निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 20/03/2013
तक्रार नोदणी दिनांकः- 02/04/2013
तक्रार निकाल दिनांकः- 13/11/2013
कालावधी 07 महिने. 11 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्या
सौ.अनिता ओस्तवाल. M.Sc.LLB.
---------------------------------------------------------------------------------------------------------
श्रीमती प्रभावती भ्र.गोपाळराव यादव. अर्जदार
वय 35 वर्षे. धंदा. घरकाम. अॅड.अनिल पेडगावकर.
रा. रामपूरी (बु) ता.मानवत जि.परभणी.
विरुध्द
1 युनायटेड इंडिया इन्शुरन्स कं.लि. गैरअर्जदार.
मंडळ कार्यालय क्र.2, अंबिका हाऊस, अॅड.जी.एच.दोडीया.
शंकरनगर चौक,नागपूर -440 010.
व्दारा युनायटेड इंडिया कंपनी परभणी कार्यालय.
2 मा.तालुका कृषि अधिकारी. स्वतः
तालुका कृषि अधिकारी कार्यालय, मानवत.
______________________________________________________________________
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटुरकर.अध्यक्ष.)
गैरअर्जदारविमा कंपनीने अर्जदाराच्या मयत पतीचा शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत नुकसान भरपाई देण्याचे टाळून अर्जदारास सेवेत त्रुटी दिल्या बद्दलची अर्जदाराची तक्रार आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदार ही मौजे रामपुरी बु.
तालुका मानवत जिल्हा परभणी येथील रहिवाशी असून तीचे पती गोपाळराव उध्दव यादव हे 19/05/2010 रोजी अॅटो क्रमांक एम.एच.-22 एन – 3187 च्या चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवुन जोरदार धडक दिली व त्यामध्ये अर्जदाराच्या पतीचा अपघाती मृत्यू झाला. अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, अर्जदाराचे पती हे शेतकरी होते व शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत मिळणा-या लाभास ते पात्र आहे. पतीच्या मृत्यूनंतर अर्जदाराने गैरअर्जदाराकडे 15/10/2010 रोजी शेतकरी अपघात योजने अंतर्गत लाभ मिळावे म्हणून क्लेमफॉर्म सोबत दोषारोपपत्र, प्रतिज्ञापत्र तालुका कृषि अधिकारी कार्यालय मानवत येथे दिलेले अर्ज तसेच ईतर आवश्यक ती कागदपत्रे 7/12 ची प्रत दाखल करुन फॉर्म पूर्ण पाठविला, परंतु गैरअर्जदार विमा कंपनीने सदरचा क्लेम कोणतेही कारण नसतांना 25/03/2011 रोजी युनायटेड इंडिया इंन्शुरंस कंपनी यांनी फेटाळला. अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, अर्जदार यांनी गैरअर्जदार कंपनीकडे विमा उतरविला होता व त्यांनी शेतकरी अपघात योजने अन्वये जबाबदारी स्वीकारली आहे, परंतु अर्जदार यांना गैरअर्जदार यांनी कागदपत्रांची पुर्तता करावी असे सांगुन फेटाळला आहे. त्यानंतर सुध्दा अर्जदार याने कागदपत्रांची संपूर्णपणे पुर्तता करुन देखील गैरअर्जदार हे शेतकरी विमा योजने अंतर्गत मिळाणारे 1,00,000/- रुपये नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करीत आहे. शेवटी दिनांक 11/01/2012 रोजी अर्जदार गैरअर्जदार कंपनीकडे गेली व विमा योजने अंतर्गत नुकसान भरपाई द्या विनंती केली असता, त्यांनी स्पष्टपणे नकार दिला. म्हणून सदरची तक्रार दाखल करण्यास भाग पडले व मंचास विनंती केली आहे की, सदरचा तक्रार अर्ज मंजूर करुन शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत 1,00,000/- रु. गैरअर्जदाराकडून अर्जदारास देण्याचा आदेश व्हावा, मानसिक व शारिरीकत्रासापोटी गैरअर्जदाराने अर्जदारास 10,000/- रु. देण्याचा आदेश व्हावा, तसेच तक्रार अर्जाच्या खर्चापोटी 3,000/- रुपये देण्याचा आदेश व्हावा अशी विनंती केली आहे.
तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 2 वर अर्जदाराने आपले शपथपत्र दाखल केलेले आहे.नि.क्रमांक 6 वर 11 कागदपत्रांच्या यादीसह 11कागदपत्रे दाखल केलेली आहेत. ज्यामध्ये गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदारास विमा दावा फेटाळल्याचे पत्र, कबाल इन्शुरन्सचे 15/10/2010 चे अर्जदारास पत्र, 03/08/2010 चे कबाल इन्शुरन्सचे अर्जदारास लिहिलेले पत्र, क्लेमफॉर्म भाग क्रमांक 1, क्लेमफॉर्म भाग क्रमांक 2, क्लेमफॉर्म भाग क्रमांक 4, अर्जदाराने तालुका कृषी अधिकारी मानवत यांच्याकडे कागदपत्र दाखल केलेला अर्ज, मृत्यू प्रमाणपत्र, चार्जशिटची प्रत, अर्जदाराचे शपथपत्र, पासबुकची प्रत, फेरफार नोंदवहीची प्रत इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
लेखी निवेदन सादर करण्यासाठी मंचातर्फे गैरअर्जदारांना नोटीसा काढण्यात आल्यावर, गैरअर्जदार क्रमांक 1 वकिला मार्फत मंचासमोर हजर, व नि.क्रमांक 10 वर आपला लेखी जबाब सादर केला. व त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, सदरची तक्रार ही खोटी व बनावटी आहे. अर्जदार व तीचे पती हे गैरअर्जदार विमा कंपनीचे केव्हाही ग्राहक नव्हते, त्यामुळे सदरची तक्रार चालवण्याचा मंचास अधिकार नाही. तसेच गैरअर्जदार विमा कंपनीचे हे म्हणणे आहे की, अर्जदाराने किंवा तीच्या मयत पतीने हप्ता भरलेला नाही, त्यामुळे अर्जदार हे गैरअर्जदार विमा कंपनीचे ग्राहक होत नाही, व तसेच Tri-Partite agreement असल्यामुळे शेतकरी गैरअर्जदार विमा कंपनी विरुध्द तक्रार दाखल करु शकत नाही. म्हणून सदरची तक्रार फेटाळणे योग्य आहे. व तसेच गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदारास कोणत्याही प्रकारची सेवेत त्रुटी दिलेली नाही. म्हणून सदरची तक्रार कायद्यान्वये चालवणे योग्य नाही तसेच गैरअर्जदार विमा कंपनीचे हे म्हणणे आहे की, कबालने दिनांक 03/08/2010 रोजी क्लेमफॉर्म तसेच तालुका कृषी अधिका-याचे पत्र 7/12 उतारा, 8 - अ, 6 - क कागदपत्रे मयत पतीतच्या नावे असल्याचा पुरावा दाखल करावे व तसेच पोलिस पेपर ड्रायव्हींग लायसेंन्स, आर.सी.बुक इत्यादी कागदपत्रे दाखल करावेत असे अर्जदारास कळविले होते, परंतु अर्जदाराने सदरचे कागदपत्र कबालकडे दाखल केले नाही. त्यामुळे कबालने अर्जदाराचा अर्धवट प्रस्ताव गैरअर्जदार विमा कंपनीकडे दाखल केला. म्हणून गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदाराचा विमा प्रस्ताव फेटाळला व सदरचा प्रस्ताव फेटाळतांना गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदाराचा विमादावा 90 दिवसांच्या आत न आल्यामुळे योग्य ते कारण देवुन दिनांक 24/03/2011 रोजी फेटाळला आहे व तसेच गैरअर्जदार विमा कंपनीचे हे म्हणणे आहे की, सदरची पॉलिसी ही 15/08/2009 ते 14/08/2010 पर्यंत लागु होती व पॉलिसीच्या नियमा प्रमाणे अर्जदाराने आपला विमादावा 90 दिवसांत दाखल करणे बंधनकारक होते ते न केल्यामुळे गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदाराचा विमादावा फेटाळला आहे व तसेच गैरअर्जदार विमा कंपनीचे हे म्हणणे आहे की, अर्जदाराचे पती हे मोटार सायकल चालवत असतांना मयत झाले आहे व पॉलिसीच्या नियमा प्रमाणे ड्रायव्हींग लायसेंन्स दाखल करणे आवश्यक आहे ते देखील अर्जदाराने गैरअर्जदार विमा कंपनीकडे दाखल केले नाही, म्हणून मंचास विनंती केली आहे की, सदरची तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी.
गैरअर्जदार विमा कंपनीने नि.क्रमांक 11 वर आपले शपथपत्र दाखल केले आहे.
गैरअर्जदार क्रमांक 2 मंचासमोर हजर व नि.क्रमांक 12 वर आपला लेखी जबाब सादर केला, त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, दिनांक 04/12/2009 अन्वये राज्या मध्ये शेतकरी जनता अपघात विमा योजना कार्यान्वीत केलेली आहे. मयताची पत्नी प्रभावती गोपाळराव यादव यांनी सदरील योजनेचा लाभ मिळवण्याच्या दृष्टीने अपघात विमा प्रस्ताव दिनांक 05/07/2010 रोजी तालुका कृषी अधिकारी मानवतकडे सादर केला प्रस्ताव तपासणी केली असता त्यामध्ये काही कागदपत्रे कमी असून देखील प्रस्ताव वेळेत सादर होणे गरजेचे असल्यामुळे या कार्यालयाने प्रस्ताव प्रलंबीत न ठेवता तात्काळ वरिष्ठ कार्यालयास पूढील कार्यवाहीसाठी सादर करण्यात आला. विमा कंपनी स्तरावर प्रस्ताव तपासणी अंती त्यामध्ये त्रुटी काढण्यात आल्या व विमा कंपनीने त्रुटी सादर करण्या बाबत पत्र देवुन या कार्यालयास कळविण्यात आले या कार्यालयाने त्रुटी बाबतचे पत्र दिनांक 13/08/2010 रोजी मंडळ कृषी अधिकारी रामेटाकळी यांच्या मार्फत संबंधीत अर्जदारास त्रुटीची पुर्तता करण्यासाठी देण्यात आल्यानंतरही संबंधीताकडून त्रुटीची कागदपत्रे पुर्तता न केल्यामुळे 15/10/2010 रोजी विमा कंपनीकडून दुसरे पत्र प्राप्त झाले ते सुध्दा क्षेत्रीय कर्मचा-या मार्फत संबंधीता पर्यंत पोंहच करण्यात आले होते, परंतु विमा कंपनीने त्रुटीची मागणी केलेली कागदपत्रे लायसेंन्स, आर.सी.बुक संबंधीताने या कार्यालयास वेळेत सादर केल्याचे दिसून येत नाही, म्हणून अर्जदाराचा अपघात विमा नामंजूर केलेला आहे. त्यामुळे आम्ही अर्जदारास कोणत्याही प्रकारची सेवेत त्रुटी दिलेली नाही, सर्व कार्यवाही विहित मुदतीत पार पाडल्यामुळे या प्रकरणी तालुका कृषी अधिकारी यांना दोषी धरणे योग्य नाही.
नि.क्रमांक 13 वर गैरअर्जदार क्रमांक 2 ने आपले शपथपत्र दाखल केलेले आहे.
दोन्ही बाजुंच्या कैफियतीवरुन निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे.
मुद्दे. उत्तर.
1 अर्जदाराची सदरची तक्रार मुदतीत आहे काय ? होय.
2 गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदाराचा शेतकरी अपघात विमा योजने
अंतर्गत नुकसान भरपाई देण्याचे टाळून सेवेत त्रुटी दिली आहे काय ? होय.
3 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1.
अर्जदाराचा मयत पती गोपाळराव उध्दवराव यादव हा शेतकरी अपघात विमा पॉलीसीचा लाभार्थी होता. ही अॅडमिटेड फॅक्ट आहे.अर्जदाराच्या पतीचा मृत्यू दिनाक 19/05/2010 रोजी अॅटो क्रमांकएम.एच.-22 एन – 3187 ने धडक दिल्यामुळे अपघाती मृत्यू झाला होता ही बाब नि.क्रमांक 6/12 वरील दाखल केलेल्या फायनल रिपोर्टवरुन सिध्द होते, तसेच पतीच्या मृत्यू नंतर अर्जदाराने योजनेचा लाभ मिळवण्याच्या दृष्टीने शेतकरी अपघात विमा प्रस्ताव दिनांक 05/07/2010 रोजी गैरअर्जदार क्रमांक 2 कडे दाखल केला होता ही बाब नि.क्रमांक 12 वर दाखल केलेल्या गैरअर्जदार क्रमांक 2 च्या लेखी जबाबावरुन दिसून येते. अर्जदाराचा विमा प्रस्ताव गैरअर्जदार क्रमांक 1 विमा कंपनीने 90 दिवसांच्या आत दाखल न केल्यामुळे शेतकरी योजना अपघात विमा अंतर्गत अर्जदाराचा विमादावा दिनांक 24/03/2011 रोजी फेटाळला होता ही बाब नि.क्रमांक 6/1 वरील दाखल केलेल्या रेप्युडेशन लेटर वरुन सिध्द होते, त्यानंतर अर्जदाराने मंचासमोर सदरची तक्रार ही 15/03/2013 रोजी दाखल केलेली आहे व ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 24 A (1) प्रमाणे दावा दाखल करण्याची मुदत कारण घडल्या पासून दोन वर्षाच्या आत दाखल करणे आवश्यक आहे. सदरचे प्रकरणात गैरअर्जदार विमा कंपनीने दिनांक 24/03/2011 रोजी अर्जदाराचा विमादावा फेटाळला व अर्जदाराने सदरची तक्रार ही दिनांक 15/03/2013 रोजी मंचासमोर दाखल केली व ती दोन वर्षाच्या आत आहे. म्हणून सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायद्या अन्वये मुदतीत आहे. असे मंचास वाटते म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर होकारार्थी देत आहोंत.
मुद्दा क्रमांक 2
अर्जदाराचा विमादावा गैरअर्जदार विमा कंपनीने दिनांक 24/03/2011 रोजी 90 दिवसाच्या आत दाखल न केल्यामुळे फेटाळला होता ही बाब नि.क्रमांक 6/1 वरील रेप्युडेशन लेटर वरुन सिध्द होते. पॉलिसीची मुदत संपल्यानंतर 90 दिवसात दाखल केला नाही म्हणून क्लेम नामंजूर केल्याचे दिलेले कारण मुळीच ग्राह्य धरता येणार नाही. कारण शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना संदर्भातील महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकामध्ये नुकसान भरपाई क्लेम ठराविक मुदतीतच दाखल केला पाहीजे ही अट मुळीच बंधनकारक नाही. मुळातच राज्यातील सर्व खातेदार शेतक-यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे घेतलेल्या शेतकरी विमा पॉलीसीचा खर्च लाभार्थी शेतक-यांचा अकस्मात अपघाती मृत्यू झाल्यावर त्याच्या कुटूबांला आर्थिक हातभार मिळावा व कुटूंबावर उपासमारीची पाळी येवू नये या उदात्त हेतूने शेतकरी विम्याची कल्याणकारी योजना राबविली गेली आहे. असे असतानाही विमा कंपनीने क्लेम मुदतीत दाखल केला नाही हे तांत्रीक कारण दाखवून अर्जदाराचा क्लेम बेकायदेशीररित्या नाकारुन निश्चीतपणे सेवा त्रूटी केली आहे असाच यातून निष्कर्ष निघतो. क्लेम उशीरा दाखल केला म्हणून विमा कंपनीस पॉलीसी हमीप्रमाणे मयताच्या अपघाती मृत्यूची नुकसान भरपाई देण्याचे विमा कंपनीला मुळीच टाळता येणार नाही.
या संदर्भात मा. महाराष्ट्र राज्य आयोगानेही रिपोर्टेड केस 2008 (2) All MR (Journal) page 13 आय.सी.आय.लोंबार्ड विरुध्द सिंधुताई खैरनार या प्रकरणात असे मत व्यक्त केले आहे की, क्लेम दाखल करण्यास उशीर झाला ही अट मुळीच बंधनकारक तथा मॅडेटरी नाही हे मत प्रस्तूत प्रकरणालाही लागू पडते याखेरीज मा. राष्ट्रीय आयोगाने देखील रिट पिटीशन 3329/07 युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी विरुध्द अरुणा या प्रकरणात 22.10.2007 रोजी दिलेल्या निकालपत्रात देखील वरील प्रमाणेच मत व्यक्त केलेले आहे.ते प्रस्तुत प्रकरणाला लागु पडते. अर्जदाराचा क्लेम चुकीच्या पध्दतीने नाकारुन तीला मानसिक त्रास दिला आहे व सेवेतील त्रूटी केलेली असल्याचे स्पष्ट दिसते.गैरअर्जदार क्रमांक 1 विमा कंपनीने यांनी मयत गोपाळ यादव याचा डेथक्लेम बेकायदेशिररित्या नाकारुन त्याच्यावर अन्याय केलेला आहे व नुकसान भरपाई मिळणे पासून वंचित ठेवलेले आहे. निश्चितच अर्जदार गैरअर्जदार क्रमांक 1 विमा कंपनीकडून शेतकरी अपघात योजने अंतर्गत रु. 1,00,000/- मिळवण्यास पात्र आहे. गैरअर्जदार क्रमांक 1 विमा कंपनीने सदरची रक्कम अर्जदारास देण्याचे टाळून निश्चितच सेवेत त्रुटी दिली आहे. म्हणून मुद्दा क्रमांक 2 चे होकारार्थी उत्तर देवुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2 गैरअर्जदार विमा कंपनी यांनी निकाल कळाल्यापासून 30 दिवसांच्या आत
अर्जदारास रु. 1,00,000/- फक्त ( अक्षरी रुपये एकलाख फक्त ) द्यावे.
3 तक्रारीचा खर्च ज्याचा त्यांनी सोसावा.
4 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
सौ.अनिता ओस्तवाल. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्या. मा.अध्यक्ष.