निकाल
दिनांक- 21.06.2013
(द्वारा- श्रीमती माधुरी विश्वरुपे, सदस्य)
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे आहे.
तक्रारदारांचे पती महादेव बाजीराव चाटे हे शेतकरी असून दि.05.03.07 रोजी विजेचा धक्का बसल्यामुळे मृत्यू पावले. तक्रारदारांनी सदर धटनेची माहिती अंबाजोगाई पोलीस स्टेशन यांना दिली. पोलीसांनी घटनेची चौकशी व तपास करुन मृत्यूची नोंद केली, मयत व्यक्तीचा पंचनामा केला.
तक्रारदारांनी पतीच्या मृत्यूनंतर शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत विमा प्रस्ताव तहसिल कार्यालय अंबाजोगाई मार्फत गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचेकडे दाखल केला अद्याप पर्यंत विमा प्रस्ताव मंजूर केला नाही अशी तक्रारदारांची तक्रार आहे.
गैरअर्जदार क्र.1 यांच्या लेखी खुलाशानुसार तक्रारदारांचा प्रस्ताव दि.03.08.07 रोजी प्राप्त झाल्यानंतर दि.10.09.07 रोजी गैरअर्जदार क्र.2 विमा कंपनीकडे पाठविण्यात आला. गैरअर्जदार क्र.2 विमा कंपनीने विमा प्रस्ताव दि.02.01.08 रोजीच्या पत्रान्वये नामंजूर केला.
गैरअर्जदार क्र.2 यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदारांचे पती महादेव बाजीराव चाटे यांनी त्यांच्या मौजे वरवटी ता.अंबाजोगाई येथील गट नं.348 मधील शेतात असलेल्या कृषी पंपाचे वीज कनेक्शन बिल न भरल्यामुळे वितरण कंपनीने कायमचे बंद केले. त्यामुळे दि.05.03.07 रोजी चुलत भावाच्या कृषी पंपाचे वीज पेटीमधून अनधिकृतरित्या केबल वायरद्वारे वीज पुरवठा घेण्याचा प्रयत्न केला असता सदरची वीज चोरी करत असताना केबल वायरचे दोन्ही वीजभारीत टोके त्यांचे हाताला स्पर्श होवून वीजेचा धक्का लागून मयत झाले.
तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्र, गैरअर्जदार क्र.1, 2 यांचे लेखी म्हणणे व दाखल कागदपत्र यांचे सखोल वाचन केले. तसेच तक्रारदाराचे विद्वान वकील श्री.पावसे आणि गैरअर्जदार क्र.2 विमा कंपनीचे विद्वान वकील श्री.वाघमारे यांचा युक्तीवाद ऐकला.
तक्रारदारांचे पती श्री.महादेव बाजीराव चाटे हे शेतकरी असून वीजेचा धक्का बसल्यामुळे दि.05.03.07 रोजी मृत्यू पावले. गैरअर्जदार क्र.2 विमा कंपनीने दि.02.01.08 रोजी पत्रान्वये तक्रारदारांनी अनधिकृतपणे वायर कनेक्शन करताना ते धोकादायक असल्याबाबतची माहिती असूनही घेण्याचा प्रयत्न केला. सदरची बाब विमा योजनेअंतर्गत समाविष्ठ नाही. त्यामुळे तक्रारदारांच्या प्रस्तावाची फाईल बंद केली आहे. परंतू तक्रारदारांना गैरअर्जदार विमा कंपनीने दि.02.01.08 रोजीचे पत्र पाठवल्याबाबतचा व पोच झाल्याचा कोणताही पुरावा न्यायमंचासमोर नाही. सदर पत्रावर विमा कंपनीच्या कार्यालयाचा जावक क्रमांकही दिसून येत नाही. तक्रारदारांना दि.02.01.08 रोजीचे पत्र प्राप्त न झाल्यामुळे प्रस्तावाबाबतची कोणतीही माहिती मिळाली नसल्याचे स्पष्ट होते. अशा परिस्थितीत तक्रारदारांची तक्रार दाखल करण्यास सतत कारण घडत असल्यामुळे तक्रारदारांची तक्रार विहीत मुदतीत दाखल केली आहे असे न्यायमंचाचे मत आहे.
तक्रारदारांनी पतीच्या मृत्यूनंतर सदर योजनेअंतर्गत शासनाच्या परिपत्रकातील निर्देशानुसार विहीत मुदतीत व आवश्यक कागदपत्रांसहीत प्रस्ताव दाखल केला आहे. गैरअर्जदार यांनी प्रस्तावाबाबतची माहिती तक्रारदारांना देणे बंधनकारक आहे असे न्यायमंचाचे मत आहे.
गैरअर्जदार क्र.2 विमा कंपनीने विद्युत निरीक्षक यांनी दि.22.06.07 रोजी दिलेला अहवाल सदर प्रकरणात दाखल केला आहे. तक्रारदारांचे पती दि.05.03.07 रोजी चुलत भावाचे कृषी पंपाचे वीज कनेक्शन पेटीमधून अनधिकृतपणे केबल वायरद्वारे वीज पुरवठा घेण्याचा प्रयत्न केला असता अनावधानाने केबल वायरची दोन्ही वीजभारीत टोके त्यांच्या हाताला स्पर्श होवून त्यांचा प्राणांतिक विद्युत अपघात घडला. सदर प्रकरणी भा.वि.नि.1956 चे नियम क्र.29 चा भंग झाला असून सदर अपघातास अपघातग्रस्त व्यक्ती श्री.महादेव बाजीराव चाटे जबाबदार आहेत.
तक्रारीतील कागदपत्रे पाहता तक्रारदारांचे पतीचा मृत्यू इलेक्ट्रीक शॉक लागून झाल्याचे स्पष्ट होते. परंतू विद्युत निरीक्षक यांचे दि.22.06.07 रोजीचे पत्राचे अवलोकन केले असता सदरचा अहवाल राम महादेव चाटे यांनी दि.24.05.07 रोजी दिलेल्या अर्जावरुन दिल्याचे दिसून येते. श्री.महादेव बाजीराव चाटे यांना दि.05.03.07 रोजी इलेक्ट्रीक शॉक लागला. यावरुन सदर घटनेनंतर दोन महिन्यानंतर दिलेल्या अर्जावरुन अहवाल दिलेला आहे. सदर घटनेची चौकशी विद्युत निरीक्षक यांनी अपघातानंतर 3 महिन्याचे विलंबानंतर केल्याचे दिसून येते. श्री.महादेव चाटे हे अनधिकृतपणे वायरची जोडणी करत असताना मृत्यू पावल्याबाबतचा अहवाल कोणत्या आधारावर दिला याबाबत खुलासा नाही, पंचनामा नाही, साक्षीदारांचे जबाब नाही. त्यामुळे सदरचा अहवाल ग्राहय धरणे उचित नाही असे न्यायमंचाचे मत आहे. विमा कंपनीने सदरचा प्रस्ताव एम.एस.ई.बी. च्या अहवालास अनुसरुन नाकारला आहे. तक्रारीत आलेल्या पुराव्यावरुन तक्रारदारांनी अनधिकृतपणे वायर जोडणी करताना अपघात झाल्याची बाब स्पष्ट होत नाही असे न्यायमंचाचे मत आहे. त्यामुळे गैरअर्जदार यांनी अयोग्य कारणास्तव तक्रारदारांचा प्रस्ताव नामंजूर केल्याचे स्पष्ट होते.
तक्रारदारांचे पती शेतकरी असून त्यांचा अपघाती मृत्यू झाल्याची बाब स्पष्ट होत असल्यामुळे तक्रारदार सदर योजनेअंतर्गत विमा लाभ घेण्यास पात्र आहेत असे न्यायमंचाचे मत आहे.
वरील परिस्थतीचे अवलोकन केले असता तक्रारदारांना सदर योजनेअंतर्गत देय असलेली नुकसान भरपाईची रक्कम रु.1,00,000/- देणे उचित होईल असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब, न्यायमंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
आदेश 1) गैरअर्जदार क्र.2 विमा कंपनीला आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांना
शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत विमा लाभ रक्कम
रु.1,00,000/- (अक्षरी रुपये एक लाख) आदेश मिळाल्यापासून
30 दिवसात द्यावी..
2) वरील आदेश क्रमांक 1 मधील रक्कम विहीत मुदतीत अदा न
केल्यास 9% व्याजदरासहीत द्यावी.
3) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम
20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत
करावेत.
श्रीमती माधूरी विश्वरुपे, श्रीमती नीलिमा संत,
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड