(घोषित दि. 20.06.2011 व्दारा श्री.डी.एस.देशमुख,अध्यक्ष) विमा कंपनीच्या सेवेत त्रुटी असल्याच्या आरोपावरुन ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. थोडक्यात तक्रारदाराची तक्रार अशी आहे की, तिचे पती सदाशिव हे शेतकरी होते. त्यांचे दिनांक 04.04.2008 रोजी विहिरीत काम करीत असताना डोक्यावर क्रेन पडल्यामुळे गंभीर दुखापत होऊन निधन झाले. मयत सदाशिव यांचे निधन महाराष्ट्र शासनाने गैरअर्जदार क्रमांक 2 रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी यांच्याकडे अपघाती विमा योजने अंतर्गत उतरविलेल्या विमा पॉलीसी कालावधीमध्येच झालेले असल्यामुळे तिने दिनांक 07.07.2008 रोजी तालूका कृषी अधिका-या मार्फत आवश्यक कागदपत्रांसह गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांच्याकडे विमा दावा दाखल केला होता. परंतू गैरअर्जदारांनी तिचा विमा दावा जाणिवपुर्वक प्रलंबित ठेऊन तिला विमा रक्कम देण्यास टाळाटाळ केली. म्हणून तक्रारदाराने अशी मागणी केली आहे की, तिला गैरअर्जदारांकडून शेतकरी अपघात विमा योजनेनुसार रक्कम रुपये 1,00,000/- नुकसान भरपाई म्हणून व्याजासह देण्यात यावे. गैरअर्जदार क्रमांक 1 कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हीसेस प्रा.लि. यांनी लेखी निवेदन दाखल केले. त्याचे म्हणणे असे आहे की, सदाशिव गवळी यांचे दिनांक 04.04.2008 रोजी झालेल्या अपघाती मृत्यू संदर्भात दिनांक 16.08.2008 रोजी विमा दावा प्राप्त झाला होता. परंतू विमा दाव्यासोबत बँकेचे पासबुक, तहसीलदार व तलाठयाचे प्रमाणपत्र , 7/12 आणि 6 क नव्हते. म्हणून तक्रारदाराला कागदपत्रांची पुर्तता करण्याबाबत पत्र देण्यात आले. तसेच दिनांक 23.06.2010 रोजी विमा कंपनीने देखील तक्रारदाराला कागदपत्रांची पुर्तता करण्याबाबत पत्र दिले. परंतू तक्रारदाराने कागदपत्रांची पुर्तता केली नाही. म्हणून दिनांक 24.11.2010 रोजी गैरअर्जदार क्रमांक 2 रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने तक्रारदाराचा विमा दावा बंद केला. गैरअर्जदार क्रमांक 2 रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने लेखी निवेदन दाखल केले. त्यांचे म्हणणे असे आहे की, तक्रारदाराने विमा दाव्यासोबत आवश्यक कागदपत्र दाखल केले नव्हते. म्हणून तक्रारदाराला कागदपत्रांची पुर्तता करण्याबाबत वारंवार पत्र देण्यात आले. परंतू तक्रारदाराने कागदपत्रांची पुर्तता केली नाही. म्हणून तक्रारदाराचा विमा दावा नामंजुर करण्यात आला. तक्रारदाराने कागदपत्रांची पुर्तता केलेली नसल्यामुळे तिला विमा रक्कम देण्याचा प्रश्न निर्माण होत नाही व तिला त्रुटीची सेवा दिलेली नसल्यामुळे ही तक्रार फेटाळावी अशी मागणी विमा कंपनीने केली आहे. दोन्ही पक्षाच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात मुद्दे उत्तर 1.गैरअर्जदार क्रमांक 2 विमा कंपनीच्या सेवेत त्रुटी आहे काय ? होय 2.आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे कारणे मुद्दा क्रमांक 1 – तक्रारदाराच्या वतीने अड.आर.एस.अंभोरे आणि गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्या वतीने अड.पी.एम.परिहार यांनी युक्तीवाद केला. तक्रारदाराचे पती सदाशिव गवळी हे शेतकरी होते, ही बाब तक्रारदाराने सादर केलेले 7/12, गाव नमुना नंबर 8 अ आणि गाव नमुना 6 क वरुन स्पष्ट दिसुन येते. तक्रारदाराचे पती मयत सदाशिव यांचे दिनांक 04.04.2008 रोजी विहीरीत कामकरीत असताना विहीरीत पडल्यामुळे डोक्याला मार लागून निधन झाले होते, ही बाब एफ.आय.आर., इनक्वेस्ट पंचनामा, घटनास्थळ पंचनामा व शवविच्छेदन अहवालावरुन दिसून येते. तक्रारदाराचे पती मयत सदाशिव यांचे दिनांक 04.04.2008 रोजी अपघाती निधन झाले त्यावेळी महाराष्ट्र शासनाने शेतक-यांचा शेतकरी अपघात विमा पॉलीसी अंतर्गत गैरअर्जदार क्रमांक 2 रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडे विमा उतरविलेला होता. विमा कालावधीमध्येच मयत सदाशिव यांचे अपघाती निधन झाल्यामुळे तक्रारदाराने तालूका कृषी अधिका-यामार्फत गैरअर्जदार क्रमांक 1 कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हीसेस यांच्याकडे शेतकरी अपघात विमा योजनेनुसार नुकसान भरपाई मिळावी म्हणून विमा दावा दाखल केला होता. तो विमा दावा कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हीसेस प्रा.लि. यांच्याकडे दिनांक 16.08.2008 रोजी प्राप्त झाला होता. तक्रारदाराचा विमा दावा मिळाल्यामुळे गैरअर्जदार क्रमांक 1 कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हीसेस यांनी तक्रारदाराकडे काही कागदपत्रांची मागणी केली होती. त्यानुसार दिनांक 05.12.2009 रोजी तक्रारदाराने तालूका कृषी अधिकारी जाफ्राबाद जि.जालना यांच्याकडे कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हीसेस प्रा.लि. यांना देण्यासाठी कागदपत्र दिले होते ही बाब तक्रारदाराने दाखल केलेले पत्र नि.03/1 वरुन दिसुन येते. गैरअर्जदार क्रमांक 2 रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने दिनांक 24.11.2010 रोजी तक्रारदाराचा विमा दावा कागदपत्रांची पुर्तता न केल्याच्या कारणावरुन फेटाळला. परंतू तक्रारदाराच्या विमा दाव्यासोबत कोणते कागदपत्र नव्हते याचा काहीही खुलासा गैरअर्जदार क्रमांक 2 विमा कंपनीने केलेला नाही. विमा कंपनीने तक्रारदाराकडे विमा दावा निकाली काढण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची मागणी केल्याचे दिसुन येत नाही. विमा कंपनीने तशा प्रकारचा कोणताही पुरावा दिलेला नाही. कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हीसेस यांनी तक्रारदाराला दिनांक 08.12.2008 रोजी तहसीलदार जाफ्राबाद यांच्या मार्फत कागदपत्रांची पुर्तता करावी असे पत्र दिल्याचे म्हटले आहे. त्या संदर्भाचे पत्र तक्रारदाराला मिळाल्याचा कोणताही पुरावा नाही. तक्रारदाराचा अपूर्ण असलेला विमा दावा ज्यावेळी कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हीसेस यांनी गैरअर्जदार क्रमांक 2 विमा कंपनीकडे पाठविला तेव्हा गैरअर्जदार क्रमांक 2 विमा कंपनीने विमा दाव्यासोबत जी कागदपत्र नाहीत त्या बाबतची मागणी तक्रारदाराकडे करणे आवश्यक होते. परंतू विमा कंपनीने तक्रारदाराकडे कोणत्याही कागदपत्रांची मागणी न करता किंवा तक्रारदाराला अपूर्ण कागदपत्रांविषयी कोणतीही सुचना न देता तिचा विमा दावा फेटाळला ही बाब अत्यंत चुकीची असुन, तक्रारदाराचे पती शेतकरी होते हे तक्रारदाराने सादर केलेल्या कागदपत्रांवरुन सिध्द् होते. तसेच तिच्या पतीचे विमा कालावधीमध्येच अपघाती निधन झाले होते ही बाब देखील तक्रारदाराने सादर केलेल्या कागदपत्रांवरुन सिध्द् झालेली आहे. तक्रारदाराला शेतकरी अपघात विमा योजनेनुसार गैरअर्जदार क्रमांक 2 विमा कंपनीने तिच्या पतीच्या अपघाती मृत्यु संदर्भात नुकसान भरपाई देणे आवश्यक असताना आणि तक्रारदाराने कागदपत्रांची पुर्तता केलेली असुनही गैरअर्जदार क्रमांक 2 विमा कंपनीने तक्रारदाराचा विमा दावा फेटाळून तिला निश्चितपणे त्रुटीची सेवा दिलेली आहे. म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर वरील प्रमाणे देण्यात आले. म्हणून खालील प्रमाणे आदेश करण्यात येतो. आदेश - तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
- गैरअर्जदार क्रमांक 2 रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने तक्रारदाराला रुपये 1,00,000/- (रुपये एक लाख फक्त.) दिनांक 24.11.2010 पासून पुर्ण रक्कम देईपर्यंत द.सा.द.शे. 9 % व्याज दाराने निकाल कळाल्यापासून एक महिन्याचे आत द्यावेत.
- गैरअर्जदार क्रमांक 2 रिलायान्स जनरल इन्शुरन्स कंपनीने तक्रारदाराला मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रुपये 1,000/- तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 1,000/- असे एकूण रुपये 2,000/- (रुपये दोन हजार फक्त.) निकाल कळाल्यापासून एक महिन्याचे आत द्यावेत.
- संबंधितांना आदेश कळविण्यात यावा.
सौ.माधूरी विश्वरुपे डी.एस.देशमुख सदस्या अध्यक्ष
| HONABLE MRS. Sow. Madhuri Vishwarupe, MEMBER | HONORABLE Mr. D. S. Deshmukh, PRESIDENT | , | |