्यानंतर संपूर्ण ब्लॉक्स बदलून देण्याचे आश्वासन दिलेहोते. मात्र ते त्यांनी पाळले नाही. सामनेवाले यांना दि.१८-०७-२००९ रोजी नोटीस पाठविण्यात आली, त्याचे उत्तर त्यांनी दिले नाही. त्यामुळे अखेर या मंचात तक्रार दाखल करावी लागली आहे असे तक्रारदार यांचे म्हणणे आहे.
सामनेवाले यांच्याकडून खरेदी केलेले पेव्हर ब्लॉक्स बदलवून मिळावेत, खरेदी रकमेवर द.सा.द.शे.१८ टक्के प्रमाणे व्याज मिळावे, ब्लॉक्स बसविण्याचा खर्चरु.५०,०००/- मिळावा, तक्रारीचा खर्च रु.१०,०००/- आणि मानसिक त्रासापोटी रु.१,००,०००/- मिळावेत अशी मागणी तक्रारदार यांनी केली आहे.
(३) तक्रारीच्या पुष्ट्यर्थ तक्रारदार यांनी दि.०३-०२-२००९ रोजीचे पेव्हर ब्लॉक्सचे बिल, दि.१२-०२-२००९ चे बिल, दि.१४-०२-२००९ चे बिल, सामनेवाले यांना पाठविलेल्या नोटीसची प्रत, सामनेवाले यांना नोटीस मिळाल्याची पोहोच पावती, तक्रारदार यांनी शासकीय तंत्रनिकेतनातून ब्लॉक्स तपासून घेतल्याचा अहवाल आदी कागदपत्रांच्या छायांकीत प्रती दाखल केल्या आहेत.
(४) सामनेवाले यांनी हजर होऊन आपला खुलासा दाखल केला. त्यात त्यांनी म्हटले आहे की, तक्रारदार यांना दिलेल्या सेवेत त्रुटी नाही. तक्रारदार यांनी ३० ब्रास पेव्हर ब्लॉक्स खरेदी केले होते हे मान्य आहे. मात्र त्याची स्ट्रेंथ २० एम एवढी आहे असे तक्रारदार यांना कधीही सांगण्यात आले नव्हते. त्यांनी जे ब्लॉक्स पाहिले होते आणि जे खरेदी करण्याचे कबूल केले होते तोच पुरवठा त्यांना करण्यात आला. ब्लॉक्सच्या दर्जासंदर्भात तक्रारदार यांनी कळविल्यानंतर त्यांच्या घरी जाऊन पाहणी करण्यात आली. त्यावेळी असे निदर्शनास आले की, त्यांनी सामनेवाले यांच्याकडून जितके ब्लॉक्स खरेदी केले होते त्यापेक्षा जास्तीचे ब्लॉक्स त्यांच्या अंगणात बसविण्यात आले होते. यावरुन तक्रारदार यांनी इतरही ठिकाणाहून आणखी ब्लॉक्स खरेदी केल्याचे स्पष्ट होते. तक्रारदार यांनी अंगणात बसविलेले ब्लॉक्स व्यवस्थितपणे बसविण्यात आलेले न्व्हते. त्यामुळेही त्यांची तुटफूट होण्याची शक्यता असते. याची कल्पना तक्रारदार यांना देण्यात आली होती. त्यामुळे त्या तुटफुटीसाठी सामनेवाले यांना जबाबदार धरता येणार नाही, असे या खुलाशात नमूद करण्यात आले आहे.
(५) आपल्या खुलाशाच्या पुष्टयर्थ सामनेवाले यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.
(६) तक्रारदार यांनी तक्रारीत केलेले वर्णन, त्याच्या पुष्टयर्थ दाखल केलेले शपथपत्र व कागदपत्रे, सामनेवाले यांचा खुलासा व शपथपत्र तसेच सामनेवालेंच्या विद्वान वकिलांनी केलेला युक्तिवाद ऐकला आणि तक्रारदार यांच्या विद्वान वकिलांनी दाखल केलेला लेखी युक्तिवाद, शासकीय तंत्रनिकेतन धुळे यांनी ब्लॉक्सची तपासणी करुन दाखल झालेला अहवाल, कोर्ट कमिशनर यांनी दाखल केलेला ब्लॉक्सचा मोजणी अहवाल याचा विचार करता, आमच्यासमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्यांची उत्तरे आम्ही सकारण देत आहोत.
मुद्देः | निष्कर्षः |
(अ)तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय ? | : होय |
(ब)सामनेवाले यांनी सदोष सेवा दिली आहे हे तक्रारदार यांनी सिध्द केले आहे काय ? | : नाही |
(क)आदेश काय ? | : अंतिम आदेशा प्रमाणे |
विवेचन
(७) मुद्दा क्र. ‘‘अ’’ – तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याकडून पेव्हर ब्लॉक्स खरेदी केले होते, त्या खरेदीची बिले त्यांनी तक्रारीसोबत दाखल केली आहेत. ही बिले सामनेवाले यांनी नाकारलेली नाहीत. यावरुन तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत हे सिध्द होते. म्हणून मुद्दा क्र. ‘‘अ’’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(८) मुद्दा क्र. ‘‘ब’’ – सामनेवाले यांच्याकडून खरेदी केलेल्या पेव्हर ब्लॉक्सची गुणवत्ता चांगली नव्हती आणि त्यामुळे अंगणात बसविलयानंतर त्यांची मोठया प्रमाणावर तुटफूट झाली. हे ब्लॉक्स बदलवून देण्याचे आश्वासन सामनेवाले यांनी दिले होते, मात्र ते पाळले गेले नाही अशी तक्रारदार यांची मुख्य तक्रार आहे. तथापि, सामनेवाले यांनी तक्रारदार यांची तक्रार पूर्णपणे नाकारली आहे. तक्रारदार यांना ब्लॉक्स बदलवून देण्यासंदर्भात कोणतेही आश्वासन देण्यात आले नव्हते. किंबहुना तक्रारदार यांना सदोष मालाचा पुरवठाच करण्यात आला नव्हता, अशी भूमिका सामनेवाले यांनी घेतली आहे.
तक्रारदार यांनी तक्रारीसोबत सामनेवाले यांच्याकडून खरेदी केलेल्या पेव्हर ब्लॉक्सची बिले दाखल केली आहेत. दि.०३-०२-२००९ चे बिल रु.२०,२५०/- एवढया रकमेचे आहे. त्यात १२ ब्रास एवढ्या ब्लॉक्सची खरेदी केल्याचे नमूद आहे. दुसरे बिल दि.१२-०२-२००९ चे असून रु.२०,२५०/- एवढया रकमेचे आहे. त्यातही १२ ब्रास ब्लॉक्सची खरेदी दाखविण्यात आली आहे. तिसरे बिल दि.१४-०२-२००९ चे असून रु.१०,१२५/- एवढ्या रकमेचे आहे, त्यातही ६ ब्रास एवढया ब्लॉक्सची खरेदी केली असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या तिनही बिलांमध्ये ब्लॉक्सचा आकार ६० एम.एम.एवढा दाखविण्यात आला आहे. तक्रारदार यांनी शासकीय तंत्रनिकेतन, धुळे यांच्याकडून सदर ब्लॉक्सची तपासणी करुन घेतल्याचा अहवाल दाखल केला आहे. त्यात ब्लॉक्सचा आकार म्हणजेच जाडी ४० एम.एम. अशी दर्शविण्यात आली आहे.
सामनेवाले यांच्या वकिलांनी आपल्या युक्तिवादात याच मुद्याकडे मंचाचे लक्ष वेधले. तक्रारदार यांनी ६० एम.एम.जाडीचे ब्लॉक्स सामनेवाले यांच्याकडून खरेदी केले होते. मात्र तपासणी अहवालात त्या ब्लॉक्सची जाडी ४० एम.एम.अशी दाखविण्यात आली आहे. त्याचबरोबर तपासणी अहवालात पाच प्रकारचे ब्लॉक्स तपासण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. यावरुन तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याकडून ६० एम.एम.जाडीचे ब्लॉक्स खरेदी केले आणि तपासणीसाठी पाठवितांना ४० एम.एम.जाडीचे ब्लॉक्स पाठविले असे सामनेवाले यांच्या वकिलांचे म्हणणे आहे. याचा अर्थ जे ब्लॉक्स सामनेवाले यांच्याकडून खरेदी करण्यात आलेले नव्हते, ते ब्लॉक्स तक्रारदार यांनी तपासणीसाठी पाठविले होते असे सामनेवाले यांच्या वकिलांचे म्हणणे आहे.
तक्रारीच्या चौकशी दरम्यान आणि आपल्या खुलाशात सामनेवाले यांनी तक्रारदार यांनी ज्या ठिकाणी आणि ज्या संख्येने पेव्हर ब्लॉक्स बसविले होते तो मुद्दाही उपस्थित केला. तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याकडून ३० ब्रास ब्लॉक्सची खरेदी केली. प्रत्यक्षात त्यांच्या अंगणात ४० ब्रासपेक्षा अधिक ब्लॉक्स बसविण्यात आले आहेत, असा मुद्दा सामनेवाले यांच्या वकिलांनी उपस्थित केला. त्यासाठी त्यांनी ब्लॉक्सची मोजणी करण्यासाठी कोर्ट कमिशनर नियुक्त करण्याचीही मागणी केली होती. ती मंचाने मंजूर करुन श्री.महेंद्र मुकूंद विसपुते यांची कोर्ट कमिशनर म्हणून नियुक्ती केली होती. तक्रारीच्या चौकशीदरम्यान कोर्टकमिशनर विसपुते यांनी तक्रारदार यांच्या प्रत्यक्ष घरी जाउन त्यांच्या अंगणात बसविण्यात आलेल्या ब्लॉक्सची मोजणी करुन त्याचा अहवाल मंचात सादर केला. ही मोजणी करतांना सामनेवाले सुभाष कांकरीया, तक्रारदार यांच्यातर्फे प्रविण कोटेचा, शांताराम पाटील, नरेंद्र बोरसे हे उपस्थित होते.
कोर्ट कमिशनर श्री.विसपुते यांनी मोजणीनंतर दाखल केलेल्या अहवालात तक्रारदार यांच्या अंगणात सुमारे ४५.३३ ब्रास ब्लॉक्स बसविण्यात आले आहेत, असे नमूद केले आहे. याचाच अर्थ तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याकडून ३० ब्रास ब्लॉक्स तर इतर ठिकाणाहून सुमारे १५ ब्रास ब्लॉक्सची खरेदी केली असावी हे स्पष्ट होते.
तक्रारदार यांच्या तक्रारीतील म्हणण्याप्रमाणे अंगणात बसविलेल्या ब-याच ब्लॉक्सची तुटफुट झाली आहे. तथापि, त्यांच्या अंगणात एकूण ४५ ब्रास ब्लॉक्स बसविण्यात आले हे स्पष्ट आहे. त्यापैकी नेमक्या कोणाकडून खरेदी केलेल्या ब्लॉक्सची तुटफूट झाली हे तक्रारदार ठामपणे सांगू शकत नाहीत. ब्लॉक्सवर त्यांच्या उत्पादकासंदर्भात कोणताही शिक्का किंवा निशाणी नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी कोणाकडून खरेदी केलेल्या आणि कोणाच्या ब्लॉक्सची तुटफूट झाली हे स्पष्ट होत नाही.
तक्रारदार यांच्याकडून ब्लॉक्सच्या तुटफुटीची प्रथम माहिती मिळाल्यानंतर सामनेवाले यांनी त्यांच्या घरी जाऊन पाहणी केली होती. त्यावेळी सामनेवाले यांना बरेच ब्लॉक्स व्यवस्थितपणे बसविलेले नाहीत असे निदर्शनास आले होते. त्याबाबत त्यांनी तक्रारदार यांना कल्पना दिली होती. यावरुन ब्लॉक्सच्या तुटफुटीची अन्य कारणे असू शकतात, असे आमचे मत आहे. याचमुळे केवळ सामनेवाले यांच्याकडून खरेदी केलेले ब्लॉक्स सदोष होते आणि कमी गुणवत्तेचे होते असे तक्रारदार यांचे म्हणणे सिध्द होत नाही, असे आम्हाला वाटते. म्हणूनच म्हणून मुद्दा क्र. ‘‘ब’’ चे उत्तर आम्ही नकारार्थी देत आहोत.
(९) मुद्दा क्र. ‘‘क’’ – वरील दोन्ही मुद्यांचा विचार करता, सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सदोष मालाचा पुरवठा केला किंवा सदोष सेवा दिली हे तक्रारदार सिध्द करु शकलेले नाहीत. याच कारणामुळे सामनेवाले यांच्याविरुध्द कोणतेही आदेश करणे उचित होणार नाही आणि तक्रारदार यांची तक्रार केवळ त्रोटक आणि संक्षीप्त माहितीवरुन मंजूर करता येणार नाही या निर्णयाप्रत आम्ही आलो आहोत. म्हणून आम्ही पुढील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
(१) तक्रारदार यांचा तक्रार अर्ज रद्द करण्यात येत आहे.
(२) तक्रार अर्जाचे खर्चाबद्दल इतर कोणतेही आदेश नाहीत.
धुळे.
दिनांक : ११-०९-२०१४