जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे
तक्रार क्रमांक –126/2011 तक्रार दाखल तारीख –11/08/2011
शिवाजी भिवसेन खाडे
वय 40 वर्षे धंदा शेती .तक्रारदार
रा.डोईठाण ता.आष्टी जि.बीड
विरुध्द
1. विभाग प्रमुख,
कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हीस प्रा.लि.
शॉप नं. राज अपार्टमेंट, सिडको,औरंगाबाद. .सामनेवाला
2. शाखा व्यवस्थापक,
रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि.
19, रिलायन्स सेंटर, वालचंद हिराचंद मार्ग,
बेलार्ड इस्टेट, मुंबई.
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य.
तक्रारदारातर्फे :- अँड.ए.एस.पावसे.
सामनेवाला 1 तर्फे :- स्वतः
सामनेवाला 2 तर्फे ः- अँड.ए.पी.कूलकर्णी
निकालपत्र
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदाराचे वडील नामे श्री.भिवसेन अंबुजा खाडे यांचा मृत्यू दि.24.07.2008 रोजी संर्पदशांने झालेला आहे. त्यांची माहीती आष्टी पोलिस स्टेशन यांना दिली. पोलिसांनी मृत्यूची नोंद केली. पंचनामा केला. शवविच्छेदनासाठी संबंधीत वैद्यकीय अधिका-याकडे पाठविले. तक्रारदाराचा जवाब नोंदविला. मयताचे प्रेत अंत्यविधीसाठी तक्रारदाराकडे सोपवले.
मयत भिवसेन खाडे व्यवसायाने शेतकरी होते. त्यामुळे त्यांचा प्रस्ताव सामनेवाला क्र.1 व 2 कडे रितसर दाखल केला. सामनेवाला क्र.2 यांचेकडे कृषी अधिकारी कार्यालयामार्फत सर्व कागदपत्र साक्षांकीत करुन पाठविण्यात आले.
विनंती की, तक्रारदारास रु.1,00,000/- 18 टक्के व्याजासहीत देण्याचे आदेश व्हावेत. सामनेवाला क्र.1 यांनी वरील विमा दावा सामनेवाला क्र.2 कडे पाठवून त्वरीत निर्णय दयावा असा आदेश व्हावा. मानसिक,शारीरिक त्रासापोटी रु.10,000/- व खर्चापोटी रु.5,000/- देण्या बाबत आदेश व्हावेत. तक्रारीत संबंधीत तक्रारदाराचा विलंब माफीचा अर्ज व शपथपत्र दाखल आहे.
सामनेवाला क्र.1 यांनी दि.09.09.2011 रोजी त्यांचा खुलासा दाखल केला.खुलासा की, श्री. भिवसेन खाडे रा. डोईठाण ता.आष्टी यांचा अपघात दि.24.07.2008 रोजी झाला. त्यांचा दावा दि.27.10.2008 रोजी अपूर्ण कागदपत्रासह (उदा.रासायनिक प्रयोगशाळेचा अहवाल, पोलिस ऑफिसरने सांक्षाकीत केलेले) मिळाले. त्या बाबत दि.20.11.2008 रोजी आणि दि.04.04.2009 रोजी कळविण्यात आले. विमा कंपनीने देखील दि.23.06.2010 रोजी तक्रारदारांना त्या बाबत कळविले. तक्रारदारांनी सदरची कागदपत्रे सादर न केल्याने अंतिमतः दावा बंद करण्यात आला. त्यांचे पत्र तक्रारदारांना दि.24.11.2010 रोजी देण्यात आले.
सामनेवाला क्र.2 यांनी त्यांचा खुलासा दि.01.11.2011 रोजी दाखल केला. खुलाशात तक्रारीतील सर्व आक्षेप नाकारलेले आहेत. सदरचा दावा हा विलंबाने सामनेवालाकडे पाठविला आहे. तक्रारदारांनी सर्व कागदपत्रे दिले असल्याचे रेकार्ड वरुन दिसत नाही. आक्षेपित अपघाताला एक वर्षाचे कालावधीपेक्षा जास्त कालावधी झाला त्यात कागदपत्रही अपूर्ण आहेत ती वेळेत मिळाली नाहीत म्हणून तक्रार मूदतबाहय आहे. तक्रारदारास तक्रार दाखल करण्यास कोणतेही कारण घडलेले नाही. तक्रार खर्चासह रदद करण्यात यावी.
तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, तक्रारदाराचे शपथपत्र, सामनेवाला क्र. 1 व 2 यांचा खुलासा,शपथपत्र, यांचे सखोल वाचन केले.
तक्रारदाराचे विद्वान वकील श्री.पावसे व सामनेवाला यांचे विद्वान वकील श्री.ए.पी.कूलकर्णी यांचा यूक्तीवाद ऐकला.
तक्रारीतील सर्व कागदपत्रे पाहता तक्रारदारांनी श्री.भिवसेन खाडे यांचा मृत्यू दि.24.07.2008 रोजी संर्पदंशान झालेला आहे. त्या बाबतची माहीती पोलिस स्टेशन आष्टीला दिल्यानंतर पोलिसांनी त्यांची कार्यवाही करुन शव विच्छेदनासाठी पाठविले आहे. शवविच्छेदन अहवाल दाखल आहे. त्यात मृत्यूचे कारण संर्पदंशाने देण्यात आलेला आहे. सदर अहवालात निदान असंदिग्ध नाही व त्यामुळे व्हिसेरा राखून ठेवल्याचे त्यात नमूद नाही. उलट व्हिसेरा नष्ट करण्यात आला असा शेरा आहे. अशा परिस्थितीत सामनेवाला क्र.1 व 2 यांनी संबंधीत तक्रारदाराकडे रासायनिक प्रयोगशाळेच्या अहवालाची मागणी केली आहे. मूळात सदरच्या अहवालासाठी व्हिसेरा राखीव ठेवण्यात आलेला नाही त्यामुळे त्यांची पूर्तता निश्चितच तक्रारदार करु शकत नाहीत.
तक्रारदारांनी त्यांचा वडिलांचा मृत्यू दि.24.07.2008 रोजी झालेला असल्याने तक्रार दि.11.08.2011 रोजी दाखल केलेला आहे. तथापि, सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदाराचा दावा दि.24.11.2010 रोजी नाकारला आहे. एकूण दिनांकाचा विचार घेता व या बाबतचा तक्रारदाराच्या विलंबाच्या अर्जा बाबत विचार करता जरी मृत्यू 2008 साली झाला तरी कागदपत्राअभावी विमा कंपनीने दावा दि.24.11.2010 रोजी दाखल केलेला आहे. तक्रार दि.11.08.2011 रोजी दाखल झालेला आहे. म्हणजे दावा नाकारल्यापासून मूदतीत दाखल झालेला आहे. सदरची बाब तांत्रिक आहे, तक्रारदाराने विलंब अर्जात योग्य व सबळ कारणे नमूद केलेली नाहीत. त्यामुळे तक्रारदारास विलंब माफ करणे योग्य नाही अशी सामनेवाला यांची हरकत आहे, परंतु विलंबाची तांत्रिक बाबीचा विचार करता मूळात दि.24.11.2010 रोजी दावा नाकारल्यानंतर तक्रारदारांना दोन वर्षाचे आंत तक्रार दाखल करता येते. त्यामुळे सदरची हरकत याठिकाणी ग्राहय धरणे उचित होणार नाही असे न्यायमंचाचे मत आहे.
वरील विवेचनाप्रमाणे जी कागदपत्रे अस्तित्वात नाही त्या कागदपत्राची मागणी करुन सामनेवाला यांनी तक्रारदाराचा दावा तांत्रिक बाबीवर नाकारल्याचे दिसते. सदरचा दावा नाकारुन सामनेवाला यांनी तक्रारदारांना दयावयाचे सेवेत कसूर केल्याची बाब स्पष्ट होते असे न्यायमंचाचे मत आहे.त्यामुळे सामनेवाला यांनी तक्रारदारांना रक्कम रु.1,00,000/- देणे उचित होईल असे न्यायमंचाचे मत आहे.
सेवेत कसूरीची बाब स्पष्ट झाल्याने सामनेवाला यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासाची रक्कम रु.5,000/- व तक्रारीचा खर्चापोटी रु.3,000/- देणे उचित होईल असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाला क्र.2 यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांना रक्कम
रु.1,00,000/- (अक्षरी एक लाख फक्त) आदेश मिळाल्यापासून एक
महिन्याचे आंत अदा करावी.
3. सामनेवाला क्र.2 यांना आदेश देण्यात येतो की,वरील रक्कम मूदतीत न
दिल्यास वरील रक्कमेवर द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याज तक्रार दाखल
दि.11.08.2011 पासून पूर्ण रक्कम पदरीपडेपर्यत सामनेवाला क्र.2
जबाबदार राहतील.
4. सामनेवाला क्र.2 यांना आदेश देण्यात येतो की, मानसिक त्रासाची
रक्कम रु.5000/-(अक्षरी रु.पाच हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चाची
रककम रु.3000/-(अक्षरी रु.तिन हजार फक्त) आदेश प्राप्तीपासून
30 दिवसांचे आंत अदा करावी.
5. ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम-20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
(अजय भोसरेकर) (पी.बी.भट)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड