(घोषित दि. 31.12.2010 व्दारा सौ.ज्योती ह.पत्की, सदस्या) या तक्रारीची हकीकत थोडक्यात खालील प्रमाणे आहे. तक्रारदाराचे म्हणणे असे आहे की, तिचे पती रमेश सोनवणे हे व्यवसायाने शेतकरी होते. महाराष्ट्र शासनाने औरंगाबाद महसुल विभागातील शेतक-यांचा गैरअर्जदार क्रमांक 2 रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत दिनांक 14.08.2008 ते 13.08.2009 या कालावधीसाठी विमा उतरविलेला होता आणि तिच्या पतीचे दिनांक 02.07.2008 रोजी वाहन अपघातामधे निधन झाले. पतीचे अपघाती निधन झाल्यामुळे तिने दिनांक 18.09.2008 रोजी तहसील कार्यालय, भोकरदन यांच्यामार्फत गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांच्याकडे आवश्यक कागदपत्रांसह विमा दावा दाखल केला. परंतू गैरअर्जदारांनी तिच्या विमा दाव्याबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही केली नाही आणि तिचा विमा दावा विनाकारण प्रलंबित ठेवला व तिला त्रुटीची सेवा दिली. म्हणून तक्रारदाराने अशी मागणी केली आहे की, तिला गैरअर्जदारांकडून विमा रक्कम रुपये 1,00,000/- देण्यात यावेत. गैरअर्जदार क्रमांक 1 कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हीसेस यांनी लेखी निवेदन दाखल केले. त्यांचे म्हणणे असे आहे की, श्री. रमेश सोनवणे यांचा विमा दावा अद्याप त्यांच्याकडे प्राप्त झाला नाही त्यामुळे त्यांना त्याबाबत काहीही सांगता येणार नाही. गैरअर्जदार क्रमांक 2 रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने लेखी निवेदन दाखल केले त्यांचे म्हणणे असे आहे की, तक्रारदाराचा कोणताही विमा दावा कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हीसेस यांच्याकडे दाखल झाला नाही. त्यामुळे तक्रारदाराला ही तक्रार दाखल करण्याचे कारण घडलेले नाही व त्यांच्या सेवेत कोणतीही त्रुटी नाही. म्हणून ही तक्रार फेटाळावी अशी मागणी विमा कंपनीने केली आहे. दोन्ही पक्षाच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात मुद्दे उत्तर 1.गैरअर्जदार क्रमांक 2 विमा कंपनीच्या सेवेत त्रुटी आहे काय ? नाही 2.आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे कारणे मुद्दा क्रमांक 1 – तक्रारदाराच्या वतीने अड.आर.व्ही.जाधव आणि गैरअर्जदार क्रमांक 2 विमा कंपनीच्या वतीने अड.पी.एम.परिहार यांनी युक्तीवाद केला. गैरअर्जदार क्रमांक 1 गैरहजर. तक्रारदाराचे पती रमेश कडूबा सोनवणे यांचे दिनांक 02.07.2008 रोजी अपघाती निधन झालेले आहे ही बाब तक्रारदाराने सादर केलेली फिर्याद नि. 4/15 व शवविच्छेदन अहवाल नि.4/16 वरुन दिसून येते. तसेच रमेश सोनवणे हे शेतकरी होते ही बाब सातबारा नि.4/11, एकूण जमिनीचा दाखला नि.4/10 आणि फेरफार नक्कल नि.4/12 आणि 4/13 वरुन स्पष्ट दिसून येते. तक्रारदाराने तिचे पती रमेश सोनवणे यांचे अपघाती निधन झाल्यामुळे तहसील कार्यालय, भोकरदन यांच्यामार्फत शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा रक्कम मिळण्यासाठी विमा दावा दाखल केला. परंतू तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार जर गैरअर्जदार क्रमांक 2 विमा कंपनीकडे महाराष्ट्र शासनाने दिनांक 14.08.2008 ते 13.08.2009 या कालावधीसाठी शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत औरंगाबाद महसुल विभागातील शेतक-यांचा विमा उतरविलेला असेल तर सदर विमा योजनेचा तक्रारदाराला लाभ मिळू शकणार नाही कारण तिच्या पतीचे निधन दिनांक 02.07.2008 रोजी म्हणजे पॉलीसी सुरु होण्यापुर्वीच झालेले होते. या शिवाय तक्रारदाराचा विमा दावा गैरअर्जदार क्रमांक 2 रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडे दाखल झालेला नाही ही बाब गैरअर्जदार क्रमांक 1 कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हीसेस यांनी देखील मान्य केली आहे. यावरुन तक्रारदाराला गैरअर्जदारांचे विरुध्द तक्रार दाखल करण्याचे कारण घडल्याचे दिसत नाही आणि गैरअर्जदारांच्या सेवेत त्रुटी असण्याचा कोणताही प्रश्न उदभवत नाही. म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर वरील प्रमाणे देण्यात आले. म्हणून खालील प्रमाणे आदेश करण्यात येतो. आदेश - तक्रारदाराची तक्रार फेटाळण्यात येते.
- तक्रारीचा खर्च दोन्ही पक्षांनी आपापला सोसावा.
- दोन्ही पक्षांना आदेश कळविण्यात यावा.
| HONORABLE Mrs. Jyoti H. Patki, Member | HONORABLE Mr. D. S. Deshmukh, PRESIDENT | , | |