(घोषित दि. 16.10.2014 व्दारा श्रीमती.रेखा कापडिया, सदस्या)
अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्याकडून टाईल्स खरेदी केल्या आहेत. त्या टाईल्स सदोष असल्याबद्दल अर्जदाराने गैरअर्जदार यांना अनेक वेळेस कळविले. परंतू गैरअर्जदार यांनी कोणताही प्रतिसाद न दिल्यामुळे अर्जदाराने ग्राहक संरक्षण कायदा अंतर्गत मंचात तक्रार दाखल केली आहे.
अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रारीनुसार अर्जदार जालना येथील रहिवासी असून त्यांनी गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्याकडून घरात बसविण्यासाठी टाईल्स खरेदी केल्या. गैरअर्जदार क्रमांक 1 हे या टाईल्सचे उत्पादक आहेत तर गैरअर्जदार क्रमांक 2 हे स्थानिक विक्रेते आहेत.
अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्याकडून दिनांक 28.05.2012 रोजी खरेदी केलेल्या व्हेट्रिफाईड टाईल्सची एकूण किंमत 1,19,125/- रुपये आहे. सदरील टाईल्स बसविताना त्यात तडे जात होते व त्यास छोटे छोटे डाग होते. अर्जदाराने याबाबत गैरअर्जदार यांना कळविले. परंतु गैरअर्जदार यांनी कोणताही प्रतिसाद न दिल्यामुळे दिनांक 21.10.2013 रोजी गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांना अर्जदाराने वकीला मार्फत कायदेशीर नोटीस पाठविली व दोषपूर्ण टाईल्स पोटी 2,00,000/- रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. गैरअर्जदार यांनी त्यास दाद न दिल्यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल करुन गैरअर्जदार यांनी नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.
अर्जदाराने तक्रारी सोबत टाईल्सचे खरेदी बिल व वकीला मार्फत पाठविलेल्या नोटीसची प्रत दाखल केली आहे.
गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी मंचात दाखल केलेल्या जवाबानुसार अर्जदाराची, टाईल्समध्ये दोष असल्याची तक्रार त्यांना मान्य नाही. अर्जदारास विकलेल्या टाईल्स त्यांनीच उत्पादीत केल्याचे त्यांना मान्य आहे. परंतु अर्जदाराने 28 मे 2012 रोजी टाईल्स खरेदी केल्या व वकीला मार्फत दिनांक 21.10.2013 रोजी नोटीस पाठविली आहे. यावरुन अर्जदाराने टाईल्स खरेदी केल्यानंतर व वापरल्यानंतर दिड वर्षांनंतर टाईल्स सदोष असल्याची तक्रार केली आहे जी पूर्णपणे चुकीची असून पैसे घेण्याच्या उद्देशाने केली आहे. टाईल्स खरेदी केल्यानंतर किंवा त्या बसविताना जर त्यात दोष आढळला असता व तसे कळविले असते तर त्याची दखल घेण्यात आली असती. टाईल्समध्ये दोष आहे याबाबत अर्जदाराने कोणत्याही तज्ञ व्यक्तीचा अहवाल दाखल केलेला नाही. अर्जदाराने तक्रार खारीज करण्याची विनंती मंचास केली आहे.
गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी मंचात जवाब दाखल केला आहे. त्यांच्या जवाबानुसार अर्जदाराची तक्रार चुकीची असून टाईल्स विकत घेण्यापूर्वी त्यांनी त्या तपासून व पाहणी करुन घेतलेल्या आहेत. त्यात जर दोष असता तर अर्जदाराने त्या बसविण्या पूर्वीच निदर्शनास आणून देणे गरजेचे होते. चुकीच्या पध्दतीने बसविल्यामुळे टाईल्सला तडे जावू शकतात. अर्जदाराने त्यांना त्रास देण्याच्या उद्देशाने मंचात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे ती खारीज करण्याची विनंती मंचास केली आहे.
अर्जदार व गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन व सुनावणीवरुन असे दिसून येते की, गैरअर्जदार क्रमांक 1 हे व्हेट्रिफाईड टाईल्सचे उत्पादक असून गैरअर्जदार क्रमांक 2 हे त्यांचे स्थानिक विक्रेते आहेत. अर्जदाराने दिनांक 28.05.2012 रोजी गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्याकडून व्हेट्रिफाईड टाईल्सचे 2’ * 2’ आकाराचे 100 बॉक्स खरेदी केले. त्यांची एकूण खरेदी किंमत 1,19,925/- रुपये आहे. अर्जदाराने या टाईल्स अन्य व्यक्तीकडून बसवून घेतल्या आहेत. या टाईल्स कोणाकडून व केव्हा बसविल्या या बाबत अर्जदाराने खुलासा केलेला नाही. टाईल्स खरेदी केल्यानंतर दिनांक 21.10.2013 रोजी म्हणजेच 17 महिन्याच्या कालावधीनंतर अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांना वकीला मार्फत नोटीस पाठविलेली दिसून येते. यामध्ये टाईल्स दोषपूर्ण असल्यामुळे 2,00,000/- रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. टाईल्स खरेदी केल्यानंतर व सदरील नोटीस पाठविण्यापूर्वी टाईल्स दोषपूर्ण असल्याबाबत कोणतीही तक्रार केल्याचे दिसून येत नाही. अर्जदाराने मंचात दाखल केलेल्या तक्रारीमध्ये टाईल्स सदोष असल्याबाबत तज्ञ व्यक्तीचा अहवालही दाखल केलेला नाही. टाईल्स खरेदी केल्यानंतर किंवा बसवित असतानाच त्यातील दोष लक्षात येऊन गैरअर्जदार यांच्याकडे तक्रार करणे अपेक्षित होते. परंतु अर्जदाराने टाईल्स बसविल्यानंतर 17 महिन्याच्या कालावधीनंतर व तज्ञ व्यक्तीच्या अभिप्राया शिवाय ही तक्रार दाखल केली आहे जी चुकीची असल्याचे मंचाचे स्पष्ट मत आहे. त्यामुळे तक्रारदाराची तक्रार फेटाळण्यात येते.
म्हणून मंच खालील आदेश पारित करत आहे.
आदेश
- अर्जदाराची तक्रार फेटाळण्यात येते.
- खर्चा बाबत आदेश नाहीत.