(घोषित दि. 29.01.2011 व्दारा श्री.डी.एस.देशमुख,अध्यक्ष) विमा कंपनीच्या सेवेत त्रुटी असल्याच्या आरोपावरुन ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी आहे की, तिचे पती सुरेश इच्छे हे शेतकरी होते आणि त्यांचे दिनांक 07.01.2008 रोजी वाहन अपघातामध्ये निधन झाले. महाराष्ट्र शासनाने दिनांक 14.08.2008 ते 13.08.2009 या कालावधीसाठी औरंगाबाद विभागातील शेतक-यांचा गैरअर्जदार क्रमांक 2 रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत प्रत्येकी रुपये 1,00,000/- चा विमा उतरविलेला होता. सदर विमा पॉलीसीच्या कालावधीमध्येच तिचे पती सुरेश यांचे अपघाती निधन झाल्यामुळे तिने गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांच्याकडे आवश्यक कागदपत्रांसह विमा दावा दाखल केला. परंतू वारंवार मागणी करुनही गैरअर्जदारांनी तिच्या विमा दाव्याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही आणि तिचा विमा दावा विनाकारण प्रलंबित ठेवला. म्हणून तिने अशी मागणी केली आहे की, तिला गैरअर्जदारांकडून रुपये 1,00,000/- विमा रक्कम देण्यात यावी. गैरअर्जदार क्रमांक 1 कबाल इन्शुरन्स बोकींग सर्व्हीसेस प्रा.लि. यांनी त्यांचे म्हणणे सादर केले. त्यांचे म्हणणे असे आहे की, त्यांना तक्रारदाराचे पती सुरेश यांच्या अपघाती मृत्यू संदर्भातील विमा दावा दिनांक 30.05.2008 रोजी प्राप्त झाला होता. परंतू सदर विमा दावा महत्वाच्या कागदपत्रांअभावी अपूर्ण होता. म्हणून तक्रारदाराने कागदपत्रांची पुर्तता करावी यासाठी वारंवार स्मरणपत्र देण्यात आले. परंतू तक्रारदाराने कागदपत्रांची पुर्तता केली नाही. त्यामुळे अपूर्ण असलेला विमा दावा विमा कंपनीकडे पाठविण्यात आला आणि विमा कंपनीने तक्रारदाराला दिनांक 23.06.2010 रोजी कागदपत्रांची पुर्तता करण्याबाबत पत्र दिले. गैरअर्जदार क्रमांक 2 रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने लेखी निवेदन दाखल केले. त्यांचे म्हणणे असे आहे की, तक्रारदाराने दाखल केलेल्या विमा दाव्यासोबत मयताचे ड्रायव्हींग लायसन्स आणि आर.सी.बुक नव्हते. सदर कागदपत्रांची पुर्तता करण्याबाबत तक्रारदाराला पत्र देण्यात आले. परंतू अद्यापही कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली नाही. त्यामुळे तक्रारदाराच्या विमा दाव्याबाबत कोणताही निर्णया घेतलेला नसून तक्रारदाराची तक्रार अपरिपक्व आहे व तिला त्रुटीची सेवा दिलेली नाही. म्हणून ही तक्रार फेटाळावी. दोन्ही पक्षाच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात मुद्दे उत्तर 1.गैरअर्जदार क्रमांक 2 विमा कंपनीच्या सेवेत त्रुटी आहे काय ? नाही 2.आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे कारणे मुद्दा क्रमांक 1 – तक्रारदाराच्या वतीने अड.आर.व्ही.जाधव आणि गैरअर्जदार क्रमांक 2 च्या वतीने अड.पी.एम.परिहार यांनी युक्तीवाद केला. तक्रारदाराने गैरअर्जदाराकडे दाखल केलेल्या विमा दाव्याच्या अनुषंगाने तक्रारदाराला दिनांक 23.06.2010 रोजी पत्र नि. 4/2 द्वारे वाचनीय वाहन परवाना तसेच इतर कागदपत्रांची पूर्तता करण्याचे कळविण्यात आले होते. सदर पत्र तक्रारदाराने दाखल केलेले आहे. त्यानंतर तालूका कृषी अधिकारी भोकरदन यांनी तक्रारदाराला दिनांक 28.07.2010 रोजी विमा कंपनीच्या दिनांक 23.06.2010 रोजीच्या पत्राचा संदर्भ देवून कागदपत्रांची पूर्तता करण्याचे पत्र नि.4/1 द्वारे कळविले होते. विमा कंपनी आणि तालूका कृषी अधिका-याचे पत्र अनुक्रमे नि. 4/2 आणि 4/1 नुसार तक्रारदाराने विमा कंपनीकडे कागदपत्र सादर केल्याबाबत कोणताही पुरावा दिलेला नाही. तक्रारदाराने मयत सुरेश इच्छे यांचा वाहन चालविण्याचा परवाना नि. 4/16 वर दाखल केला आहे. परंतू सदर परवाना पाहता त्यामधील नोंदी वाचनीय नाहीत. म्हणून तक्रारदाराला मुळ वाहन परवाना दाखल करण्याबाबत सुचविण्यात आले होते. परंतू तक्रारदाराने मंचासमोर मुळ वाहन परवाना दाखल केला नाही. तक्रारदाराने गैरअर्जदार क्रमांक 2 विमा कंपनीच्या मागणीप्रमाणे कागदपत्रांची पूर्तता केलेली नसल्यामुळे विमा कंपनीला तक्रारदाराच्या विमा दाव्याबाबत निर्णय घेणे शक्य झाले नाही. तक्रारदाराचा विमा दावा प्रलंबित राहण्यास तक्रारदार स्वत:च कारणीभूत आहे. त्यामध्ये विमा कंपनीचा कोणताही दोष दिसून येत नाही आणि विमा कंपनीच्या सेवेत कोणतीही त्रुटी नाही असे आमचे मत आहे. म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर वरील प्रमाणे देण्यात आले. म्हणून खालील प्रमाणे आदेश करण्यात येतो. आदेश - तक्रारदाराची तक्रार फेटाळण्यात येते.
- तक्रारीचा खर्च संबंधितांनी आपापला सोसावा.
- संबंधितांना आदेश कळविण्यात यावा.
| HONABLE MRS. Rekha Kapdiya, MEMBER | HONORABLE Mr. D. S. Deshmukh, PRESIDENT | HONORABLE Mrs. Jyoti H. Patki, Member | |