ग्राहक तक्रार क्र. 52/2014
दाखल तारीख : 10/03/2014
निकाल तारीख : 01/07/2015
कालावधी: 01 वर्षे 02 महिने 21 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. सुनिल हरी ढोले,
वय – 22, धंदा - शेती,
रा.उत्तमी कायापूर, ता.जि.उस्मानाबाद, ... तक्रारदार.
वि रु ध्द
1. कबाल इन्शुरन्स ब्रेकिंग सर्व्हिसेस,
प्रा.लि. दिशा अलंकार शॉप नं.2,
कॅनाटगार्डन टाऊन सेंटर सिडको,
औरंगाबाद.
2. मे. तहसिलदार,
तहसिल कार्यालय, उस्मानाबाद
3. रिलायन्स जनरल इन्शुरन्स कं. लि.
19 रिलायन्स सेंटर, वालचंद हिराचंद मार्ग,
बेलार्ड इस्टेट, मुंबई - 400038
4. चंद्रकला हरी ढोले,
वय- 25 वर्ष, धंदा - घरकाम,
रा. उत्तमी कायापूर, ता. जि. उस्मानाबाद. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विदयुलता जे.दलभंजन. सदस्य.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रादारातर्फे विधीज्ञ : श्री. बी. ए. बेलूरे.
विरुध्द पक्षकार क्र.1 विरुध्द तक्रार रद्द.
विरुध्द पक्षकार क्र.2 तर्फे विधीज्ञ : श्री. नो से.
विरुध्द पक्षकार क्र.3 तर्फे विधीज्ञ : श्री.जे.व्ही.भोसले.
विरुध्द पक्षकार क्र.4 विरुध्द एक्सपार्टी.
न्यायनिर्णय
मा. अध्यक्ष, श्री.एम.व्ही.कुलकर्णी यांचे व्दारा:
अ) पूर्वी विरुध्द पक्षकार (विप) क्र.4 आई हिने वडीलांचे मृत्यूनंतर शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत भरपाईची तक्रार क्र.377/2008 केली होती व ती रद्द झाली होती. परंतु तक्रारकर्ता (तक) भरपाई मिळणेस पात्र असल्यामुळे त्यांने विमा कंपनी इत्यादी विरुध्द पक्षकार (विप) यांचेकडे क्लेम केला तो विप यांनी प्रंलबित ठेवला म्हणून तक ने ही तक्रार दिलेली आहे.
तक चे तक्रारी अर्जातील कथन थोडक्यात पूढीलप्रमाणे आहे.
1. तक चे वय 22 वर्ष दिले असून विप क्र.4 चे वय 25 वर्षे दिले आहे. तक चे वडील हरीबा हे विप क्र.4 चे पती होते असे म्हटले आहे. म्हणजे विप क्र.4 तक ची सावत्र आई असावी. हरीबा यांस येथे गट क्र.42 मध्ये 96 आर. जमिन होती. तो शेतकरी असल्यामुळे त्यांचा शेतकरी अपघात विमा उतरविलेला होता. दि.01.01.2008 रोजी बाबाशा कांबळे यांने हरीबाचे डोक्यात हत्याराने मारुन त्यांचा खून केला. नंतर त्यांस गळफास देऊन आंब्याचे झाडास लटकवले व आत्महत्याचा बनाव केला. त्याबद्दल बाबाशा यांचे विरुध्द खटला दाखल झाला.
2. तक ने म्हटले आहे की, दि.04.08.2008 रोजी सर्व कागदपत्रांसह त्यांने तहसीलदार उस्मानाबाद यांचेकडे दावा दाखल केला. नंतर कागदपत्र मागणीचे पत्र दि.25.09.2008 रोजी मिळाले. फायनल रिपोर्ट खटला न संपल्यामूळे मिळाला नव्हता. त्यामुळे दावा मंजूर करण्यात आला नाही. विप क्र.4 जी हरीबाची पत्नी होती तिने तक्रार क्र.377/2008 मंचामध्ये दाखल केली. तिला शेतकरी अपघात विम्याची रक्कम मिळत नाही या निकर्षावर ती तक्रार फेटाळण्यात आली.
3. तक यांने शेतकरी अपघात विम्याची रक्कम मिळावी म्हणून प्रयत्न केले. विप क्र.3 विमा कंपनीने पुन्हा कागदपत्रे दाखल करावी म्हणून मयताचे नांवे पत्र पाठविले. विप क्र.1 व 2 यांनी चुकीचे नांव कळविल्यामुळे प्रस्ताव प्रलंबित राहिल्याचे दिसते. पुन्हा पुन्हा तेच कागदपत्रे मागवून विप क्र.3 विमा रक्कम देण्याची टाळाटाळ करीत आहेत ती विमा रक्कम रु.1,00,000/- मानसिक त्रासापोटी रु.10,000/- व्याजासह मिळावे म्हणून तक ने ही तक्रार दि.10.02.2014 रोजी दाखल केली आहे.
4. तक ने तक्रारीसोबत विप क्र.2 चे विप क्र.1 ला दिलेले ऑगस्ट 2008 चे पत्र, विप क्र.3 चे दि.03.05.2013 चे पत्र, सत्र न्यायालयातील खटला क्र.50/2008 मधील दि.07.02.2009 चे निकालाची प्रत, हरीबाचे निवडणूक ओळखपत्र, इत्यादी कागदपत्रे हजर केली आहेत.
5. तक ने विप क्र.1 ब्रोकर यांचे विरुध्द योग्य ती तजविज न केल्यामुळे विप क्र.1 विरुध्द तक्रार रद्द झालेली आहे.
6. विप क्र.2 यांनी या कामी आपले म्हणणे दाखल केलेले नाही.
7. विप क्र.3 यांनी लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. विप क्र.3 ने हे नाकबूल केले की, तक्रार क्र.377/2008 मध्ये तक म्हणजे प्रस्तूत विप क्र.4 हिच्यावर हरीबाचे खुनाचा आरोप असल्यामुळे ती तक्रार फेटाळण्यात आली. प्रस्तूत तक व विप क्र.4 हे शेतकरी अपघात विम्याची रक्कम मिळण्यास पात्र आहेत हे नाकबूल आहे. विमा पॉलिसी अटी प्रमाणे जर खून झाला असेल तर शेतकरी अपघात विमा मिळू शकत नाही. प्रस्तूत तक्रारीला रेस ज्यूडिकेटा या तत्वाचा बांध येतो. त्यामुळे तक्रार रद्द होण्यास पात्र आहे.
8. विप क्र.4 नोटीस बजावूनही गैरहजर राहीली म्हणून तिचे विरुध्द तक्रार एकतर्फा चालली आहे.
9. तक ची तक्रार, त्यांने दाखल केलेली कागदपत्रे व विप चे म्हणणे यांचे अवलोकन करता आमचे विचारार्थ खालील मुद्दे येतात त्यांची उत्तरे आम्ही त्यांचे समोर खालील दिलेल्या कारणासाठी लिहीली आहेत.
मुद्दे उत्तर
1. विप यांनी सेवेत त्रूटी केली आहे काय ? नाही
2. तक अनुतोषास पात्र आहे काय ? नाही
3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिंमासा
मुद्दा क्र.1 व 2 -
10. पूर्वीची तक्रार क्र.377/2008 हे निकालपत्राची प्रत सदस्याच्या प्रतीला जोडलेली आढळून येते. ती तक्रार विप क्र.4 चंद्रकला हिने दाखल केलेली होती. मयत हरीबाचा शेतकरी अपघात विमा मिळावा म्हणून ती तक्रार दिलेली होती. ती तक्रार दि.17.03.2009 रोजी रद्द करण्यात आलेली आहे. हे स्पष्ट आहे की, प्रस्तूत तक हा त्या कामी पक्षकार नव्हता. मात्र त्या कामी जी तक्रारकर्ती होती ती ह्याकामी विप क्र.4 म्हणून सामील आहे. प्रस्तूत विप क्र.4 ही हरीबाची कायदेशीर पत्नी असल्याचे तक ने तक्रारीत म्हटले आहे. पुर्वीची तक्रार प्रस्तूत तक साठी केली नव्हती असे तक चे म्हणणे नाही. ही बाब लक्षात ठेवावी लागेल.
11. सत्र न्यायालयातील खटला क्र.50/2008 चे निकालपत्र असे दर्शवतो की, चंद्रकला हरी ढोले म्हणजे प्रस्तूत विप क्र.4 व बाबाशा कांबळे यांचे विरुध्द हरीबाचा खुन केल्याबद्दल तो खटला होता. त्या खटल्याचा निकाल दि.07.02.2009 रोजी लागून दोन्ही आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली. पुर्वीची ग्राहक तक्रार क्र.377/2008 चा निकाल त्यानंतर दि.17.3.2009 रोजी लागला. असे दिसते की त्यावेळी सत्र न्यायालयातील निकालाची प्रत हजर करण्यात आलेली नव्हती. त्या खटल्यामध्ये हरीबा यांचा खून झाला असे धरण्यात आलेले आहे. त्या खटल्यात फियादी पक्षाची तक्रार होती की, आरोपी चंद्रकला व बाबाशा यांचे अनैतिक संबंध होते व त्यामुळे त्यांनी हरीबाचा खून केला. निकालपत्रात म्हटले आहे की, त्या दोन आरोपींनी हरीबाचा खून केला हे शाबीत झालेले नाही.
12. प्रस्तूत तक ने म्हटले आहे की, प्रस्तूत विप क्र.4 हिच्यावर हरीबाचा खून केल्याचा आरोप असल्यामुळे पूर्वीची तक्रार या मंचाने रद्द केली. पुर्वीच्या तक्रारीतील निकालपत्राचे अवलोकन केले असता हे म्हणणे खरे असल्याचे दिसून येत नाही. त्याकामी या मंचासमोर असा मूद्दा होता की, खून झाला असेल तर अपघाती विमा रक्कम मिळू शकेल का काय ? राष्ट्रीय आयोगाचा निवाडा पृथ्वीराज भंडारी विरुध्द लाईफ इन्शूरन्स कार्पोरेशन 2006 (2) सीपीआर 8 यावर भर देऊन या मंचाने म्हटले की जेथे खून झाला असेल तेथे अपघाती मृत्यू झाला असे म्हणता येणार नाही. खून हा जर जाणीवपूर्वक केला असेल तर तो अपघात या व्याख्येत बसणार नाही. वर म्हटल्या प्रमाणे सत्र न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे हरीबा यांचा जाणीवपूर्वक खून करण्यात आलेला होता. त्यामुळे त्यांचा अपघाती मृत्यू होता हे तक चे म्हणणे मान्य करता येणार नाही. त्यामुळे विमा अपघात दावा फेटाळून विप क्र.3 यांनी सेवेत त्रूटी केलेली नाही. तक कोणत्याही अनुतोषास पात्र नाही. त्यामुळे आम्ही मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर नकारार्थी देतो व खालीलप्रमाणे आदेश करतो.
आदेश
1. तक ची तक्रार फेटाळण्यात येते
2. खर्चाबद्दल कोणताही आदेश नाही.
3. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
4. उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री.एम.व्ही.कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकुंद.बी.सस्ते) (सौ.विद्युलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्य
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद