::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, मा. किर्ती गाडगीळ (वैदय), सदस्या )
(पारीत दिनांक :- 30/06/2017)
अर्जदाराने सदरची तक्रार ग्राहक सरक्षंण कायदयाचे कलम १२ अन्वये दाखल केली आहे.
अर्जदाराच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालील प्रमाणे.
1. अर्जदाराने आापल्या तक्रारीत असे कथन केले आहे कि, गैरअर्जदार क्र.1 व 2 हे डेव्हलपर्स असून त्यांनी गैरअर्जदार क्र.3 ते 7 यांच्याशी झालेल्या करारनुसार, त्यांच्या मालकीच्या मौ.वरोरा, हलका क्र.15, भुमापन क्र.298,299 आणि 189 येथील शेतजमीनीवर लेआऊट टाकला व ग्राहकांकरीता भुखंड उपलब्ध करून दिले. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी दिलेल्या माहितीपत्रकामुळे आकर्षीत होवून अर्जदाराने सदर अभिन्यासातील प्लॉट क्र.12 किंमत रू.2,98,378/- मध्ये खरेदी करण्याबाबत गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचेशी दिनांक 10/1/2012 रोजी रू.100/- चे स्टॅंपपेपरवर इसारपत्र केले आणि भुखंडाचे इसारापोटी रक्कम रू.1,49,189/- गैरअर्जदार क्र.1 व 2 हयांना दिली. मात्र इसारपत्रावर सर्व्हेनं.189 ऐवजी 190 नमुद करण्यांत आलेले आहे. भुखंडाची उर्वरीत किमतीची रक्कम विक्रीपत्राचे दिवशी देण्याचे ठरले. अर्जदार कायद्याबाबत अज्ञानी असल्यामुळे गैरअर्जदारांच्या भुलथापांवर विश्वास ठेवून त्याने व्यवहार केला. मात्र त्यानंतर 12 महिने होवूनदेखील गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचेकडून प्रतिसाद न मिळाल्यामुळे जेंव्हा त्यांनी गैरअर्जदारांशी संपर्क साधला तेंव्हा त्यांना कळले की उपरोक्त शेतजमीन ही गैरअर्जदार क्र.1 व 2 यांच्या मालकीची नसून गैरअर्जदार क्र.3 ते 7 हे जमिनीचे मालक आहेत. गैरअर्जदार क्र.1 व 2 ने गैरअर्जदार क्र.3 ते 7 यांच्या संमतीने व त्यांच्यासोबत झालेल्या करारानुसार लेआऊट टाकून प्लॉट पाडले परंतु सदर लेआऊटला कोणतीही कायदेशीर मान्यता नाही. असे असतांना खोटी माहिती देवून अर्जदाराशी अनधिकृत लेआऊटमधील प्लॉट विक्रीचा करार करून गैरअर्जदारांनी अनुचित व्यापार पद्धतीचा अवलंब केला असून अर्जदाराची फसवणूक केली आहे. तक्रारकर्ता हा, सदर प्लॉट क्र.12 ला कायदेशीर मान्यता मिळाल्यानंतर किमतीची उर्वरीत रक्कम गैरअर्जदारांना देवून प्लॉटचे विक्रीपत्र करून घेण्यांस तयार आहे. अर्जदाराने अनेकदा विक्रीसाठी संपर्क साधूनही गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी प्रतिसाद न दिल्याने अर्जदाराने वकीलामार्फत नोटीस पाठविला, परंतु त्यांनी तो नोटीस स्विकारला नाही किंवा त्याची दखलही घेतली नाही. सबब तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचात दाखलकेली असून तक्रारीत अशी मागणी केली आहे कि, गैरअर्जदारांनी दिलेली सेवा ही न्युनतापूर्ण सेवा तसेच त्यांनी अवलंबिलेली व्यापार पध्दत ही अनुचीत व्यापार पध्दत ठरविण्यांत यावी. तसेच गैरअर्जदारांनी दिनांक 10/1/2012 चे इसारपत्रानुसार आवंटन केलेला भुखंड क्र. 12 चे पंजीकृत विक्रीपत्र अर्जदाराला करून द्यावे व काही कायदेशीर अडचणीमुळे विक्रीपत्र करून देणे शक्य नसल्यांस इसारपत्राची रक्कम रू. 1,49,189/- द.मा.द.शे. 2 टक्के व्याजासह तसेच शारिरीक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई रू.25,000/- गैरअर्जदाराकडून मिळण्याचे आदेश व्हावे.
2. अर्जदाराची तक्रार स्विकृत करुन गैरअर्जदार क्र.1 ते 7 विरुध्द नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार क्र.2 ने हजर होवून आपले लेखीउत्तर दाखल केले. गैरअर्जदार क्र.2 ने आपल्या लेखी उत्तरात तक्रारकर्त्याचे तक्रारीतील कथन खोडून काढले. त्यांनी नमूद केले कि, अर्जदार व गैरअर्जदार यांचेतील व्यवहार हा विकसनाशी निगडीत असल्यामुळे तक्रारकर्ता हे ग्राहक होत नाहीत. गैरअर्जदार क्र.1 व 2 आणि गैरअर्जदार क्र.3 ते 7 यांचेतील वाद दिवाणी न्यायालयात प्रलंबीत आहे. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी अर्जदाराशी केलेला करार गैरअर्जदार क्र.3 ते 7 यांचेवर बंधनकारक असल्यामुळे अर्जदार हे गैरअर्जदार क्र.3 ते 7 यांचेही ग्राहक होतात. अर्जदाराने गैरअर्जदार क्र.1 व 2 शी करार करण्यापूर्वी गैरअर्जदारांनी दाखविलेल्या अभिन्यास नकाशावरुन प्लॉट पसंत केला व तो नकाशा स्पष्ट दर्शवितो की अभिन्यास मंजूर झालेला नाही आणी तरीसुध्दा अर्जदाराने गैरअर्जदार क्र.1 व 2 शी करार केला. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी गैरअर्जदार क्र.3 ते 7 यांच्याशी, गैरअर्जदार क्र.3 ते 7 यांच्या मालकीची मौ.वरोरा, हलका क्र.15, भुमापन क्र.298 आराजी 1.68 हे.आर., क्र.299 आराजी 0.24 हे.आर. आणि क्र.189 येथील आराजी 1.44 हे.आर. ही शतजमीन एकूण किंमत रू.2,21,75,461/- मध्ये खरेदी करण्याबाबत गैरअर्जदार क्र.3 ते 7 यांचेशी दिनांक 7/10/2011 रोजी करार केला आणि त्याच दिवशी इसारापोटी रक्कम रू.55 लाख गैरअर्जदार क्र.3 ते 7 हयांना दिली. गैरअर्जदार क्र.3 ते 7 यांनी त्याच दिवशी जमिनीचा कब्जा गैरअर्जदार क्र.1 व 2 यांना दिला व उर्वरीत रक्कम विक्रीचे वेळी देण्याचे ठरले. सदर्हु कराराप्रमाणे लेआऊटच्या कामाबद्दलचे अधिकार गैरअर्जदार क्र.3 ते 7 यांनी गैरअर्जदार क्र.1 व 2 यांना बहाल केले. त्यानुसार गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी अर्जदारासह इतर प्रस्तावीत भुखंडखरेदीकर्त्यांशी करार केले. त्यामुळे ते करार गैरअर्जदार क्र.3 ते 7 यांचेवर बंधनकारक आहेत. गैरअर्जदार क्र.3 ते 7 यांनी गैरअर्जदार क्र.1 ते 2 यांना जमिनीची विक्री करून न दिल्यामुळे अर्जदाराच्या कराराची पुर्तता करण्याची जबाबदार गैरअर्जदार क्र.3 ते 7 यांची आहे व होती. प्राप्त परिस्थितीत दोन पर्याय निघतात. अर्जदाराने व्याजासह उर्वरीत रक्कम गैरअर्जदार क्र.1 व 2 यांना द्यावीव त्यानंतर गैरअर्जदार क्र.3 ते 7 यांनी अभिन्यास मंजूर करून घेवून अर्जदाराचे विक्रीपत्र करून देवून प्लॉटचा ताबा द्यावा किंवा तक्रारकत्यांस भुखंडाच्या किमतीपोटी घेतलेली रक्कम परत करण्याचा आदेश झाल्यांस सदर रक्कम गैरअर्जदार क्र.3 ते 7 यांनी तक्रारदारांस द्यावी असे आदेश व्हावेत. सबब प्रस्तूत तक्रार गैरअर्जदार क्र.2 विरूध्द खारीज होण्यांस पात्र आहे.
4. गैरअर्जदार क्र.1 ने प्रस्तूत प्रकरणी हजर होवून पुरसीस दाखल केली की गैरअर्जदार क्र.2 ने दाखल केलेले लेखी उत्तर व दस्तावेज गैरअर्जदार क्र.1 चे लेखी उत्तर व दस्तावेज समजण्यांत यावेत.
5. गैरअर्जदार क्र.3 ते 7 ने प्रस्तूत प्रकरणी हजर होवून दाखल केलेल्या लेखी उत्तरात प्राथमीक आक्षेप घेतला की तक्रारकर्ता व गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचेतील भुखंड विक्रीचा करारामध्ये गैरअर्जदार क्र.3 ते 7 नव्हते त्यामुळे तक्रारकर्ता हा गैरअर्जदार क्र.3 ते 7 चा ग्राहक होत नाही. गैरअर्जदार क्र.3 ते 7 यांनी त्यांच्या लेखी उत्तरात अमान्य केले की गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी गैरअर्जदार क्र.3 ते 7 च्या मालकीच्या शेतजमिनीत त्यांच्या संमतीने फकरी डेव्हलपर्सच्या माध्यमातून वरोरा येथे बुं-हानी टाऊन नांवाचे रहिवासी अभिन्यास टाकले. तक्रारकर्ता व गैरअर्जदार क्र.1 व 2 यांच्यात काही व्यवहार झाला हेही त्यांनी अमान्य केले असून गैरअर्जदार क्र.3 ते 7 ची जमीन परावर्तीत नसल्यामुळे त्या जमिनीचे भुखंड पाडून विकण्याचा कोणालाही अधिकार नाही आणि सदर जमिनीसंबंधी कागदपत्रे तयार करण्याबाबत गैरअर्जदार क्र.3 ते 7 यांनी कोणलाही अधिकार दिलेले नव्हते. उलट गैरअर्जदार क्र.1व 2 यांनी गैरअर्जदार क्र.3 ते 7 यांच्यासोबत त्यांची शेतजमीन खरेदी करण्याचा सौदा दिनांक 7/10/2011 रोजी केला, परंतु करारानुसार दिलेल्या मुदतीत गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी विक्रीपत्र करून न घेतल्यामूळे दिनांक 10/12/2012 रोजी गैरअर्जदार क्र.3 ते 7 यांनी गैरअर्जदार क्र.1व 2 यांना नोटीस पाठवून करार संपूष्टात आल्याचे कळविले आहे. अर्जदार हा गैरअर्जदार क्र.3 ते 7 चा ग्राहक आहे हे म्हणणे खोटे असल्याने अर्जदाराला कोणताही शारिरीक, मानसीक त्रास दिलेला नसून त्याच्याविरूध्द अनुचित व्यापार पध्दती गैरअर्जदार क्र.3 ते 7 यांनी अवलंबिलेली नाही. गैरअर्जदार क्र.3 ते 7 यांनी अर्जदाराकडून भुखंड क्र. क्र.56 करीता इसाराची कोणतीही रक्कम स्विकारलेली नसल्यामुळे अर्जदार हा गैरअर्जदार क्र.3 ते 7 चा ग्राहक नाही. अशा परिस्थितीत प्रस्तूत गैरअर्जदार क्र.3 ते 7 विरूध्द आदेश पारीत करण्यांसाठी कोणतेही कारण नाही. म्हणून सदर तक्रार खारीज करण्यांत यावी अशी त्यांनी विनंती केलेली आहे.
6. अर्जदाराची तक्रार, दस्ताऐवज, शपथपञ, लेखी युक्तिवाद तसेच गैरअर्जदार क्र.1 व 2 चे लेखीउत्तर, तसेच गैरअर्जदार क्र.3 ते 7 चे लेखी उत्तर व दस्ताऐवज, गैरअर्जदार क्र.3 चे शपथपञ, लेखी युक्तिवाद बद्दल दाखल पुरसीस व तोंडी युक्तीवाद तसेच अर्जदार व गैरअर्जदार यांचे परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील निष्कर्ष आणि त्याबाबतची कारण मिमांसा पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
(1) अर्जदार गैरअर्जदार क्र.1 व 2 चा ग्राहक आहे काय ? होय
(2) अर्जदार गैरअर्जदार क्र.3 ते 7 चा ग्राहक आहे काय ? होय
(3) गैरअर्जदार क्र.1 ते 7 यांनी अर्जदारास न्युनतापूर्ण सेवा दिली आहे होय
काय ?
(4) गैरअर्जदार क्र.1 ते 7 यांनी अर्जदाराप्रति अनुचित व्यापार पध्दतीचा
अवलंब केला आहे काय ? होय
(5) अर्जदार मागणीप्रमाणे दाद मिळण्यास पाञ आहे काय ? अंतीम आदेशाप्रमाणे
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1 बाबत ः-
7. गैरअर्जदार क्र.1 व 2 हे डेव्हलपर्स असून त्यांनी गैरअर्जदार क्र.3 ते 7 यांच्याशी झालेल्या करारनुसार, गैरअर्जदार क्र.3 ते 7 यांच्या मालकीच्या मौ.वरोरा, हलका क्र.15, भुमापन क्र.298,299 आणि 189 येथील शेतजमीनीवर लेआऊट टाकला व ग्राहकांकरीता भुखंड उपलब्ध करून दिले. तक्रारकर्त्याने सदर अभिन्यासातील प्लॉट क्र. क्र.12 किंमत रू.2,98,378/- मध्ये खरेदी करण्याबाबत गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचेशी दिनांक 10/01/2012 रोजी रू.100/- चे स्टॅंपपेपरवर इसारपत्र केले आणि भुखंडाचे इसारापोटी रक्कम रू.1,49,189/- गैरअर्जदार क्र.1 व 2 हयांना दिली. भुखंडाची उर्वरीत किमतीची रक्कम विक्रीपत्राचे वेळी देण्याचे ठरले. ही बाब प्रकरणात उपलब्ध इसारपत्र या दस्तावेजावरून सिध्द होते. सबब अर्जदार हा गैरअर्जदार क्र.1 द २ यांचा ग्राहक आहे असे सिध्द होत असल्याने मुद्दा क्रं. 1 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 2 बाबत ः-
8. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी गैरअर्जदार क्र.3 ते 7 यांच्याशी, त्यांच्या उपरोक्त नमूद मालकीची मौ.वरोरा, सदर शेतजमीन एकूण किंमत रू.2,21,75,461/- मध्ये खरेदी करण्याबाबत दिनांक 7/10/2011 रोजी करार केला. सदर करारपत्राचे अवलोकन केले असता गैरअर्जदार क्र.3 ते 7 सदर शेतजमिनीचा मालकीहक्क व ताबा गैरअर्जदार क्र.1 व 2 यांना हस्तांतरीत केला असून सदर शेतजमिनीत लेआऊट टाकून भुखंड विक्री करण्याकरीता आवश्यक बाबींचे अधिकार गैरअर्जदार क्र.3 ते 7 यांनी गैरअर्जदार क्र.1 व 2 यांना हस्तांतरीत केले आहेत असे स्पष्ट होते. त्यामुळे गैरअर्जदार क्र.1 व 2 हे सदर शेतजमिनीचा उपयोग लेआऊट टाकण्यासाठी करणार आहेत याची पूर्ण कल्पना गैरअर्जदार क्र.3 ते 7 यांना होती. गैरअर्जदार क्र.3 ते 7 यांनी जरी अर्जदारांशी प्रत्यक्ष पणे कोणतेही आर्थीक व्यवहार केलेले नाहीत ही बाब जरी खरी असली तरी गैरअर्जदार क्र.3 ते 7 यांनी गैरअर्जदार क्र.1 व2 यांना अधिकृत करून त्यांच्यामार्फत अप्रत्यक्षपणे अर्जदाराशी भुखंड विक्रीचा करार केलेला आहे. त्यामुळे अर्जदार हा गैरअर्जदार क्र.3 ते 7 यांचादेखील ग्राहक आहे हे सिध्द होते. गैरअर्जदार क्र. 1 ते 7 यांनी अर्जदाराशी भुखंड विक्रीचा व्यवहार केलेला आहे व भुखंड विक्रीशी संबंधीत वाद असल्यामुळे प्रस्तूत मंचाला त्यावर निर्णय देण्याचे अधिकारक्षेत्र आहे असे मंचाचे मत आहे. सबब मुद्दा क्रं. 2 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 3 व 4 बाबत ः-
9. गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी, गैरअर्जदार क्र.3 ते 7 यांच्याकडून करारान्वये मिळालेल्या अधिकारांचा वापर करून अर्जदाराशी सदर लेआऊटमधील भुखंड क्र. क्र.12 किंमत रू.2,98,378/- मध्ये खरेदी करण्याबाबत गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचेशी दिनांक 10/01/2012 रोजी रू.100/- चे स्टॅंपपेपरवर इसारपत्र केले आणि भुखंडाचे इसारापोटी रक्कम रू.1,49,189/- गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी स्विकारली. भुखंडाची उर्वरीत किंमतीची रक्कम विक्रीपत्राचे वे्ळी देण्याचे ठरले होते, ही बाब प्रकरणात उपलब्ध इसारपत्र या दस्तावेजावरून सिध्द होते. यानंतर तक्रारकर्ता भुखंडाची उर्वरीत पूर्ण किंमतीची रक्कम देवून विक्रीपत्र करून घेण्यांस तयार असूनही गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी विक्रीपत्र करून देण्यांस टाळाटाळ केली. त्यामुळे तक्रारकर्त्याने उर्वरीत देणे रक्कम थांबविली. गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्याशी भुखंड विक्रीचा करार करून भुखंड किमतीपोटी काही रक्कम स्विकारलेली असली तरीही सदर शेतजमिनीस अकृषक परवानगी मिळालेली नसल्याचे तक्रारकर्ता आणि गैरअर्जदार क्र.3 ते 7 चे कथनावरून निदर्शनांस येते शिवाय ही बाब गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी नाकारलेली नाही. शेतजमिनीस अकृषक परवानगी मिळालेली नसतांना तक्रारकर्त्याकडून रक्कम घेवून इसारपत्र करुन देण्याची कृती ही ग्राहक संरक्षण कायद्याचे अंतर्गत अनुचीत व्यापार पद्ध्तीत मोडते. सदर प्रकरणाचे अवलोकन केले असता अर्जदाराकडून भुखंडाचे किमतीपोटी रक्कम स्विकारून व तक्रारकर्ता उर्वरीत रक्कम देवून विक्रीपत्र करून घेण्यांस तयार असूनही गैरअर्जदार क्र.1 व2 यांनी करारानुसार तसे विक्रीपत्र तक्रारकर्त्यांस करून दिले नाही. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी अर्जदाराशी करार करून त्याचा भंग केल्यामुळे अनुचीत व्यापार पद्धतीचा अवलंब केलेला आहे व अर्जदारांस त्रुटीपूर्ण सेवा दिलेली आहे.
10. गैरअर्जदार क्र.1 व 2 तसेच गैरअर्जदार क्र.3 ते 7 यांच्यात वरील शेतजमिनीबाबत अंतर्गत विवाद असून सदर विवाद दिवाणी न्यायालयासमक्ष निवाडयासाठी प्रलंबीत आहे असे दिसून येते. मात्र असे असले तरीही गैरअर्जदार क्र.1 व 2 तसेच गैरअर्जदार क्र.3 ते 7 यांच्यातील सदर वादाशी तक्रारकर्त्याचा प्रत्यक्ष कोणताही संबंध नाही. त्यामुळे सदर वादाचा भुर्दंड तक्रारकर्त्यावर टाकणे न्यायोचीत होणार नाही. सबब गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी तक्रारकर्तीकडून भुखंडाची उर्वरीत रक्कम स्विकारून तक्रारकर्त्याला भुखंड क्र. 12 चे विक्रीपत्र करून द्यावे किंवा असे विक्रीपत्र करून देण्यांत काही कायदेशीर अडचणी असल्यांस त्याच्याकडून भुखंडापोटी स्विकारलेली रक्कम व्याजासह परत करण्याबाबत आदेशीत करणे न्यायोचीत राहील या निष्कर्षाप्रत मंच आले आहे. सबब मंच मुद्दा क्रं. 1 ते 3 च्या विवेचनावरुन खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
(1) अर्जदाराची तक्रार क्र.119/2013 अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
(2) गैरअर्जदार क्र.1 व 7 यांनी तक्रारदारांस सेवासुविधा देण्यांस कसूर केल्याची बाब जाहीर करण्यांत येते.
3) गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तरीत्या अर्जदाराकडून विवादीत लेआऊटामधील भुखंड क्र. 12 चे किमतीची उर्वरीत रक्कम स्विकारून त्याला सदर भुखंडाचे पंजीबद्ध विक्रीपत्र करून द्यावे व प्रत्यक्ष ताबा हस्तांतरीत करावा. सदर आदेशाची पुर्तता आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसाचे आत करावी.
4) वर नमूद क्र.3 ची पुर्तता करणे शक्य नसल्यांस गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तरीत्या तक्रारकर्त्याकडून तिन्ही भुखंडांचे इसारापोटी स्विकारलेली रक्कम रू.1,49,189/-, त्यावर कराराच्या दिनांकापासून रक्कम हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 10 टक्के दराने व्याजासह परत करावी.
(3) गैरअर्जदार क्र.1 ते 7 यांनी वैयक्तिक वा संयुक्तरीत्या तक्रारकर्त्याला झालेल्या शारीरिक मानसिक ञासापोटी रु.25,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रू.10,000/- तक्रारकर्त्याला आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसाचे आत करुन दयावे.
(4) उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्य पाठविण्यात यावी.
चंद्रपूर
दिनांक – 30/06/2017
( अधि.कल्पना जांगडे (कुटे) )( अधि. किर्ती गाडगीळ (वैदय) ) ( श्री उमेश व्ही.जावळीकर)
मा.सदस्या. मा.सदस्या. मा. अध्यक्ष