जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे समोर
ग्राहक तक्रार क्रमांक –72/2011 तक्रार दाखल तारीख –02/05/2011
गोदावरी भ्र.चंद्रसेन लांडे
वय 30 वर्षे धंदा शेती .तक्रारदार
रा.घाटसावळी ता. जि.बीड
विरुध्द
1. कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हीस लि.
भास्कर नारायण प्लॉट नं.7 सेक्टर
द्वारा एच.डी.एफ.सी.लाईफ इं.कं.लि.जवळ
कॅनॉट गार्डन,टाऊन सेंटर,सिडको,औरंगाबाद .सामनेवाला
2. रिलायंस जनरल इन्शुरन्स कंपनी लि.
अदालत रोड, बाबा पेट्रोल पंपाच्या बाजुस औरंगाबाद.
3. रिलायंस जनरल इन्शुरन्स कंपनी लि.
श्री.साई एन्टरप्रायजेस, आर.बी.मेहता मार्ग,
पटेल चौक,घाटकोपर (पुर्व)मुंबई 400 077
4. तहसिलदार,
तहसील कार्यालय, बीड
5. कृषी अधिक्षक,
कृषी अधिक्षक कार्यालय, धानोरा रोड,बीड
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य.
तक्रारदारातर्फे :- अँड.सी.एन.वीर
सामनेवाले क्र.1 तर्फे :- स्वतः
सामनेवाले क्र.2 व 3 तर्फे ः- अँड ए.पी.कूलकर्णी
सामनेवाले क्र.4 तर्फे ः- स्वतः
सामनेवाले क्र.5 तफॅ ः- स्वतः
निकालपत्र
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदाराचे पती नामे चंद्रसेन नामदेव लांडे हे शेतकरी होते. त्यांचें नांवे घाटसावळी ता.जि. बीड येथे गट नंबर48 मध्ये 11 आर,गट क्र.271 मध्ये 17.1/2 आर गट क्र.273मध्ये 5 आर अशी एकूण 33.1/2 आर जमिन होती.
तक्रारदाराचे पती दि.27.4.2009 रोजी शेतात जात असताना दुपारी 1.30 वाजताचे सुमारास एक अपे रिक्षा क्र.एम.एच.-23-एन-0570 ने चंद्रसेन यांना जोराची धडक दिल्यामुळे त्यांस सुरुवातीस बीड येथे दवाखान्यात उपचारासाठी नेले, त्यानतर जादा मार असल्यामुळे त्यांस दुनाखे हॉस्पीटल औरंगाबाद येथे नेण्यात आले. उपचार चालू असताना त्यांचा मृत्यू दि.02.05.2009 रोजी झाला. वरील ड्रायव्हरचे विरुध्द दि.16.5.2009 रोजी गून्हा नंबर 52/2009 कलम 304 अ, 279 भादवि प्रमाणे श्रीकृष्ण रामभाऊ मते यांचे फिर्यादीवरुन गून्हा नोंदविण्यात आला. पतीच्या दुःखद निधनानंतर तक्रारदारांनी दि.01.10.2009 रोजी प्रस्ताव अर्ज तक्रारीत नमूद केलेल्या कागदपत्रासह दाखल केला. नुकसान भरपाईची मागणी केली. दि.02.02.2010 रोजी सामनेवाला क्र.2 व 3 ने पाठविलेले पत्र सामनेवाला क्र.5 ने तक्रारदारांना दिले.सर्व कागदपत्राची मागणी केली. सामनेवाला क्र.4 कडे दि.01.10.2009 रोजी तक्रारदारांनी अगोदरच प्रस्ताव अर्जा सोबत दाखल केली होती तरी सुध्दा तक्रारदारांनी मागणी केल्याप्रमाणे दि.24.2.2010 रोजी प्रस्ताव अर्ज रु.100/- चा बॉंड, वरील शपथपत्र, मयताचे नांवाचे तलाठी प्रमाणपत्र भाग-2,मयताचा 7/12 व 8अ व 6क, मृत्यूचे प्रमाणपत्र, वयाचा दाखला, मतदान कार्ड, 6ड, एफआयआर, घटनास्थळ पंचनामा, इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मार्टम रिपोर्ट इत्यादी कागदपत्रे दाखल केली.
दि.22.07.2010 रोजी व दि.28.07.2010 रोजी सामनेवाला क्र.5 यांनी सामनेवाला क्र.1 यांना दि.23.06.2010 रोजी पाठविलेले पत्र तक्रारदारांना दिले. एफआयआर, मयताचा 8अ, सी.ऐ.रिपोर्ट, मेडीकल रिपोर्टची मागणी केली. सदर कागदपत्रे दि.01.10.2009 रोजी दि.24.2.2010 रोजी दाव्या सोबत जोडली होती.
वर नमुद केल्याप्रमाणे दोनदा कागदपत्रे दाखल केल्यानंतर तक्रारदाराने दि.30.06.2010 रोजी सामनेवाला क्र.1 यांनी फोन करुन नूकसान भरपाईची मागणी केली असताना तेथील कर्मचा-याने तक्रारीत नमूद केलेल्या कागदपत्राची मागणी केली. दि.26.06.2010 रोजी सामनेवाला क्र.5कडे कागदपत्रे दाखल केली. सामनेवाला यांनी नूकसानी भरपाईचा विचार केला नाही. म्हणून तक्रारदारांनी सामनेवाला क्र.1 ते 3 यांनी दि.17.02.2011 रोजी वकिलामार्फत नोटीस पाठविली. त्यांचाही उपयोग झाला नाही. सामनेवाला यांनी तक्रारदारांना दयावयाचे सेवेत कसूर केलेला आहे.
विनंती की,तक्रारदारास सामनेवाला क्र. 1 ते 5 यांचेकडून एकत्रित नूकसान भरपाई रु.1,00,000/- प्रस्ताव दाखल दि.01.10.2009 रोजी पासून 12 टक्के व्याजासह मंजूर करावेत. मानसिक त्रासापोटी रु.10,000/- व अर्जाचा खर्च रु.10,000/- मंजूर करण्यात यावा.
सामनेवाला क्र.1 यांनी त्यांचा खुलासा दाखल केला. चंद्रसेन लांडे रा.घाटसावळी ता.बीड यांचा अपघात दि.27.04.2009 रोजी झाला.त्यांचा प्रस्ताव अर्ज दि.13.11.2009 रोजी अपूर्ण कागदपत्रासह प्रामूख्य करुन रासायनिक प्रयोगशाळेचा अहवाल पोलिसांनी सांक्षाकीत केलेला त्यात नव्हता.या बाबत दि.02.02.2010 रोजी कळविले आहे. स्मरणपत्र दि.2.3.2010 रोजी दिले. विमा कंपनीने दि.23.06.2010 रोजी तक्रारदारांना कागदपत्राची सुचना केली. तक्रारदारांनी सदरचे कागदपत्र दाखल केले नाही.रिलायन्स कंपनीने दि.24.11.2010 रोजीच्या पत्रान्वये सदरचा दावा नामंजूर केला.
सामनेवाला क्र.2 व 3 यांनी त्यांचा खुलासा दाखल केला. तक्रारीतील सर्व आक्षेप सामनेवाला यांनी नाकारलेले आहेत. तक्रारदारांना दयावयाचे सेवेत सामनेवाला यांनी कूठेही कसूर केलेला नाही. तक्रारदारांना तक्रार करण्यास कोणतेही कारण घडलेले नाही. तक्रार खर्चासह रदद करण्यात यावी.
सामनेवाला क्र.4 यांनी त्यांचा खुलासा दि.07.07.2011 रोजी दाखल केला. तक्रारदाराचा दावा कबाल इन्शुरन्स कंपनीकडे पूढील कार्यवाहीस्तव पाठविण्यात आला. सामनेवाला क्र.4 यांचे कार्यालय तक्रारदार आणि कंपनी या दोघाचे संपर्क साधून देणारे माध्यम आहे.त्यांचेवर कोणत्याही प्रकारे अपघाताची नूकसान भरपाई मंजूर करण्याची जबाबदारी नाही. तक्रार खर्चासह नामंजूर करावी.
सामनेवाला क्र.5 यांनी त्यांचा खुलासा दि.12.09.2011 रोजी दाखल केला. शासनाच्या वतीने सामनेवाला क्र.5 हे शेतकरी व विमा कंपनी यांचेमधील दुवा आहेत. तक्रारदारांनी दाखल केलेला प्रस्ताव विमा कंपनीकडे पाठविण्याचे काम आहे. त्याप्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे. पूर्ण कागदपत्राची मागणी विमा कंपनीने केल्याने तसे तक्रारदारांना कळवून पूर्तता करण्यास सांगितले. तक्रार रदद करण्यात यावी.
तक्रारदाराची दाखल तक्रार, दाखल कागदपत्रे, तक्रारदाराचे शपथपत्र, सामनेवाला क्र.1 चा खुलासा, सामनेवाला क्र.2,3 चा खुलासा, शपथपत्र, सामनेवाला क्र.4 चा खुलासा, सामनेवाला क्र.5 चा खुलासा यांचे सखोल वाचन केले.
तक्रारदाराचे विद्वान वकील श्री.विर, सामनेवाला क्र.2 व 3 चे विद्वान वकील श्री.ए.पी.कूलकर्णी, यांचा यूक्तीवाद ऐकला. सामनेवाला क्र.1,4, 5 यूक्तीवादाचे वेळी गैरहजर.
तक्रारीतील कागदपत्रे पाहता चंद्रसेन नामदेव लांडे यांचा अपघात एक अपे रिक्षा क्र.एम.एच.-23-एन-0570 ने चंद्रसेन यांना जोराची धडक दिल्यामुळे त्यांस सुरुवातीस बीड येथे दवाखान्यात उपचारासाठी नेले, त्यानतर जादा मार असल्यामुळे त्यांस दुनाखे हॉस्पीटल औरंगाबाद येथे नेण्यात आले. उपचार चालू असताना त्यांचा मृत्यू दि.02.05.2009 रोजी झाला.
अपघाता बाबत पोलिस स्टेशनला फिर्याद देण्यात आली. संबंधीत अँटो रिक्षा चालका विरुध्द गून्हयाची नोंद झालेली आहे.
चंद्रसेन लांडे यांची पोस्ट मार्टेम करण्यातआलेले आहे व त्यांचा अहवालही डॉक्टरांनी दिला. त्यात मृत्यूचे कारण Cervical Cord injury असे नमूद केलेले आहे.
या संदर्भात तक्रारदारांनी चंद्रसेन यांचे मृत्यूनंतर प्रस्ताव अर्ज विमा रक्कम मिळण्यासाठी सामनेवाला क्र.3 कडे कागदपत्रासह दाखल केला होता. तथापि सामनेवाला क्र.1 कडून तक्रारदारांना काही कागदपत्राची मागणी करण्यात आली. त्याप्रमाणे कागदपत्राची पूर्तता सामनेवालाकडे तक्रारदारांनी वेळोवेळी तक्रारीत दाखल पत्राप्रमाणे केलेली आहे. तक्रारदाराचा दावा सामनेवाला क्र.3 यांनी रासायनिक प्रयोगशाळेचा अहवाल सादर न केल्याने नाकारला आहे. या संदर्भात रासायनिक प्रयोग
शाळेचा अहवाल आवश्यक कागदपत्र आहे काय या बाबत विचार करता सदर कागदपत्रावरुन चंद्रसेन लांडे यांचा मृत्यू Cervical Cord injury मुळे झाल्याचे स्पष्ट निदान पोस्ट मार्टेम करणा-या डॉक्टरांनी केलेले आहे व त्यांचा व्हिसेरा राखून ठेवल्या बाबत किंवा त्यांचे मृत्यूचे कारण पाहता संदिग्धता असल्याचे पोस्ट मार्टेम अहवालावरुन कूठेही स्पष्ट होत नाही. तथापि सामनेवाला क्र.3यांनी सदर प्रस्तावाची छाननी/तपासणी योग्य त-हेने केल्याचे दिसत नाही. सामनेवाला क्र.1 व 3 यांनी कागदपत्राची मागणी केली. त्या संदर्भा मध्ये सदरचे कागदपत्र कोणत्या आधारे तक्रारदाराकडे मागण्यात आले या बाबतचा कोणताही कागद सामनेवाला यांनी दाखल केलेला नाही. छापील कागदपत्रातील कागद मागण्याच्या यादीतील कागदपत्रात खुण करुन त्यांची मागणी करण्यात आल्याचे रूटीन काम केल्याचे दिसते.वास्तवीक सदरचा अपघात मार लागल्याने झाला असे मृत्यूचे निदान डॉक्टरांनी स्पष्टपणे केलेले असताना पोस्ट मार्टेम अहवाल केलेल्या डॉक्टरांनी त्या बाबतचा कोणताही व्हिसेरा राखून ठेवलेला नसताना सदरची मागणी सामनेवाला यांनी का केली याबाबतचा बोध होत नाही. सदरचे कागदपत्रे तक्रारदार गोदावरी सामनेवाला कडे दाखल करुन शकत नाही. त्या कारणावरुन सामनेवाला यांनी तक्रारदाराचा दावा नाकारला आहे तो योग्य रितीने नाकारला असे आलेल्या पुराव्यावरुन स्पष्ट होत नाही. त्यामुळे सामनेवाला यांनी तक्रारदाराचा दावा नाकारुन तक्रारदारांना दयावयाचे सेवेत कसूर केल्याची बाब स्पष्ट होते म्हणून सामनेवाला क्र.2 व 3 यांनी तक्रारदारांना अपघाताची रक्कम रु.1,00,000/- देणे उचित होईल असे न्यायमंचाचे मत आहे. तसेच सेवेत कसूरीची बाब स्पष्ट झाल्याने निश्चित तक्रारदारांना मानसिक त्रास झालेला आहे म्हणून मानसिक त्रासाची रक्कम रु.5,000/- व तक्रारीचा खर्च रु.2,000/- देणे उचित होईल असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाला क्र.3 यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांना मयत रामराव औताडे यांचे मृत्यूची रक्कम रु.1,00,000/- (अक्षरी रु.एक लाख फक्त) आदेश प्राप्तीपासून 30 दिवसांचे आंत अदा करावी.
3. सामनेवाला क्र.3 यांना आदेश देण्यात येतो की, वरील रक्कम विहीत मूदतीत अदा न केल्यास सामनेवाला क्र.3 हे तक्रारदारांना तक्रार दाखल दि.02.05.2011 पासून द.सा.द.शे.9 टक्के प्रमाणे व्याज देण्यास जबाबदार राहतील.
4. सामनेवाला क्र.3 यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांना मानसिक त्रासाची रक्कम रु.5,000/-(अक्षरी रु.पाच हजार फक्त) व तक्रारीचा खर्च रु.2,000/-(अक्षरी रु.दोन हजार फक्त) आदेश प्राप्तीपासून 30 दिवसांचे आंत अदा करावी.
5. ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम- 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
(अजय भोसरेकर) (पी.बी.भट)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड