आदेश पारित द्वारा मा. अध्यक्षा श्रीमती आर. डी. कुंडले 1. तक्रार – शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत रक्कम मिळण्याबद्दल दाखल आहे. ही तक्रार दाखल करण्यासाठी तक्रारकर्त्यांना 10 महिने 5 दिवसांचा उशीर झालेला आहे. हा उशीर होण्याचे कारण मृतक विमाधारकाचे आई-वडील दोघेही वृध्द असून त्यांना कायदेशीर बाबी समजत नाहीत. त्यामुळे त्यांना जेव्हा विमा असल्याचे लक्षात आले त्यानंतर त्याबाबतचा दावा मिळण्यासाठी धावाधाव केली. मंचाला हे कारण संयुक्तिक वाटते म्हणून हे मंच तक्रार दाखल करण्यास झालेला उशीर माफ करीत आहे. 2. मृतक विमाधारक राजेश वसंत काटेखाये हा दिनांक 29/11/2007 ला नागपूर वरून आपल्या गावी मारूती व्हॅनने परत येत होता. त्याच्या व्हॅनमधील पेट्रोल संपले म्हणून गाडी एका बाजूला उभी करून दुस-या एखाद्या गाडीची वाट पाहात तो उभा होता. त्या वेळेस मागून येणा-या ट्रक क्रमांक एमएच-04/एच-2735 ने राजेशला व त्याच्या व्हॅनला धडक दिली. या अपघातामध्ये राजेश जागीच मरण पावला. राजेश व्यवसायाने ड्रायव्हर होता व त्याच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना होता. राजेशच्या नावे शेती होती व तो कास्तकारी सुध्दा करीत होता. 3. दोन्ही तक्रारकर्ते मृतक विमाधारक राजेशचे आई-वडील आहेत. मृतक विमाधारकाच्या नावे तो शेतकरी असल्याने शेतकरी अपघात विमा होता. या विम्याची रक्कम मिळण्यासाठी राजेशच्या वडिलांनी विरूध्द पक्ष क्र. 3 तहसीलदार, पवनी यांच्याकडे अर्ज सादर केला. त्यासोबत संपूर्ण आवश्यक दस्तऐवज जोडले. यानंतर विरूध्द पक्ष क्र. 3 यांच्याकडे वारंवार पाठपुरावा व विचारणा तक्रारकर्ता क्र. 2 म्हणजेच मृतक विमाधारक राजेश याचे वडील यांनी केली. परंतु त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही. शेवटी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला भेट दिली असता तेथील श्री. महाजन साहेब यांनी सांगितले की, विरूध्द पक्ष क्र. 1 यांनी पूर्ण कागदपत्रे सादर केली नाहीत, त्यामुळे ते प्रकरण बंद करण्यात आले आहे. 4. तक्रारकर्त्यांकडे विरूध्द पक्ष क्र. 1 किंवा विरूध्द पक्ष क्र. 3 यांनी कोणत्याही अधिकच्या कागदपत्रांची मागणी कधीही केली नाही, त्यामुळे कागदपत्राअभावी प्रकरण बंद केले हे कारण तक्रारकर्त्यांना न पटणारे आहे. आज पर्यंत देखील विमा कंपनीकडून तक्रारकर्त्यांना कोणत्याही प्रकारचे दावा बंद करण्यात आल्याबाबतचे पत्र प्राप्त झालेले नाही. तसे पत्र तहसीलदार, पवनी विरूध्द पक्ष क्र. 3 यांना सुध्दा प्राप्त झालेले नाही. त्यामुळे कागदपत्रे सादर केली नाही म्हणून दावा बंद करणे हा खोटा बहाणा आहे असे तक्रारकर्ते म्हणतात. तीनही विरूध्द पक्ष यांच्या सेवेमध्ये त्रुटी आहे कारण त्यांनी तक्रारकर्त्यांच्या प्रकरणाचा पाठपुरावा योग्य रितीने केलेला नाही असे तक्रारकर्ते म्हणतात. तक्रारकर्त्यांची मागणी अशी आहे की, विमा दावा रक्कम रू. 1,00,000/- व्याजासह विरूध्द पक्ष क्र. 2 यांच्याकडून मिळावे तसेच शारीरिक व मानसिक त्रासाची नुकसानभरपाई म्हणून रू. 25,000/- मिळावे. तक्रारकर्त्यांनी त्यांच्या तक्रारीसोबत एकूण 26 कागदपत्रे जोडली आहेत. त्यामध्ये विमा दावा मिळावा म्हणून दिनांक 20/11/2010 च्या नोटीसचाही उल्लेख आहे. ही नोटीस तीनही विरूध्द पक्ष यांना देण्यात आलेली आहे. 5. विरूध्द पक्ष क्र. 1 कबाल इन्शुरन्स सर्व्हीसेस यांचे उत्तर नेहमीप्रमाणे कुरिअरने प्राप्त झाले. त्यानुसार विमाधारक मयत राजेश वसंत काटेखाये याला दिनांक 29/11/2007 रोजी अपघात झाला व त्यात तो मरण पावला. विमा दावा मिळण्यासाठी विरूध्द पक्ष क्र. 1 यांच्याकडे प्रस्ताव दिनांक 12/01/2008 रोजी प्राप्त झाला. तो प्रस्ताव विरूध्द पक्ष क्र. 1 यांनी पुढील कार्यवाहीस्तव दिनांक 03/03/2008 रोजी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी म्हणजेच विरूध्द पक्ष क्र. 2 यांच्याकडे पाठविला. पुढे आपल्या उत्तरात विरूध्द पक्ष क्र. 1 म्हणतात की, त्यांनी दाव्याबाबत वारंवार विचारणा केली. आजही हा दावा विमा कंपनीकडे प्रलंबित आहे. विरूध्द पक्ष क्र. 1 यांचा सहभाग अत्यंत मर्यादित असल्याने व त्यांच्या सेवेत कोणतीही त्रुटी नसल्याने त्यांच्याविरूध्द तक्रार खारीज करावी असे ते म्हणतात. 6. विरूध्द पक्ष क्र. 3 तहसीलदार, पवनी यांचे उत्तर रेकॉर्डवर आहे. त्यानुसार त्यांनी अर्जदारास (मृतकाचे वडील) प्रत्यक्ष कार्यालयात बोलावून दावा अर्ज भरून घेतला आणि दिनांक 10/01/2008 रोजी कबाल इन्शुरन्स सर्व्हीसेस म्हणजेच विरूध्द पक्ष क्र. 1 यांच्याकडे मंजुरी तथा पुढील कार्यवाहीसाठी पाठविला. त्यानंतर विरूध्द पक्ष क्र. 1 यांनी त्रुटींची पूर्तता करण्याचे कळविल्यावरून दिनांक 22/02/2008 अन्वये त्रुटींची पूर्तता करून व आवश्यक दस्तऐवज सादर करून पुन्हा प्रस्ताव त्यांच्याकडे सादर केला. त्यानंतर या प्रकरणात काय झाले याबद्दल ते अनभिज्ञ आहेत. 7. विरूध्द पक्ष क्र. 2 विमा कंपनी यांना अनेकवेळा संधी देऊनही ते गैरहजर राहिले. त्यांनी उत्तर दाखल केले नाही म्हणून दिनांक 01/03/2011 रोजी त्यांना एकतर्फी घोषित करण्यात आले. त्यानंतरच्या तारखेला दिनांक 03/03/2011 रोजी विरूध्द पक्ष क्र. 2 तर्फे ऍड. दलाल यांनी मेमो दाखल केला तेव्हा प्रकरण युक्तिवादाकरिता लागून 4 तारखा झालेल्या होत्या. त्या नंतरच्या 2 तारखांनंतर विरूध्द पक्ष क्र. 2 तर्फे ऍड. दलाल यांनी वकीलपत्र दाखल केले. त्यासोबत एकतर्फी आदेश रद्द करण्याचा व उत्तर दाखल करू देण्याचा अर्ज दिला. उत्तरावर विरूध्द पक्ष क्र. 2 च्या सह्या नसल्याने मंचाने हा अर्ज फेटाळला व प्रकरण युक्तिवादाकरिता पुढील तारखेवर ठेवले. पुढील तारखेला म्हणजेच दिनांक 10/03/2011 ला विरूध्द पक्ष क्र. 2 यांच्या वकिलांनी तोंडी युक्तिवाद करू देण्याची परवानगी मागितली. हा परवानगीचा अर्ज अध्यक्षा यांनी मंजूर केला, परंतु दोन्ही सदस्यांनी तो नामंजूर केला. म्हणून विरूध्द पक्ष क्र. 2 तर्फे वकील दिनांक 11/03/2011 रोजी हजर असूनही त्यांचा युक्तिवाद ऐकून घेण्यात आला नाही. 8. तक्रारकर्त्यांची तक्रार व त्यासोबतची कागदपत्रे तसेच विरूध्द पक्ष क्र. 1 व 3 यांचे उत्तर इत्यादींच्या आधारावर हे मंच खालीलप्रमाणे निरीक्षण व निष्कर्ष नोंदवित आहे. 9. मृतक विमाधारकाचा मृत्यु अपघाताने तो रस्त्यावर एका बाजूला असतांना झाला ही बाब निर्विवाद आहे. मृतक विमाधारकाच्या नांवे शेतकरी अपघात विमा होता ही बाब सुध्दा सर्वमान्य आहे. अशा परिस्थितीत मृतकाच्या वृध्द आई-वडिलांना, त्यांनी संपूर्ण कागदपत्रांसह रितसर दावा दाखल केल्यानंतरही रक्कम न देणे ही विरूध्द पक्ष क्र. 2 च्या सेवेतील त्रुटी ठरते असा मंचाचा निष्कर्ष आहे. 10. विरूध्द पक्ष क्र. 2 यांनी, विरूध्द पक्ष क्र. 1 व 3 यांना अथवा तक्रारकर्त्यांना त्यांच्या प्रस्तावाचे काय झाले याबाबत कोणत्याही प्रकारे कळविलेले नाही. तसेच दावा मंजूर अथवा नामंजूरही केलेला नाही. याचाच अर्थ सदर दावा अजूनही विचाराधीन आहे असे निष्पन्न होते. म्हणून तक्रारकर्त्यांची तक्रार मंजूर करण्यात येते. करिता आदेश. आदेश तक्रारकर्त्यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 1. विरुद्ध पक्ष क्र. 2 ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी यांनी दोन्ही तक्रारकर्त्यांना शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत रु. 1,00,000/- द्यावे 2. तक्रारकर्ते वृध्द आहेत व त्यांना सदर प्रकरणाचा पाठपुरावा करतांना शारीरिक व मानसिक त्रास झाला त्याबद्दल दोन्ही तक्रारकर्त्यांना विरुद्ध पक्ष क्र. 2 यांनी रू. 10,000/- नुकसानभरपाई द्यावी. 3. व्याजाबाबत करण्यात आलेली मागणी फेटाळण्यात येते. 4. सदर तक्रारीचा खर्च म्हणून विरूध्द पक्ष क्र. 2 यांनी दोन्ही तक्रारकर्त्यांना रु. 2,000/- द्यावेत. 5. विरूध्द पक्ष क्र. 1 व 3 यांच्या सेवेत त्रुटी नसल्याने त्यांच्याविरूध्दची तक्रार खारीज करण्यात येते. 6. विरुद्ध पक्ष क्र. 2 यांनी आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसांच्या आत करावे.
| HONABLE MR. N. V. BANSOD, MEMBER | HONABLE MRS. R. D. KUNDLE, PRESIDENT | , | |