जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
तक्रार क्रमांक 728/2009
तक्रार दाखल करण्यात आल्याची तारीखः-03/06/2009.
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः- 14/06/2013.
श्रीमती विमलबाई मोहन पारधी,
उ.व.सज्ञान, धंदाः घरकाम,
रा.अंबापिंप्री, ता.पारोळा,जि.जळगांव. .......... तक्रारदार.
विरुध्द
1. व्यवस्थापक,
1.कबाल इंन्शुरन्स सर्व्हीसेस प्रा.लि.,
1.4-अ, देहमंदीर सोसायटी, श्रीरंग नगर, साई लेले श्रवण
1.विकास विद्यालयाजवळ,पंपींग स्टेशन रोड,
1.नाशिक 13.
2. व्यवस्थापक,
नॅशनल इंन्शुरन्स कंपनी लि,
रजि.कार्यालय-3, मिडीलटन स्ट्रीट, पो.बॉक्स नं.9229,
कोलकाता 71. ......... विरुध्द पक्ष
कोरम-
श्री.विश्वास दौ.ढवळे अध्यक्ष
श्रीमती पुनम नि.मलीक सदस्या.
तक्रारदार तर्फे श्री.हेमंत अ.भंगाळे वकील.
विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 एकतर्फा.
निकालपत्र
श्री.विश्वास दौ.ढवळे, अध्यक्षः शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत विमाधारक मृत्यु झाल्यानंतर त्याचा विमा क्लेम देण्याचे नाकारुन दिलेल्या सेवेतील त्रृटी दाखल प्रस्तुत तक्रार अर्ज तक्रारदाराने या मंचासमोर दाखल केलेला आहे.
2. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की,
तक्रारदार हे मु.पो.अंबापिंप्रा, ता.पारोळा,जि.जळगांव येथील रहीवाशी असुन तक्रारदाराचे मयत पती कै.मोहन राजाराम पारधी यांची मौजे अंबापिंप्री, ता.पारोळा,जि.जळगांव येथे गट क्र.325/1 शेतजमीन असुन महाराष्ट्र शासनाचे निर्णयानुसार शासनाने विमा हप्ता भरणा करुन राज्यातील सर्व शेतक-यांना व्यक्तीगत अपघात विमा योजना विरुध्द पक्ष क्र. 2 चे सहकार्याने राबवण्यात आली, प्रस्तावाची छाननी करण्याची जबाबदारी विरुध्द पक्ष क्र. 1 ची होती. सदर योजनेअंतर्गत शेतक-याचा अपघाती मृत्यु झाल्यास रक्कम रु.1,00,000/- नुकसान भरपाई मिळणार होती. दि.3/11/2006 रोजी तक्रारदाराचे पती कै.मोहन राजाराम पारधी हे संध्याकाळी 5 ते 5.30 वाजेच्या दरम्यान त्यांचे शेतात प्लास्टीकचे पोत्यात कपाशी भरत असतांना त्या पोत्यावरुन सरकुन बैलगाडीचे खाली पडले व त्यावेळी बैलगाडी चालती झाल्याने बैलगाडीचे चाक पोट व छातीवरुन गेल्याने कै.मोहन राजाराम पारधी हे मयत झाले याबाबत पारोळा पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यु नोंद क्र.84/06, दि.03/11/2006 21.45 वाजता झालेली असुन मयत कै.मोहन राजाराम पारधी यांचा मरणोत्तर पंचनामा, घटनास्थळ पंचनामा व पोस्टमार्टेमही झालेले आहे. तदनंतर तक्रारदार यांनी दि.17/11/2006 रोजी क्लेम फार्म भरुन आवश्यक त्या कागदपत्रांसह भरुन पाठविला असता विरुध्द पक्ष क्र. 2 यांनी मयताचे नांव 7/12 उता-यावर नसल्याचे कारण दर्शवुन तक्रारदाराचा क्लेम नामंजुर केला. तक्रारदाराने क्लेम फॉर्म सोबत मयताचे नांवे असलेला 7/12 उतारा पाठविला होता तथापी तक्रारदाराचा क्लेम खोटे कारण दर्शवुन नाकारुन विरुध्द पक्षांनी सेवेत त्रृटी केलेली आहे. सबब तक्रारदारास शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत रक्कम रु.1,00,000/- देण्याचे आदेश व्हावेत, नुकसान भरपाई दाखल रु.50,000/- व तक्रारीचा खर्च रु.15,000/- मिळावा अशी विनंती केली आहे.
3. सदरची तक्रार दाखल करुन, विरुध्द पक्ष यांना ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 13(1) ब प्रमाणे नोटीसा काढण्यात आल्या. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 हे या मंचातर्फे पाठविलेली रजिष्ट्रर नोटीस स्विकारुनही याकामी गैरहजर राहील्याने त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश पारीत करुन तक्रार निकालासाठी घेतली.
4. तक्रारदार यांची तक्रार, त्यांनी दाखल केलेले कागदपत्रे, व तक्रारदाराचा युक्तीवाद इत्यादीचे सुक्ष्म अवलोकन केले असता न्यायनिवाडयासाठी पुढील मुद्ये उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालीलप्रमाणे देत आहोत.
मुद्ये उत्तर.
1. विमा कंपनीने सेवेत त्रुटी केली आहे काय होय.
2. तक्रारदार कोणता अनुतोष मिळणेस पात्र आहे अंतीम आदेशानुसार
3. आदेश काय खालीलप्रमाणे
5. मुद्या क्र. 1 - तक्रारदाराचे तक्रारीचे अनुषंगाने नि.क्र.7 चे कागद पत्र यादी लगत दाखल कागदपत्रांचे बाकरकाईने अवलोकन करता तक्रारदाराने विरुध्द पक्ष क्र. 1 मार्फत मुळ दावा अर्ज, तलाठयाचे प्रमाणपत्र, 7/12, 8अ, 6क चा उतारा, तहसिलदाराचे प्रतिस्वाक्षरीत प्रमाणपत्र तसेच अपघाताच्या अनुषंगाने इतर आवश्यक कागदपत्रे दाखल केलेली आहेत. तक्रारदाराचे पती मोहन राजाराम पारधी यांचा दि.3/11/2006 रोजी मृत्यु झाल्याचे मृत्यु प्रमाणपत्र असुन अकस्मात मृत्युचे खबर मध्ये प्लास्टीकचे पोत्यात कपाशी भरुन त्या पोत्यावरुन सटकुन बैलगाडी त्याचे खाली येऊन त्यास डॉक्टरकडे घेऊन जात असतांना मृत्यु झाल्याचे नमुद आहे. तसेच सदर प्रस्तावामध्ये सर्वात महत्वाचा पुरावा म्हणजे तक्रारदाराचे पती मयत मोहन राजाराम पारधी यांचे नांवे गट क्रमांक 324/1 मध्ये 79 आर शेतजमीन असल्याने दि.13/11/2006 रोजीचे तलाठी आंबापिंप्री,ता.पारोळा यांनी दिलेल्या 7/12 उता-याच्या छायाप्रतीवरुन स्वयस्पष्ट होते. तसेच विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी तक्रारदाराचे उपरोक्त कथन व पुरावे हे मंचासमोर हजर होऊन नाकारले देखील नाही. तक्रारदाराकडे तिचा पतीचा मृत्यु अपघाती झाल्याबाबत तसेच मयत पती हे शेतकरी असल्याबाबत वर नमुद संपुर्ण कागदोपत्री पुरावे असतांनाही विरुध्द पक्ष क्र. 2 यांनी दि.5/10/2007 रोजीचे पत्रान्वये तक्रारदारास 7/12 उता-यावर मयताचे नांव नाही असे बेजबाबदारपणाचे उत्तर देऊन तक्रारदाराचा शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा क्लेम चुकीचे कारण दर्शवुन तो देण्याचे नाकारुन सदोष व त्रृटीयुक्त सेवा दिल्याचे निष्कर्षाप्रत हा मंच येत आहे. सबब मुद्या क्र. 1 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
6. मुद्या क्र. 2 –तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडुन शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत रक्कम रु.1,00,000/- देण्याचे आदेश व्हावेत, नुकसान भरपाई दाखल रु.50,000/- व तक्रारीचा खर्च रु.15,000/- मिळावा अशी विनंती केली आहे. आमच्या मते तक्रारदार हे विरुध्द पक्ष क्र.2 नॅशनल इंन्शुरन्स कंपनी लि यांचेकडुन शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत रक्कम रु.1,00,000, नुकसान भरपाई दाखल रु.5,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.3,000/- मिळणेस पात्र आहे.
7. मुद्या क्र. 3 - वरिल विवेचनावरुन आम्ही खालीलप्रमाणे आदेश देत आहोत. आ दे श
1. तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजुर करण्यात येतो.
2. विरुध्द पक्ष क्र. 2 नॅशनल इंन्शुरन्स कंपनी लि. यांना आदेशीत करण्यात येते की, त्यांनी तक्रारदार यांना शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत रक्कम रु.1,00,000/-(अक्षरी रक्कम रु.एक लाख मात्र) या आदेशाच्या प्राप्तीपासुन 30 दिवसांचे आंत द्यावेत.
3. विरुध्द पक्ष क्र. 1 नॅशनल इंन्शुरन्स कंपनी लि. यांना आदेशीत करण्यात येते की, त्यांनी तक्रारदार यांना नुकसान भरपाई दाखल रु.5,000/- (अक्षरी रक्कम रु.पाच हजार मात्र ) व तक्रार अर्जाचा खर्च रु.3,000/- (अक्षरी रु.तीन हजार मात्र ) या आदेशाच्या प्राप्तीपासुन 30 दिवसांचे आंत द्यावेत.
ज ळ गा व
दिनांकः- 14/06/2013.
( श्रीमती पुनम नि.मलीक ) (श्री.विश्वास दौ.ढवळे )
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,जळगांव.