जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे
तक्रार क्रमांक – 83/2011 तक्रार दाखल तारीख –01/07/2011
शिवकन्या भ्र. बाळकिसन बांडे
वय 35 वर्षे धंदा शेती .तक्रारदार
रा.अंबेसावळी ता. जि.बीड
विरुध्द
1. अध्यक्ष, कबाल इन्शुरन्स कंपनी लि.
राज अपार्टमेट, जी सेक्टर, प्लॉट नं.29
रिलायन्स फ्रेशच्या मागे,टाऊन सेंटर,सिडको,औरंगाबाद सामनेवाला
2. रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि.
19, रिलायन्स सेंटर,वॉलचंद हिराचंद मार्ग,
बेलार्ड इस्टेट, मुंबई 400 038
3. तहसीलदार,
तहसील कार्यालय, बीड.
4. तालुका कृषी अधिकारी,
कृषी अधिकारी कार्यालय, धानोरा रोड, बीड
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य.
तक्रारदारातर्फे :- अँड.सी.एन.विर
सामनेवाला क्र.1 तर्फे :- स्वतः
सामनेवाला क्र.2 तर्फे ः- अँड.ए.पी.कूलकर्णी सामनेवाला क्र.3 तर्फे ः- स्वतः
सामनेवाला क्र.4 तर्फे ः- स्वतः
निकालपत्र
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे
तक्रारदाराचे पती बाळकिसन प्रभाकर बांडे हे शेतकरी होते. त्यांचा दि.29.12.2008 रोजी दुपारी 4 वाजेचे सुमारास बस स्टँण्ड बीड कडून बार्शी नाका बीड कडे जात असताना त्यांस एम.एच.-20-एटी-1794 कंटेनरने जोराची धडक दिल्यामुळे खाली पडला त्यामुळे त्यांस सरकारी दवाखाना बीड येथे नेले पण जादा मार लागल्यामुळे त्यांस घाटी हॉस्पीटल औरंगाबाद येथे नेले असता त्यांचा दि.30.12.2008 रोजी उपचारा दरम्यान मृत्यू झाला. सदर कंटेनर चालक विरुध्द शिवाजी नगर पोलिस स्टेशन बीड येथे गून्हा नंबर 234/2008 दि.29.12.2008 रोजी विश्वनाथ बांडे यांचे फिर्यादीवरुन नोंदविण्यात आला.
त्यांचे मृत्यूनंतर तक्रारदारांनी दि.24.6.2009 रोजी तहसील कार्यालय व तालूका कृषी अधिकारी यांना आवश्यक कागदपत्रासह प्रस्ताव अर्ज दाखल केला.परंतु त्यांनी त्यांची दखल घेतली नाही. म्हणून तक्रारदारांनी दि.6.5.2011 रोजी वकिलामार्फत सामनेवाला क्र.1 व 2 यांना नोटीस पाठवून भरपाई मागितली असता सामनेवाला क्र.1व2 यांनी नोटीस मिळूनही त्यांनी काहीही कारवाई केली नाही.तक्रारदार चौकशीसाठी सामनेवाला क्र.1व 2 कडे गेले असता सामनेवाला क्र.1 व 2 यांना दि.15.1.2010 रोजी नूकसान भरपाईची मागणी फेटाळल्याचे उत्तर दिले.
विनंती की, सामनेवाला क्र.1 ते 4 यांचेकडून एकत्रितरित्या नूकसान भरपाई रु.1,00,000/- चा प्रस्ताव दाखल दि.24.6.2009 पासून 12 टक्के व्याजासह मंजूर करण्यात यावेत. मानसिक त्रासापोटी रु.10,000/-व तक्रारीच्या खर्चाची रक्कम रु.10,000/- मंजूर करण्यात यावेत.
सामनेवाला क्र.1 यांनी त्यांचा खुलासा दि.29.8.2011 रोजी दाखल केला. श्री.बाळकिसन प्रभाकर बांडे रा. अंबेसावळी यांचा अपघात दि.29.12.2008 रोजी झाला. त्यांचा दावा दि.24.6.2009 रोजी मिळाला. सदरचा दावा संबंधीत विमा कंपनीकडे दि.15.1.2010 रोजी पाठविला. दि.24.1.1.2010 रोजीचे उत्तराने विमा कंपनीने सदरचा दावा नाकारला आहे.
सामनेवाला क्र.2 यांनी त्यांचा खुलासा दि.04.11.2011 रोजी दाखल केला. खुलाशात सर्व आक्षेप त्यांनी नाकारलेले आहेत. सामनेवाला आणि शेतकरी यांचा सरळ करार नाही. महाराष्ट्र शासनाने त्रिपक्षीय करार केलेला आहे. त्यानुसार त्यांचा कालावधी दि.15.8.2008 ते 14.8.2009 असा आहे. तक्रारदारांनी सामनेवालाकडे कागदपत्र योग्य त्या एजन्सीमार्फत पाठविल्याचा पुरावा नाही. तक्रार मुदतीत नाही.
मयत आणि इतर दोन व्यक्ती या मोटार सायकलवरुन जात होत्या. सदरची बाब ही कायदयाचा भंग करणारी आहे. त्यामुळे विमेधारकाला कोणतीही नूकसान भरपाई मिळू शकत नाही. तक्रारदारास कोणतेही कारण घडलेले नाही. सामनेवाला यांना तक्रारदारांनी रु.5,000/- खर्च देण्या बाबत आदेश व्हावेत.
सामनेवाला क्र.3 यांनी त्यांचा खुलासा दि.29.8.2011रोजी दाखल केला. खुलाशात प्रस्ताव दाखल झाल्यानंतर सदरचा प्रस्ताव हा कबाल इन्शुरन्स कंपनीकडे परिपत्रकानुसार पाठविण्यात आले. त्यामुळे सामनेवाला क्र.3 विरुध्दची तक्रार खर्चासह रदद करावी.
सामनेवाला क्र.4 यांनी दि.29.8.2011 रोजी सदरचा प्रस्ताव दाखल केला. खुलाशात तक्रारीतील सर्व आक्षेप त्यांनी नाकारलेले आहेत. दि.3.12.2008 रोजी श्री.बाळकिसन बांडे यांचा मृत्यू झाला होता. त्यांचा प्रस्ताव दि.9.11.2009 रोजी प्राप्त झाला. तो दि.12.11.2009 रोजी जिल्हा अधिक्षक जिल्हा कृषी अधिकारी बीड यांनी सादर केला. त्रूटीची पूर्तता करण्यासाठी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बीड यांचे पत्र दि.20.11.2009 रोजी प्राप्त झाला. पत्राचे संदर्भान्वये मंडळ कृषी अधिकारी यांचे कार्यालयाकडे सदरचे पत्र हातोहात त्रूटी पूर्ततेसह दिले. त्यांनी दि..11.12.2009 रोजी त्रूटीची पूर्तता करुन कार्यालयास प्रस्ताव सादर केला. सदरचा प्रस्ताव जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांचे कार्यालयात पूढील कार्यवाहीस्तव सादर केले. मूळातच प्रस्ताव 11 महिने उशिराने प्राप्त झाला. प्रस्तावातील त्रूटी पूर्णतेच्या कारणास्तव तक्रारदाराकडून विलंब झालेला आहे. ती पूर्तता करुन प्रस्ताव कार्यालयास प्राप्त झाल्यानंतर पूढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आलेले आहे.झालेल्या विलंबाला हे कार्यालय जबाबदार नाही.
तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, तक्रारदाराचे शपथपत्र, सामनेवाला यांचा खुलासा,सामनेवाला यांचे शपथपत्र, यांचे सखोल वाचन केले.
तक्रारदाराचे विद्वान वकील श्री.विर व सामनेवाला क्र.2 यांचे विद्वान वकील श्री.ए.पी.कूलकर्णी यांचा यूक्तीवाद ऐकला.
तक्रारीतील सर्व कागदपत्रे पाहता विमाधारक हीने बाळकिसन बांडे यांचे मृत्यूचा प्रस्ताव सामनेवाला क्र.2 कडे दिलेला होता. सदरचा प्रस्ताव दि.24.11.2010 रोजी पत्रान्वये विमा पत्रातील शर्ती व अटीचा भंग करणे अपघाताचे वेळी दूचाकी वाहनावरुन तिन व्यक्ती प्रवास करीत असल्याने झाल्याने प्रस्ताव नाकारण्यात आलेला आहे.
या संदर्भात अपघाताचे वेळी विमाधारक बाळकिसन बांडे हे मोटार सायकलवरुन प्रवास करीत होते. यावरुन विमा कंपनीचा कोणताही पुरावा नाही. या संदर्भात तक्रारदारांनी दाखल केलेले पोलिस पेपर, पहिली खबर, श्री.विश्वनाथ बांडे यांचा जवाब यात दोन्ही कागदपत्रातश्री. बाळकिसन बांडे हे बस स्टँण्ड कडून बार्शी नाका बीड कडे पायी जात असल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे मोटार सायकल वरुन तिन जण प्रवास करीत असल्याची बाब खोटी असल्यामुळे विमा पत्राचा भंग झाल्याची बाब स्पष्ट होत नाही. सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदाराचा दावा नाकारुन तक्रारदारांना दयावयाचे सेवेत कसूर केल्याची बाब स्पष्ट होते. त्यामुळे सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदारांना विम्याची रक्कम रु.1,00,000/- देणे उचित होईल असे न्यायमंचाचे मत आहे.
सामनेवाला क्र.1,3,4 यांनी परिपत्रकानुसार त्यांची कारवाई पूर्ण केलेली असल्याने सेवेत कसूरीचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे त्यांचे विरुध्दची तक्रार रदद करणे उचित होईल असे न्यायमंचाचे मत आहे.
सेवेत कसूरीची बाब स्पष्ट झाल्याने सामनेवाला यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासाची रक्कम रु.5,000/- व तक्रारीच्या खर्चाची रक्कम रु.5,000/- देणे उचित होईल असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाला क्र.2 यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांना मयत
बाळकिसन बांडे यांचे अपघाती मृत्यू दाव्याची रक्कम
रु.1,00,000/- (अक्षरी एक लाख फक्त) आदेश मिळाल्यापासून
एक महिन्याचे आंत अदा करावी.
3. सामनेवाला क्र.2 यांना आदेश देण्यात येतो की,वरील रक्कम मूदतीत
न दिल्यास वरील रक्कमेवर द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याज तक्रार
दाखल दि.01.06.2011 पासून देण्यास सामनेवाला क्र.2 जबाबदार
राहतील.
4. सामनेवाला क्र.2 यांना आदेश देण्यात येतो की, मानसिक त्रासाची
रक्कम रु.5000/-(अक्षरी रु.पाच हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चाची
रककम रु.5,000/-(अक्षरी रु.पाच हजार फक्त) आदेश प्राप्तीपासून
30 दिवसांचे आंत अदा करावी.
5. ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम-20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
(अजय भोसरेकर) (पी.बी.भट)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड